निकाल दहावीचे असेही!

औरंगाबाच्या साठ वर्षांच्या आजी आणि पुण्यातल्या त्रेचाळीस वर्षांच्या वडिलांनी मिळविले दहावीत यश

आशय बबिता दिलीप येडगे / १८ जून २०२२ :

काल म्हणजेच १७ जून २०२२ ला राज्यात दहावीचा निकाल लागला. राज्यातील दहावीची परीक्षा दिलेले ९६.९४% विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. आज वर्तमानपत्रांचे मथळे दहावीत शंभर टक्के मिळवून यश संपादन केलेल्या, शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या बातम्यांनी सुशोभित केलेले पाहायला मिळाले पण या दहावीच्या निकालाच्या बातम्यांमध्ये काही गोष्टी अशाही आहेत ज्या वाचल्या, अनुभवल्या तर ‘शिक्षण घेण्याला वय नसते’, ‘माणसाने आयुष्यभर विद्यार्थीदशेत राहावे’ अशा वाक्प्रचारांवर विश्वास बसायला लागतो.

‘६० वर्षांच्या आजीबाईंनी मिळविले दहावीत यश’

औरंगाबादमध्ये राहणाऱ्या हजराबी अहमद शेख या साथ वर्षांच्या महिलेने दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘शिक्षण घेण्यासाठी कुठलेही वय योग्य किंवा आदर्श नसते’ हे सिद्ध केले आहे. शुक्रवारी राज्यभरात दहावीचे निकाल लागल्यानंतर अहमद शेख यांच्या घरात मात्र दुहेरी आनंद साजरा केला गेला. एकीकडे त्यांच्या ६० वर्षीय पत्नी हजराबी अहमद शेख ५५.८८% मिळवून दहावी उत्तीर्ण झाल्या तर दुसरीकडे त्यांची नात सादिया मैनाज हिने सुद्धा ७७% मिळवून दहावीच्या परीक्षेत यश मिळवले.
औरंगाबादच्या प्रौढ महिला विद्यालय समर्थ नगर इथे शिकणाऱ्या हजराबी सांगतात की “मला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती पण परिस्थिती आणि लग्नामुळे माझी शिक्षण घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. आता उतारवयात हातात वेळ असल्याने मी समर्थ नगरच्या शाळेत प्रवेश घेतला आणि यावर्षी अभ्यास करून दहावीची परीक्षा दिली.”

आपल्या यशामध्ये वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या आपल्या पतीचा खूप मोठा हात असल्याचे हजराबी सांगतात. “लग्नानंतर मला शिक्षण घ्यायचे होते पण मग पुढे मुलं झाली आणि माझे शिक्षणाचे स्वप्न लांबणीवर पडले पण पुन्हा माझ्या पतीने मला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि त्यानंतर मला शाळेत सोडायला असेल किंवा परीक्षेला सोडायला सुद्धा माझे पती अहमद शेख माझ्या सोबत आले होते. त्यांच्या सहकार्यामुळे आणि समर्थ नगर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने मी हे यश मिळविण्यात यशस्वी ठरले.”

आपल्या पुढच्या योजनेबद्दल माहिती देताना हजराबी मोठ्या अभिमानाने सांगतात की, “आयुष्याने पुन्हा एकदा दिलेली ही संधी मी आता वाया घालविणार नाही आता दहावीवर न थांबता मी बारावीचीसुद्धा परीक्षा देणार आणि बारावी उत्तीर्ण होणार.”

आपल्यासोबत आपली नात सुद्धा दहावी उत्तीर्ण झाल्यामुळे आनंदलेल्या हजराबी यांनी दहावीमध्ये यश मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सांगितले की, “प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. संकटं कुणालाही चुकलेली नाहीत उलट हारल्याशिवाय विजयाची चव तितकीशी गोड लागत नाही ‘हार के बाद ही जीत है’ प्रयत्न करा, प्रामाणिक मेहनत करा यश तुमचेच असेल. एकदा अपयशी झालात म्हणून खचून जाऊ नका. माझ्याकडे पहा मी या वयातही मेहनत केली, अभ्यास केला आणि आता दहावी उत्तीर्ण झाले आहे.”

पुण्याच्या वाघमारे कुटुंबीयांचा ‘गड आला पण सिंह गेला’

भास्कर वाघमारे आणि त्यांचा मुलगा साहिल या दोघा बापलेकाने यावर्षी एकत्रच दहावीची परीक्षा दिली होती

पुण्यामध्ये डायस प्लॉट झोपडपट्टीत राहणाऱ्या वाघमारे कुटुंबियांच्या घरी दहावीच्या निकालानंतर संमिश्र वातावरण होते. कारण भास्कर लिंबाजी वाघमारे आणि त्यांचा मुलगा साहिल भास्कर वाघमारे यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. शुक्रवारी निकाल आला आणि निकालामध्ये भास्कर वाघमारे वयाच्या ४३ व्य वर्षी ४६% मिळवून उत्तीर्ण तर झाले पण त्यांचा मुलगा साहिल मात्र हे यश मिळू शकला नाही. साहिल वाघमारे दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला. आता असा निकाल लागल्यावर वडिलांच्या उत्तीर्ण होण्याने आनंद साजरा करावा की मुलाच्या अपयशाने दुःख हा प्रश्न वाघमारे कुटुंबियांच्या समोर उभा राहिला आहे.

पण ४३ व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने भास्कर वाघमारे म्हणाले की, “१९९२ मध्ये सातवीनंतर मला शाळा सोडावी लागली पण यावर्षी माझ्या मुलाकडे पाहून मीही माझे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार दहावीला प्रवेश घेतला. शिक्षण घेण्याला कुठलेही वयाची अट नसते असे माझे मत आहे त्यामुळे मी अभ्यास केला, परीक्षा दिली आणि आता ४६% मिळवून मी पासही झालो आहे.”

आपल्या मुलाबद्दल बोलताना भास्कर वाघमारे म्हणाले की, “मी उत्तीर्ण होऊ शकतो तर माझा मुलगादेखील आरामात हे करू शकतो. यावेळी त्याचे दोन विषयच राहिल्याने यावेळी त्याला उत्तीर्ण होणे फारसे जड जाणार नाही. आता मी स्वतः त्याचा अभ्यास घेऊन, शिकवणी लावून त्याला पुनःपरीक्षेत उत्तीर्ण करेन.”

दहावी उत्तीर्ण झालेल्या आपल्या वडिलांच्या यशाबद्दल साहिलनेही आनंद व्यक्त केला पण स्वतःच्या अपयशाची चिंता व्यक्त करत तो म्हणाला की, “आता मीही पुन्हा एकदा व्यवस्थित अभ्यास करून दहावीची परीक्षा देणार आहे आणि यावेळी मात्र मी नक्की उत्तीर्ण होईन.”

शेवटी काय तर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत असतांना आयुष्याच्या प्रवासात संघर्ष करून पुन्हा स्वतःला शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेतलेल्या हजराबी आणि भास्कर यांनी हे सिद्ध केले आहे की माणूस कधीही काहीही मिळवू शकतो फक्त मनात असायला हवी प्रबळ इच्छा आणि जिद्द!

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here