- अक्षय शिंपी
“मछुआरे कभी किसी के दुश्मन नहीं थे। हो भी नहीं सकतें। १९४७ के पहले दोनों एकही समुंदर में मिलकर मछुआरी करते थे। आज भी उसी समुंदर में करते है। कल तक जब बाउंड्री पर मिलते थे तो राशन, अनाज का लेनदेन होता था। भला वे किसी के भी दुश्मन कैसे हो सकते है?”
हे शब्द आहेत, गुजरातमधील सौराष्ट्रातल्या अणि शत्रू राष्ट्रातील प्रांतानजीक असलेल्या एका साध्या मच्छिमाराचे. त्यांच्या आणि त्याच्यांसारख्याच हातावर पोट असलेल्या मच्छिमार बिरादारीच्या अगतिकतेचे. पालघर जिल्हा आणि गुजरातमधील सौराष्ट्रातील अनेक मच्छिमार खोल समुद्रात मासेमारी करायला जातात आणि नकळत पाण्यातली बाॅर्डर ओलांडून शत्रू राष्ट्राच्या तावडीत अलगद सापडतात. तद्नंतर त्यांचे हाल कुत्राही खात नाही. अतिशय दारिद्र्यात असलेल्या कुटुंबातील कर्ती माणसं जेव्हा शत्रू राष्ट्राचे कैदी होतात तेव्हा त्या कुटुंबाचेही प्रचंड हाल होतात. घरातल्या बायका कुटुंबं चालवण्यासाठी पडेल ते काम करतात. ज्या मच्छिमारांचा कैदेत मृत्यू होतो, त्यांची शरीरंही महिनोन् महिने परस्पर देशांकडे सुपूर्द केली जात नाहीत. देश परस्परांचे शत्रू असल्याची किंमत साध्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसांना चुकवावी लागते, ज्यात त्या माणसांचा, त्यांच्या बिरादारीचा यत्किंचितही दोष नसतो.
दोन्ही देशांचे तज्ज्ञ अभ्यासक, पत्रकार, वकिल, बिरादरीचे मुखिया एकमुखानं सांगतात की, दोन्ही देशांकडे यासंबंधातल्या उपायांविषयी प्रचंड उदासीनता आहे. इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे झालेल्यांसाठी नरक परवडला, अशी अवस्था असते.

या सगळ्याचा ‘आंखो देखी’ मांडणारा प्रगती बाणखेले लिखित आणि संतोष कोल्हे दिग्दर्शित ‘क्या पानी में सरहद होती है’ या साध्या शब्दांतला पण मूलभूत प्रश्न असलेल्या शीर्षकाचा माहितीपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. जे मासे आपण जेवणात चवीनं खातो त्यामागे असलेल्या बिरादारीच्या प्रचंड मेहनतीची आणि त्यांना किंमत चुकवावी लागत असलेल्या राजकीय उदासीनतेची चरचरीत मांडणी यात आहे.
प्रगती बाणखेलेंनी ‘ऑन दि फिल्ड’ या त्यांच्या पुस्तकात घेतलेला विदारक अनुभव तितक्याच टोकदारपणे पडद्यावर दृश्यांच्या साखळीतून आणि साध्या साध्या कष्टकरी माणसांच्या बोलीतून आपल्या समोर येतो. हा माहितीपट करतानाही कर्त्यांना अनेक त्रासातून, परवानग्यांच्या किचकट प्रक्रियेतून जावं लागलं असावं. कारण हा अतिशय किचकट, गुंतागुंतीचा विषय आहे.
कलेचा उद्देश माणसं उलगडून दाखवणं हे असतं. इथे अशी माणसंच आपल्याला थेट बघता-ऐकता येतात, ज्यांचं आयुष्यच कुणाच्या तरी पोटाची खळगी भरण्यासाठी काम करत असता कायमचं बदललेलं आहे. त्यांच्या परिस्थितीची शहरी लोकांना कल्पनाही नाही.
जे मासे जाळ्यात पकडतात तेच कुणाच्या तरी जाळ्यातले मासे होतात, तेव्हा काय होतं- याचा अनुभव घ्यायचा असेल तर या माहितीपटाचा खेळ अवश्य बघा. आपण थेट काहीही करू शकलो नाही तरी किमान आपल्या आणि पलिकडल्या देशांतल्या कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या मच्छिमारांची जगण्यातली एक काळी बाजू आपल्याला समजू घेता येऊ शकेल. आजकालच्या उत्खननात देवीदेवताच सापडणाऱ्या दिवसांत किमान आपण माणूस समजून घेण्याइतपत तरी सहिष्णु उरलेले असू. कदाचित अजून सहस्त्र वर्षांनंतरच्या उत्खननात माणसांचे मूठभर अवशेषतरी सापडतील, अशी आशा आहे.
भारत-पाक तुरुंगातील मच्छीमारांना स्वातंत्र्य कधी?
या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई माहिती देताना सांगतात की, २००८ ला दोन्ही देशांनी निवृत्त न्यायाधीशांची एक समिती कैद्यांच्या चौकशीसाठी बनवली गेली होती. एकूण आठ सभासद असलेली ही समिती नियमितरित्या एकमेकांच्या तुरुंगात जाऊन, आपल्या देशाच्या कैद्यांना भेटत असे. त्यांच्या सुटकेसाठी आवश्यक कारवाई होते की नाही, ते देखील समिती पाहत असे. तुरुंगात आपल्या देशाचे वरिष्ठ निवृत्त न्यायमूर्ती भेटत असल्याने कैदी त्यांना सगळी माहिती देत असत. समितीच्या मध्यस्थीमुळे काही कैद्यांच्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती, मला समितीच्या काही सभासदांनी दिली होती. या समितीची शेवटची बैठक २०१३ च्या ऑक्टोबरमध्ये भारतात झालेली. त्यानंतर या समितीचे काम बंद पडले आहे.