दिल्लीचे ‘मिनी काबूल’… आपल्याच देशातून परागंदा होण्याची एक भयकथा!

अफगाणिस्तानच्या संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आघाडीचा संघ म्हणून नावारूपाला येण्याच्या दिशेने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट रसिकांकडूनही अफगाणिस्तानच्या खेळाडूंना स्टेडियममध्ये आणि स्टेडियमच्या बाहेरही मोठा पाठिंबा मिळाला. दिल्लीच्या लाजपत नगर येथे तर हजारो अफगाणी निर्वासितांची वस्ती आहे. या भागाला ‘मिनी काबूल’ म्हणून ओळखलं जातं. हे सगळे अफगाणी निर्वासित आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रोजेक्टर लावून एकत्र आले होते. दिल्लीच्या याच ‘मिनी काबूल’ची ही जन्मकथा…

  • नम्रता भिंगार्डे

ऑक्टोबर महिन्यातल्या सोनेरी संध्याकाळी राजधानी दिल्लीमधल्या एका हिरव्यागार बागेत सोनेरी कांतीची, गुबऱ्या गुबऱ्या गालांची, फ्रॉकमधली मुजदा आझमी बहिणीशी गप्पा मारत बसलेली होती. हातातलं हिंदी विषयाचं पुस्तक दाखवत तिने मोठ्या उत्साहात शाळेविषयी सांगायला सुरूवात केली. मालवीयनगरच्या सरकारी शाळेत मुजदा शिकते. “हिंदी नहीं आती थी बिलकुल भी. परेशानी होती थी स्कूल में, क्युं की हमारी भाषा अफगानी है ना. ये मेरी सिस्टर है, अभी एक महिना पहले ही दिल्ली आई है. हिंदी नहीं बोलती इसिलिए मेरे साथ घुमती है.” मुजदाच्या शेजारी मान खाली घालून बसलेली अंगभर ड्रेस घातलेली आसमाँ गप्प होती. अफगाणिस्तानातून महिनाभरापूर्वीच आसमाँचं कुटूंब आश्रित म्हणून भारतात आलं. आसमाँ शाळेत जात नाही. “अफगाणिस्तानातून निघालो तेव्हा आधी पाकिस्तानात राहिलो आणि मग भारतात आलो. आता इथली वेळही संपत आलीये. इथून पुढे माहित नाही कुठे जाऊ?” असं मुजदाने जेव्हा सांगितलं तेव्हा तिचा हसरा चेहरा कोणत्यातरी विचारांत बुडाला आणि शांत झाला.

मुजदाचा अर्थ काय? असं विचारल्यावर तिच्या शांत चेहऱ्यावर पुन्हा हास्याची लकेर उमटली आणि गोड आवाजात उत्तर आलं…. “खुशी”

“खुशी’ आणि मोकळं “आकाश’… या दोन शब्दांपासून कायमच्या पारख्या झालेल्या या बहिणी… जन्मल्यापासून केवळ दहशतीखाली राहिलेल्या मुजदा आणि आसमाँ… ‘खुशी’ आणि टीचभर मोकळं ‘आकाश’ जगण्यासाठी मिळावं यासाठी अफगाणिस्तानापासून सुरू झालेला प्रवास त्यांना भारतात घेऊन आला… निर्वासित या नव्या ओळखीसह!

दिल्लीमधील लाजपत नगर 2 च्या गल्लीत दुपारच्या वेळी वातावरणात रोटीचा वास भरून राहिला होता. रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर रुमालांखाली झाकलेल्या मोठ्या मोठ्या रोट्या घेण्यासाठी पांढरी आणि राखाडी पठाणी घातलेल्या पुरुषांनी गर्दी केली होती. दिल्लीच्या या छोट्याशा गल्लीत कानांवर पडणारी पर्शियन भाषा ऐकल्यावर आणि अरबी भाषेत लिहलेले दुकानांचे बोर्ड पाहिल्यावर लक्षात येतं की, दिल्लीच्या ह्रदयात जपलेल्या काबूलमध्ये आपण पाय ठेवलेला आहे.

हजारो अफगाणी शरणार्थी म्हणून दिल्लीत दाखल झाले

प्रशासकीय भाषेत सांगायचे झाले तर फक्त एका परिच्छेदातच या अफगाणी निर्वासितांबद्दल सांगता येईल. भारतीय सरकारशी संलग्न असलेल्या UNHCR (The United Nations High Commissioner for Refugees) च्या नोंदीनुसार या घडीला 15,559 अफगाणी निर्वासित किंवा शरणार्थी म्हणून भारतात राहत आहेत. पैकी सर्वात जास्त अफगाणींची वस्ती राजधानी दिल्लीत विखुरलेली आहे. 1970-80 च्या दशकात अफगाणिस्तान जेव्हा सोव्हिएत संघाच्या ताब्यात होता तेव्हा… 1990-96 दरम्यान देशांतर्गत टोळीयुद्ध प्रचंड भडकले असताना… 1996 नंतर तालिबानच्या हाती देश गेला तेव्हा आणि 2001 नंतर आर्थिक दिवाळीखोरीच्या वेळी… अशा चार वेगवेगळ्या कालावधीत हजारो अफगाणी शरणार्थी म्हणून दिल्लीत दाखल झाले आणि तिथेच राहिले.

ही झाली कोरडी भाषा… परंतु या कोरड्या भाषेच्या पलिकडे दुसऱ्या देशात निवारा शोधणाऱ्या निर्वासिताचं एक वेगळं जगणं आहे… या जगण्यात तीव्र वेदना आहेत… दहशतवाद आणि यादवी युद्धाच्या भळभळत्या जखमा आहेत… कोणतंही युद्ध हे राजकीय सत्तासंघर्षांतून, अनेकदा अमानवी महत्त्वाकांक्षेतून होत असलं तरी ती हानीच असते. शहरांची, गावांची, माणसांची आणि मुख्य म्हणजे माणुसकीची! सरेआम होणारी कत्तल, विध्वंस मागे ठेवते ते फक्त निराधारपण, वेदना आणि भरून न येणारी हानी! दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये कित्येक अफगाणींशी बोलताना पदोपदी हेच जाणवतं होतं…

मुळच्या शांत स्वभावाच्या आणि साहित्य, कला, लोकसंस्कृतीत रमलेल्या अफगाणी जनतेला 1996 पासून तालिबान्यांच्या अमर्याद अत्याचाराचा सामना करावा लागला. मुलींना शाळेत जायला बंदी केली गेली. तरुण मुलांना सैन्यात सामिल व्हायची सक्ती केली. टिव्ही, न्यूजचॅनल्स, इंटरनेट, वर्तमानपत्र बंद पाडली. दहशतवादावर लिखाण करण्याची हिंमत राखणारे अफगाणी लेखक, कवी, विचारवंत यांच्यावर एकतर गोळीबार झाला किंवा ते बॉम्बब्लास्टमध्ये मारले गेले. लहान सहान उद्योग करणंही मुश्कील झालं. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली. आतंकवाद्यांचा खातमा करण्याच्या नावाखाली अमेरिकेने अफगाणिस्तानवर आकाशातून बॉम्बिंग केलं ज्यात हजारो निष्पाप अफगाणी नागरिकांचा बळी गेला. दिल्लीत भेटणाऱ्या प्रत्येक निर्वासिताच्या डोळ्यांनी रक्त पाहिलेलं आहे… मुडदे पाहिलेले आहेत… प्रत्येकाने आपल्या जवळची एक व्यक्ती बॉम्बब्लास्टमध्ये गमावलेली आहे.

इथे मी रिफ्युजी आहे पण मी जिवंत आहे…

लाजपतनगर पासून चार किलोमीटरवर असलेल्या जगनपुरा भोगल या भागातही अफगाणी निर्वासितांची वस्ती आहे. इथं अनेक अफगाणी तरुणांनी टेलरकाम सुरू केलंय. पठाणीसून सुरू झालेल्या त्यांच्या कामात आता डिझायनर कपड्यांचाही समावेश असतो. 2015 पासून दिल्लीत निर्वासित म्हणून राहणारे दाऊद मोहम्मद एक छोटसं टेलरचं दुकान चालवतात. “अफगाणिस्तानात माझं छोटं दुकान होतं. आजही आई आणि भाऊ तिथेच राहतात. पण तिथे काम करून पोट भरणं अशक्य झालं होतं. युद्ध नव्हतं, तालिबानी नव्हते तेव्हा आमचा देश खुप चांगला होता. पण आता तिथे केवळ बॉम्बब्लास्टचे आवाज, उध्वस्त शहरं आणि माणसं इतकंच उरलंय. सुकूनच्या शोधात मी दिल्लीत आलो. इथे मी रिफ्युजी आहे पण मी जिवंत आहे………..”

“हा माझा बेस्ट फ्रेंड. गेल्या वर्षी ब्लास्टमध्ये खतम झाला. 19 वर्षांचा जवान लडका. हम साथ पढ़ाई करते थे.” फेसबूकवर रेहमानचा बर्फात खेळणारा फोटो दाखवत इमरान मला त्याच्याविषयी सांगत होता. काबूलमध्ये राहणारा इमरान खान दिल्लीत अम्मीच्या इलाजाकरता म्हणून आला आणि इथंच थांबला. इमरानच्या आईला टीबी झालेला त्यामुळे त्याची आई आणि अब्बा दिल्लीत आले होते. हौज रानी भागात इलाजाकरीता आलेले अनेक अफगाणी पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक राहतात. तिथल्याच एका चिंचोळ्या गल्लीत अफगाणी रोटींच्या असलेल्या एका दुकानात इमरान ताजी गरम रोटी घेण्यासाठी आला होता. खास अफगाणी पद्धतीच्या शेणमातीने बनवलेल्या तंदुरच्या आवरणात रोटी भाजण्याचं काम करणारी दोन विशीतली अफगाणी पोरं आणि इमरान हे एकवतन आणि एकभाषा असल्याने एकमेकांची दोस्त झाली होती. एकमेकांची मस्करी करत त्यांचं काम करत होती. भट्टीत रोटी सेकण्याचं महत्त्वाचं काम करणारा हेबीझेर म्हणजे त्या दुकानाची जान आहे. केस रंगवलेला, कूल दिसणारा, तारुण्याने मुसमुसलेला उत्साही हेबीझेर 2016 पासून दिल्लीत राहतोय. “पहले ट्युशन लेता था पर अब यहाँ रोटी सेंकता हूं. पेट तो भरना पडता है ना.” असं म्हणत हेबीझेर हसला तेव्हा त्याच्या गालावर खळी पडली.

हेबीझेर

पर्शियन भाषेत काहीतरी बोलला आणि मग इमरान, हेबीझेर आणि रहिम अल्लाह सगळेच माझ्यावर एकत्र हसले. रहिम अल्लाह अफगाणिस्तानातल्या मजार ए शरीफ या मोठ्या शहरात रहायचा. “काबूल और मजार ए शरीफ ये दिल्ली और मुंबई जैसे शहर है.” 19 वर्षांच्या रहिम अल्लाहने मुंबई फक्त सिनेमांत बघितली होती. आटा आणि मैद्याच्या पीठाला हातांनी गोल आकार देत तो गप्पा मारत होता. 20 रुपयाला एक रोटी याप्रमाणे दिवसाकाठी 300 रोट्या बनवण्याचं आणि विकण्याचं काम हे दोघे करतात. हौज रानी भागात वस्ती नाही मात्र अफगाणी पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक असल्याने हे दुकान चांगलं चालतं मात्र हे कायमस्वरुपी काम नाही. रेफ्युजी कार्ड असेल तर काम मिळतं, नाहीतर कोणीही या अफगाणी निर्वासितांवर विश्वास ठेवून काम देत नाही.

अफगाणिस्तानातून ‘जगण्या’साठी भारतात आलेल्यांना दिल्लीतील UNHCR मध्ये नोंदणी करावी लागते. तिथे सुरूवातीला त्यांची नोंद ‘शरणार्थी’ म्हणून होते आणि कालांतराने (जवळपास दीड वर्षाने) निर्वासित म्हणून त्यांना मान्यता देत UNHCR एक रेफ्युजी कार्ड देते. या कार्डच्या आधारे निर्वासितांना मुलभूत सोयी जसं की शिक्षण, आरोग्यसेवा, नोकरी वगैरे मिळवता येतात. मात्र या सोयी त्यांना मिळाल्याच पाहिजेत असा काही कायदा अस्तित्वात नाही. कारण भारताने 1951 मध्ये आलेल्या निर्वासितांच्या अधिवेशनावर ना सही केली ना 1967 मध्ये आलेल्या त्यासंबंधीच्या शिष्टाचारावर मंजुरी दर्शवली. त्याचवेळी जगभरातील 144 देशांनी मात्र या अधिवेशनावर सही करून निर्वासितांचे काही अधिकार मान्य केले आहेत. भारतात मात्र या निर्वासितांना अधिकार किंवा हक्क देणारा कोणताही कायदा भारतात नाही.

असे असले तरी आफ्रिका, अफगाणिस्तान, म्यानमार, तिबेट आणि इतर देशांतून भारतात दरवर्षी शेकडोंनी येणाऱ्या निर्वासितांसाची काहीतरी नोंदणी असावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही गरजेचे आहे ते मिळावे यासाठी UNHCR ही एकमेव संस्था भारत सरकार आणि निर्वासित यांच्यात मध्यस्थाचं काम करते. निर्वासितांना रेफ्युजी कार्ड देणं, त्यांच्यासाठी हेल्थ कॅम्प्स घेणं, निर्वासितांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणं, सरकारी शाळांमध्ये अॅडमिशन मिळावं यासाठी लेटर्स देणं त्याचप्रमाणे निर्वासितांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी BOSCO, ACCESS सारख्या संस्थांसोबत वेगवेगळे वर्कशॉप्स, कार्यक्रम घेणं इत्यादी अनेक गोष्टी UNHCR करत असते. तरीही घरबार, संपत्ती, उत्पन्नाची साधनं आणि शिक्षण सोडून भारतात आलेल्या अफगाणी निर्वासितांना रोजचा खर्च भागवताना अनेक दिव्यांतून जावं लागतं. अफगाणिस्तानातलं राहणीमानाचा दर्जा विसरून हालाखीत रहावं लागतं.

रझिया असास

“काबूलच्या प्राथमिक शाळेत विज्ञानाची शिक्षिका म्हणून मी काम करत होते तर माझा नवरा काबूलमधल्या एका टीव्ही चॅनलला न्यूज रिपोर्टर होता. 2013 मधला तो दिवस मला आजही आठवतो तेव्हा आम्ही काबूल सोडलं. अंगावरच्या कपड्यांचे तीन तीन जोड घेऊन मी, माझा नवरा आणि माझी चार मुलं मालवीय नगरमध्ये आलो. अवाजवी भाडं भरून डोक्यावर छत घेतलं पण आमच्याकडे आधार कार्ड नसल्याने गॅस लवकर मिळाला नाही. माझा मोठा मुलगा तेव्हा 14 वर्षांचा होता तर त्याच्यामागचा 12 वर्षांचा. कामधंदा नव्हता. जेवढे पैसे सोबत आणले होते त्यात गुजारा करत होतो. त्यामुळे त्या दोघांनाही शाळेत घालू शकलो नाही. आम्ही दोघांनीही काम शोधण्याचा प्रयत्न केला. आमच्यासाठी रोजच्या रोज हातातोंडाची गाठ पडणं महत्त्वाचं होते.” 45 वर्षांच्या रझिया असास हळूहळू आवाजात बोलत आपबिती सांगत होत्या. रझिया असास यांचा चुलत भाऊ काही दिवसांपूर्वीच बॉम्ब ब्लास्टमध्ये गेला… 20 वर्षांचा होता तो.

दिल्ली काबूल रेस्टॉरंट: अफगाणींचे एकत्र जमण्याचे ठिकाण

“काबूलमधलं जगणं असं होतं की, सकाळी डोळे उघडले की आपण आणखी एक दिवस जिवंत आहोत यासाठी अल्लाहचे आभार मानायचो. मुलं शाळेसाठी घराबाहेर पडली की ती पुन्हा माघारी येतील की नाही, त्यांच्या शाळेत गोळीबार किंवा बॉम्बहल्ला तर होणार नाही ही चिंता जिवाला खात रहायची. माझे मिस्टर रिपोर्टिंगसाठी एखाद्या गावात जायचे मग तिथून परत यायचा रस्ता तालिबान्यांनी बंद केला असला तर ते अडकून जायचे. दिवस दिवस त्यांच्याशी संपर्क होत नसे. अशा परिस्थिती मी आणि माझी मुलं एकमेकांना धरून घरात कोंडून घ्यायचो. नाही नाही ते विचार मनात थैमान घालायचे.” सांगता सांगता रझिया दीदीच्या पापण्या ओलावल्या आणि शब्द थिजले. एक घोट पाणी पिऊन त्यांनी भारतातला जगण्यासाठीचा संघर्ष सांगायला सुरूवात केली. रझिया दिदीचं आयुष्य पहिल्यासारखं राहिलं नाही. काबुलमध्ये न्यूज रिपोर्टर असलेला रझिया दिदीचा नवरा मालवीय नगरमधल्याच एका अफगाणी हॉटेलात काम करतो. BOSCO या संस्थेच्या मदतीने काही वर्षांनी तिच्या मुलांना शाळेत दाखला मिळाला. रेफ्युजी कार्डमुळे गॅस, वैद्यकीय सेवा, भाड्याचं घर मिळवण्याची कसरत सुटली.

लाजपत नगरमधले ‘दिल्ली काबूल रेस्टॉरंट’ हे या सगळ्या अफगाणींचे एकत्र जमण्याचे ठिकाण. अफगाणिस्तानात सोडून आलेल्या घरच्या खाण्याची चव आणि भाषा यांचं बेमालुम मिश्रण झाल्याने ‘काबूल दिल्ली रेस्टॉरंट’शी भावनिकरित्या जोडले गेलेले अनेक अफगाणी तरुण इथं रोज एकमेकांना भेटतात. “चोप्पन कबाब’ आणि “काबूल उझबेकी’ यांच्यासोबत चहाचा आस्वाद घेत लॉंग टर्म व्हिसा पासून ते नोकरीधंद्यापर्यंत अनेक विषयांवर चर्चा करतात.

“काबूलमध्ये कन्ट्रक्शनचा व्यवसाय होता. पण हालात बिघडत गेले आणि आम्हाला तो बंद करावा लागला. 2010 साली आम्ही सर्व कुटूंब दिल्लीत आलो ते इथं लाजपतनगरमध्ये राहिलो. इथे तेव्हा बरेचसे अफगाणी निर्वासित राहत होते. इथलं राहणीमान आणि भाषेशी जुळवून घेत असलेल्या अफगाणींचे जेवणाबाबत मात्र खुप हाल होत होते. हे ओळखून आम्ही हे रेस्टॉरंट सुरू केलं.” बिझनेस व्हिसावर दिल्लीत येऊन ठेपलेल्या आतिक्ख यांनी 2010 मध्ये अफगाणिस्तानचे लजीज जेवण वाढणारं रेस्टॉरंट सुरू केलं. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या राजधानींना एकत्र जोडणारं नाव देत सुरू झालेलं ‘दिल्ली काबूल रेस्टॉरंट’ लाजपतनगरमध्ये येणाऱ्या प्रत्येक अफगाणीला आपलंस वाटतं.

“भारतीय कायद्यानुसार इतर देशांतून आलेल्या निर्वासितांना भारतात कोणताही व्यवसाय स्वतःच्या नावाने सुरू करता येत नाही की, स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी घेता येत नाही. माझ्याकडे बिझनेस व्हिसा आहे तरीही हे रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी भारतीय पार्टनरला सोबत घ्यावं लागलं. लाजपतनगरमध्ये जितकी अफगाणींनीची दुकानं दिसतील ती सर्व इथल्या स्थानिकांसोबत पार्टर्नरशिपमध्ये सुरू आहेत.” आतिक्ख दर सहा महिन्यांनी काबूलला जातात आणि बिझनेस व्हिसा रिन्यु करून पुन्हा येतात. लाजपतनगरमध्ये वाढत जाणारी अफगाणी निर्वासितांची संख्या लक्षात घेत इथलं मार्केटही आता अफगाणिस्तानातल्या एखाद्या मार्केटसारखं रुपडं घेत आहे.

अफगाणी पारंपारिक नक्षीकाम असलेल्या रंगबिरंगी शलवार कमीज़, काफ्तान विकणारी दुकानं, चक्क अरबीमध्ये बोर्ड असलेला डॉ. सचिन यादव यांचा दातांचा दवाखाना, अफगाणी रोटींची दुकानं, गेम झोन, ट्रॅव्हल एजंट्स, मेडिकल यांची अरबी भाषेतले बोर्ड, बल्ख सुपर मार्केट, पाकीजा बेकरी, अफगाण फार्मसी… इतकंच काय तर लाजपतनगरमधल्या स्थानिक टेलर्सनीही आडदांड अफगाणी पुरूषांच्या मापाची पठाणी शिवण्याचं कसबही अंगिकारलंय.

उसवलेली आयुष्य शिवणारी ‘सिलाईवाली’

फ्रान्समधील डिझायनर ईरीस स्ट्रील भारतातील हस्तकलेवर रिसर्च करण्यासाठी भारतात आल्या. जयपूर आणि दिल्ली यांच्या आसपास बरेच वर्ष काम केल्यानंतर रेडिमेड कपड्यांच्या इंडस्ट्रीमध्ये वाया जाणाऱ्या कापडाबाबत काहीतरी करावं असं त्यांना वाटू लागलं. हस्तकला आणि कापडाच्या चिंध्या यांचा संगम करत आगळ्या वेगळ्या बाहुल्या ईरीस यांनी डिझाईन केल्या आणि ‘सिलाईवाली’ची स्थापना झाली. ईरीस स्ट्रील आणि बिश्वदीप मोईत्रा यांनी आपला जमा झालेला पैसा गुंतवून 12 अफगाणी महिलांसोबत नोव्हेंबर 2018 मध्ये सिलाईवालीची सुरुवात केली. जगभरातील विविध संस्कृतीच्या महिलांना रिप्रेझेंट करणाऱ्या खास बाहुल्या येथील निर्वासित अफगाणी महिला बनवतात. “सर्व समाजातल्या, सर्व रंगाची त्वचा असलेल्या स्त्रियांना स्वीकारण्यासाठीच अशा प्रकारच्या बाहुल्या तयार केल्या गेल्या. संपूर्णपणे कापडाच्या बनलेल्या या बाहुल्या गोऱ्या, काळ्या, गव्हाळ अशा रंगाच्या असतात. फ्रॉक घातलेली, काफ्तान घातलेली, पंजाबी सूट घातलेली, अफगाणी ड्रेस घातलेली अशा सगळ्या प्रकारच्या बाहुल्या आम्ही बनवतो.” बिश्वदीप मोईत्रा मोठ्या उत्साहात सांगतात.

MADE 51 या संस्थेद्वारे UNHCR तर्फे विविध रेफ्युजी कलाकरांनी बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी, मार्केटींगसाठी प्लॅटफॉर्म दिले जाते जेणेकरून त्यातून थोडंफार उत्पन्न आणि भविष्याच्यादृष्टीने या निर्वासितांना काही संधी उपलब्ध होतील. MADE 51 सोबत जर्मनीच्या ‘एबीयोन्ते’ आणि पॅरिसच्या ‘मेझो ए ऑब्जे’ अशा काही प्रदर्शनांमध्ये या बाहुल्या पाठवल्यानंतर ‘सिलाईवाली’ अफगाणी महिलांनी मागे वळून पाहिलं नाही. आज जगभर तब्बल 50 दुकानांमध्ये या बाहुल्या विकल्या जात आहेत. ऑनलाईनही या बाहुल्यांची चांगली विक्री होते. आपल्यासारख्याच सामान्य तरीही आकर्षक दिसणाऱ्या बाहुल्यांना जगभरातून मागणी आहे. 12 निर्वासित महिलांपासून सुरू झालेल्या ‘सिलाईवाली’मध्ये आता 50 अफगाणी महिलांना काम मिळाले आहे. कामासोबत येणारे आर्थिक स्वावलंबन आणि आदरही या महिलांना मिळू लागला आहे.

“जेव्हापासून “सिलाईवाली’मध्ये काम करण्यासाठी या महिला येतात तेव्हापासून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आलीये. रोज हसायला, गप्पा मारायला, एकत्र जेवायला, सामाजिक व्हायला त्यांना एक स्पेस मिळाली. मेहनत करत आहेत आणि कमवतही आहेत. आर्थिकदृष्ट्या आम्हाला थोडाफार दिलासाही मिळालाय.” काळजीपूर्वक कापड कापत रझिया दिदीने शेजारच्या टेबलावर बाहुलीचे कपडे शिवत असलेल्या 43 वर्षांच्या नजीबा रस्तिन यांच्याशी ओळख करून दिली. लंच टाईम झाला होता त्यामुळे नजीबा दिदींनी मलाही त्यांच्यासोबत जेवायला बसवलं. जाड पांढरी रोटी आणि चिकनची खास अफगाणी भाजी त्यांनी डब्यात आणली होती. रझिया दीदी आणि नजीबा दीदीने माझ्या डब्यातली छोले आणि चपाती मोठ्या आवडीने खाल्ली तर मी अफगाणी चविष्ट चिकनवर ताव मारला. सिलाईवाली स्टुडिओत काम करणाऱ्या 50 महिलांपैकी केवळ 3 ते 4 महिलाच लंच टाईममध्ये स्टुडिओत दिसत होत्या. डबा खायलाही कोणी आलं नाही. कारण विचारल्यावर रझिया दिदी गोड हसली. “यहाँ काम करनेवाली सब आसपास की मोहल्ले में ही रहती है. तो लंच टाईम पर घर जाके बच्चों के साथ खाना खाते है. मै अपनी बेटी को स्कूल छोड के आयी हूं इसिलिये मैं लंच करके आई.”

“सिलाईवाली’साठी जागा शोधताना अफगाणी महिलांच्या वस्तीतच ती असावी याचा विचार का केला गेला असेल याची कल्पना मला तोवर आली होती. आईला घराबाहेर जाऊन जास्त वेळ झाला म्हणजे ती जिवंत परत येणारच नाही ही भिती अफगाणी लहान मुलांच्या मनात खोलवर रूतून बसली आहे. त्यामुळे घराजवळ काम असल्याने या महिला अधूनमधून आपल्या चिल्यापिल्यांना पाहून येऊ शकतात.

नजीबा दीदीला एकूण पाच मुलं. “माशाल्लाह अब जो जवान हो गए सब. एक लडकी तो बिलकूल तेरे उमर की है.” लहानपणापासून शिवणकाम आणि नक्षीकाम येत असल्याने नजीबा ‘सिलाईवाली’मध्ये छान रुळलीय. आपणच शिवलेले कपडे घालण्याची अफगाणिस्तानात जास्त पद्धत आहे त्यामुळे मला सगळे कपडे शिवता येतात. नजीबा दिदीचे दोन देवर आणि दोन भाऊ युद्धात शहीद झाले. “काबुल में हम जिस तरह की सुकून की जिंदगी जी रहे थे कुछ सालों पहले, तेच जगणं पुन्हा गवसावं या अपेक्षेने सगळं मागे टाकून हम आगे बढ़ रहें है.”

एवढ्यात चहकती शबनम सगळ्यांना सलाम करत स्टुडिओत घुसली. पिवळ्या ड्रेसमध्ये उठून दिसणारी गोरी 20 वर्षांची तरुणी शबनम हैदरी अफगाणिस्तानातल्या बामयान गावातली पण काबूलमध्ये राहणारी. “कितना मिस करती हूं मै काबूल को, खासकर बर्फ… दोस्तों के फोटो देखती हूं ना फेसबूक पें तो सोचती हूं काश मैं वहाँ होती तो बर्फ में खेलती.” सिलाईवालीमधल्या चाळीशीच्या महिलांच्या ग्रुपमध्ये चुलबुली आणि गप्पीष्ट असलेल्या विशीतल्या शबनमला बॉलिवूडचं खूप वेड आहे. अनेक फिल्म्स बघितल्यामुळे इतरांच्या तुलनेत फर्मास हिंदीत बोलते. 2016 ला दहावी अर्धवट सोडून दिल्लीत निर्वासित म्हणून ती परिवारासह आली. आधी ब्युटीशियन म्हणून काम करत होती तर आता सिलाईवालीमध्ये पॅकिंगचं काम करते.

‘सिलाईवाली’च्या स्टुडीओत हसत खेळत, मोबाईलवर “दरी’ या स्थानिक भाषेतली गाणी ऐकत सगळ्या महिला काम करतात. शांत चेहऱ्याने आणि एकचित्ताने बाहुल्या तयार करत असलेल्या अफगाणी निर्वासित महिलांना पाहून वाटलं, काटेकोर मापात बसवल्या गेलेल्या रेडिमेड कपड्यांना पूर्णत्व येण्यासाठी ज्या कापडाने कापून जाणं पसंद केलं त्या कापलेल्या चिंध्यांना टाके घालत बाहुल्यांचं रुप देतात. त्यांच्यात जीव फुंकणाऱ्या या अफगाणी महिला चिंध्या झालेलं स्वतःचं आयुष्यही असंच शिवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या संस्कृतीच्या या बाहुल्यांना जसं स्वीकारलं गेलं तसंच आपल्यालाही कधीतरी स्वीकारलं जावं. प्रतिष्ठेचं जगणं पुन्हा मिळावं, भविष्य लख्ख असावं, स्वदेशातला रक्तपात थांबावा, मला पुन्हा एकदा त्या बर्फिल्या दऱ्यांमध्ये जाता यावं… या प्रत्येक भावनेचा एक तुकडाही त्या निर्वासित अफगाणी महिला एकेका बाहुलीसोबत शिवत असतील…

या सगळ्यांना भेटून, अनुभवून, काही क्षण का होईना त्यांच्यात मिसळल्यानंतर फरोग़ फर्रुखजाद या फारसी कवियित्रीच्या काही ओळी आठवल्या…

कोई भी नहीं चाहता यक़ीन करना कि
बाग़ सूख रहा है कि
बाग़ का दिल धूप में
झुलस रहा है|
कि बाग़ का दिमाग़ धीरे धीरे
हरियाली की यादों से खाली हो रहा है|
और बाग़ का अहसास… तन्हा चीज़ है, जो दम तोड़ रहा है|

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here