शेती केली म्हणून आदिवासींचा तरुणीवर बहिष्कार

झारखंडच्या २२ वर्षीय मंजूचे शेती करणे आदिवासी समाजाला अमान्य; आजही महिलेने शेती करणे अपशकुन मानला जातो

टीम बाईमाणूस

झारखंड हे आपल्या देशातील आदिवासी बहुल राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यातील ‘दाहुटोली‘ या आदिवासी पाड्यावरील २२ वर्षांची मंजू उराव सध्या प्रचंड चर्चेत आहे. झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील सिसई विभागात असणाऱ्या शिवनाथपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हा आदिवासी पाडा असून येथे राहणाऱ्या मंजू उराव या तरुणीला तिच्याच आदिवासी बांधवांकडून सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

झाले असे की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यापीठातून शिकलेल्या मंजूने तिच्याच कुटुंबियांच्या मालकीच्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून जमीन नांगरली आणि तिचा हा नांगर केवळ शेतातच फिरला नाही तर त्या गावाच्या एका अनिष्ट आणि चुकीच्या परंपरेवर तिने नांगर फिरवल्यामुळे तिच्या गावातील, तिच्याच समाजातील लोक नाराज झाले आणि मंजूने ट्रॅक्टर चालवून त्यांच्या परंपरेला मोडले असल्याने मंजूच्या समाजबांधवांनी तिच्यावर आणि तिच्या संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे मंजुचा विरोध करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. आपल्याच बेड्यांवर प्रेम करणाऱ्या या बिचाऱ्या महिलांना आता कोण समजावून सांगणार असा प्रश्न सध्या अनेकजण विचारत आहेत. मंजू उरावच्या ट्रॅक्टर चालविण्यावरून तिच्या गावात राहणाऱ्या नागरिकांची वेगवेगळी मते असल्याचेही कळत आहे. ज्या लोकांना तिचे ट्रॅक्टर चालविणे आवडले नाही ते मात्र ‘उरांव‘ समाजाच्या परंपरांचा दाखला देत मंजुचा प्रखर विरोध करत आहेत.

या परंपरेचा उल्लेख करत मंजुचा निषेध करणारा ३३ वर्षांचा सुगरु उरांव म्हणतो की, “मंजू एक बाई आहे. आमच्या उरांव समाजामध्ये ‘बाई’च्या जातील नांगर मारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. काहीही झाले तरी एका बाईचे नांगर चालविणे आम्हाला मान्य नाही. नांगराविना आमच्या जमिनी वांझोट्या झाल्या, नापीक झाल्या तरी आम्हाला चालेल पण एका बाईच्या हातात नांगर आम्हाला कदापि स्वीकारार्ह नाही. असे असूनही मंजूने ट्रॅक्टर चालवून तिचे शेत नांगरल्याने अनेक गावकरी तिच्यावर नाराज आहेत. महिलांनी केवळ महिलांचीच कामे करावी पुरुषांच्या कामात ढवळाढवळ करू नये एवढेच आम्हाला वाटते.”

हा तर मोठा अपशकुन आहे!

मंजूचा भाऊ सुकरू उरांव

मंजूने शेत नांगरणे हा अपशकुन आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना मंजूचे चुलत भाऊ आणि एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे सुकरु उरांव म्हणतात की, “आदिवासी समाजातील काही परंपरांमुळे माझ्या बहिणीचा विरोध केला जातो आहे. हे निषेधार्ह आहे. पण गावकऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की मंजूने बैलांचा वापर नांगरण्यासाठी केला नाही तिने त्यासाठी ट्रॅक्टर वापरले होते. त्यामुळे हा अपशकुन ठरत नाही.”

“भारताच्या राष्ट्रपतिपदी एक आदिवासी महिला बसलेली असताना मंजू सुद्धा आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पाहू शकते. त्यामुळेच तिने ट्रॅक्टर खरेदी केला आणि त्याचा वापर करून शेती करण्याचा ती प्रयत्न करत आहे. एखादी महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी ज्याप्रमाणे शिक्षण घेते, नोकरी करते अगदी तसेच मंजुही शेतीतून समृद्धीचा आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग शोधू पाहत आहे. आता महिला विमान, रेल्वे, बस सगळं चालवत आहेत.”

असे असले तरी या गावात सुईणीचे काम करणाऱ्या आणि मंजुचा विरोध करणाऱ्या ४५ वर्षीय ‘कंदाइन उरांव‘ यांनी बीबीसीशी बोलताना या घटनेची एक वेगळी बाजू मांडली. त्यांनी सांगितले की प्रवीण मिंज नावाच्या एका ख्रिश्चन माणसाने आमच्या दाहूटोली गावातील दोन कुटुंबांचे धर्मांतर घडवून आणले आहे ही दोन्ही कुटुंबे आमच्या उरांव समाजातीलच होती. याच विषयावर आमच्या गावातील गावकऱ्यांनी 2 जुलै रोजी एक ग्रामसभा भरवली होती. या ग्रामसभेत आम्ही प्रवीण मिंज आणि त्या दोन कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार टाकला.

गावकऱ्यांचे म्हणणे काय आहे?

दाहूटोली गाव

कंदाइन उरांव यांनी सांगितले की, “गावकऱ्यांनी २ जुलैलाच प्रवीण मिंज यांच्या शेतात कुणीही कामाला जाणार नाही असे ठरवलेले होते. हे माहिती असूनही समजातून बहिष्कृत केलेल्या प्रवीण मिंज यांच्या शेतात मंजूने नांगरणी केली, मंजूच्या या कृत्यावर आमचा आक्षेप आहे.”

सामाजिक बहिष्काराचा सामना करत असलेल्या प्रवीण मिंज यांच्याशी माध्यमांनी संपर्क केला असता ते म्हणाले की, “आमच्या गावात राहणाऱ्या बंधन उरांव यांच्या पत्नी बंधिन उरांव या सतत आजारी असत पण ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेला येऊ लागल्याने त्यांच्या तब्येतीला त्याचा फायदा झाला आणि त्यांना झालेला फायदा पाहून बृसमुनि उरांव यादेखील या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ लागल्या.”

“ही गोष्ट गावकऱ्यांना आवडली नाही आणि मग गावकऱ्यांनी माझ्यावर या कुटुंबांचे धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप लावला. माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. माझ्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याने मी प्रशासनाकडे याविरोधात दाद मागितली पण आमच्या गावात उरांव समाजातील लोक बहुसंख्यक असल्याने प्रशासनही काही करू शकले नाही.”

प्रवीण मिंज यांनी दावा केला की, “माझे कुटुंब मागील दोन पिढ्यांपासून ख्रिश्चन आहे आणि बंधन उरांव आणि बृसमुनि उरांव यापैकी कुणीही ख्रिश्चन झालेले नाही पण गावकऱ्यांनी वाळीत टाकल्यामुळे या दोन कुटुंबांनी चौदा सदस्यांसह गाव सोडले आहे.”

मंजूने प्रवीण मिंज यांचे दीड एकर शेत भाड्याने घेतल्याची बाब मात्र प्रवीण मिंज यांनी मान्य केली आहे आणि हेच शेत नांगरण्यासाठी मंजूने ट्रॅक्टरचा वापर केल्याने हा वाद निर्माण झालेला आहे.

मंजू उरांव म्हणते की,“माझ्या कुटुंबाचे जेवढे शेत आहेत तेवढ्या शेतात माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. म्हणून मी प्रवीण मिंज यांचे शेत भाड्याने घेतले आहे आणि प्रवीण मिंज यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याआधीच मी हे शेत कसण्यासाठी घेतले होते.”

गावात महिलांनी मंजूच्या विरोधात घेतलेल्या बैठकीविषयी मंजू सांगते की, “या बैठकीमध्ये मला सांगण्यात आले की आम्ही ज्या प्रवीण मिंजवर बहिष्कार टाकला आहे त्याचेच शेत तू भाड्याने घेतलेले आहे. प्रवीणवर बहिष्कार टाकूनही जर तो गावातल्या किराणा दुकानांमधून सामानाची खरेदी करू शकत असेल आणि किराणा दुकानदार त्याच्याशी व्यवहार करू शकत असेल तर मीही हा व्यवहार नक्कीच करू शकते.”

मंजूचा विरोध करणाऱ्या करमचंद उरांव यांनी सांगितले की सामाजिक बहिष्कार टाकलेल्या प्रवीण मिंजचे शेत मी यापुढेही कसत राहणार असल्याचा निर्धार मंजूने केल्यानेच आम्ही सगळे जास्त नाराज आहोत. जर आता मंजूने प्रवीणचे शेत कसले नाही तरच आमच्या समाजाची उरलीसुरली इभ्रत वाचेल असे मला वाटते.

करमचंद पुढे म्हणाले की, “जर गावकऱ्यांनी दिलेली सूचना मंजूने पाळली नाही तर हे प्रकरण आदिवासींच्या ‘पाहडा’ समाजासमोर मांडले जाईल आणि तिथे तिला कठोर शिक्षाही होऊ शकते.”

मंजूचे काय म्हणणे आहे?

मंजूचे आई आणि वडील

मंजुची 58 वर्षांची आई अंगनी भगत एक रुग्ण आहे तर 65 वर्षांचे तिचे वडील लालदेव भगत हे आता खूप थकले आहेत. मंजूचा लहान भाऊ शंकर मानसिक रोगाचा शिकार आहे तर मंजूचे मोठे ३३ वर्षीय बंधू विनोद भगत यांच्यासोबत मिळून मंजू शेती करते.

मंजूला यापुढेही शेतीच करायची आहे. त्यामुळे मागील वर्षी तिने काही लोकांची शेती कसण्यासाठी भाडेतत्वावर घेतली होती. मंजूच्या वडिलांची सहा एकर शेती आणि यावर्षीही तिने आणखीन दीड एकर शेती कसण्यासाठी भाड्याने घेतलेली आहे. शेती करण्यासाठी मंजूने तिच्या कमाईवर, मित्रांच्या मदतीने आणि काही कर्ज काढून एक ट्रॅक्टर शेतीसाठी विकत घेतला आहे.

मंजू म्हणते की, “मी नाईलाजाने ट्रॅक्टर साठी कर्ज घेतले आहे कारण मला किसान क्रेडिट कार्डाचा वापर करून ट्रॅक्टर घ्यायचा होता पण मला काही किसान क्रेडिट कार्ड योजनेमुळे पैसे मिळाले नाहीत आणि मग मला कर्ज काढावे लागले. आपल्या देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपतींना मला विनंती करायची आहे की आपल्या देशात मुलामुलींमध्ये करण्यात येणार भेदभाव संपविण्यासाठी त्यांनी काम करावे. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही कर्ज मिळायला हवे जेणेकरून त्या अधिकाधिक आत्मनिर्भर होतील.”

या विभागाच्या प्रदेश विकास अधिकारी सुनीला खालखो म्हणाल्या की, “मंजूला कर्ज न मिळाल्याचे प्रकरण मला माहिती आहे. आदिवासी महिलांना कागदोपत्री जमिनीची मालकी मिळत नाही मग ती महिला विवाहित असो वा अविवाहित त्याने काहीही फरक पडत नाही. त्यामुळेच बँका कर्ज देण्यास नकार देतात. महिलांनी त्यांच्या नवऱ्याच्या अथवा वडिलांच्या नावावर कर्ज घ्यावे असे बँक सांगते.”

प्रदेश विकास अधिकारी सुनीला खालखो

मंजूवर टाकलेल्या सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणामुळे आश्चर्यचकित झालेल्या सुनील म्हणाल्या की, “आम्ही गावात एक बैठक घेऊ आणि या बैठकीनंतरही जर गावकऱ्यांनी मंजूवर दंड आकारला अथवा बहिष्कार टाकला तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. जिल्हा प्रशासनानेही तसेच निर्देश आहेत.”

आदिवासी समाजाच्या प्रतिक्रिया

गुमला जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी रवि कुमार आनंद म्हणाले की, “दाहुटोली गावात घडलेले धर्मांतराचे प्रकरण मला माहित आहे. मी या परिसरामध्ये मागील दोन वर्षांपासून कार्यरत आहे आणि आता हे मंजू उरांव प्रकरण समोर आले आहे.”

“मी मागील दोन वर्षांपासून या भागात काम करतो आणि असा प्रकार पहिल्यांदाच समोर आल्याने सारासार निष्कर्ष काढण्याची सध्यातरी गरज नाहीये. तरीही स्थानिक अधिकाऱ्यांकरवी मी मंजू प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.”

राजी पाहडा‘ नावाची एक आदिवासी संघटना देशभर आदिवासींसाठी काम करते. या संघटनेचे पदाधिकारी आणि लष्करातून निवृत्त झालेले कॅप्टन लोहरा उरांव हे मागील कैक वर्षांपासून आदिवासींच्या प्रश्नावर सामाजिक काम करतात. लोहरा उरांव म्हणतात की, “सामाजिक बहिष्कार टाकलेल्या प्रवीणचे शेत मंजूने कसले आहे यामध्ये काहीही गैर किंवा चुकीचे नाही. तिने शेती करायला पाहिजे. असे असले तरीही प्रवीण मिंजवर टाकलेला सामाजिक बहिष्कारही चुकीचा नाहीये मिंजमुळे ज्या दोन कुटुंबांनी उरांव समाजाचा त्याग करून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आहे त्यांना तोपर्यंत त्यांचे शेत दिले जाणार नाही जोपर्यंत त्यांची उरांव समाजामध्ये घरवापसी होत नाही.”

“आमच्या कायद्यातील पाचव्या अनुसूचीनुसार आदिवासी समाजाच्या बाहेरील व्यक्ती आदिवासींच्या हक्काच्या जमिनीवर शेती करू शकत नाही.”

मंजू पदवीचे शिक्षण घेत आहे

बावीस वर्षीय मंजू ओराव यांनी आवाहन केले की, “दिल्ली, पंजाब आणि वीटभट्टीवर काम करणाऱ्या समाजातील सर्व मुलींना मला सांगायचे आहे की, त्यांनीही माझ्याप्रमाणे त्यांच्या गावात शेती करून पुढे जावे, जेणेकरून शोषणाला आळा बसेल.”

शेतीसोबतच मंजू तिचे लेखनही सुरू ठेवले आहे. 2017 मध्ये सिसाई ब्लॉकमधील बार्री भागात असलेल्या ‘प्रपोजल हायस्कूल’मधून त्याने 58% गुण मिळवून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. तिची शाळा घरापासून 15 किमी दूर होती. तिच्या इंटरमिजिएटच्या अभ्यासासाठी, ती 45 किमी दूर असलेल्या लोहरदगा गावात तिच्या आजीकडे गेली. 2019 मध्ये, तिने महिला महाविद्यालय लोहरदगा येथून 46% गुण मिळवून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. लॉकडाऊनमुळे ती तीन वर्षांपासून तिच्या दाहुतोली या गावात राहत होती.

याच काळात मंजू आपल्या भावासोबत शेतीत काम करू लागली. शेतीतील बारकावे जाणून घेतल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी काही शेततळे भाडेतत्त्वावर घेतले. ज्यामध्ये त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले. या दरम्यान त्यांनी काही पिकांमध्ये उत्पन्न मिळवले आणि लॉकडाऊनमुळे काही पिकांचे नुकसानही झाले. यंदा तिला भाडेतत्त्वावरील शेतात बटाटे, कोबी यांसारख्या भाज्यांची लागवड करायची आहे.

यावर्षी मंजूने गुमला येथील इग्नू सेंटरमध्ये संस्कृत ऑनर्सला प्रवेश घेतला आहे. सध्या बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी मंजू हिने सांगितले की, शेतीमध्ये जास्त वेळ असल्याने तिला महाविद्यालयातून नियमित पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता आले नाही. या कारणास्तव, तिने 40 किमी दूर गुमला येथील इग्नू केंद्रात प्रवेश घेतला, जिथे तिला फक्त परीक्षा द्यायची आहे.

भाषांतर : आशय बबिता दिलीप येडगे

सौजन्य : बीबीसी मराठी

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here