- अप्सरा आगा (पुणे)
हि गोष्ट आहे पुण्यातील काशीवाडी – भवानी पेठ या भागात राहणारे विजय गुजर यांची. गेली 22- 23 वर्ष झालं विजय ज्यांना बॉक्सिंग शिकायचं आहे अन ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा खेळाडूंना मोफत बॉक्सिंग शिकवतात. त्यांनी आतापर्यत बऱ्याच खेळाडूंना बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले आहे. ते म्हणतात,”बॉक्सिंग ही एक कला आहे, आणि मी एक कला शिकवतो.”
विजय गुजर यांचं शिक्षण सरकारी शाळेमध्ये झालं. पाचवीत असताना त्यांना बॉक्सिंगची आवड लागली. त्या काळात त्यांनी अनेक स्पर्धात सहभाग घेऊन बक्षिसं मिळवली. एवढंच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक मिळवली. राज्य अंजिक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत पाच वेळा सुवर्ण पदक मिळालं आहे. तसेच रौप्य पदक ही मिळालं आहे. राष्ट्रीय खेळाडूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण असल्यामुळे विजय सरांनी खेळाडू कोट्यातून रेल्वे भरतीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली. ते सांगतात, “रेल्वेमधल्या अधिकाऱ्यांनी नोकरीसाठी लाच मागितली. म्हणून मी सरकारी नोकरीचा नाद सोडला आणि मुलांना बॉक्सिंग शिकवायचं ठरवलं.

विजय यांनी 2000 सालामध्ये पुण्यातील भवानी पेठेत बॉक्सिंग समर कॅम्प सुरु केला. वस्तीतल्या मुलांची ऊर्जा लहानपणापासूनच चांगल्या गोष्टीसाठी वापरली गेली तर त्यांचं भविष्य चांगलं घडू शकतं.हे विजय सरांनी ओळखलं. वस्तीतल्या मुलांच्या घरी जाऊन खेळाचे महत्त्व सांगू लागले.शाळेतल्या विद्यार्थ्यंना भेटू लागले. त्यामुळे समर कॅम्पसाठी भरपूर मुलं जमली. समर कॅम्पमध्ये येणारी मुलं कष्टकरी कुटूंबातील होती. त्यामुळे मुलं फी हि देऊ शकत नव्हते. पण सुरुवातीला कॅम्पसाठी खर्च येणारच होता. या कॅम्पसाठी आमदार रमेश बागवे यांनी आर्थिक मदत केली. त्यानुसार त्यांनी समर कॅम्प सुरु केला. समर कॅम्पमधून आतापर्यंत चारशेहून अधिक राज्यपातळीवरचे आणि सत्तरहून अधिक राष्ट्रीय बॉक्सर घडले आहेत. विजय सरांनी मुलांना तंत्रशुद्ध बॉक्सिंग शिकवण्यासाठी आंतराराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनतर्फे घेण्यात आलेल्या कोचेस चे प्रशिक्षण घेतलं आहे. समर कॅम्पपासून सुरु केलेल्या विजय यांच्या प्रशिक्षणातून चारशेहून अधिक खेळाडू राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. समर कॅम्पमध्ये बॉक्सिंग शिकलेला सलमान शेखला महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती’ पुरस्कार मिळाला आहे.
सलमान शेख हा पुण्याच्या काशेवाडी वस्तीतला मुलगा. सलमान सलग सातवेळा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विजय झाला आहे. इंडोनेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. सलमानची घरची परिस्थिती बेताची. वडील काशीवाडी वस्तीत सलून चालवतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचं घर चालतं. सलमान सांगतो, “मला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. शाळेत असताना एकदा बॉक्सिंग समर कॅम्पची नोंदणी सुरु होती. मी नोंदणी केली. तिथून माझा बॉक्सिगचा प्रवास सुरु झाला.” 2003 पासून विजय सरांच्याकडे सलमान बॉक्सिगचं प्रशिक्षण घेत होता. सध्या सलमान खेळाडू कोट्यातून भारतीय रेल्वे खात्यात तिकीट चेकरची नोकरी करत आहे.

विजय यांच्याकडे शिकलेला राष्ट्रीय बॉक्सिग खेळाडू रेनॉल्ड जोसेफ सांगतो, “विजय सरांच्याकडून मी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. विजय सरांनी बॉक्सिग शिकवल्यामुळेच मी राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवू शकलो. विजय सरांना खेळाडूंच्या घरच्या परिस्थितीची जाणीव आहे. ते वेळोवेळी खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करतात.” अनेक खेळाडूंची परिस्थिती नसताना विजय सरांच्या बॉक्सिगच्या प्रशिक्षणामुळे बरेच खेळाडू अंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. सरांच्या या कामाची दखल पुणे महानगरपालिकेने घेतली. महानगरपालिकेने विजय सरांना ‘उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक’ या पुरस्काराने गौरवलं आहे.
विजय सांगतात, “जे खेळाडू बॉक्सिंगच प्रशिक्षण घ्यायला येतात. ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. ते खेळाडू थोडीफार फी देतात. मला यातून फारसे पैसे मिळत नाही. घर चालविण्यासाठी कंपनीत नोकरी करतो. वस्तीतल्या मुलांना बॉक्सिग शिकवण्यात जे समाधान मिळतं ते समाधान माझ्यासाठी मोठं आहे. माझ्याकडे शिकलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल मिळवतात. यातूनच मला बॉक्सिग शिकवण्याची प्रेरणा मिळते.” अनेकांना बॉक्सिगमध्ये करियर करण्याची इच्छा असते. पण परिस्थिती नसते. अशा धडपडी खेळाडूंना विजय यांनी बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिलं आहे.