- आशय बबिता दिलीप येडगे
“अजून काही दिवसांनी आपण जर येणाऱ्या पिढीला म्हणलो की, कधीकाळी अशा टुरिंग टॉकीज चालत होत्या आणि आम्ही सगळे तंबूत बसून सिनेमा बघायचो तर लोकांना विश्वास सुद्धा राहणार नाही. एकेकाळी गर्दीचा उच्चांक पाहिलेला माझा तंबू आणि मी आज अतिशय दयनीय अवस्थेत जगत आहोत. मी अपघाताने या तंबू टॉकीजचा ऑपरेटर झालो आणि पुढे अपघातानेच मालकही झालो. आता हा व्यवसाय वाचावा म्हणून शेवटचे प्रयत्न मी करतोय पण पुढे काय होईल माहित नाही. एकेकाळी लाखोंची उलाढाल केलेला हा उद्योग आता शेवटच्या घटका मोजतोय… बघा काही जमलं तर…”
संध्याकाळचे सहा वाजलेत. मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात असणारं एक छोटंसं गाव जांबसमर्थ. या गावाला स्वतःचा असा एक इतिहास आहे. समर्थ रामदासांचं गाव म्हणून एक गाव राज्यभर ओळखलं जातं. त्यामुळे इथे रामनवमीच्या मुहूर्तावर भरणारी जत्राही यंदा थाटात साजरी केली जातेय. कोरोना लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच पंचक्रोशीतील गावकरी या यात्रेत सहभागी झालेत. मोठमोठे आकाशपाळणे, लहान मुलांची खेळणी, मिठायांची रेलचेल अशी सगळी धामधूम सुरू आहे. ज्याठिकाणी ही जत्रा आहे तिथे हजारो लोक जमलेत. पण जत्रेच्या या गोंधळापासून काही मीटर दूर एका सपाट जागेवर एक तंबू थाटण्यात आलाय. टेम्पोसारख्या दिसणाऱ्या एका गाडीत प्रोजेक्टर लावून नुकताच प्रदर्शित झालेला अजय देवगनचा ‘भोला’ हा चित्रपट दाखवण्याची तयारी तिथे केली जातीय. पत्र्यांचं कुंपण लावून त्याच्या आत एक कापडी तंबू तयार केला गेलाय. त्या तंबूत एक पांढरा कपडा लावून सिनेमा त्यावर प्रोजेक्ट करण्याचं ठरवण्यात आलंय. या तंबूच्या बाहेर एक छोटंसं खोकं तयार करण्यात आलंय. या खोक्यात बसलाय संतोष श्रीकृष्ण वसू… त्याच्या हातात पन्नास रुपड्यांच्या तिकिटाचं एक पुडकं आहे, यातली दहा पंधरा तिकिटच आज विकली गेल्याने संतोष जरा खिन्न झालाय…

संतोष वसू मागील तेवीस वर्षांपासून या तंबूत सिनेमात ऑपरेटरची नोकरी करतोय. या सिनेमाचा मालक सत्यनारायण शेषराव कपाटे उर्फ नारायण ऑपरेटर याच्याशी असलेल्या मैत्री खात्यातून संतोष ही नोकरी अजूनही करतोय. एकेकाळी प्रेक्षकांनी तुडुंब वाहणाऱ्या या तंबूला आता मात्र असं प्रेक्षकांविना तडफडताना पाहून संतोषचा जीव तडफडतोय. या यात्रेत ‘भोला’ सिनेमा चालेल आणि आमच्या सिनेमावर जगणाऱ्यांचं पोट भागेल या अपेक्षेत संतोष वसू तिकीटविक्रीच्या या खोक्यात बसलाय. एक-दोन गिऱ्हाईक तिकीटाची किंमत विचारायला येतंय, पन्नास रुपये ऐकून हातात असणाऱ्या मोबाईलवर भोला चित्रपट शोधण्याचा प्रयत्न करत परत जातंय. पण काही हवशे, नवशे, गवशे अजूनही तिकीट खरेदी करतायत.
तिकडे ज्या गाडीत प्रोजेक्टर लावला गेलाय तिथे एक माणूस जनरेटर लावून प्रोजेक्टरच्या वायरी जोडतोय. प्रोजेक्टरच्या खोक्यातून डोकावून प्रेक्षक आलेत का ते तपासून बघतोय पण अजूनही मालकाने सांगितलंय तेवढे लोक या तंबूत जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी फाटलेला आणि मग शिवून घेतलेला पांढरा पडदा प्रोजेक्टरचा प्रकाश त्याच्यावर पडण्याची वाट बघतोय. जमलेली चारदोन डोकी गोंधळ करायला लागू नयेत म्हणून गाडीत बसलेल्या या माणसाने काही गाणी लावलीयत. त्यालाही माहितीय जर अजून कुणी आलं नाही तर एवढ्याच लोकांना चित्रपट दाखवून त्याला आजचा खेळ संपवावा लागणार आहे.
जांबसमर्थच्या जत्रेत लावलेल्या हिंदविजय चित्र मंदिर नावाच्या टुरिंग टॉकीजचा मालक नारायण ऑपरेटर मात्र प्रचंड धावपळ करतोय. पुन्हा पुन्हा जाऊन जनरेटरमध्ये पुरेसं तेल आहे का, तिकीटविक्रीच्या खोक्यावर लोक आलेत का, आत्तापर्यंत किती तिकिटं विकली गेली, काही हजार रुपये देऊन खरेदी केलेले भोला सिनेमाचे हक्क आणि आता त्या तुलनेत आलेलं गिऱ्हाईक यांचं गणित त्याच्या मनात सुरूय. तिकडे जत्रेत मात्र हजारो लोक नानागोष्टी खरेदी करतायत, आकाशपाळण्याचा आनंद घेतायत, तरुण पोरं जत्रंत आलेल्या पोरींच्या मागे फिरतायत, नारायण ऑपरेटर इथे बसून हताश होऊन हे सगळं पाहतोय तितक्यात….

तितक्यात एक गिऱ्हाईक तिकीटविक्रीच्या खोक्याजवळ येतं. वयाच्या विशीत असणारा हा पोरगा त्या खोक्यात बसलेल्या संतोषला तिकीट विचारतो. संतोष सांगतो पन्नास रुपय… तो पोरगा म्हणतो “पन्नास रुपय? तेबी या फाटक्या तंबूत जमिनीवर बसून पिच्चर बघायचे? याड लागलंय का काय? वीस रुपय देतो घ्यायचं तर घ्या…” हिंदविजय सिनेमाचा मालक नारायण ऑपरेटर हे सगळं दुरून ऐकतोय. खोक्यात बसलेला मोडकंतोडकं शिकलेला संतोष आता या पोराला काय उत्तर द्यावं त्याचा विचार करतोय. संतोष त्याला म्हणतो “दादा हा ‘भोला’ सिनेमा आत्ताच रिलीज झालाय. सिनेमा थेटरात गेलास तर पाचशे रुपये मोजावे लागतील. इथं आम्ही तुला तुझ्याच गावात पन्नास रुपये मागतोय तर देत न्हाईस तू…” त्यावर तो पोरगा जरा चिडूनच संतोषला म्हणतोय “आरं बाबा मी कशाला भोला बघायला थेटरात जाऊ” असं म्हणून तो खिशातला मोबाईल काढतो आणि खोक्यात बसलेल्या संतोषला भोला सिनेमाची पायरेटेड कॉपी दाखवून म्हणतो “हे बघ माझ्या मोबाईलात हाय तुझा भोला पण म्हणलं जरा बघावं मोठ्या पडद्यावर म्हणून इकडं आल्तू पण आता तू देत न्हाईस तर जातू परत…फुकटातल्या गोष्टीला पन्नास रुपये द्यायला मी काय येडा हाय व्हयं?” असं म्हणून तिकीट खरेदीला आलेला तो पोरगा त्याचा ‘मोबाईल’ खिशात टाकून पुन्हा जत्रेत उड्या मारायला निघून जातो…’मोबाईल…’
मागील वीस वर्षांपासून टुरिंग टॉकीजच्या धंद्यात असणाऱ्या नारायण ऑपरेटच्या नवीन दुष्मनाचं नाव आहे मोबाईल. मागील काही दशकांमध्ये तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे अनेक पारंपरिक व्यवसायांची मौत झालीय. टुरिंग टॉकीजचा धंदाही त्याला काही अपवाद नाही. 2000 च्या सालात महाराष्ट्रात काम करणाऱ्या टुरिंग टॉकीजची संख्या काही हजारांच्या घरात होती पण आता मात्र बोटावर मोजता येतील एवढ्याच टुरिंग टॉकीज महाराष्ट्रात उरल्यात. एकेकाळी महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय असणारा हा उद्योग शेवटच्या घटका मोजतोय. येणाऱ्या काळात आपल्याला या टुरिंग टॉकीज दिसतील की नाही ते सांगता येत नाही पण मरत चाललेला हा उद्योग एकेकाळी लाखो रुपयांची उलाढाल करायचा असं आता सांगितलं तर कुणाचा विश्वासही बसणार नाही.
जुने लोक सांगतात की, त्याकाळी होणाऱ्या जत्राही प्रचंड मोठ्या असत. एकेका जत्रेत दहा दहा टुरिंग टॉकीज यायच्या. तीस तीस चित्रपटांचे खेळ व्हायचे. एकाच छताखाली अनेक चित्रपट दाखवण्याची ‘मल्टिप्लेक्स’ची आयडिया ही टुरिंग टॉकीजनेच महाराष्ट्राला दिली असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र काळ बदललाय. मोठमोठी मल्टिप्लेक्स असणाऱ्या शहरांमध्ये चित्रपट दाखवायला टुरिंग टॉकीजला मनाई आहे पण चकाकणाऱ्या मल्टिप्लेक्सचा पाया याच टुरिंग टॉकीजने रचलाय हे आपण विसरलोय बहुधा.
टुरिंग टॉकीज सुरु कशा झाल्या?
1904 मध्ये मुंबईत राहणाऱ्या माणिक शेठ नावाच्या पारश्याने ब्रिटिशांना एका तंबूत बसवून पहिला चित्रपट दाखवला आणि मग तिथूनच सुरु झाला टुरिंग टॉकीजचा प्रवास. एकत्र येऊन चित्रपट पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या या टुरिंग टॉकीजला त्याकाळी प्रचंड प्रतिसाद मिळू लागला होता. मद्रास, मुंबई, कोलकात्ता यांसारख्या ठिकाणी टुरिंग टॉकीजने हातपाय पसरले होते. पण हळू हळू चित्रपटगृहांची संख्या वाढली आणि मद्रास, कोलकात्त्यातल्या टुरिंग टॉकीज नामशेष झाल्या.

पण तमाशा, नाटक, लावणी अशा लोककलांना आश्रय देणाऱ्या महाराष्ट्रातील जत्रांनी मात्र टुरिंग टॉकीजला नामशेष होऊ दिले नाही. याउलट महाराष्ट्रात हजारो टुरिंग टॉकीज तयार झाल्या. दादा कोंडके, निळू फुले यांच्यासकट राजेश खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र, मनोजकुमार, राजकुमार, राजेंद्रकुमार असल्या हिंदी हिरोंना खरी लोकप्रियता मिळवून दिली याच टुरिंग टॉकिजनी. पण काळ आणखीन पुढे सरकला घराघरात टीव्ही आले, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले, इंटरनेट बटाट्यापेक्षा स्वस्त झालं आणि हे सगळं या टुरिंग टॉकीजच्या किंवा नारायण ऑपरेटरच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘तंबू टॉकीज’च्या मूळावर उठलं….
मागच्या दोन वर्षात आलेल्या महामारीमुळं तर उरल्या सुरल्या टुरिंग टॉकीजचं कंबरडंच मोडलंय. शासनाने याकाळात काही मदत तर केली पण सिनेमाचा इतिहास जपणारा हा उद्योग वाचवायचा असेल तर असे अनेक प्रयत्न करावे लागतील असे नारायण सांगतो. तो म्हणतो की, “अजूनही काही लाख रुपयांचा करमणूक कर आम्ही टुरिंग टॉकीज चालवणारे लोक सरकारला देतोय पण सरकार मात्र आमच्याकडे बघायला बी तयार न्हाई…”
सिनेमाच्या वेडापोटी टुरिंग टॉकीजचा व्यवसाय करण्याचे धाडस करणाऱ्या सत्यनारायण शेषराव कपाटे उर्फ नारायण ऑपरेटर यांच्यासारखे काही मोजकेच टुरिंग टॉकीजचे मालक हा पारंपरिक व्यवसाय वाचवू पाहतायत. खरंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चित्रपटगृहांची संख्या तशी कमीच आहे. त्यामुळे या टुरिंग टॉकीजना सरकारी आश्रय मिळाला तर एकत्र बसून सिनेमा पाहण्याचे स्पिरिट तरुणांच्या मनावर रुजविण्यात या टॉकीज महत्वाची भूमिका बजावू शकतात. तूर्त तरी नारायण ऑपरेटर सारख्या शेकडो लोकांना जागिवण्यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. नाहीतर हल्ली जन्माला येताच मोबाईल हातात मिळणाऱ्या बाळांच्या पिढीला ‘असेही एक विश्व होते’, हे एखाद्या कहाणीसारखे सांगावे लागणार आहे….
खूप छान विषयाला हात घातला तुम्ही. टुरिंग टॉकीज हे सध्याच्या काळात नामशेष झालेले पाहायला मिळतात त्यातही हिंदविजय चित्र मंदिर यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. अतिशय उत्तम ग्राउंड रिपोर्ट 👍
खूप तळमळीचा लेख आपण लिहिता …
Khoop abhyas