स्त्री ही खरंच स्वतंत्र आहे का?

नवरा-बायकोच्या नात्यांत मैत्री असेल तर बरेच प्रश्न सुटू शकतात. प्रत्येकच नात्यांत हा मैत्रीचा पाया असेल तर बरेच प्रश्न सुटतील. मैत्रीत आपण अधिक मोकळे होतो, अधिक स्पष्ट होतो आणि अधिक समंजसही होतो.

  • प्रतिक पुरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, की ‘गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या तरच तो बंड करून उठेल.’ या वाक्यातील ‘जाणीव’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अनेकांना ती जाणीवच असत नाही त्यामुळे आपलं काही चुकतंय हेच त्यांना मान्य नसतं. आता सध्याच्या पिढीतील भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत ही कसोटी लावून काही उदाहरणं बघितली तरी हे खरं स्वातंत्र्य आहे की छुपी गुलामी आहे ते लक्षांत येईल. स्त्री-पुरुष समानतेचा नारा आज आपण देतो व तसं आपण वागतो असंही अनेकांचं म्हणणं असतं. ही समानता लग्नाच्या दृष्टीनं पाहिली तरी असं दिसून येईल की यात वर्चस्व हे पुरुषांचच आहे. बायका आपल्या नवऱ्यांना अजूनही अहोजाहो करतात, ज्या करतात त्यांचे नवरे त्यांना अहोजाहो करतात का? काही पुरोगामी नवरे आपल्या बायकांना घरी अरेतुरे करण्याची परवानगी देतात (परवानगी शब्द इथे महत्त्वाचा आहे) पण बाहेर मात्र त्यांना तसं केलेलं आवडत नाही. बायकांनी आपल्या कोणत्या मित्रांशी बोलायचं, कोणत्या मैत्रिणीला घरी आणायचं याबाबत नवऱ्याचं मत विचारात घेतलं जातं. बायकोनं गळ्यात मंगळसूत्र घालावं, हातात बांगड्या घालाव्यात, कपाळावर टिकली तरी लावावी, ते तिच्या सौभाग्याचं लक्षण आहे असं सातत्यानं ठसवलं जातं. सात जन्म एकच नवरा मिळण्यासाठी बायकांनीच पुजा करायची, एखादीनं म्हटलं की मला नाही करायची पूजा, मला नकोय तू पुढच्या जन्मी नवरा म्हणून, तर किती नवऱ्यांना ते आवडणार आहे? किती बायकांना या सर्व गोष्टींत काही वावगं वाटत नाही?

संबंधित लेख : #माझीटिकली #माझीमर्जी ‘भिडेंविरोधात महिला पत्रकार आक्रमक’

लग्नाच्या बाजारात आता मुलींच्या दिसण्याला फार महत्त्व दिलं जात नाही असं म्हटलं जातं. पण ते महत्त्व आता तिच्या कमाईला आलं आहे हे विसरून चालणार नाही. त्यातही तिचा पगार आपल्यापेक्षा कमीच हवा, ती जिथे नोकरी करते तिथल्या पुरुष सहकाऱ्यांशी तिनं फार मिळून मिसळून वागू नये अशी तिच्यावर बंधनं नसतात का? या सर्व प्रश्नांच्या मागे आपल्या बायकोनं आपलंच ऐकावं ही पुरुषी मानसिकता तर असतेच पण त्या बाईला देखिल तिच्या नवऱ्याचं असं वागणं सहसा खटकत नाही, कारण तो आपला नवरा आहे त्यानं अशा अपेक्षा बाळगण्यात काही चूक नाही, तेव्हा आपणच तडजोड करावी, हे सतत तिच्यावर ठसवलं गेलेलं असतं आणि तिलाही तेच योग्य वाटायला लागतं. निदान ती विरोध तरी करत नाही. सोसत राहते. कधी तिच्या संसारासाठी, कधी मुलांसाठी, कधी आपल्या माहेरच्यांसाठी, कधी समाजासाठी. पण मग ही काय फक्त स्त्रीचीच जबाबदारी असते का? संसार घर हे काय फक्त बाईचंच असतं का? पुरुषाची काहीच जबाबदारी नसते का? त्यामुळे पहिला मुद्दा हा की तिला आपल्या गुलामीची जाणीव आहे का हा आहे. दुसरं म्हणजे ती ज्याला आपलं स्वातंत्र्य समजते आहे ते खरं स्वातंत्र्य आहे का हा मुद्दा.

आपल्या देशांत मनूस्मृतिच्या नावाखाली करोडो लोकांना जाच सहन करावा लागला आहे. पण दुःखाची गोष्ट अशी की हा जाच नसून धर्म आहे असं इथल्या लोकांचं ठाम मत आहे. त्याचे संस्कार इतके गडद आहेत की ते जणू आपल्या रक्तातच भिनले गेले आहेत आणि त्यात कोणालाच काही चूक वाटत नाही. मनू सांगतो की स्त्रीला स्वातंत्र्य नाही. मुलगी असेल तर पिता, बहिण असेल तर भाऊ, पत्नी असेल तर पती, आई असली की मुलगा हे सारे पुरुषच तिचं रक्षण करतील, तिच्या जगण्याचे निर्णय घेतील आणि तिनं ते पाळायचे. त्याविरूद्ध वागायचं नाही. कारण तिला स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्त्व नाही. ही गोष्ट आपण अगदी आजही घरोघरी पाहू शकतो की नवरा बायकोवर डाफरतो, पोरगा आईवर ओरडतो, भाऊ आपल्या बहिणीवर हक्क गाजवतो आणि पिता आपल्या पोरीच्या आयुष्याचे निर्णय घेतो. या सर्वांना त्या बाईला काय वाटतं हे विचारण्याची गरज वाटत नाही. त्यांनाही दूर्दैवानं आपण आपलं काही मत द्यावं असं वाटत नाही. आता नक्कीच परिस्थिती बदलत आहे पण पूर्णपणे बदलली आहे असं मात्र नाही. कारण कुठेनाकुठे जेव्हा कसोटीची वेळ येतो तेव्हा पुरुषच नव्हे तर स्त्रीदेखिल त्यात अपयशीच होते. पुरुषाला आपला अहंकार सोडवत नाही आणि स्त्रीला बंड करणं जमत नाही.

संबंधित लेख : स्त्री ही पुरुषांची मालमत्ता आहे का?

स्त्री स्वातंत्र्याची अशी एक परीक्षा होते ती तिच्या लग्नाच्या वेळी. लग्नाच्या वेळी अनेक पुढारलेल्या मुलींना आपली जात आठवते. अनेक पुढारलेले आई-बाप आपल्या मुलीनं किंवा मुलानं परजातीतल्या किंवा परधर्मांतल्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम केलं तर ते घराण्याच्या इभ्रतीनं पेटून उठतात. किती वेळा संभोग करायचा, आपल्याला मुल होऊ द्यायचं की नाही, कधी होऊ द्यायचं, मुलगा की मुलगी यात पत्नीचा कितपत सहभाग असतो यावरूनही हे कळून येईल. अनेक ठिकाणी असं दिसतं की नवरा किंवा बायको हे बाहेर फार पुढारलेपणाच्या गोष्टी करतात पण घरी मात्र त्यांचं अगदी उलट वर्तन असतं. त्यांचं पुढारलेपण, त्यांचा पुरोगामीपणा हा निवडक स्वरुपाचा असतो. त्यांना ज्या सुधारणा अडचणीच्या वाटत नाहीत तिथे त्या केल्या जातात पण अडचणीत आणणाऱ्या सुधारणा मात्र या ना त्या कारणानं टाळल्या जातात. समानतेचा हा दुतोंडी चेहरा तर समाजात अनेक ठिकाणी बघायला मिळतो. पुरुषांची व्यसनं आणि स्त्रियांची व्यसनं याकडे आपण कसे पाहतो त्यातूनही ही गोष्ट कळून येते. पुरुषांच्या व्यसनाला प्रतिष्ठा असते पण स्त्रीच्या व्यसनानं मात्र कलीयुग आल्याची हाकाटी पेटवली जाते. धर्म रक्षणाची, परंपरा चालवण्याची जबाबदारी बहुतेक स्त्रियांच्या माथीच मारली जाते. आपल्या स्त्रीनं आपल्या आवडी निवडी आपल्यासारख्याच ठेवायच्या किंवा आपल्या इच्छेनेच बदलायच्या हा आग्रह पुरुष धरतात. तिनं एखादी विरोधी इच्छा प्रकट केली तर त्याला अपमान वाटतो किंवा तिचं आपल्यावर प्रेम नाही असं वाटतं. व्यक्ति म्हणून तिला तिच्या स्वतःच्या अशा स्वतंत्र आवडी नावडी असू शकतात याचा विचार किती जण करतात?

आज जे लोक आपल्याला सुधारलेले मानतात, ते उद्या आपल्या मुलांच्या व मुलींच्या बाबतीत किती वेळा सुधारलेलं वर्तन करतात? नवऱ्यानं नोकरी सोडून काही वेगळं काम करायचं ठरवलं तर अनेक बायका त्याला तसं ते करू देत नाही. तेही तेव्हा जेव्हा त्या स्वतः कमावत असतात. आपला नवरा बायकोच्या जीवावर जगतो असं लोक म्हणतील, (ते म्हणतातच) आणि याची त्यांना लाज वाटते. बायकोनं नोकरी करणं आणि नवऱ्यानं घर सांभाळणं हे घडत नाही कारण ती आपली मानसिकता नाही. त्यात पुरुषाला आपला अपमान वाटतो आणि बाईला लाज वाटते. इथे दोघेही चूकतच आहेत पण त्याची जाणीव त्यांना सहसा नसते. अशी शेकडो उदाहरणं आहेत ज्यांतून दिसून येईल की अजूनही स्त्री असो वा पुरुष, दोघेही पूर्णपणे स्वतंत्र झाले आहेत असं म्हणता येणार नाही. दुसरं असं की हे स्वातंत्र्य सातत्यपूर्ण हवं. ती अधिकच अवघड बाब असते. आपल्याला अजून बरीच मजल गाठायची आहे. पण आपण त्यादिशेनं आज विचार करतोय ही देखिल आश्वासक बाब आहे आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला निश्चितच दिसतील. नवरा-बायकोच्या नात्यांत मैत्री असेल तर बरेच प्रश्न सुटू शकतात. प्रत्येकच नात्यांत हा मैत्रीचा पाया असेल तर बरेच प्रश्न सुटतील. मैत्रीत आपण अधिक मोकळे होतो, अधिक स्पष्ट होतो आणि अधिक समंजसही होतो. यामुळे स्त्री-पुरुषांमधील सर्व समस्या सुटतील असं नाही. कारण त्यामागे इतर अनेक घटकही कारणीभूत असतात जे दूर करणं ही फार कठीण गोष्ट आहे. पण आपण प्रयत्नच केले नाहीत तर मात्र काहीच होणार नाही. त्या प्रयत्नांसाठी मैत्री हा एक चांगला उपाय असू शकतो हे मी निश्चित म्हणेन.

संबंधित लेख : मर्द, मर्दानी व मर्दानगी…

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here