स्कॉचला टक्कर देतेय महुआ मॉन्ड… ताज आणि मॅरिएटमध्ये विकली जातेय मोहाची दारू!

महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वी मोहाची दारू लाँच करण्याचा निर्णय घेतला होता. या दारूला महुआ न्युट्रिबेव्हरेज असं नाव दिलं होतं. परंतू ती फक्त घोषणाच ठरली तर दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेश सरकारने लॉन्च केलेली ‘मॉन्ड’ या ब्रँडची महुआची दारू आज स्कॉचला टक्कर देत असल्याचे सिद्ध झाले आहे. मध्यप्रदेशातील अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये महुआची दारू शौकिनांना महागड्या स्कॉच आणि व्हिस्कीपेक्षा अधिक पसंत पडत आहे…

  • इरम सिद्दीकी

24 वर्षीय फॅक्टरी मॅनेजर अंकिता भाबर यांच्याकडे त्यांच्या कामगारांना पगार द्यायला पैसे नव्हते. मध्य प्रदेश सरकारच्या प्रोत्साहनाने त्यांच्या स्वयं सहायता भिलाला आदिवासी समुहाने 8 महिन्यांपूर्वी अलीराजपूर जिल्ह्यातील कठ्ठीवाडा भागात राज्यातील पहिली, कायदेशीर मोहाची म्हणजे महुआ दारू तयार करणारी फॅक्टरी उभारली होती. पण जानेवारीत उत्पादन सुरू झाल्यानंतरही ते एकही बॉटल विकू शकले नव्हते. शेतकरी पैसे मागत होते. कामगार काम सोडण्याची धमकी देत होते. त्याच दरम्यान त्यांना जिल्हा आबकारी विभागाचे ब्रजेंद्र कोरी यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, “आम्ही महुआच्या 24 पेट्या विकल्या आहेत. त्याचे 4 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा केले आहेत.”

ही ऑगस्ट महिन्याची गोष्ट आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महुआला हेरिटेज दारूचा दर्जा दिल्याची घोषणा केल्यानंतर ठीक एक वर्ष उलटलं होतं. तेव्हापासून भोपाळ, इंदौर, रतलाम, नर्मदापूरम्, छतरपूर आणि मध्य प्रदेशातील सरकारी हिस्सा असलेल्या अन्य हॉटेल्स व वाईन्स स्टोर्समधून सातत्याने ऑर्डर्स येत आहेत. कठ्ठीवाडा भागातील या फॅक्टरीने 320 बॉटल्स विकल्या आहेत. 750 मिलीलिटरची बॉटल 800 रुपयाला तर 180 मिलीलिटरची 200 रुपयाला. यातून 20 लाखांची कमाई झाली आहे. पिवळ्या लेबलवर उसळत्या घोड्याचा लोगो असलेली ही दारू ‘मॉन्ड’ या नावाने विकली जाते. पारंपरीक पद्धतीने बनवल्या जाणारी आणि काहीशी हेटाळणी होणारी ही दारू विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकार ब्रँडींग करत आहे. सध्या तरी याची व्याप्ती कमी आहे. कारण उत्पादनच मर्यादीत आहे. त्यामुळे एलिट क्लासलाच ग्राहक बनवण्यावर जोर देण्यात येत आहे. त्यासाठी ऑर्गनिक आणि आर्टीसनाल अशी लेबल्स वापरून तरुणांनाही आकर्षित करण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये डिंडोरी जिल्ह्यातील भाखा माल गावातील गोंड समुहाने त्यांची फॅक्टरी उघडली. तिथे ‘मोहुलो’ नावाने ही दारू विकली जाते.

आदिवासींना महुआची दारू विकण्यासाठी प्रोत्साहन

डेप्युटी एक्साइज कमिश्नर राजेश हेन्री यांचं म्हणणं आहे की “आदिवासी समुहांनाच महुआ दारू तयार करून विकण्यासाठी प्रोत्साहन देणे ही एक ऐतिहासिक चूक सुधारण्याची संधी आहे. अलीराजपूर येथील भिलाला आदिवासी समुहाच्या या पारंपरीक दारूला आधी ब्रिटीशांनी नावं ठेवली. त्यात भेसळ असते व ती आरोग्याला हानीकारक असते म्हणून. स्वातंत्र्यानंतर यात थोडा बदल झाला. जर गोव्यात फेणी, केरळमध्ये ताडी आहे तर मध्य प्रदेशही महुआची मार्केटींग करू शकतो. आजवर ही दारू राज्यातच विकली जायची. पण आता चौहान सरकार ती देशपातळीवर विकून या वारसा दारूला मानाचं स्थान देऊ इच्छित आहे.”

मॉन्ड आणि मोहुलो हे ब्रँड्स आता ताज, मॅरिएटमध्ये…

मॉन्ड आणि मोहुलो हे ब्रँड्स बाजारात आणण्याआधी, ताज, मॅरिएट आणि अन्य पंचतारांकीत हॉटेल्समध्ये बारटेंडर्ससाठी ती चाखायला ठेवण्यात आली होती. त्यावर लेबल्स नव्हते. फीडबॅक फॉर्म्स होते. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. मॉन्ड चाखणारे रतलामवासी विनय कुमार बांगड सांगतात की ती स्कॉचसारखीच लागते. ते म्हणतात, “याची चव फुलांसारखी आहे आणि ही एक सरल तरल आणि मलमली अल्कोहोल आहे.” आता त्यांच्या संग्रहात मॉन्डची बॉटलही उभी असते.

भोज ताल (वरचा तलाव) जिथून बघता येतो ते भोपाळचं लोकप्रिय विंड्स अँड वेव रेस्ट्राँ त्या पहिल्या हॉटेल्सपैकी एक आहे जिथे याची टेस्टींग केली गेली होती. तिथले बार अटेंडेंट कमल शर्मा सांगतात, “आमच्याकडे असेही लोक होते ज्यांना याची चव इतकी आवडली की ते बाहेर दुकानात त्याचा शोध घेऊ लागले. पण जेव्हा ती बाहेर मिळाली नाही तेव्हा ते परत आले आणि त्यांनी तक्रार केली. अनेकांना ती इतकी आवडली की त्यांना पूर्ण बॉटलची हवी होती पण आम्ही बॉटल्स विकत नाही.” एंबी वाइनचे सह-संस्थापक जितेंद्र पाटीदार सांगतात की, “मॉन्ड त्या लोकांमध्ये लोकप्रिय आहे ज्यांनी आधी कोऱ्या महुआची चव चाखली आहे.” तर राजेश हेन्रीच्या सांगण्यानुसार मॉन्ड सध्या तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. मॉन्ड आणि मोहुलो आता इंदौर आणि भोपाळ विमानतळावरही विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पण एंबी वाईन्स त्याचे सर्वांत पहिले आणि मोठे विक्रेते आहेत. अंकिता भाबरला जेव्हा फोन आला तेव्हा तिने ती खुशखबर आपल्या वडिलांना दिली आणि त्यांना त्यांचा फोन तपासण्यासाठी सांगितलं. त्यांना इंग्रजी येत नाही पण आकडे ते ओळखू शकतात. मेसेज येताच त्यांनी ते आकडे जोरजोरात वाचून दाखवले. पण इकडे वेगळीच समस्या उभी राहिली. कारण रतलामच्या एंबी वाईन्सच्या गोदामापर्यंत माल पोहोचला तेव्हा दिसलं की लेबल्स नीट लागलेले नव्हते. मॉन्ड प्लान्टमध्ये काम करणारे कानसिंह चौहान सांगतात की, “जेव्हा डीलरने सांगितलं की तेही ऑर्डर घेणार नाहीत तेव्हा आमची निराशा झाली. आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी असं करू नये कारण ही आमची पहिलीच वेळ आहे आणि आम्हीही अजून शिकतोय की प्रॉडक्ट्स पॅकींग कशी करायची.” सुदैवाने पाटीदार यांनी स्वतःच्या खर्चाने लेबल्स ठीक केले.

महुआची दारू करमुक्त

त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने हनुमान स्व-सहायता समूहाच्या बायकांना लेबल लावण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी पाटीदार यांना विनंती केली. अलीराजपूर डिस्टीलरीच्या यशाची बातमी अन्य आदिवासी जिल्ह्यांतही पसरली. अनेकांनी भाबराच्या नेतृत्त्वात आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. आता शहडोल, बडवानी, धार आणि खरगोन जिल्ह्यातही डिस्टीलरी सुरू होत आहे. अलीराजपूर आणि डिंडोरी प्लान्टला सरकारने प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती. तर बाकी ठिकाणी स्व-सहायता समूह व्याजमुक्त कर्जासाठी अर्ज करत आहेत. राज्य सरकारच्या वाणिज्यिक कर विभागाच्या प्रमुख सचिव दीपाली रस्तोगी म्हणाल्या की, “आम्हाला विश्वास होता की ही दारू केवळ आदिवासी समूहच गाळू शकतात. आम्ही त्यांतून व्यवसाय करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलं आहे पण यापुढे त्यांनाच हे सारं चालवायचं आहे.” विक्री वाढवण्यासाठी सध्या ही दारू करमुक्त ठेवली आहे आणि त्याची किंमत कोणी बदलू शकणार नाही. पुढचे सात वर्षे यावर एक्साइज ड्युटी लागणार नाही. हे समूह लाभ मिळवण्यासाठी स्थानीय विक्रेत्यांसोबत काम करू शकतात. रस्तोगींनी पुढे सांगितलं की सरकार अलीराजपूरच्या पहिल्या महुआ डिस्टीलरीत सक्रीयपणे सहभागी झालं होतं.

आदिवासी महिला सॅम्पल टेस्टर

कठ्ठीवाडा येथील जुन्या तेंदूपत्ता संकलन केंद्राचं नुतनीकरण करण्यात येऊन त्याला पेंट देण्यात आलाय. एका खोलीत चार बायका नीळा कोट घालून महुआची वाळलेली फुलं निवडत आहेत. दुसऱ्या खोलीत काही पुरुष एका बॉयलरमध्ये इंधन भरत आहेत तिसऱ्या खोलीत दारू गाळली जात आहे. गाळल्या जाणाऱ्या महुआचा सुगंध हवेत पसरलेला आहे. रेखा वाकळे, गीता तोमर या महुआ निवडण्याचं काम करतात. दोघीही विशीच्या आहेत. वाकळे सांगते, “आम्ही खूप जास्त दारू पित नाही. पण आम्हाला सांगण्यात आलंय की प्रत्येक बॅचचं सँपल आम्हाला चाखावं लागेल.” त्या आणि इतर लोकांना आता टेस्टींगची कला जमू लागली आहे. भाबर सर्व प्लान्टची देखरेख ठेवत असते. इथं रोज 200 लीटर दारू तयार होते. पण अलीराजपूरातील लोकांना अजूनही मॉन्डची प्रतिक्षा आहे. कारण सध्या तरी तिची खुली विक्री होत नाही. कठ्ठीवाडात खानावळ चालवणारे भिलाला आदिवासी संजय मिस्त्री सांगतात, “आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या परंपरेचा भाग असलेली दारू आता व्यावसायिकपणे बनवली आणि विकली जात आहे. पण ती आमच्यासाठीही उपलब्ध केली जायला हवी.”

महुआच्या दारूला राष्ट्रीय मद्याचा दर्जा मिळणे गरजेचे

महुआला ही नवी प्रतिष्ठा देण्यात अनिरुद्ध मुखर्जी यांचा मोठा हात आहे. ते वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियात कामाला होते आणि भारतीय देशी दारूंविषयी त्यांना सखोल ज्ञान आहे. ते सांगतात, “सिंधू संस्कृतीत म्हणजे साधारण इसवीसन पूर्व 13 व्या शतकात दारू गाळल्याचे पुरावे मिळाले आहेत. भारताला गाळीव दारूचं उगमस्थानही म्हणता येईल. देशी दारूचे जवळपास 50 प्रकार आहेत.” त्यांना वाटतं की महुआ ही अरक (कोको प्लम किंवा तांदळापासून गाळलेली दारू) पेक्षाही जुनी आहे आणि तिला राष्ट्रीय मद्याचा दर्जा मिळायला हवा कारण ती देशातील 13 राज्यांत प्यायली जाते. राजेश हेन्री यांच्यासोबत मुखर्जीदेखील हीची चव चांगली करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाणी आणि मातीच्या गुणवत्तेनुसार चवीतही बदल होत असतो. त्यामुळेच अलीराजपूरला मॉन्ड तर डिंडोरीला मोहुलो नावाने तिची विक्री केली जाते. त्यांची चवयात्रा त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत घेऊन आली. तिथली चव त्यांना आवडली. त्यानंतरच त्यांनी महुआ दारू उत्पादनासाठी पुढाकार घेतला. कैजुला प्रीमियम फेणीचे व्यावसायिक हेंजेल वाज यांनीही यात लक्ष घातलं आहे. अर्थात आदिवासी मोठ्या प्रमाणात दारूचं उत्पादन करू शकत नाहीत. त्यावर मुखर्जी म्हणतात, “हे खरंय की प्रत्येक बॅचमध्ये थोडा फरक राहणार आहे. पण हीच हाताने तयार केलेल्या दारूची खासियत असते. हे शास्त्रीय संगीतातील राग विस्तारासारखं आहे.”

बॉम्बे आबकारी अधिनियम 1878 आणि महौरा अधिनियम 1892 अंतर्गत याच्यावर बंदी लादण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतरही ही बंदी कायम राहिली. मात्र आदिवासी याचं उत्पादन व सेवन आपल्या गरजेपूरतं करू शकत होते. पण हा नियम पाळला नाही तर दंड व्हायचा. पोलिसांनी ‘ड्रंक ऑन पॉवर’ नावाचा एक अहवाल तयार केला होता. त्यानुसार जानेवारी 2018 ते डिसेंबर 2020 या काळात भोपाळ, जबलपूर आणि बैतूलमध्ये नोंद झालेल्या 540 एफआयआर्स मधून 33 टक्के या महुआ उत्पादनाशी संबंधीत होत्या.

मध्य प्रदेशात सरकारने सध्या तरी महुआ दारू उत्पादनाची परवानगी केवळ आदिवासी सहायता समूहांनाच दिली आहे. त्यासाठी त्यांनी कायद्यात सुधारणा केली. 20 जिल्ह्यांमध्ये त्यांचं काम आता सुरू आहे. आता कठ्ठीवाडातील हनुमान स्वसहायता समूहातील बायका उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक भागात सहभागी असतात. शेतकऱ्यांपासून महुआ फुलं विकत घेण्यापासून ते गाळलेली दारू पॅक करून विक्रेत्यांकडे पाठवण्यापर्यंत. तोमर आणि वाकळे यांचं काम सकाळी 8 पासून महुआ फुलं निवडण्यापासून सुरू होतं. ते घरीच दारू गाळतात तेव्हा सारी फुलं मागच्या बॅचमधील राहिलेल्या इस्टसोबत मिसळून पाण्यात भिजवत ठेवतात फर्मेंटेशनसाठी. तोमर सांगते की, “इथं कारखान्यात मात्र ते आधी पिसले जातात आणि नंतर मोठ्या ड्रम्समध्ये फर्मेंटेशनसाठी ठेवली जातात.” अंकिताची आई भोली भाबरही प्लान्टवर काम करतात. त्यांच्या अनुभवानुसार कारखान्यात जी दारू तयार होते ती तीव्र असते तर घरी गाळली जाणारी महुआ सौम्य असते. भोली म्हणतात की महुआ हा आमच्या आदिवासी संस्कृतीचा भाग आहे.

गोदामात काम करणारे कानसिंह चौहान यांना खरं तर शिक्षक व्हायचं होतं पण कोरोनामुळे शाळा बंद पडल्या आणि त्यांचं स्वप्नही. त्याच दरम्यान ते अलीराजपूरला आले. तिथे त्यांना इथल्या डिस्टीलरीत एका विज्ञान पदवीधराची आवश्यकता असल्याचं समजलं. त्यांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली. ते अभिमानानं सांगतात की, माझं काम फर्मेंटेशनच्या आधी आणि नंतर साखरेची मात्रा तपासण्याचं आहे. ते सांगतात की मॉन्डमध्ये 38 टक्के अल्कोहोल असतं. भोली आणि इथं काम करणाऱ्या लोकांसाठी महुआ दारू तयार करणं आणि विकणं हे एका प्रदीर्घ कटू संघर्षानंतरचा गोड विजय आहे. मॉन्ड प्लान्टमधली पहिली बॅच ही कठ्ठीवाडामधील डोंगरी माता टेकडीवर असलेल्या आदिवासी देव पिथोरा बाबा यांच्या मंदिरात वाहण्यात आली होती. मॉन्डच्या लोगोवरील घोडा हा देवाच्या प्रिय व पवित्र प्रतीकांपैकी एक आहे. बायकांना या गोष्टीचा आनंद आहे की त्यांना त्यांच्या पारंपरिक गोष्टी आणि वारसा आता इतरांसोबतही वाटून घेता येईल.

अनुवाद – प्रतिक पुरी

(सौजन्य – द प्रिंट)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here