चेतना, हे काय करून बसलीस?

प्लास्टिक सर्जरीमुळे २१ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू

टीम बाईमाणूस / १९ मे २०२२

दिसायला अतिशय देखणी आणि मोहक असलेल्या कन्नड टीव्ही अभिनेत्री चेतना राजचं वयाच्या २१ व्या वर्षी निधन झाल्याचं वृत्त एव्हाना चांगलच व्हायरल झालयं. चेतनानं बंगळुरूच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तिचं निधन प्लॅस्टिक सर्जरीमुळे झाल्याचं बोललं जात आहे. तिला फॅट फ्री सर्जरीसाठी बंगळुरूच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडली. तिच्या फुफ्फुसात पाणी जमा झाल्यानं तिचं निधन झाल्याचं बोललं जात आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्रीनं या सर्जरीबाबत तिच्या आई-वडिलांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. ती तिच्या मैत्रिणींसोबत रुग्णालयात गेली होती. सर्जरी झाल्यानंतर संध्याकाळी तिला त्रास जाणवू लागला. तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होऊ लागलं आणि त्यानंतर काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला. चेतना ही कन्नड टीव्ही मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिनं अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली होती. चेतनानं Geetha आणि Doresani मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. चेतनाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

वास्तविक चेतनाचा फोटो पाहिल्यानंतर लगेचच पहिला प्रश्न असा डोक्यात येतो की, अरे दिसायला इतकी सुंदर असतानाही हिला प्लॅस्टिक सर्जरी करायची गरजच का निर्माण झाली? मात्र सिनेसृष्टीच्या या झगमगत्या ‘फेक’ दुनियेने इथे टिकून राहण्यासाठी असे काही नियम केले आहेत ज्यात चेतनासारख्या हजारो मुलींना हे नियम ‘फॉलो’ करावेच लागतात. कर्नाटकच्या चेतना राजला शरीरावर साचलेली चरबी घटवायची होती आणि त्यासाठी तिने फॅट फ्री कॉम्सॅटिक सर्जरीचा पर्याय निवडला. कॉस्मेटिक सर्जरी ही अलिकडच्या काळात सर्रास होणारी गोष्ट झाली आहे. कॉस्मेटिक सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचाच एक प्रकार आहे. चेहरा किंवा शरीरावरील दोष दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. बंगळूरू येथील खासगी इस्पितळात या शस्त्रक्रिये दरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे तिच्या फुप्फुसांमध्ये दोष निर्माण झाला. त्यातून हृदयक्रिया बंद पडून तिचा मृत्यू झाला.

शरीराचा बेढबपणा कमी करण्यासाठी महिला आणि पुरुष रुग्ण ही सर्जरी करू शकतात. प्रसूतीनंतर शरीराचा बदललेला आकार पूर्ववत करण्यासाठी अनेक महिला या शस्त्रक्रियेचा आधार घेतात. मांड्या, दंड, कंबर, पोटरी, पाठ, हनुवटी, चेहरा किंवा पोटावर वाढलेली चरबी व्यायाम करून कमी होत नसल्यास अशा शस्त्रक्रियांना पसंती दिली जाते. अवयवांचा आकार कमी-जास्त करण्यासाठी लिपोसक्शन किंवा कॉस्मेटिक सर्जरी हा पर्याय अवलंबला जातो. पुरुषांमध्येही लिपोसक्शन आणि कॉस्मेटिक सर्जरी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने स्तनांवरील अनियंत्रित चरबीची वाढ कमी करण्यासाठी पुरुष लिपोसक्शन सर्जरी करतात. अनुवांशिकता, औषधे, वजन, संप्रेरके किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय डाएटमध्ये वापरलेले सप्लीमेंट्ससारखे घटक यांच्या दुष्परिणामांतून अशी वाढ संभवण्याचा धोका असतो.

बॉलीवूडमध्ये नवीन ट्र्रेड

काही वर्षांपूर्वी अभिनेत्री आरती अग्रवाल हिलादेखील या शस्त्रक्रियेमुळे आपला जीव गमवावा लागला होता. स्थूलपणा कमी करण्यासाठी आरतीने लिपोसक्शन सर्जरी केली होती. निधनाच्या महिनाभरापूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून तिच्या शरीरावरील अतिरिक्त चरबी काढण्यात आली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिला श्वासोच्छवासाला त्रास होऊ लागला होता. आरतीवर न्यू जर्सीतील अटलांटिक सिटीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे तिच्यावर अजून एक शस्त्रक्रिया होणार होती, मात्र अचानक तिचे निधन झाले.

आज मनोरंजन सृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सुंदर दिसण्यासाठी किंवा फिगर चांगली दिसण्यासाठी वेगवेगळ्या सर्जरी करीत असतात. प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी, अनु्ष्का शर्मा, जान्हवी कपूर, श्रुती हसन, आयेशा टाकिया या अभिनेत्रींनी देखील प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. अर्थात या सर्जरीनंतर काही जणींना ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले होते. पण चेतना राजचा मृत्यू झाल्याने ही सर्जरी आता चिंतेची बाब बनू लागली आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here