- प्रतिक पुरी
मुक्काम पोस्ट मढी… अहमदनगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. नाथ परंपरेतल्या कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं स्थान. फाल्गुन महिन्यातल्या होळी पौर्णिमेपासून चैत्रातल्या गुढी पाडव्यापर्यंत इथे कानिफनाथांची यात्रा भरते. तशा फाल्गुन महिन्यापासून वैशाखापर्यंत महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी देव-देवतांच्या अनेक यात्रा-जत्रा भरत असतात. महाराष्ट्रातल्या प्रथा-परंपरांचं, धार्मिक-सामाजिक चालीरीतींचं इष्ट-अनिष्ट दर्शन त्यातून घडत असतं. मढीची यात्रा यापैकीच एक- मात्र पारंपरिक समाजजीवनाचे अनेकविध कंगोरे असलेली. या कंगोऱ्या विषयी बरंच काही ऐकण्यात येत होतं, वाचण्यात येत होतं. त्यातून या यात्रेविषयी कुतूहल वाढत होतं.
भटक्या-विमुक्तांची पंढरी
एक म्हणजे होळीपासून पाडव्यापर्यंत सलग पंधरा दिवस ही यात्रा चालते. इतक्या दीर्घकाळ चालणाऱ्या किती यात्रा महाराष्ट्रात भरत असतील? या पंधरा दिवसांच्या काळात महाराष्ट्रभरातून लक्षावधी माणसं इथे यात्रेसाठी येत असतात, असं ऐकलं होतं. दुसरं म्हणजे या यात्रेतला हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायांचा सहभाग. दोन्ही समुदायांचं हे श्रद्धास्थान. महाराष्ट्रात अशी ठिकाणं किती आहेत? इथे हिंदूंसाठी असलेले ‘कानिफनाथ’ मुस्लिमांसाठी ‘जानपीर’ आहेत. दोन्ही समुदायांचे लोक इथे मानाच्या काठ्या घेऊन येतात. आणि याहूनही विशेष म्हणजे कानिफनाथांचा जयजयकार करत इथे एकवटणा-या जाती-जमाती. मढी हे ‘भटक्या-विमुक्तांची पंढरी’ म्हणून ओळखलं जातं ते या यात्रेतल्या त्यांच्या लक्षणीय सहभागामुळे. महाराष्ट्रात भटक्या-विमुक्तांच्या बेचाळीस जमाती आहेत.

यापैकी बहुतांश जमातींचे लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात. नवस बोलणं, नवस फेडणं, कोंबड्या-बक-यांचे बळी देणं वगैरे परंपरा इथे दिसतातच, पण मुख्यत्वे इथे विविध भटक्या समाजांच्या जात पंचायती भरतात. गेल्या काही वर्षांपासून अंधश्रद्धा निमुर्लन समितीने केलेले प्रबोधन आणि कारवाईचा धाक यांचा परिणाम होऊन मढी यात्रेतील जात पंचायती बंद झाल्या. मात्र अगदी आतापर्यंत भटक्या-विमुक्तांचे सामुदायिक-कौटुंबिक वादविवाद या पंचायतींद्वारे मिटवले जायचे. मढी हे भटक्या-विमुक्तांचं ‘सर्वोच्च न्यायालय’ मानलं जायचं. यात्रेनिमित्त भरणा-या बाजारात अठरापगड व्यवहारांची झलक दिसते, आणि त्यातही लक्ष वेधून घेणारा असतो तो इथे भरणारा गाढवबाजार. देशभरातून लोक इथे गाढवांच्या खरेदीसाठी येत असतात.
इतकी सारी वैविध्यं या एकाच यात्रेत एकवटलेली. साहजिकच या यात्रेबद्दल मनात मोठं कुतूहल होतं. महाराष्ट्रात खोलवर पसरलेला समाज पाहण्याची, जाणून घेण्याची ही एक संधी होती. बदलत्या काळाचे पडसाद या यात्रेत, इथे येणा-या अठरापगड लोकांमध्ये कसे उमटले आहेत हे जाणून घेण्याचीही इच्छा होती. म्हणूनच ठरवलं, चलो मढी!
मढीमध्ये कानिफनाथांच्या गडावर कानिफनाथांचं संजीवन समाधी मंदिर आहे. मढी गाव या गडाच्या पायथ्याशी वसलं आहे. गावाच्या सुरुवातीला एक ख्रिस्ती कब्रस्तान आहे. तिथे दहा-बारा कबरी आहेत. पुढे दलित वस्ती. इथून पुढे दोन्ही बाजूंना घरं असलेला लहानसा रस्ता आपल्याला गडापर्यंत नेतो. रस्त्यावरून जाताना गडावरच्या मंदिराचा उंचच उंच कळस दिसतो. गडाचा पसारा नजरेत भरू लागतो. नव्यानेच रंगवलेला प्रशस्त दगडी परकोट- त्यातून डोकावणारी आतल्या मंदिरांची शिखरं. गडाच्या पाय-या चढून वर गेल्यावर प्रवेशद्वार लागतं. इथून आत प्रवेश केल्यावर कानिफनाथांचं समाधी मंदिर दृष्टीस पडतं.

संबंधित वृत्त :
- म्हसा यात्रा पावली…!
- अठरापगड जातीची माळेगाव यात्रा एकदा अनुभवयालाच हवी
- अस्तंबा ऋषी यात्रा : अंधश्रद्धा दूर करण्यासाठी बाईमाणूसचा लढा
कानिफनाथ हे भटक्या जमातींचं आराध्य दैवत
कानिफनाथ हे नवनाथांपैकी एक. साधारणपणे इसवी सनाच्या आठव्या शतकात नाथ संप्रदायाचा उगम झाला असावा, असं मानलं जातं. हा संप्रदाय शिवाला आदिनाथ मानतो. त्यावर शैव परंपरेचा प्रभाव आहे. तथापि, सर्वच जाती-पंथ आणि धर्मांना या संप्रदायाने आपलंसं केलं होतं असं म्हणतात. त्यामुळेच शैव, वैष्णव, शाक्त, सूफी अशा पंथांमध्ये आणि बौद्ध, जैन, मुस्लिम, शीख अशा धर्मांमध्ये या संप्रदायाला मानणारे लोक आढळतात. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ अशी ही परंपरा. अहमदनगर जिल्ह्यातल्या गर्भगिरी पर्वतामध्ये यापैकी मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांच्या समाध्या आहेत. त्यामुळेच हा जिल्हा नाथ संप्रदायाचा पाया मानला जातो. नवनाथांपैकी कानिफनाथ हे भटक्या आणि निमभटक्या जाती-जमातींचं आराध्य दैवत मानले जातात. मढीच्या गडावरील त्यांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भटक्या समाजांनी हजेरी लावण्याची परंपरा फार पूर्वीपासूनच पडली असावी.

समाधी मंदिराच्या एका बाजूला कानिफनाथ ट्रस्टचं कार्यालय आहे. तिथे ट्रस्टच्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना ही माहिती मिळत होती. इथे आज कानिफनाथांच्या समाधीवर जे मंदिर दिसत आहे ते महाराणी येसूबाईंनी बांधलंय. शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना सुटकेसाठी त्यांनी कानिफनाथांना नवस बोलला होता. या मंदिराच्या बांधकामामध्ये भटक्या समाजांचा मोठा सहभाग होता. गोपाळ समाजाने मंदिरासाठी मोठमोठे दगड वाहून आणले, घिसाडी समाजाने लोखंडी काम केलं, बेलदार समाजाने नक्षीकाम केलं, कोल्हाटी समाजाने उंच बुरूज बांधण्यास मदत केली, कैकाडी समाजाने बांबूच्या टोपल्या तयार केल्या. अशाच प्रकारे वैदू, गारुडी, लमाण, भिल्ल, जोशी, वडारी अशा अठरापगड जमातींनी आपापला सहभाग देऊन या मंदिराचं बांधकाम केलं. मंदिराच्या बांधकामानंतर इथे यात्रा भरण्यास सुरुवात झाली. या यात्रेत भटक्या समाजांना त्यांनी मंदिर बांधण्यास केलेल्या मदतीनुसार मानपान लाभले. यात गोपाळ समाजाला होळी पेटवण्याचा मान मिळाला, तर कैकाडी समाजाला मानाच्या काठ्या मिरवण्याचा व सर्वांत आधी समाधी मंदिराच्या कळसाला काठी टेकवण्याचा मान मिळाला. म्हणूनच बहुधा या स्थानाची ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख झाली असावी.
भटके समाज आणि कानिफनाथ मंदिराचं नातं असं असलं, तरी मंदिराच्या ट्रस्टवर प्रामुख्याने मराठा समाजाचे लोक आहेत. मढी गावात मराठा समाजाचं वास्तव्य जास्त असल्याने असं घडलं असावं. अर्थात, सर्वच समाज कानिफनाथांना मानत असल्यामुळे इथे समाजा-समाजांमध्ये भेदभाव नाही, असं अनेकजणांनी आवर्जून सांगितलं. भटका समाज हा फिरस्ता समाज असल्यामुळे मंदिराच्या व्यवस्थापनात प्रामुख्यांने स्थानिक स्थायी समाजाची मंडळी असणंही स्वाभाविक आहे. असो.
यात्रेची नुकतीच सुरुवात झालेली असल्याने आणि गडावर फारशी गर्दी नसल्याने गडाचा परिसर मोकळेपणाने पाहता आला. गडाचा परिसर साधारण 10 हजार चौ.मी.चा आहे. गडावर येण्यासाठी पूर्व, पश्चि्म व उत्तर अशा तीन दिशांनी प्रवेशद्वारं आहेत. समाधी मंदिरात कानिफनाथांची समाधी आणि त्यापुढे त्यांची चांदीच्या सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. समाधी मंदिराच्या बाजूला कानिफनाथांच्या दोन शिष्यांची समाधी मंदिरं आहेत. मागे विठ्ठल मंदिर आहे. तिथेच तळघरातील ध्यानमंदिरात जाण्यासाठी एक अरुंद मार्ग आहे. पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ नवनाथांचं मंदिर आहे.

मढीला जाण्यासाठी तिसगाव व निवडुंगे गावापासून फाटे आहेत. यात्राकाळात निवडुंगे फाट्यातून मढीत शिरायचं आणि तिसगावच्या रस्त्यानं बाहेर पडायचं अशी सोय असते. या दोन्ही रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झाला होता. शेकडो भाविक खासगी वाहनांतून मढीला निघाले होते. काही वाहनांच्या टपांवर मानाच्या काठ्या होत्या. काही ट्रक्समध्ये ढोल-ताशेही वाजत होते. वाहनांतून उतरून मानाच्या काठ्या उंचावत भाविक ढोल-ताशे बडवत, गुलाल उधळत मंदिराकडे जात होते. गडाच्या प्रवेशद्वारावर जाऊन ही सारी गर्दी आदळत होती. मानाच्या काठ्या वाहणारे अनेक अस्थाने गडावर चढत होते. 20-30 फूट लांबीचे बांबू, त्यावर भगवी वस्त्रं गुंडाळलेली, बांबूच्या टोकाला लोखंडी त्रिशूळ लावलेले. या मानाच्या काठ्या. ढोल-ताशाच्या तालावर या काठ्या हवेत उंच पेलत, नाचवत, कानिफनाथांचा जयजयकार करत सारे तल्लीन झाले होते. त्यांच्या सोबतीला अंगात संचार झालेले काही भक्तही होते. केस मोकळे सोडून बाया घुमत होत्या आणि पुरुष उघड्या अंगावर आसूड ओढत होते. दुसरीकडे गडाच्या पायथ्याशी नवसाचे नारळ फोडण्यासाठी झुंबड उडाली होती. नारळांनी भरलेलं पोतं घेऊनच काही लोक चढत होते आणि प्रत्येक पायरीवर नारळ फोडत होते. आत पोचलेल्या अस्थानांची समाधी मंदिराच्या कळसाला काठ्या टेकवण्याची धडपड सुरू होती. ती टेकली की कानिफनाथांचा जयजयकार होऊन रेवड्यांचा प्रसाद उधळला जात होता.
बाजारात सारा आधुनिकतेचाच पसारा
गडाखाली दुकानांमध्ये लोकांची गर्दी होती. खेळणी, जोडे-चपला, बॅग्ज, कपडे, बांगड्या, भांडीकुंडी, पुस्तकं, कॅसेट वगैरेंची ही दुकानं होती. याशिवाय शाकाहारी-मांसाहारी खानावळी, पान टप-या, कोल्ड्रिंक्सचे ठिय्ये होते. सर्वसाधारणपणे कोणत्याही ग्रामीण यात्रेत आढळतात अशी दुकानं-पालं इथेही होती. मढीच्या यात्रेत भटक्या समाजांचे लोक पालं ठोकून आपापले पारंपरिक व्यवसाय करतात असं ऐकलं होतं. यात्रेत फिरताना नजर त्याचाच शोध घेती होती, पण काही अपवाद वगळता असे व्यवसाय आढळले नाहीत. वैदूंच्या काही पथा-या दिसल्या. त्यावर काही जडी-बूटी मांडलेल्या होत्या, पण त्यांच्या खरेदीसाठी फारशी गर्दी नव्हती. घिसाडी समाजाच्या एक-दोन पथा-या होत्या. त्यात शेतकामाची लोखंडी औजारं, कानिफनाथांचे चिमटे, त्रिशूळ वगैरे होते. तिथेही लोकांची गर्दी अशी नव्हती. माकडवाले, डोंबारी, दरवेशी, ससे-तितर विकणारे पारधी, गारुडी वगैरे शोधूनही सापडत नव्हते. अधूनमधून शहरात दिसणारे वासुदेव व पोतराजही इथे दिसत नव्हते. गर्दीचा ओघ कपड्यांच्या, चपलांच्या, बांगड्या-ब्रेसलेट वगैरेंच्या दुकानांकडे वळत होता. कानिफनाथांच्या पारंपरिक यात्रेतील बाजारात सारा आधुनिकतेचाच पसारा दिसत होता.

हिंदू-मुस्लिम एकता
या सा-या माहोलात मानाच्या काठ्या घेऊन आलेले गावोगावच्या लोकांचे अस्थाने मैदानात जिथे जागा मिळेल तिथे विसावलेले दिसत होते. इथे बशीर अली भेटले. ते मढीचेच. मंदिराला मानाच्या काठ्या टेकवून त्यांचा अस्थाना परतला होता. मागील पिढ्यांपासून चालत आलेली मानाची काठी वाहण्याची परंपरा ते पुढे चालवत होते. कानिफनाथ म्हणजेच त्यांच्या जानपिरावरची श्रद्धा त्यांनी बोलून दाखवली. हिंदूंप्रमाणेच मुस्लिमही इथे येतात, कोणतेही वादविवाद होत नाहीत, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्याप्रमाणेच मुस्लिम समाजाचे काही अस्थाने इथे विसावले होते. मानाच्या काठ्या घेऊन येणा-यांममध्ये सर्वच समाजांचे लोक दिसत होते. त्यात जसे भटके समाज होते तसेच मराठा व इतर समाजही होते. बीड जिल्ह्यातून आलेल्या विधाते महाराजांच्या अस्थान्यात गवसे बंधू भेटले. ते मराठा. गेल्या 20 वर्षांपासून ते इथे येत आहेत. ते सांगत होते, अस्थाना म्हणजे गुरुपरंपरा. कानिफनाथांच्या शिष्यांमध्ये सर्व समाजांचे लोक होते. समाधीच्या दर्शनासाठी हे शिष्य मढीला येऊ लागले. त्यातून अस्थान्याची परंपरा पडली.
गाढवांचा बाजार
या सा-यांपासून काही अंतरावर गाढवांचा बाजार भरलेला होता. महाराष्ट्रात जुन्नर, जेजुरी, मढी व सोनारी अशा ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. त्यात मढीचा गाढवांचा बाजार भारतात प्रसिद्ध. इथे तो 5-6 दिवस भरतो, गाढवांची किंमत 50 हजारांपर्यंत जाते आणि एक-दीड कोटींची उलाढाल होते असं ऐकलं होतं. मात्र आता इथे जेमतेम अडीचशे गाढवं विक्रीला उभी होती. त्यात जास्त प्रमाण गावरान गाढवांचंच होतं. राजस्थानकडची काही पांढरीशुभ्र खेचरंही दिसत होती. शेजारीच त्यांचे मालक आणि ग्राहकही उभे होते. इथे खेड राजगुरुनगरचे धोत्रे भेटले. हे वडार समाजाचे. त्यांच्याशी बोलताना आता पूर्वीचे दिवस राहिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. इथून ते आता पैठणच्या यात्रेला जाणार होते व तिथून सोनारीला. गाढवं विकण्यासोबतच गाढवांची पिल्लं विकत घेऊन, ती वाढवून पुन्हा विकण्याचाही त्यांचा व्यवसाय होता. गावरान गाढवाला 5-8 हजारांपर्यंत तर काठेवाडी गाढवांना 20-25 हजारांपर्यंत भाव मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. मढीत या वर्षी पंचवीसेक लाखांचा धंदा होईल सर्वांचा मिळून, असा अंदाज त्यांनी सांगितला. यात्रा आटोपली की पुन्हा गावी परतायचं. तिथे मिळाली तर मजुरी, नाही तर बिगारी करत जगायचं, असं ते सांगत होते. बुलढाण्याच्या दिलीपने त्याला दुजोरा दिला. पूर्वी वैदू, कैकाडी, वडार, घिसाडी, मदारी, डोंबारी, कुंभार वगैरे मंडळी गाढवं खरेदी करत असत, पण आता त्यांचं प्रमाण कमी झालंय. आता 3-4 हजारांनाही गाढव विकत घ्यायला काचकूच करतात लोक. यात्रेचे दिवसही कमी झालेत. गाढवं विकली गेली नाही तर होणार्या नुकसानीचीच चिंता त्यांना छळत होती.

एव्हाना रात्र झाली. मानाच्या काठ्या समाधी मंदिराला टेकवून आलेले अस्थाने आता जेवणाच्या पंगती आटपून परतीच्या प्रवासाला लागले होते. तमाशाच्या फडांना जाग आली होती. खणखणीत अस्सल मराठी लावण्यांचा रंग भरण्यास सुरुवात झाली होती आणि या रंगात दंग होण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
यात्रेची परंपरा टिकून आहे, गावागावांतून अस्थाने येत आहेत, अठरापगड समाज आपलं अस्तित्व अजूनही दाखवत आहे, हे खरं आहे; पण यात्रेतल्या बाजाराने आधुनिक रूप धारण केलंय. इथे अठरापगड लोकांची गर्दी दिसतेय, पण पारंपरिक पेहरावातली त्यांची ओळख पुसली गेलीय. गाढवांचा बाजार इथे आजही भरतोय, पण त्याला लागलेली उतरती कळाही स्पष्ट दिसतेय. हे निरीक्षण जर बरोबर असेल तर या बदलांकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं. परंपरेचं जोखड काही प्रमाणात तरी उतरतंय असं म्हणता येईल.
- आपण हा व्हिडिओ बघितला का ?