‘मी म्हणालो होतो, आपण पाकिस्तानच्या हद्दीत घुसलोय पण कुणीही माझं ऐकलं नाही…’

ते दहशतवादी नसतात, ते गुप्तहेर नसतात… तरीही ते खितपत पडलेले असतात वर्षानुवर्षे तुरुंगात... आणि तुरुंग तरी कुठले तर थेट पाकिस्तानचे! काय दोष असतो त्यांचा? त्यांनी नकळत पाकिस्तानची सागरी हद्द ओलांडलेली असते… तसे ते पारंपरिक मच्छिमारदेखील नाहीत, ते आहेत पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी बोटीवर काम करणारे आदिवासी मजूर… तब्बल चार वर्षानंतर हे आदिवासी मजूर पाकिस्तानच्या तुरुंगातून आपल्या घरी परतले आणि मग पुढे काय झालं…? ‘टीम बाईमाणूस’चा हा आंखों देखा हाल…

  • आशय बबिता दिलीप येडगे

लोकेशन : सरावली शनवार पाडा, ता. डहाणू, मुंबईपासून 150 कि.मी. (गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला आदिवासी पाडा)

“साहेब जहाज बुडालं तर नवीन बांधता येईल, लाकडाचं, फायबरचं अगदी पाहिजे तसं जहाज नवीन बनवता येईल पण नवीन माणूस कुठून आणायचा? तो लाकडापासून बनवायचा का चिखलापासून?” पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात असणाऱ्या सरावली शनवारपाडा नावाच्या गावात एका डोंगरावर झोपडी बांधून राहणारे ऐंशी वर्षांचे सोन्या डावऱ्या काकडे सांगत होते.

त्यांचा 31 वर्षांचा मुलगा अर्जुन तब्बल साडेतीन वर्षे पाकिस्तानच्या लांडी तुरुंगात राहिल्यानंतर नुकताच परत आलाय.

ही गोष्ट आहे तब्बल साडेतीन वर्षे पाकिस्तानात तुरुंगवास भोगून परतलेल्या पाच गरीब आदिवासी मजुरांची.

पालघर, डहाणू, जव्हार, तलासरी या भागातील शेकडो आदिवासी मजूर मच्छिमारी करण्यासाठी गुजरातमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बंदरांवर जातात. तिथे गुजराती मालकांच्या बोटींवर बारा बारा तास काम करून, कित्येक दिवस समुद्रातच राहून काही पैसे कमावतात आणि त्यातूनच दर महिन्याला काही पैसे पाठवून गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचं पोट भरण्याचा प्रयत्न करतात.

आंतरराष्ट्रीय सीमावाद, सागरी सीमा आणि त्यावरून निर्माण झालेले वाद, पाकिस्तानची हद्द, भारताची सागरी हद्द या सगळ्याचा काहीही गंध नसलेल्या या मजुरांना बोटींवर लादण्यात येते आणि त्यांच्या नकळत ही जहाजं पाकिस्तानच्या हद्दीत घुसवली जातात. आता बोट चालवणाऱ्या माणसाकडून नेमकं असं का केलं जातं? पाकिस्तानच्या हद्दीत जहाज पकडल्यावर त्या जहाजाचं आणि त्यावर काम करणाऱ्या माणसांचं नेमकं काय होतं? ती माणसं तुरुंगात गेल्यावर मागे भारतात त्यांच्या कुटुंबाला काय काय सहन करावं लागतं? मासेमारी करायला गेलेल्या त्यांच्या घरातील कर्त्या माणसाला पाकिस्तानी मेरीटाईम सेक्युरिटी एजन्सी म्हणजेच सागरी सुरक्षा संस्थेच्या जवानांनी अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी सरकारकडून किंवा सरकारी यंत्रणांकडून ‘मन की बात’ केली जाते का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘पाकिस्तान रिटर्न’ माणसांची ही थरारक गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे. हे अनुभव भीतीदायक आहेत, दुःखद आहेत आणि त्याचबरोबर आपल्या यंत्रणेची, देशाची आणि समाजाची एक नागडी, असंवेदनशील बाजू दाखवून देणारे हे सगळे अनुभव आहेत.

‘स्वतःच्या बापालाच न ओळखणारी मच्छीमारांची मुलं’

पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने अटक केलेल्या मराठी मच्छीमारांमध्ये अर्जुन डावरे हा एक मच्छीमार आहे. त्याची नुकतीच सुटका झालीय. अर्जुनला तीन छोट्या छोट्या मुली आणि एक मुलगा आनंद अशी एकूण चार मुलं आहेत. या सगळ्या मुलांमध्ये सगळ्यात लहान असणारी रोशनी आता जरी पाच वर्षांची असली तरी अर्जुन पाकिस्तानला गेला तेंव्हा ती फक्त 23 आठवड्यांची होती. 16 मे ला अर्जुन डावरे त्याच्या घरी परत आला. तो सांगतो की, “ज्या क्षणी मी माझ्या घरात पाऊल ठेवलं त्याक्षणी माझ्या लेकरांना जवळ केलं. मी तब्बल साडेतीन वर्षांनी त्यांना भेटत होतो. मी पाकिस्तानात जाताना अवघ्या दोन वर्षांची असणाऱ्या माझ्या चिमुरडीला, रोशनीला मला जवळ घ्यायचे होते. तिचा बाप परत आलाय हे तिला सांगायचं होतं. मी तिला माझ्या जवळ बोलावलं आणि ती मला बघून रडायला लागली. तिने बहुतेक मला ओळखलंच नाही. माझी मुलं त्यांच्या बापालाच विसरली होती.”

अर्जुनला घरी येऊन पाच दिवस उलटून गेलेत पण अजूनही पाच वर्षांची रोशनी त्याच्या जवळ येत नाही. त्यांचे नातेवाईक तिला विचारतात की “बाळा तुझा बाप कोण?” हा प्रश्न ऐकल्यावर पाच वर्षांची ही निरागस पोर बाप म्हणून तिच्या ऐंशी वर्षांच्या आजोबांकडे बोट दाखवते.

अर्जुन आणि त्याचे मुलं

अर्जुनसाठी मागच्या साडेतीन वर्षांच्या पाकिस्तानातील तुरुंगवासापेक्षा हा प्रसंग अधिक वेदनादायक असावा. फारसा न शिकलेला, या चिमुरड्यांची पोटं भरण्यासाठी राज्य सोडून दूरवर समुद्रात काम करायला गेलेला अर्जुन हे दुःख नीट सांगूही शकत नाही. त्याला प्रचंड रडायचं असतं पण तो नीट रडूही शकत नाही.

जी परिस्थिती अर्जुन डावरेची आहे तशीच काहीशी परिस्थिती अर्जुनसोबतच पकडल्या गेलेल्या आणि सुटका झालेल्या जितेश दिवाची आहे. त्याचीही लहान लहान मुलं त्यांच्या बापाची ओळख विसरली आहेत. या सगळ्या मच्छीमाराना त्यांचं आयुष्य तर पुन्हा उभं करायचंच आहे पण यासोबतच त्यांच्या पोटच्या पोरांच्या डोळ्यात स्वतःला बाप म्हणूनही पाहायचं आहे हा त्यांच्या आयुष्याचा संघर्ष आता सुरु झालाय.

‘मी म्हणालो होतो आपण पाकिस्तानच्या हद्दीत घुसलो होतो पण कुणीही माझं ऐकलं नाही….’

डहाणू तालुक्यातल्या सरावली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या शनवारपाड्याच्या बाहेर एका छोट्याश्या टेकडीवर एक झोपडी आहे. तिथेच अर्जुन डावरेचं एक छोटंसं कुटुंब राहत होतं. त्यावेळी 27 वर्षांचा असणारा अर्जुन डावरे, त्याची बायको, चार छोटी छोटी गोंडस मुलं आणि म्हातारे आई वडील. अगदी नावालाच शाळेत गेलेला अर्जुन लहान असल्यापासूनच बोटींवर कामाला जायचा. त्यामुळे मच्छिमारी करण्याचं तंत्र त्याला त्याच्या कुटुंबाचं पोट भरण्यात मदत करत होतं. त्याच्या घरात खाणारी सात तोंडं होती आणि त्यांचं पोट भरायला अर्जुनला सतत काम करत राहणं भाग होतं. नाही म्हणायला डावरे कुटुंबाकडे पोट भरता येईल एवढा जमिनीचा तुकडा आहे पण या भागात पडणाऱ्या प्रचंड पावसामुळं इथे फक्त भातच पिकवता येतो. एकदा का हा भात काढला की या परिसरात काम करून पोट भरायला फारशा संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून काही किलोमीटर आतमध्ये राहणाऱ्या कोकणी, वारली, कातकरी आदिवासींना समुद्र किनाऱ्यावरच्या कोळ्यांच्या गलबतावर मजुरी करायला जाणे हाच एकमेव मार्ग शिल्लक राहतो.

जितेश दिवा

त्यामुळेच 27 वर्षांचा अर्जुन त्याचे सासरे जयवंत पाचलकर यांच्यासोबत डिसेंबर 2019 ला गुजरातच्या मांगरोळ बंदरावर गेला होता. त्या बंदरावर मंगरोळच्याच दामा कानजी या गुजराती मालकाचे नीलकंठ नावाचे एक जहाज होते. त्या जहाजावर अर्जुन डावरे, त्याचे सासरे जयवंत पाचलकर, जितेश पाचलकर, जितेश दिवा आणि विलास कोंढारी हे पाच मराठी मच्छीमार काम करत होते. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असणारं मांगरोळ मासेमारीसाठी सुप्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावर असणाऱ्या काही मोठ्या बंदरांमध्ये या बंदराचा समावेश होतो पण हेच बंदर आणखीन एका गोष्टीसाठी ओळखलं जातं. या बंदरावर काम करणारे मच्छीमार अनेकदा आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत जातात आणि त्यामुळे या बंदरावर काम करणाऱ्या शेकडो लोकांना आजपर्यंत पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने अटक करून पाकिस्तानच्या तुरुंगात टाकलं आहे.

अर्जुन डावरे सांगतो त्याप्रमाणे त्यानेही पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने अटक केलेल्या आणि काही महिन्यांनी सोडून देण्यात आलेल्या मजुरांच्या कहाण्या या आधीही ऐकलेल्या होत्या. डिसेंबरच्या महिन्यात गुजरातच्या ओखा बंदरावरून अजित आणि त्याच्या इतर साथीदारांचं जहाज पाण्यात मासेमारी करायला रवाना झालं. गुजराती ‘शेठ’ने बांधलेलं ते एक नवीन जहाज होतं. दहा ते बारा दिवस समुद्रात घालविल्यानंतर अखेर जहाजाने आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात प्रवेश केला. यापूर्वीही वेगवेगळ्या जहाजांवर मासेमारी करण्याचा अनुभव असणाऱ्या अर्जुनने आपल्या जहाजाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याचं ओळखलं होतं. त्याचा साथीदार असणाऱ्या जितेश दिवाला तो तसे म्हणालाही होता पण त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि अखेर व्हायचं तेच झालं. पाकिस्तानी मेरीटाईम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी साध्या वेशात त्यांच्या जहाजावर प्रवेश केला आणि तिथल्या तिथे या सगळ्यांना जहाजासकट अटक केली. अटक केल्यानंतर या सगळ्या मजुरांना पाकिस्तानच्या लांडी तुरुंगात पाठवण्यात आलं. इतर मच्छीमारांप्रमाणे आपलीही काही महिन्यांमध्ये सुटका होईल असं या सगळ्यांना वाटलं होतं पण तब्बल 42 महिने त्यांना तुरुंगात राहावं लागलं.

आणि इकडे अर्जुनच्या गावात त्याचा संपूर्ण संसारच अक्षरशः उघड्यावर पडला होता. डहाणूच्या शनवारपाड्यात राहणाऱ्या त्याच्या बायकोला तिच्या नवऱ्याला अटक करून पाकिस्तानला नेण्यात आलंय हे काही महिन्यांनी कळलं. मात्र अर्जुन पाकिस्तानात असताना या कुटुंबात आणखीन एक संकट कोसळलं त्याच्या या लेकरांची आई असणाऱ्या त्याच्या बायकोने म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना सांभाळावं लागू नये म्हणून लेकरं त्यांच्याकडे टाकून ते घर सोडलं. घरात काम करणारी तरणीताठी सून चार लहान लहान लेकरांना या म्हातारा म्हातारीच्या पदरात टाकून घर सोडून निघून गेल्याचं अर्जुनची मोठी बहीण सीता सांगते. अर्जुनचं घर एका छोट्याश्या टेकडीवर आहे. वस्तीपासून दूर असणाऱ्या या झोपडीत पाणी आणायला ती टेकडी उतरून जावे लागते. ऐंशी वर्षांच्या अर्जुनच्या वडिलांनी मागच्या तीन वर्षांपासून त्यांच्या थकलेल्या खांद्यांवर अर्जुनच्या चारही लेकरांची आणि सतत आजारी राहणाऱ्या अर्जुन डावरेच्या आईची जबाबदारी पेलवलीय. अर्जुन तुरुंगात होता त्याकाळात एकाही सरकारी अधिकाऱ्याची किंवा तो ज्या जहाजावर कामाला होता त्या जहाजाच्या मालकाची पावलं त्यांच्या झोपडीकडे फिरकली नाहीत. कुणीही त्यांना साधी एक रुपयाची देखील मदत केली नाही. भाताची पेज करून पोटाची आग भागविण्याची कसरत केलेल्या अर्जुनच्या वडिलांना अर्जुन घरी परत आल्यामुळे आनंद तर झालाय पण मागच्या चार वर्षात आम्हाला आम्ही मेलोय की जिवंत आहोत हे विचारायलाही कुणी आलं नसल्याची तक्रार ते करत होते.

अर्जुन डावरे त्याच्या परिवारासोबत

अर्जुन आता परत आलाय. मागच्या चार वर्षात मोडकळीस आलेली त्याची झोपडी आता त्याला परत बांधायचीय. त्याच्या पोटच्या चारही लेकरांचा सांभाळ करायचाय. त्याची बायको त्याला सोडून निघून गेलीय तिने दुसरा संसार उभा केलाय पण मागच्या चार वर्षात होत्याचं नव्हतं झालेल्या अर्जुन डावरेला आता नवीन काम शोधायचंय. मुलं लहान असल्याने म्हाताऱ्या आई वडिलांकडे त्यांना सोडून त्याला आता परत तिथेच कामावर जाताही येणार नाही. 16 मे ला परत आल्यावर नाही म्हणायला स्थानिक पोलीस आणि तहसीलदारांनी अर्जुनची भेट घेतलीय पण नुकसानभरपाई तर सोडा कुणीही या कुटुंबाला अजूनपर्यंत तरी कसलीच मदत केलेली नाही. 31 वर्षांच्या, शिक्षणाचा कसलाही गंध नसलेल्या, मासेमारी सोडून इतर कोणत्याही कामाचा अनुभव नसलेल्या अर्जुन डावरेसमोर उभं आयुष्य आ वासून उभं ठाकलं आहे. त्याला त्याच्या गावात काहीतरी काम करून दोन पैसे कमवण्याची संधी हवी आहे. त्याच्या चारही लहान लहान लेकरांचा, थकलेल्या आई बापाचा सांभाळ करण्यासाठी त्याला आता मार्ग शोधावा लागणार आहे. ‘पाकिस्तान रिटर्न’ असा शिक्का कपाळावर बसलेल्या अर्जुनला मात्र आता पुन्हा पोट भरण्यासाठी जहाजावर पाऊलही ठेवायचे नाही पण त्याची परिस्थिती त्याला हा पर्याय देईल असे सध्यातरी वाटत नाही.

महाराष्ट्रातील मच्छीमारांना गुजरातला का जावं लागतं?

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या पालघर ते रायगड जिल्ह्यातल्या आदिवासींना मजुरी करण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र असे दोन पर्याय उपलब्ध आहेत पण मजुरांना दिला जाणारा पगार, मालकांकडून दिली जाणारी वागणूक ही मराठी बोट मालकांपेक्षा गुजराती बोट मालकांची चांगली असल्याने या मजुरांचा कल गुजरातकडे जास्त असतो. गुजरातच्या बंदरावरून जहाज घेऊन पाकिस्तानच्या हद्दीत घुसून मासेमारी करायची जोखीम पत्करणाऱ्या ‘तांडेलांसाठी’ मांगरोळचं बंदर प्रसिद्ध आहे. पाकिस्तानच्या पाण्यातून आणलेल्या माशांमुळे जहाजांचे मालक खुश असतात, भरपूर पैसे मिळाले म्हणून ‘तांडेल’ खुश असतात. एकीकडे हे सगळं सुरु असतं आणि दुसरीकडे मात्र पोट भरण्यासाठी महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या, कमी शिकलेल्या आदिवासींना मात्र आपण नेमकी कसली जोखीम उचलत आहोत याची बऱ्याचवेळा कल्पना नसते. पाकिस्तानच्या हद्दीत जाण्याचं कारण म्हणजे पाकिस्तानच्या पाण्यात भारतीयांना आवडणारे पापलेट आणि सुरमई मोठ्या प्रमाणात असतात, भारताच्या हद्दीत असणाऱ्या अरबी समुद्रातील भागात माश्यांची संख्याही आता कमी झाली आहे त्यामुळे चांगल्या उत्पन्नाच्या लालसेपोटी गुजराती जहाजमालक जहाज चालवणाऱ्या ‘तांडेला’ला म्हणजेच खलाश्याला ज्यादा पैश्यांचं आमिष दाखवून भारताची सागरी हद्द ओलांडून पाकिस्तानात जायला सांगतात. त्यामुळे बोटीवर पाय ठेवण्याच्या आधीच जहाज चालवणाऱ्या मुख्य खलाश्याला भरभक्कम ‘ॲडव्हान्स’ही दिला जातो.

त्यामुळे अधिकचे उत्पन्न मिळवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या या यंत्रणेमध्ये बळी जातो तो मात्र आंतरराष्ट्रीय सागरी सीमा आणि इतर वादांची कसलीही कल्पना नसलेल्या मजुरांचा. कमी शिक्षण झाल्याने आपण नेमका कोणता कायदा तोडत आहोत याची या मच्छीमारी करणाऱ्या मजुरांना कल्पना नसते आणि अनेकवेळा ते पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीच्या आयतेच तावडीत सापडतात.

‘आता मी माझ्या नवऱ्याला समुद्रात जाऊ देणार नाही’

लोकेशन : भिनारी, जांबूगाव, ता. डहाणू (गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला आदिवासी पाडा)

डहाणू तालुक्यातल्या जांबुगाव नावाच्या गावात असणाऱ्या भिनारी येथे जितेश रघु दिवा या आदिवासी मजुराचं कुटुंब राहतं. त्याच्या कुटुंबात त्याचे आई वडील, बायको, मुलगी आणि भाऊ राहतात. गुजराती मालकांच्या बोटींवर काम करून महिन्याला मिळणाऱ्या वीस पंचवीस हजारात जितेश त्याच्या कुटुंबाचे पोट भागवत होता. दहावीपर्यंत शिकलेला जितेश पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने अटक केलेल्या महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या मजुरांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल म्हणतो की “गुजरातच्या मजुरांना अटक झाल्यानंतर किमान त्यांच्या कुटुंबाचं पोट कसं भरेल याचितरी चिंता त्यांना नव्हती कारण गुजरात सरकारने त्यांच्या कुटुंबाला दर महिन्याला नऊ हजार रुपयांची मदत देऊ केली होती पण अटक झालेल्या महाराष्ट्रातल्या मजुरांना मात्र कसलीच मदत दिली जात नव्हती. मी तिकडे होतो त्यावेळी माझ्या कुटुंबाला अनेक त्रास सहन करावे लागले. माझ्या बायकोला कामाला जावं लागलं. गुजराती मजुरांना सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळत असताना आम्हाला मात्र काहीच माहिती मिळत नव्हतं.”

जितेश रघु दिवा आणि त्याचा परिवार

पाकिस्तानी तटरक्षक दलाने अटक केलेल्या गुजराती मजुरांच्या कुटुंबाना गुजरात सरकार महिन्याला एक ठराविक रक्कम मदत म्हणून देत असतं. मात्र महाराष्ट्रातून गुजरातेत जाऊन तेथील जहाजांवर मजुरी करणाऱ्या आदिवासी मजुरांना मात्र कसलीच मदत गुजरात सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकार करत नाही. वेळेवर कागदपत्रे पोहोचू न शकल्याने जितेशच्याच गावात राहणाऱ्या उमेश डावरेची सुटका होऊ शकलेली नाही. साडेतीन वर्षांनी घरी परतलेल्या जितेशची बायको म्हणते की, “माझ्या नवऱ्याला पाकिस्तानला नेण्यात आलेलं आहे हे आम्हाला कित्येक महिने माहित नव्हतं. तो तिकडे होता तेंव्हा मी माझ्या लहान मुलीला घरी सोडून कामावर जात होते. कुटुंबाची जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडली होती. कुणीतरी सांगायचं की लवकरच त्यांची सुटका होईल पण कित्येक महिने गेले तरी ते परत आलेच नाहीत. आता मात्र मी माझ्या नवऱ्याला जहाजावर पाठवणार नाही त्याने इथेच राहून काहीतरी करावे अशी माझी इच्छा आहे.”

‘मी पाकिस्तानात गेलो आणि सगळंच राहून गेलं’

लोकेशन : गोवारपाडा, ता. तलासरी (गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला आदिवासी पाडा)

पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यातील गोवारपाडा येथे राहणारा 38 वर्षांचा विलास महादू कोंढारी साडेतीन वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात राहिल्यानंतर अखेर घरी परत आलाय. दुसरीपर्यंत शाळा शिकलेल्या विलासला एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. विलासचे वडील लहानपणीच वारल्याने अगदी कमी वयातच विलास पैसे कमवायला लागला होता. विलासला डहाणूपासून ते रायगडपर्यंत आदिवासी मजुरांच्या स्थलांतराची माहिती आहे. तो म्हणतो की “आम्हांला आम्ही जिथे राहतो तिथेच दोन पैसे कमवण्याची संधी जर दिली तर आम्ही कशाला मरायला तिकडे जातोय? पण आमच्या भागात आम्हाला विचारायलाही कुणी येत नाही. आता मी पाकिस्तानवरून परत आलोय तर आमचे तहसीलदार, स्थानिक पोलीस आणि पत्रकार प्रत्येकजण रिकाम्या हाताने घरी येतोय आम्हाला विचारतोय तिकडे कसं वातावरण होतं? तुरुंगात काय काय करावं लागायचं? पाकिस्तानी लोक कसे होते? वगैरे वगैरे पण एकही माणूस हे विचारत नाही की तू तिकडे होतास तेंव्हा तुझ्या कुटुंबाचं पोट कसं भरलं? आता तुला काही मदत हवी आहे का?”

विलासलाही गुजराती मजुरांना मिळणारी मदत हवी आहे याबाबत बोलताना तो म्हणतो की, “आपल्या देशाचे पंतप्रधान महान आहेत. त्यांनीच आम्हाला सोडवलंय पण गुजराती मजुरांच्या कुटुंबांना दिली जाणारी मदत आमच्या कुटुंबाला का दिली गेली नाही? मागच्या तीन वर्षात माझं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालंय. माझं घर मोडकळीस आलंय. कुणालाही वाटलं नाही की बाबा याच्या कुटुंबाला मदत करावी.” लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या विलासला स्वतः शिकून मोठं व्हायचं होतं पण परिस्थितीने त्याला ते करू दिलं नाही पण आता तीन लेकरांचा बाप असणारा विलास म्हणतो की, “मी काहीच शिकलेलो नाही पण माझी एक साधी इच्छा होती की माझ्या मुलीला किमान शिक्षण मला देता यावं. आम्हा आदिवासींना फार मोठा अधिकारी व्हायचं स्वप्न कधीच पडत नाही पण हो माझ्या लेकीला मला शिक्षिका बनवायचं होतं पण मी पाकिस्तानात गेलो आणि सगळंच राहून गेलं आता मला तिचं लग्न लावून द्यावं लागणार आहे. शिक्षण नसल्याने माझ्या जगण्याची जी कुत्तरओढ झाली तीच माझ्या लेकरांची होणार आहे. माझा एक मुलगा आता आठवीत शिकतो पण त्यालाही कुटुंबाच्या परिस्थितीमुळे मजुरी करावी लागतीय. थोडक्यात काय तर आम्हाला शिकण्याचा, आयुष्यात काही करण्याचा अधिकारच कुणी आजवर दिलेला नाही. परिस्थितीच अशी आहे की काम नाही केलं तर आम्ही सगळे उपाशी मरू.”

विलास महादू कोंढारी आणि त्याचा परिवार

‘माझ्या नातेवाईकांना वाटलं होतं मी आणि माझा मुलगा मरून गेलोय त्यामुळे माझ्या बायकोला माहेरी हाकलून त्यांना माझं शेत त्यांना मिळवायचं होतं’

तलासरी तालुक्याच्याच कोचाई पाटील पाडा येथे राहणाऱ्या 40 वर्षांच्या जयवंत नाना पाचलकर यांना आणि त्यांच्या 18 वर्षांच्या मुलाला म्हणजेच जितेश जयवंत पाचलकर यालाही पाकिस्तानी तटरक्षक दलाने अटक केलेली होती. अगदी लहान असल्यापासूनच मासेमारीचा अनुभव असलेल्या जयवंत पाचलकर यांना हे माहिती होतं की त्यांची काही महिन्यानंतर का होईना पण सुटका होईल पण त्यांच्यासोबत मासेमारी करायला आलेल्या त्यांच्या 18 वर्षीय मुलाला मात्र याची कसलीच कल्पना नव्हती. 18 वर्षांचा जितेश म्हणतो की ,”मी पाकिस्तानच्या तुरुंगात गेलो तेंव्हा माझं वय 15 होतं आणि आता मी 18 वर्षांचा झालोय. मी शाळा केंव्हाच सोडलीय पण आता पुन्हा समुद्रात जाण्याची भीती वाटतीय. मी पुढे काय करणार आहे मला माहिती नाही.”

जयवंत पाचलकर म्हणतात की “आम्हा मजुरांना पोट भरण्यासाठी कित्येक दिवस समुद्रातच राहावं लागतं. आमच्या जहाजाला पकडलं तेंव्हा पाकिस्तानी तटरक्षक दलाचे जवान साध्या वेशात आमच्या जहाजावर चढले आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना अटक केली. आम्ही पाकिस्तानच्या तुरुंगात होतो त्यावेळी तिथल्या काही अधिकाऱ्यांनी आमची विशेष काळजी घेतली. पाकिस्तानी कैद्यांच्या तुलनेत आम्हाला सोपी कामे दिली जायची, पाकिस्तानी अधिकारी सांगायचे की तुमची लवकरच सुटका होणार आहे. आम्ही तुरुंगात होतो तेंव्हा कोरोना आला त्यावेळी आम्हाला तिथे कोरोनाच्या लसींचे तिन्ही डोस देण्यात आले. सगळं काही मिळत असलं तरीही आमच्या कुटुंबाची सतत काळजी असायची. आमच्या चुलत्याने तर आम्ही दोघे मेलो असं समजून माझ्या बायकोला माहेरी पाठवून माझी जमीन ताब्यात घेण्याचा कट रचला होता.”

‘तुरुंगातून भारतात पत्र पाठवली आणि सुटकेचा मार्ग मोकळा झाला…..’

मागच्या दोन दशकांपासून मासेमारीचा अनुभव असलेल्या जयवंत पाचलकर यांना तुरुंगात गेल्यानंतर एक कल्पना सुचली. त्यांच्या नात्यात एकच माणूस थोडा शिकलेला म्हणजे लिहिता वाचता येणारा आणि धडपड करून सगळी सरकारी कामे करणारा होता आणि तो होता त्यांच्या साडूचा मुलगा नरेश भेकरे. जयवंत पाचलकर यांना लिहिता वाचता येत नाही त्यामुळे मग त्यांनी एका कैद्याची मदत घेऊन नरेश भेकरेच्या नावाने पाकिस्तानच्या तुरुंगातून पत्र लिहिले होते. डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी लिहिलेले हे पत्र नरेशपर्यंत पोहोचायला 2020 चा सप्टेंबर महिना उजाडला. त्या पत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे नरेशने मग जयवंत पाचलकर आणि त्यांच्या मुलाची कागदपत्रे गोळा करायला सुरुवात केली.

अवघ्या पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या नरेश भेकरेला त्याच्या काकांना आणि भावाला सोडवण्यासाठी काय काय करावे लागेल, कोणकोणती कागदपत्रे गोळा करावी लागतील याची माहिती त्या पत्रामध्ये दिलेली होती. त्यासाठी त्याला कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने मदत केली नाही. जयवंत पाचलकर आणि जितेश पाचलकर यांची कागदपत्रे गोळा करत असताना नरेश भेकरेला कळले की त्यांच्याच जिल्ह्यातील इतरही चार जण पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यानंतर या सहा जणांचे रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे गोळा करून पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पाठवण्याचा त्याचा संघर्ष सुरु झाला. पाकिस्तानातल्या तुरुंगात अटकेत असलेली ही सगळी माणसं वेगवेगळ्या गावातली असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करताना नरेश भेकरेला अनेक अडचणी आल्या. काही ग्रामपंचायतींनी अशी प्रमाणपत्रे देण्यास नकार दिला अशा ग्रामपंचायतींना प्रसंगी कायद्याची भीती दाखवून, वरिष्ठांकडे तक्रारी करून नरेश भेकरेने ती सगळी कागदपत्रे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पाठवली आणि या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.

‘मदत म्हणून मिळालेल्या पाकिस्तानी रुपयांचं आम्ही करायचं काय?’

डिसेंबर 2019 मध्ये एके दिवशी संध्याकाळी लांडी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी या सगळ्या मच्छीमारांना त्यांची सुटका होणार असल्याचे सांगितले आणि मग त्यानंतर त्यांना आधी कराचीवरून लाहोरला आणण्यात आले तिथून वाघा बॉर्डरवर या सगळ्या दोनशे मच्छीमारांची सुटका करण्यात आली. तब्बल साडेतीन वर्षे स्वतःच्या देशापासून आणि घरापासून दूर राहिल्यानंतर हे दोनशे जण भारतात सुखरूप परत आले.

पाकिस्तानातून निघताना तेथील ‘ईदी फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने या सगळ्या मच्छीमारांना प्रवासात लागणारं सामान आणि पाकिस्तानी चलनातील पाच हजार रुपये दिले होते मात्र भारतात परतल्यावर पालघर जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या या मच्छिमारांसाठी ईदी फाउंडेशनने केलेली ही मदत कुचकामी ठरली कारण ‘करन्सी एक्सचेंज’मध्ये जाऊन ते पैसे भारतीय रुपयांमध्ये बदलून घेण्याचा एकही मार्ग पालघर जिल्ह्यात उपलब्ध नाही आणि असेल तर त्याची माहिती या मजुरांना नाही. त्यामुळे हे पाकिस्तानी रुपये आता या मजुरांच्या झोपडीत पडून आहेत. ते बदलून घेण्यासाठी कुणाचीतरी मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत हे सगळे मजूर आहेत. याबाबत बोलताना विलास कोंढारी म्हणतो की, “आम्ही शाळेत गेलेलो नाही त्यामुळे जिन्नाचा फोटो असलेल्या या पैश्यांचं करायचं काय हे आम्हाला माहिती नाही. मला पैश्यांची प्रचंड गरज आहे. कुणीतरी म्हणत होतं की या पाच हजार पाकिस्तानच्या रुपयांचे भारतात येऊन दीड हजार रुपयेच होतात. आता दीड तर दीड पण मग ते बदलायला मुंबईला जायचं म्हणजे दोन हजारांचा खर्च आहे. तुम्हीच सांगा आता या पैश्यांचं आम्ही करायचं काय?”

काय आहे ‘एग्रीमेंट ओन कॉन्सुलर एक्सेस?’

फाळणी पूर्वीपासून सौराष्ट्र आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मच्छीमार या परिसरात मासे पकडत आले आहेत. मच्छीमारांचे सारे आयुष्य समुद्रात मासे पकडण्यात जाते. त्यांचे जीवन आणि जगणे प्रामुख्याने मासेमारीवर अवलंबून आहे. बोटी हे त्यांच्या जगण्याचे महत्त्वाचे साधन आहे. भारत आणि पाकिस्तानात जवळपास नेहमी तणाव असल्याने मच्छीमारांना त्याचा अधिक त्रास होतो. 2008च्या ‘एग्रीमेंट ओन कॉन्सुलर एक्सेस’च्या अंतर्गत दोन्ही देश दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलैला त्यांच्याकडे असलेल्या दुसर्‍या देशाच्या कैद्यांची यादी एकमेकाला देतात. ही यादी दोन प्रकारची असते. एक यादी मच्छीमारांची असते आणि दुसरी इतर कैद्यांची.

‘एग्रीमेंट ऑन कॉन्सुलर ऍक्सेस’मध्ये म्हटलं आहे की, भारत किंवा पाकिस्तानचा एखादा नागरिक दुसऱ्या देशात पकडला गेला तर तीन महिन्याच्या आत त्या देशाच्या उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याला त्या पकडल्या गेलेल्या माणसांशी भेट घालून देण्यात येईल. पण असे अनेकदा घडत नाही. अटकेत असलेल्याला भेटून त्याच्याकडून अधिकारी सर्व माहिती घेतात आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाला कळवतात. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय गृहमंत्रालयाला ती माहिती देते. मग चौकशी करण्यात येते की तो माणूस आपल्या देशाचा नागरिक आहे की नाही. चौकशी करून त्याचे निष्कर्ष उच्च आयुक्तालयाला कळवले जाते. काही केसमध्ये तो आपल्या देशाचा नागरिक आहे, की नाही ते ठरविण्यात बरीच वर्ष लागली आहेत. राष्ट्रियता ठरत नाही तोपर्यंत सजा पूर्ण झाली तरी, कैद्यांना सोडता येत नाही. म्हणून उच्चायुक्तालयाचा अधिकारी कैद्याला भेटल्याच्या तीन महिन्याच्या आत त्याची राष्ट्रियता ठरवली जाणे आवश्यक आहे.

याबाबत बोलताना पाकिस्तान-इंडिया पीस फोरमचे कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई म्हणतात की, “अटक करण्यात आलेले मच्छीमार हे केवळ व्यवसायासाठी समुद्रात खोलवर जात असतात आणि त्यातूनच ते पाकिस्तानच्या हद्दीतही घुसतात. पलिकडे त्यांचा दुसरा कोणताच हेतू नसतो. परंतु तरी ही त्यांना कित्येक महिन्यांचा तुरुंगवास सहन करावा लागतो. असंच काही पाकिस्तानच्या मच्छीमरांसोबत भारतीय समुद्राच्या हद्दीत घडते. मच्छीमारांची अडचण लक्षात घेता पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी ‘नो अरेस्ट’ हे धोरण स्वीकारले पाहिजे. मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सी किंवा कोस्ट गार्डला वाटले की, दुसऱ्या देशाच्या मच्छीमारांच्या बोटी आपल्या देशाच्या पाण्यात येत आहे तर त्याला पकडण्याऐवजी बोटीला त्यांच्या देशाच्या पाण्यात जाण्यासाठी भाग पाडले पाहिजे. अटक करण्याऐवजी हा सोपा मार्ग आहे. असे झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल.”

पाकिस्तानातून परतलेल्या या आदिवासी मच्छिमारांच्या मजुरांच्या परत येण्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या कातकरी, कोकणी, वारली समुदायातील आदिवासी मजुरांना पोटापाण्यासाठी गुजरात गाठावे लागते. अनेकदा मासेमारी करताना पकडल्या गेलेल्या मजुरांवर हेरगिरीसारखे गंभीर आरोप लावून त्यांना वर्षानुवर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात डांबून ठेवले जाते. इकडे मायदेशात ज्या मजुरांना पकडले गेले आहे त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या सुटकेसाठी नेमके कुठे जायचे? काय करायचे? कोणती कागदपत्रे गोळा करायची याची कसलीही माहिती नसते आणि मग वेळेत कागदपत्रे न पोहोचल्याने ऐन उमेदीतच या गरीब मजुरांना पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडून राहावे लागते. गुजरातचे रहिवासी असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबियांना किमान काहीतरी आर्थिक मदत मिळते पण महाराष्ट्राच्या पालघर, डहाणू, वाडा, तलासरी आणि इतर आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना कसलीच सरकारी, खाजगी मदत मिळत नाही. अजूनही पालघर जिल्ह्यातील 20 ते 30 आदिवासी मच्छिमार पाकिस्तानात आहेत त्यांच्या सुटकेसाठी सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर काम करण्याची गरज आहे किमान पाकिस्तानात असलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणे आणि हा प्रश्न मानवतेच्या दृष्टिकोनातून हाताळणे अत्यंत महत्वाचे आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here