- टीम बाईमाणूस
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात वर्षानुवर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या 501 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह लावण्यात आला. यावेळी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा आणि त्यांच्या पत्नी मीरा मुंडा प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या विवाहात अगदी 20 वर्षांपासून 70 वर्षांपर्यंतचे वधू-वर सहभागी झाले होते आणि आश्चर्य म्हणजे त्यांची मुलेही त्यांच्या लग्नाचे साक्षीदार बनले होते.
या अनोख्या परंपरेला आदिवासी भागात लिव्ह-इनच्या नात्याला ‘ढुकु’ म्हणतात. अशी जोडपी अनेक वर्षे एकाच छताखाली एकत्र राहूनही त्यांच्या नात्याला लग्नाचे नाव देऊ शकत नाहीत. काय आहे ही ढुकू परंपरा हे जाणून घेऊ…
कित्येक पिढ्यांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची प्रथा
कोण म्हणतं की ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हे एक पाश्चिमात्य फॅड आहे आणि भारतात हे कल्चर फारसं रुचणारं नाही… तुम्ही जर असा विचार करत असाल तर तुम्हाला भारतीय समाजरचनेबद्दल काही कल्पनाच नाही. भारतात कित्येक पिढ्यांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची प्रथा सुरू आहे. विश्वास बसत नसेल तर झारखंड राज्यातील आदिवासीबहुल भागाकडे चला… ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या असंख्य घटना तेथे तुम्हाला सापडतील. नुसत्या झारखंडमध्येच नाही तर भारताच्या अनेक आदिवासी भागात ‘ढूकू प्रथा’ म्हणजेच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची प्रथा पाहायला मिळते.

ढुकू जोडप्यांनी अगदी वयाच्या सत्तरीतही लग्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. ही प्रथा प्रामुख्याने झारखंडमधील गुमला, खुंटी, बसिया, घाघरा, पालकोट, चटकपूर, तोरपा, सिमगेडा आणि मनातू या आदिवासी भागात ढुकू जोडपी सापडतील. 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार झारखंडमधील या गावात सुमारे 358 जोडपे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असून सबंध झारखंड जिल्ह्यात किमान 2 लाखांच्या आसपास ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची जोडपी राहतात. ढुकु प्रथेची ही इतकी संख्या असण्यामागचे कारण फक्त एकमेकांवरचे प्रेम नसून ती एक हतबलतादेखील आहे.
‘ढुकू’ शब्दाचा नेमका अर्थ काय आहे?
ढुकू हा शब्द ‘ढुकना’ या शब्दापासून जन्मला आहे. ढुकना म्हणजे घरात प्रवेश करणे. बिन लग्नाची एखादी महिला जर दुसऱ्याच्या घरी राहत असेल तर तिला ढुकू किंवा ढुकनी महिला म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच ती महिला दुसऱ्याच्या घरी दाखल झाली आहे किंवा तिने घुसखोरी केली आहे. म्हणूनच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना ढुकू कपल्स असे म्हटले जाते. झारखंडच्या आदिवासी भागात लग्नाच्या पद्धती खुप वेगवेगळ्या आहेत. ज्या जोडप्यांना लग्न करायचं असतं त्यांच्या कुटुंबियांना सबंध गावाला जेवण द्यावे लागते. मुलीकडचे त्यांच्या गावाला तर मुलाकडचे त्याच्या गावाला जेवण देतात. मटण, भात आणि सोबत दारू हा बेत हमखास ठरलेला असतो आणि त्यासाठी वधू-वराच्या कुटुंबाला किमान एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. 200 ते 250 रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब आदिवासी पित्याला अर्थातच हा खर्च परवडणारा नसतो आणि मग अशात एकमेकांवर प्रेम करणारे हे जोडपे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागतात.
ढुकू प्रथेमागे आणखीही एक कारण आहे. एकेकाळी मातृसत्ताक पद्धतीचे आचरण करणारा आदिवासी समाज आज बऱ्यापैकी पित्रुसत्ताक पद्धतीत जगत असला तरी लग्न आणि जोडीदाराची निवड याबाबतीत आजही आदिवासी समाजात रुढी परंपरेनुसार महिलांच्या मताला, हक्काला अतिशय महत्व आहे. येथे होणाऱ्या धुमकुडीया सोहळ्यात तरुण-तरुणींसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येते. तिथे ते नाचतात, गातात आणि जर कोणी पसंत पडला तर तसे ते घरच्यांना कळवतात. पालकांनी जर त्या लग्नाला परवानगी नाही दिली तर हे प्रेमी युगल ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला सुरुवात करतात. गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जातात, मुलंबाळं झाली की परत गावात येतात. अशा जोडप्यांनाही ढुकू जोडपी म्हणून ओळखले जाते. अशा जोडप्यांना समाजात ना इज्जत मिळते ना त्यांच्या मुलांना कायदेशीर अधिकार…
कुंकु लावूनही देव्हाऱ्यात प्रवेश नाही
गुमला जिल्हातील चैनपूर गावात राहणारी रवीना देवी म्हणते की, आमच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली असली तरी पती बजरंग कुमारसोबत मी 9 वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहात होती. ढुकनी बनून मी जेव्हा सासरी आले तेव्हाचे दिवस आठवले की आजही घाबरायला होतं. मला अस्प्रृष्यासारखी वागणूक मिळायची. नवविवाहित वधूसारखे मला कुंकु लावायची जरी परवानगी दिली असली तरी घरातील कोणत्याही पुजाअर्चेत मला सहभागी होऊ देत नसत. इतकेच काय तर छठ पुजेलाही मी सहभागी होत नसे.
रवीना सांगते की, ढुकू बनण्यापूर्वी मला एका परिक्षेला सामोरे जावे लागले. जन्माने मी ख्रिस्ती (Christianity) होते आणि माझे होते रविना इक्का. बजरंगशी लग्न करून सासरी आल्यावर सगळ्यात अगोदर माझा धर्म बदलला. दोन महिन्यात पंचायतीसमोर उभे करण्यात आले, विशेष पूजा झाली आणि मगच मला स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी मिळाली.
मुलांना संपत्तीवर अधिकार नाही
खुंटी जिल्ह्याच्या डुमरदगा गावची फूलमणी टुटी 47 वर्षांची आहे. वयाच्या 22 व्या वर्षी फूलमणीचे लग्न झाले आणि सात वर्षनंतर नवऱ्याचे निधन झाले. दोन लहान मुलं आणि पुन्हा गरोदर अशा स्थितीत फूलमणी सासरी राहत होती. सासऱ्यांनी त्यांच्या बहिण्याच्या मोठ्या मुलाला महावीरला दत्तक घेतले आणि तोही सोबत राहू लागला. फुलमणी आणि महावीरमध्ये प्रेमाचे संंबध सुरू झाले आणि ते लिव्ह इनमध्ये राहू लागले. सासऱ्यांनी या नात्याचे स्वागतच केले. खरी अडचण नंतर सुरू झाली. हे नातं कायदेशीर होण्यापूर्वीच सासऱ्यांचे निधन झाले आणि फुलमणी आर्थिक संकटात सापडली.

सासऱ्यांच्या पश्चात शेतजमीन ते कायदेशीर लग्न न झाल्यामुळे फुलमणीना काही मिळेना. पंचायतीने त्यांना ढुकू ठरवले होते. ‘निमित्त’ नावाच्या संस्थेची फुलमणीने मदत घेतली आणि एका सामुहिक विवाह समारंभात अखेर फुलमणी आणि महावीरचे कायदेशीर लग्न झाले. फुलमणी म्हणते, 16 वर्षांच्या लिव्ह इन नंतर आमचा विधिवत विवाह झाला. लग्नापूर्वी मी सरना धर्माचे पालन करायचे परंतू आता मी ख्रिस्ती (Christianity) धर्म स्वीकारला आणि त्यामुळेच माझे लग्न चर्चमध्ये पार पडले. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या अनेक हिंदू-ख्रिस्ती जोडप्यांचा विवाह संपन्न झाला.
याच विवाह सोहळ्यात 70 वर्षांच्या सिलवंती मुंडाईन यांचेही लग्न झाले. सिलवंतीचा मोठा मुलगाच 40 वर्षांचा असून त्या तब्बल 46 वर्षांपासून प्रभू सहाय आईंदसोबत लिव्ह इनमध्ये राहात होत्या. आता मात्र कायदेशीर विवाह झाल्याने त्यांच्या मुलांना सगळे अधिकार मिळणार आहेत. काही विवाह सोहळ्यात तर एकाच मंडपात सासरे-सासू आणि त्यांचा मुलगा-सून असेही विवाह झाल्याची उदाहरणे आहेत. समाजाचे पंच बंध तिग्गा माहिती देताना सांगतात की, ढुकू जोडप्यांच्या मुलांना संपतीत अधिकार मिळण्यासाठी पंचायतीद्वारा किरकोळ आर्थिक दंड आकारून आम्ही सामूहिक विवाह सोहळे आयोजित करतो. वैयक्तिक आर्थिक दंडापेक्षा सामुहिक आर्थिक दंड भरणे हा त्या त्या जोडप्यांना सोपा जातो.