वेश्या व्यवसाय : सामाजिक जबाबदारी आणि परिणाम

काही दिवसापूर्वी मा. सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलिसांनी त्रास देऊ नये असा निकाल दिल्याचे आपण सगळ्या वर्तमान पत्रातून वाचले. देहविक्री बेकायदेशीर नाही, पोलिसांचा हस्तक्षेप नको अशा बातम्या वाचल्याने बऱ्याच लोकांच्या दोन्हीही बाजूने प्रतिक्रिया आल्या. वास्तविक हे काय प्रकरण काय आहे, त्याचे परिणाम काय होतील, त्याच्या दोन्हीही बाजू समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू.

  • ॲड. महेश भोसले

बुद्धदेव कार्मसकर वि वेस्ट बंगाल नावाने एक केस मा. सर्वोच्च न्यायालयात २०१० साली दाखल झाली होती. सदरील प्रकरणामध्ये मा. न्यायालयाने एक समिती स्थापन करून त्यांना तीन मुद्द्यावर रिपोर्ट सदर करण्यास सांगितले होते. ते मुद्दे होते.

१) मानवी तास्कारीवर प्रतिबंध. २) ज्या महिलांना वेश्या व्यवसाय सोडायचा आहे त्यांचे पुनर्वसन ३) ज्या महिलांना वेश्या व्यवसाय चालू ठेवायचा आहे अशा महिलांना त्यांच्या व्यवसायातील सन्मान मिळवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. त्यानंतर २०१२ मध्ये तीन नंबर च्या मुद्द्यात बदल केला आणि संविधानाच्या आर्टिकल २१ नुसार वेश्या व्यवसायास सन्मान देणे असा केला. त्यानंतर समितीने त्यावर रिपोर्ट सादर केला आणि 2016 मध्ये मा. न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत कायदा करण्याचे सूचित केले. त्यानंतर केंद्र सरकारने कायदा न करता फक्त तारखा वाढवल्या म्हणून मा. न्यायालयाने आर्टिकल 142 वापर करून काही निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने स्पष्टपणे दिलेले निर्देश

  • वेश्या व्यवसाय करणाऱ्याला पूर्ण कायद्याचे समान संरक्षण देणे बंधनकारक आहे.
  • “वय” आणि “सहमती” असेल तर त्यांना पोलिसांनी कुठलाही त्रास देता कामा नये.
  • कुंटणखान्यावर जर धाड टाकली तर तिथे सहमतीने चाललेला असेल तर तो गुन्हा नाही हे लक्षात घेऊन कुंटणखाना बेकायदेशीर असू शकतो, तिथला व्यवसाय नाही त्यानुसार अशा महिलांना अटक करू नये.
  • राज्यांनी सर्व्हे करून ज्या महिलांना अटक केलेली आहे त्याबाबत पुनर्विचार करून तात्काळ त्याबाबत कार्यवाही करावी. पोलीस यंत्रणा आणि इतर सर्व कायद्याच्या अखत्यारीतील यंत्रणेने आशा लोकांकडे वेगळ्या नजरेतून न पाहता, त्यांना सन्मान द्यावा आणि संविधानातील सर्व मूलभूत हक्काचे संरक्षण करावे.
  • कंडोमचा वापर हा त्यांच्याविरोधात पुरावा म्हणून वापरला जाऊ नयेत. तसेच त्यांच्या बाबत कुठलाही निर्णय घेताना त्यांना विश्वासात घ्यावे आणि त्यांना सर्व कायदेशीर मदत करावी.
  • लहान मुलं जर कुंटणखान्यात सापडले तर ते तस्करी करून आणलेले आहेत असे न मानता त्यांच्या टेस्ट करून त्यांची आई कोण आहे ते पाहावे. तसेच केवळ सेक्स वर्कर आहे म्हणून त्यांच्या लहान मुलांना त्यांच्यापासून दूर करू नये.

वरील सर्व निर्देश अतिशय महत्वाचे आहेत. एखाद्या व्यवसायामुळे कुणाला वेगळ्या वागणुकीला सामोरे जावे लागणे हे अमानवीय आहेच. हे सगळेच आहे, परंतु आता एक सामाजिक जबाबदारी देखील वाढलेली आहे.

कुठलीही स्त्री आनंदाने, स्वतःहून देहविक्री करते यावर माझा विश्वास नाही. एखादी स्त्री केवळ शरीर सुखासाठी असा व्यवसाय करणार नाही. आपल्या समाजातील एखाद्या स्त्रीला रोजीरोटी साठी असा व्यवसाय करावा लागणे हा आपला सामाजिक पराजय आहे. कोणी स्त्री पैशाच्या अति हव्यासापोटी असा व्यवसाय करत असेल देखील हे नाकारता येत नाही, परंतु ती देखील खूप आनंदाने ते करत नाही. महिलांना रोजगार मिळवून देण्यात शासन कायमस्वरूपी कमी पडत असल्याची ही पावती आहे. महिलांना स्किल वर्क करण्यासाठी आणि त्याबाबतीत त्यांना ट्रेन करण्यासाठी शासकीय पातळीवरील प्रयत्न अतिशय तोडके आहेत. रोज वाढणारी महागाई आणि येणारे उत्पन्न यातील तफावत लक्षात घेतली पाहिजे. अतिशय कमी उत्पन्नात निदान बरे जीवन जगता यावे म्हणून बऱ्याच महिला या व्यवसायात दिसतात. तसेच बऱ्याच महिला आमिषाला बळी पडून देखील या व्यवसायात ओढल्या जातात आणि नंतर बाहेर पडण्याच्या सर्व वाटा बंद झाल्यामुळे त्या नाईलाजाने तिथे जगत असतात. डान्स बार बंदी झाल्यानंतर अनेक महिलांचा रोजगार गेला आणि त्यांचेवर उपासमारीची वेळ आली म्हणून त्यांना मजबुरीने वेश्या व्यवसायाकडे जावे लागले.

महिलांची, अज्ञान मुलींची होणारी तस्करी रोखणे ही खूप मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. एखादी मुलगी अशा व्यवसायात ओढली गेली की सामाजिक दडपणामुळे त्यांचे आई – वडील देखील बऱ्याचदा त्यांना जवळ करत नाहीत ही गोष्ट अतिशय वाईट आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या लेकराकडे आपण खूप वाईट नजरेने पाहतो, त्यांची चूक नसताना त्याचेंबाबत आपण पूर्वग्रहदूषित नजरेने पाहतो हे खरेच योग्य आहे का ? म्हणून एक माणूस म्हणून अशा महिलांना सन्मान मिळवून देण्यास हा निकाल मदत करेल अशी आशा वाटते. अशा महिलांना या दलदलीत न ठेवता त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक संस्था काम करत आहेत, त्यांना सर्वप्रकारच्या मदती शासनाने पुरवायला हव्यात. बऱ्याचदा अशा संस्थेच्या लोकांना जीव धोक्यात घालून काम करावे लागते यावर देखील उपाय व्हायला हवेत.

हॉटेलमध्ये सहमतीने जोडपे गेले की त्यांच्यावर बऱ्याचदा पोलीस धाड टाकून कार्यवाही करतात हे आधीही बेकायदेशीर होतेच, पण आता तर त्याला आणखी चाप बसेल असे वाटते. बऱ्याचदा जोडपे सहमतीने हॉटेलमध्ये एका रूम मध्ये राहते, अशा वेळी विनाकारण त्यांना त्रास दिला जातो, सज्ञान दोन समलिंगी व्यक्ती जसे राजरोसपणे एका रूम मध्ये राहतात तसे दोन सज्ञान भिन्न लिंगी व्यक्तींना देखील आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना सोबत राहण्यापासून अडवणे, त्यांचे नाते विचारणे, त्यांची चौकशी करून त्यांना मानसिक त्रास देणे हे चूक आहे. दोन भिन्न व्यक्ती एका रूम मध्ये राहिले की ते केवळ सेक्स करण्यासाठीच राहिले हा ग्रह आधी दूर व्हावा. मुळात ते सज्ञान असतील आणि सहमतीने सोबत असतील तर त्यांना त्रास देणे बेकायदेशीर आहे. अशा घटनांना आता या निर्णयामुळे फायदा होईल. आपल्याकडे सेक्स कुणी आणि कुणासोबत करावा याबाबत खूप सामाजिक बंधने आहेत, ते दूर केली गेली पाहिजेत. सज्ञान व्यक्ती, सहमतीने आणि इच्छेने कुणासोबतही सेक्स करू शकते हे कायदेशीर आहे.

या निकालाने अजून एक गोष्ट जबाबदारीपूर्ण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे या निकालाच्या आधारावर होणार गैरवापर. एखाद्या महिलेने सेक्स साठी सहमती दिली आणि नंतर तिने केस केली तर कसे सिद्ध करणार की तिने सहमती दिली होती? अशा बाबीवर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. सहमती घेणे म्हणजे काय करणे हे निश्चित केले पाहिजे नसता याचा गैरवापर देखील होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच कुंटणखाना चालवणे बेकायदेशीर आहे पण त्यामध्ये सहमतीने चालणारा सेक्स बेकायदेशीर नाही. असे असेल तर प्रत्येक कुंटणखान्यामध्ये सेक्स सहमतीनेच चालत असतो कारण कुंटणखान्यामध्ये बलात्कार झाला अशा घटना खुपच दुर्मिळ आहेत. म्हणजे कुंटणखानाची व्याख्या देखील तपासावी लागेल.
या निर्णयामुळे जेवढे चांगले परिणाम होतील तेवढेच प्रश्न देखील निर्माण होणार आहेत. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांना केवळ योग्य दृष्टीने पहायला पाहिजे. आपण आशा लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुधरायला हवा. त्यामुळे आता आपली समाज म्हणून अजून जबाबदारी वाढली आहे असे मला वाटते.

हे ही वाचा👉🏽 देहविक्री हा एक व्यवसायच – सुप्रीम कोर्ट

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here