स्त्रीदेह : पुरुषी बाजारातील वस्तू?

एखाद्या स्त्रीनं स्वतःच्या इच्छेनं जर आपल्या देहाचा उपयोग पैसे प्रसिद्धी कमावण्यासाठी केला तर ते खरंच चूकीचं असतं का? की हे सारं काही पुरुषांना आवडत नाही म्हणून ते यावर अनावश्यक चर्चा करतात असं काही आहे का?

  • प्रतिक पुरी

स्त्रीचं शरीर ही एक वस्तू आहे असं समजून वस्तू खरेदी-विक्रीचे सर्व नियम त्याला लावून तिच्या देहाचा बाजार मांडण्याचं काम प्राचीन काळापासून सुरू आहे. आधुनिक काळात जाहिराती आणि चित्रपट या दोन क्षेत्रांमध्ये स्त्रियांचं वस्तूकरण होत असल्याचा सातत्यानं आरोप केला जातो. स्त्री-देहाच्या प्रदर्शनाला कायमच वादग्रस्त स्वरुप लाभलेलं आहे. या अनुषंगानं विचार करताना आपण एक गोष्ट नेहमीच विसरतो की स्त्रीचं शरीर हे तिच्या मालकीचं आहे. त्याचं काय करायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वांत आधी तिचा आहे. आपण एकीकडे तिच्या शरीराचा बाजार मांडतोच पण त्याचवेळी तिला मात्र यावर आपलं मत मांडण्याची संधी मात्र देत नाही.

पहिला मुद्दा हा की खरंच स्त्रियांना असं वाटतं का की त्यांच्या देहाचा बाजार मांडण्यात येत आहे? हे त्या त्यांच्या इच्छेनंही करू शकतात असंही असू शकत नाही का? जिथे जबरदस्ती आहे आणि त्या स्त्रीच्या इच्छेविरूद्ध तिच्याकडून काम केलं जात आहे तिथं आपण समजू शकतो की तिच्यावर अत्याचार होत आहेत. पण एखाद्या स्त्रीनं स्वतःच्या इच्छेनं जर आपल्या देहाचा उपयोग पैसे प्रसिद्धी कमावण्यासाठी केला तर ते खरंच चूकीचं असतं का? की हे सारं काही पुरुषांना आवडत नाही म्हणून ते यावर अनावश्यक चर्चा करतात असं काही आहे का? पुन्हा इथेही एखाद्या स्त्रीनं काय करावं किंवा न करावं, ते योग्य की अयोग्य याचा निर्णय पुरुषांनीच घ्यायचा, स्त्रियांनी घ्यायचा नाही, हे देखिल पुरुषी वर्चस्वाचंच उदाहरण नाही का?

संबंधित लेख :

जाहिरातींमध्ये फक्त स्त्रियांच नाही तर पुरुषही अंग प्रदर्शन करत असतात. पिळदार शरीरयष्टी असलेले पुरुष आपल्या मसल्स दाखवत अनेक उत्पादनांची जाहिरात करतात. काही गरज नसताना ह्रितिक रोशन आपलं पिळदार शरीर दाखवत एखाद्या डिटर्जंट पावडरची जाहिरात करत नाचतो तेव्हा त्याच्या त्या शरीराचाही ती जाहिरात लोकप्रिय होण्यांत आणि त्याच्या महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उपयोग हा होतच असतो. मोटारबाईक्स, कार्स, साबण विकण्यासाठीही पुरुष मॉडेल उघडे होत असतात. दरवेळी स्वतःचं शरीर उघडं दाखवण्याची गरजच असते असं तर नक्कीच नसतं. दुसरं असं की पूर्वी असं म्हटलं जायचं की स्त्रियांचा ज्या गोष्टींशी काही संबंध नाही तिथेही त्यांचा वापर केला जातो. म्हणजे कार्स, बाईक्स, डीओ, शेविंग क्रिम. यातील पहिल्या तीन गोष्टींवर पूर्वी पुरुषांची मक्तेदारी होती तशी ती आता राहिलेली नाही. शेविंग क्रिमच्या जाहिरातीत बाई का असा प्रश्न काही विचारतील. पण ती असली तर बिघडलं कुठं? आपल्या नवऱ्यानं, प्रियकरानं गुळगूळीत दाढी करून मस्तपैकी आफ्टर शेव लोशन चोपडलं तर ते कोणत्या बायकोला, प्रेयसीला आवडणार नाही? दरवेळी प्रत्येकच गोष्टींत स्त्रीवर अत्याचारच होतो असं समजताना आपण तिला काय वाटतं हे विचारात न घेऊन तिच्यावर मोठा अन्याय करत नसतो का?

जाहिरातींप्रमाणेच चित्रपटांमध्येही अंग प्रदर्शन केलं जातं आणि त्यात स्त्री-पुरुष दोघेही आघाडीवर आहेत. सलमान खान किंवा जॉन अब्राहम जेव्हा शर्ट काढतो तेव्हा त्यांना पाहून बेभानपणे किंचाळणा-यांमध्ये तरुण पोरी जास्त असतात. त्यांचं टॉपलेस होणं आपण, म्हणजे पुरुषी समाजानं स्वीकारलंय. पण राधिका आपटे किंवा रिचा चढ्ढानं नग्न दृष्ये दिली तर मात्र त्यांच्यावर लगेच आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. ते हेच लोक असतात ज्यांना सलमानच्या नग्न शरीरात काही वाटत नाही. पण राधिका आपटे टॉपलेस झाली तर ती कॅरेक्टरलेसच आहे अशी त्यांची खात्रीच असते. मग लगेच यांचा धर्म, यांची संस्कृती संकटात सापडते, जगबुडी होण्याचा धोका निर्माण होतो आणि त्यांतून वाचण्यासाठी राधिकाचा कडाडून विरोध केला जातो. तिला व्यक्ती म्हणून आपण मान देत नाही, तिचा ती व्यक्ती आहे व तिच्या जगण्याचे निर्णय घेण्यास ती स्वतंत्र आहे हे आपण मान्य करत नाही याचा आपल्याला विसर पडतो. अगदी सोयीस्करपणे. त्याचवेळी अश्लील चित्रपट बघण्यात हेच विरोधक आणि इतर सर्व सामील असतात. तिथं त्यांना त्या स्त्रियांचे नग्न देह पाहण्यांत काही वाटत नाही कारण त्या तशाच असतात असा त्यांचा ठाम समज असतो. इथं त्यांना आपण केवळ लैंगिक वस्तू मानतो हेही त्यांच्या ध्यानात येत नाही. त्या स्त्रियांना काहीच भावभावना नसतात, त्यांच्यात माणूसकीच नसते असा आपला समज असतो का?

एकाच गोष्टींबाबत अशा विरोधाभासी भूमिका घेण्यामागे आपल्या सर्वांची चूकीची मानसिकता कारणीभूत आहे, जी आपल्याला सांगते की स्त्रिया या व्यक्ती नाहीत, त्या पुरुषांपेक्षा खालच्या दर्जाच्या आहेत, स्त्रीनं कायम पुरुषांच्या अधीनच असावं, त्यांचच ऐकावं, लैंगिकता ही वाईट आहे इत्यादी इत्यादी. या दूषित मानसिकतेतून बाहेर पडायचं असेल तर दोन गोष्टी आपल्या सर्वांना कराव्या लागतील. पहिली म्हणजे, आपण व्यक्ती आहोत आणि प्रत्येकाला एक वेगळं आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं हे मान्य करणं आणि त्याचा आदर करणं. दुसरी म्हणजे लैंगिकता ही वाईट गोष्ट आहे ही मानसिकता बदलणं. व्यक्ती म्हणून स्वतःचा आणि इतरांचा स्वीकार करणं म्हणजे त्यांच्याकडे स्त्री किंवा पुरुष असा लिंगभेद न करता बघणं. त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत हे मान्य करणं. ते बरे-वाईट असतील पण त्यासाठी ते जबाबदार असतील इतरांनी त्यात मर्यादेपेक्षा जास्त ढवळाढवळ न करणं. एकदा तुम्ही हे मान्य केलं की मग तुम्ही राधिका आपटे किंवा सलमान खान यांच्याकडे स्त्री आणि पुरुष म्हणून बघत नाही तर व्यक्ती म्हणून बघता आणि त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत हेही मान्य करता. ते जे करत आहेत ते त्यांच्या इच्छेनं करत आहेत हेही मान्य करता. मग त्यांत त्यांच्या देहाचं वस्तुकरण होत आहे असं म्हणण्याचा प्रश्न येत नाही. यात अपवाद आहेतच. जिथे जबरदस्ती असते तिथे. तिथे त्यांचा विरोध करायलाच हवा आणि त्यासाठी सक्षम यंत्रणा व कायदेही या देशांत आहेतच.

दुसरी गोष्ट म्हणजे लैंगिकतेसंबंधीची आपली मतं बदलणं अत्यंत गरजेचं आहे. आपली ही मतं अत्यंत बुरसटलेली, अत्यंत प्रतिगामी आणि कालविसंगत आहेत. स्वतःचं शरीर सुंदर असणं यात वाईट काय आहे? तसं ते करण्यासाठी प्रयत्न करणं य़ात काय वाईट आहे? नाही, असंच बहुतेकांचं उत्तर येईल. सुंदर शरीर मिळणं ही निसर्गदत्त गोष्ट आहे पण ती टिकवण्यासाठी मात्र फार परिश्रम घ्यावे लागतात. मूळात पिळदार शरीर नसेल तर तसं ते बनवण्यासाठी तासनतास व्यायाम करावा लागतो. ही सोपी गोष्टी नाही. मग या शरीराचा अभिमान बाळगत त्याचं प्रदर्शन जर कोणी करत असेल तर त्यात इतरांना असूया होण्याचा प्रश्न कुठे येतो? त्यातही पुन्हा पुरुषांवर कौतुकाची उधळणी आणि स्त्रियांना मात्र शिव्याशाप असा दुजाभाव का? स्त्रीच्या नग्न शरीरात वाईट काय आहे? पुरुषानं आपली छाती दाखवली तर अन्य पुरुषांना जसा जोम चढतो आणि त्याच्यासारखी छाती बनवण्याची इच्छा तयार होते त्याचवेळी स्त्रियांना आपल्याला असा पिळदार शरीराचा पुरुष हवा आहे असं वाटलं तर त्यात वाईट काय आहे?

एखाद्या स्त्रीनं आपले भरदार स्तन दाखवले तर तसे स्तन आपल्यालाही हवेत असं वाटणाऱ्या जशा स्त्रीया असतात तसंच अशी स्त्री आपल्या सहवासात यावी असं पुरुषांना वाटलं तर त्यांत अनैसर्गिक काय आहे? आपण आपल्या मूलभूत नैसर्गिक भावना दाबून टाकतो आणि काहीतरी मूर्खपणाच्या कल्पना घेऊन जगतो. या दबलेल्या भावना ज्या आधी निखळ सुंदर नैसर्गिक असतात त्या दाबल्या गेल्यामुळे विकृत होतात, आपल्या दमनासाठी मग त्या कोणाचाही बळी घ्यायला मागेपुढे पहात नाही. हे टाळायचं असेल तर या भावनांचा आदर करायला हवा. लैंगिकता वाईट हा गैरसमज मनातून निपटून काढायला हवा. शरीर मुक्त असेल तर मनदेखिल मुक्त होईल. शरीर बंधनात असेल तर मनदेखील विकृतीच्या कारागारात कायमचं सडत राहिल. जर आपल्याला सामर्थ्यवान व्यक्तिंचा कर्तृत्त्ववान समाज बनवायचा असेल तर हे टाळायलाच हवं.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here