सत्यकाम जाबालीपासून नीना गुप्ता, सुष्मिता सेनपर्यंत…

परिस्थितीमुळे हतबल होऊन एकल मातृत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्त्रियांपासून जाणीवपूर्वक मूल दत्तक घेणाऱ्या एकट्या आईपर्यंतचा बदल समाजाने स्वीकारला आहे. डोळसपणे दखल घ्यावी, असा एकल मातांचा एक मोठा समूह समाजामध्ये आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये हे आव्हान पेलणाऱ्या एकल मातांविषयी…

  • प्रतिक पुरी

आपल्या अवतीभवती आपण अनेक अशी कुटुंबं पाहतो की जिथे मुलांचा सांभाळ त्यांची आईच करते. वडीलांचं निधन झालेलं असतं किंवा त्यांनी घटस्फोट घेतलेला असतो किंवा पळून गेलेले असतात. बऱ्याच ठिकाणी नवरा असूनही त्याचा बायकोला व मुलांना उपयोग नसतो. तो व्यसनी असतो, गुन्हेगार असतो, बेरोजगार असतो किंवा आजारी असतो आणि त्याचं घरात कधीच लक्ष नसतं. अशा सर्वंच ठिकाणी घरातली बाईच घर सांभाळत असते. आपण यांना एकल माता म्हणू शकतो. पण मी ज्या एकल मातांविषयी इथं बोलणार आहे त्या यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. या त्या स्त्रिया आहेत ज्यांनी लग्न केलेलं नाही पण मुल दत्तक घेतलं तरी आहे किंवा कोणाकडून तरी स्वतःला करवून घेतलं आहे. त्या मुलाचा पिता कोण आहे हे त्यांनी जाहिर केलेलं नाही. अगदी जाणीवपूर्वक त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपण या एकल मातांविषयी बोलणार आहोत.

आपल्या प्राचीन इतिहासांत याचे दाखले आहेतच. सत्यकाम जाबाली हे त्यांतील एक प्रसिद्ध उदाहरण. सत्यकाम त्याच्या आईच्या जबालाच्या नावावरूनच ओळखला जातो. त्याच्या वडीलांची त्याला माहिती नव्हती. त्यानं त्याची तमा बाळगली नाही की तेव्हाच्या समाजानंही त्याचा अस्विकार केला नाही. पूर्वी अशी प्रथा होती की स्त्री रजस्वला झाली म्हणजे ती वयात आली की ऋतूस्त्रावाच्या या काळात ती कोणाही आवडीच्या पुरुषाला संभोगदान मागू शकायची. तिचा ऋतूस्त्राव वाया जाऊ नये ही त्यामागची भूमिका होती. अर्थात लोकसंख्या वाढावी हा हेतूही त्यामागे असेल हे उघडच आहे. ती प्रथा नंतरच्या काळात बंद पडली. पण आईच्या नावावरून मुलांची ओळख होणं बंद झालं नाही. महाभारतात कुंतीनं संभोगदान मागून पुत्र मिळवले ते कौंतेय म्हणून ओळखले गेले. पण त्यांना समाजमान्यता मिळण्यासाठी पांडव म्हणून ओळख द्यावी लागली. एकल मातांची फरफट त्यानंतरच्या काळात झपाट्यानं होत गेली. ती प्रथाच बंद पडली. बिनबापाचं पोर सांभाळण्याचा अधिकारही तिला राहिला नाही. शक्यतो इतरांच्या आश्रयानंच तिला आपली मुलं सांभाळावी लागली. मग जाणीवपूर्वक लग्न न करताच मातृत्त्वाचं सुख घेण्यासाठी एकतर दत्तक मुल घेणं किंवा त्याहीपेक्षा कोणाकडून तरी गर्भधारणा करून घेत त्या मुलाला जन्म देऊन त्याचा सांभाळ करणं ही अतिशय धाडसाची गोष्ट आहे. कारण आपल्या समाजाच्या व लोकांच्या मानसिकतेत या गोष्टी न बसणाऱ्या आहेत. त्या धर्मविरोधी समाजसंस्कृती विरोधी मानल्या जातात. नीना गुप्ता यांनी व्हिव रिचर्डसन यांच्याकडून मातृत्त्वाचं सुख मिळवलं आणि आपल्या मुलीला एकट्यानंच मोठं केलं. सुष्मिता सेन यांनीही मुलगी दत्तक घेतली, त्यांनी लग्न नाही केलं.

अपत्यासाठी लग्न करण्याची गरज नाही हा यातला पहिला मुद्दा. एखाद्या स्त्रीला, जी सक्षम आहे, तीनं जर असा निर्णय घेतला की मला लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही पण मला मुल हवंय आणि त्याचा सांभाळ करण्यास मी सक्षम आहे तर यात समाजानं विरोध करण्यासारखं काय आहे? यात तत्त्वतः चूकीचं काहीच नाही. पण समाजाच्या पचनी मात्र ही गोष्ट पडणार नाही. कायदादेखील अशा एकल मातांच्या बाजूनं उभा राहत नाही. तो अगदीच विरोधात जातो असंही नाही. पण आपल्या इथे वडीलांच्या नावाशिवाय कोणतीही कागदपत्रं बनली जात नाहीत तिथे या एकल मातांच्या मुलांना त्रास होणार हे निश्चित. आत्ता कुठे आपण आईच्या नावाला महत्त्व देतोय पण फक्त तिच्या नावावरूनच मुलांना दाखले सहजपणे मिळायला अजून बराच काळ जावा लागेल.

संबंधित वृत्त :

कायदा एकवेळ बदलेलही पण समाजाची मानसिकता बदलणं ही खूप कठीण गोष्ट असते. त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. एक स्त्री ही आधी एक व्यक्ती असते. ती जर आपल्या पायावर समर्थपणे उभी असेल, मानसिक व शारिरिकदृष्ट्या स्वतःचा व आपल्या मुलांचा सांभाळ करण्यास समर्थ असेल तर तिला मूल कसं हवंय व कोणत्या परिस्थितीत हवं याचा निर्णय घेण्यास ती स्वतंत्र आहे. इथं शारिरीकदृष्ट्या समर्थ असणे याचा अर्थ अपंग व्यक्ति तशा नसतात असा नाही. अंध, व्यंग असलेल्या व्यक्तिही आपल्या मुलांचा उत्तमपणे सांभाळ करू शकतात. शारिरीक असमर्थता म्हणजे जे स्वतःचाही सांभाळ करण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत असे लोक. व्यसनी लोकांचाही यात समावेश होतो. मातृत्त्वाची आस जर कोणा स्त्रीला लागली असेल तर तो तिचा मूलभूत अधिकार आहे ज्याची पूर्तता ती तिला हव्या त्या पद्धतीनं करण्यास स्वतंत्र आहे. त्यासाठी लग्न करायलाच हवं ही अट चूकीची आहे. किंवा तिचं लग्नही झालेलं नाही आणि ती माताही होऊ शकत नाही याचा अर्थ ती मुल सांभाळण्यास असमर्थ आहे असा घेणे हाही तिच्यावर अन्यायच आहे.

हे झालं तिच्या मातृत्त्वाच्या अधिकारांविषयी. पण एकदा ती अशी एकल माता झाल्यावर समाजाचा तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टीकोन असतो त्याच्यातही बदल होणं गरजेचं आहे. विशेषतः पुरुषांच्या दृष्टीकोनात. एकटी बाई आहे, तिच्यासोबत कोणी पुरूष नाही याचा अर्थ ती उपलब्ध आहे असा होत नाही. याचा अर्थ आपलं मुल वाढवण्यासाठी तिला पुरुषाची गरज आहे असा होत नाही. विशेषतः या मदतीच्या नावाखाली अनेक पुरुषांना आपले छुपे हेतू पूर्ण करायची संधी मिळू शकते असाही समज होतो. शिवाय हेही की तीनं आपली मदत घ्यावी इतर पुरुषाची घेऊ नये किंवा तीनं आपल्याला नाकारलं तर तीनं अन्य पुरुषांनाही नाकारायलाच हवं, तिला अन्य पुरुषांसोबत वागण्याबोलण्याचा अधिकार नाही असाही याचा अर्थ होत नाही. तीनं कोणाला जवळ करायचं की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तिलाच आहे. तीनं लग्न करून मिळणारा आपला हक्काचा पुरुष नाकारला म्हणून आपल्या पुरुष मित्रांनाही नाकारायचं असा याचा अर्थ होत नाही. किंवा तीनं पुरुष नाकारला ना मग आता आम्ही तिला कोणतीही मदत करणार नाही असा पवित्रा जर तिच्या सानिध्यातले अन्य पुरुष घेत असतील तर तेही चूकीचं ठरेल. या सर्व गोष्टी आधी पचणं आणि नंतर त्यानुसार वागणं ही आजच्या काळातील पुरुषांसाठीही थोडी अवघड गोष्ट आहे यात शंका नाही. पण सध्याचं वातावरण लक्षांत घेता आपण अशी आशा नक्की करू शकतो की अशा विचारांचे पुरुष एकदमच दूर्मिळ नाहीत.

हे केवळ एकल मातांबाबतच नाही तर एकल पित्यांबाबतही लागू पडतं. समलिंगी माता पित्यांबाबतही लागू पडतं. कारण आपल्याला मुल हवं असणं ही एक निखळ नैसर्गिक भावना आहे ज्यात काहीच गैर नाही. काही अपवाद असतीलही पण तो त्यांचा निर्णय आहे त्यामुळे त्याचाही आदर करायलाच हवा. पण एरव्ही मला जर मुल हवं असेल तर त्यासाठी लग्नच करावं लागेल किंवा भिन्नलिंगी व्यक्तीसोबतच मला मुल होऊ देण्याचा अधिकार मिळेल असं समजणं हे आपल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करण्यासारखं आहे. यामुळे लग्नसंस्था व कौटुंबिकसंस्था उध्वस्त होईल असा आक्षेप अनेक लोक घेतील. हा धोका असला तरी अशा गोष्टी या नेहमीची अपवाद म्हणून समाजात असतील. त्यांचं नियमात रुपांतर होणार नाही. दुसरं असं की अशी एकल कुटुंबं पूर्णपणे एकटी असतात असं नसतं. त्यांच्या आसपास त्यांच्या नात्यातले मैत्रीतले प्रेमातले लोक हे वावरतच असतात. आज आत्ताच एकदम टोकाचा विचार करण्याची आवश्यकता यात आहे असं नाही. तसा प्रसंग उद्भवलाच तर त्यावर तेव्हा काहीतरी उपाय निश्चित आपल्याला काढता येईल पण भविष्यात होणाऱ्या एखाद्या जवळपास अशक्य गोष्टीचा विचार करून आत्ता काही लोकांनी घेतलेल्या निर्णयाचा अनादर करणं, त्यांना परवानगी नाकारणं अन्यायकारक ठरेल. आपण आशा करूयात की या व्यासपीठावरून या विषयाला व अशा सर्व भिन्नलिंगी, समलिंगी, एकल माता, पित्यांना कायमच आपला पाठींबा असेल.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here