फायरब्रँड महुआ…

कालीमातेवरून तृणमूल पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध देशभरातले वातावरण तापलं आहे… तिला कुणी त्यांना तिरसट, चिडखोर म्हणतं तर कुणी कुठलाही पाचपोच नसलेली स्त्री असंही म्हणतं… संसदेतील तिचं पहिलंच धडाकेबाज भाषण झाल्यानंतर "अ पोलिटिकल स्टार इज बॉर्न' म्हणून तिला माध्यमांमध्ये गौरवलं जातं… अर्णव गोस्वामीला ती ऑनस्कीन 'मिडल फिंगर' दाखवून सगळ्यांना अवाक करते… ती दिसायला गोड आणि सुंदर असली तरी तितकीच तिखट आणि बधडक आहे. म्हणूनच तिच्यासाठी 'फायरब्रँड' हा शब्द योग्य ठरतो… ती आहे बोल्ड अँन्ड ब्युटिफुल, ब्युटी विथ ब्रेन… महुआ मोइत्रा!

कोमल कुंभार / 08 जुलै 2022

तुम्ही डोळे उघडून नीट पाहिलंत तर तुम्हाला या देशात सगळीकडे त्याची चिन्हं दिसतील. या देशाचे तुकडे तुकडे होऊ लागले आहेत. देश धोकादायक मार्गावर आहे आणि देशाला वाचवण्याची गरज आहे” …

संसदेतील पहिल्याच भाषणाने पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघातून निवडून आलेल्या महुआ मोइत्रा (Mahua Moitra) यांनी संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. संसदेत आपल्या पहिल्याच तिखटजाळ भाषणात सरकारच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगणं असो किंवा रिपब्लिकन टीव्हीच्या अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना ‘मिडल फिंगर’ दाखवून ‘धिस इज वन मॅन शो, सो जस्ट कीप टॉकिंग‘ असं बेधडकपणे सांगणं असो की, झी टीव्हीविरोधात (Zee TV) केलेल्या दाव्यांमुळे अडचणीत सापडणं असो किंवा विमानतळावर महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तणूक असो… महुआ मोइत्रा या मागील दोनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिल्या आहेत. कुणी त्यांना तिरसट म्हणतं, कुणी चिडखोर म्हणतं तर कुणी कुठलाही पाचपोच नसलेली स्त्री असंही म्हणतं. पण तुम्ही माझ्यावर प्रेम करा किंवा माझा तिरस्कार करा, माझी दखल तर तुम्हाला घ्यावीच लागेल, असं त्या ठणकावून दाखवून देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी “फायरब्रँड” हा शब्द योग्य ठरतो. म्हणूनच ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा वारसा त्या खऱ्या अर्थाने चालवतात असंही त्यांच्याबद्दल म्हटलं जातं.

Mahua Moitra

महुआ मोइत्रा, ‘अ पोलिटिकल स्टार इज बॉर्न’

मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत संसदेवर निवडून गेल्यावर भारतीय संसदेला मिळालेल्या नवीन चेहऱ्यांपैकी महुआ मोइत्रा एक आहेत. त्यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात भारतात फॅसिझमच्या (Fascism) सुरूवातीची पहिली सात लक्षणं दिसत असल्याचं सांगितलं तेव्हा उपस्थितांच्या चेहऱ्यावर चमकलेलं आश्चर्य दिसत होतं. 2017 मध्ये “यूएस होलोकास्ट मेमोरियल म्युझियम’ने (United States Holocaust Memorial Museum) ही सात लक्षणं एका पोस्टरवर नमूद केली होती. राष्ट्रीयत्वाला आलेलं नको इतकं महत्त्व सध्या भारतीय समाजजीवनात दिसू लागलं आहे. ते अर्थशून्य, वरवरचं, उथळ आणि मूर्खपणाचं आहे. “या देशात राजकीय नेते आपण कुठल्या विद्यापीठातून शिकलो हे दाखवण्यासाठी पदवी आणून दाखवू शकत नाहीत आणि गोरगरीब जनतेला ते या देशाचे नागरिक आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावे आणण्यासाठी भाग पाडलं जातं,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आणि संपूर्ण देशाचं लक्ष त्याच्याकडे लागलं. राष्ट्रीय सुरक्षा आणि शत्रू शोधण्याबाबत प्रचंड वेड निर्माण केलं जात आहे. प्रत्येकाला एका अज्ञात शत्रूची भीती आहे. शिवाय लष्कराने साध्य केलेल्या कामगिरीचं श्रेय एकाच व्यक्तीच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही फॅसिझमची लक्षणं नाहीत तर काय, असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा सर्वांचे डोळे विस्फारले होते. एका रात्रीत त्या देशाच्या स्टार झाल्या. त्यांचं हे भाषण या वर्षातलं सर्वोत्तम भाषण आहे असंही त्यांच्याबाबत बोललं गेलं. आपण इथे आलो आहोत ते कचकड्याची बाहुली म्हणून नाही तर आपलं एक म्हणणं आहे आणि ते आपण मांडणार आहोत हे त्यांनी पहिल्याच भाषणात सिद्ध केलं. पण त्यांची आधीची कारकीर्दही तशीच तडाखेबाज होती.

इन्व्हेस्टमेंट बँकर ते राजकारण

महुआ यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1975 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील द्विपेंद्रलाल मोइत्रा हे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या आई आणि कुटुंबाबद्दल फारशी माहिती कुठेही उपलब्ध नाही आणि त्यांनाही ती देण्यात फारसं स्वारस्य नसतं. लोकांनी आपल्या कामाबद्दल बोलावं, त्याची चर्चा व्हावी, माझं कुटुंब काय आणि कसं आहे या वैयक्तिक गोष्टींची नाही असं त्यांना वाटतं. अमेरिकेतील मॅसेच्युएट्समधल्या माऊंट होलिओक कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि गणित या विषयावर पदवी मिळवल्यावर त्यांनी इन्व्हेस्टमेंट बँकर (Investment Banker) म्हणून काम सुरू केलं. सुमारे दहा वर्षं जेपी मॉर्गन (JPMorgan Chase) या आघाडीच्या कंपनीत उपाध्यक्ष या पदावर काम करत होत्या. पण कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर दहा वर्षांनी आपल्या मित्रमैत्रिणींना परत भेटल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की आपले जवळपास सर्व मित्र इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. त्यामुळे आणखी दहा वर्षांनी आपणही त्यांच्यासारखंच आणखी एक व्यवस्थापकीय संचालक होऊन यायचं नाही. आपण आपला वेगळा मार्ग निवडला पाहिजे असं त्यांनी ठरवलं. त्यांनी स्कॅन्डिनेव्हियामध्ये राहत असलेल्या काळात लार्स ब्रोरसन या डॅनिश व्यक्तीशी लग्नही केलं. परंतु ते लग्नही अल्पकाळच टिकलं. 2009 मध्ये त्यांनी जे. पी. मॉर्गन कंपनीतून राजीनामा दिला आणि त्या भारतात परतल्या. तिथून त्यांचा राजकारणाचा प्रवास सुरू झाला.

Election Campaign 2019

कॉँग्रेसपासून फारकत घेत तृणमूलमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये परतल्यावर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निकटवर्तीय समजल्या जात होत्या. राहुल गांधी यांच्या “आम आदमी का सिपाही‘ या मोहिमेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण काँग्रेस सत्तेसाठी डाव्यांशी तडजोड करते हे त्यांना पसंत नव्हतं. त्यामुळे त्यांनी 2010 काँग्रेस सोडली आणि त्या तृणमूलच्या महासचिव बनल्या. अनेक वर्षं त्या तृणमूलच्या प्रवक्त्या होत्या. त्यांनी टीव्हीवरील अनेक चर्चांमध्ये हिरिरीने भाग घेतला. ममता बॅनर्जी यांचा त्यांच्यावर गाढ विश्वास असल्यामुळे 2016 मध्ये त्यांना आमदारकीसाठी तिकीट दिलं गेलं आणि त्या निवडूनही आल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या कृष्णनगर मतदारसंघातून निवडून आल्या. एक यशस्वी बिझनेस बँकर ते एक खासदार हा त्यांचा प्रवास दहा वर्षांत वेगाने पार पडला. पण आपण अजूनही कोषात आहोत आणि आत्ता कुठे आपल्यातल्या सुरवंटाचं फुलपाखरू होऊ लागलंय असं त्या सांगतात. सुशिक्षित असणं, बुद्धिमत्ता आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची त्यांची क्षमता यांच्यामुळे त्या राजकारणातल्या यशांच्या पायऱ्या खूप पटापट चढल्या.

पण स्त्री राजकारणातली असो किंवा इतर क्षेत्रातली. ती देखणी असेल, बुद्धिमान असेल आणि स्वतःची ठाम मतं असलेली असेल तर तिच्याविरोधात एक सुप्त लाट तयार व्हायला लागते. तिच्या वैयक्तिक आयुष्यात असं काही सापडतं का की, ज्याचा वापर तिच्याविरोधात केला जाईल याचा शोध घेतला जातो. अगदीच तसं काही सापडलं नाही तर त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले जातात. 4 जानेवारी 2017 रोजी एका टीव्हीवरील लाइव्ह चर्चेत केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी त्यांच्याबद्दल “महुआ ड्रंक ऑन महुआ” असं संबोधन केलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय टीव्हीवर आपला अपमान केल्याचा आरोप करून बाबुल सुप्रियो यांच्याविरोधात खटला दाखल केला. त्यानंतर 11 जानेवारी 1017 सुप्रियो यांनी त्यांच्याविरोधात आपल्याला रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्यात (Rose Valley financial scandal) विनाकारण गोवल्याबद्दल खटला दाखल केला. याच महुआ मोइत्रा यांच्या जून 2019 मधील संसदेतील भाषणानंतर इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांचा उल्लेख “इंडिया ड्रंक ऑन महुआ- अ पोलिटिकल स्टार इज बॉर्न’ असा केला.

Mahua Moitra in Live debate on Republic Tv with Arnab Goswami

महुआने अर्णवला दाखवले ‘मिडल फिंगर’

त्यापूर्वी 2017 मध्ये आसाममध्ये विमानतळावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या मारामारीचा व्हिडिओही प्रसारित झाला. त्यांच्यावर खटला भरला गेला. त्या आक्रस्ताळ्या आहेत, त्यांना राग खूप पटकन येतो आणि त्या या रागावर नियंत्रण मिळवू शकत नाही असा संदेश देशभरात गेला. त्यानंतर रिपब्लिक टीव्हीवरच्या (Republican TV) मॉब लिंचिंगच्या विषयावर चाललेल्या एका चर्चेत त्यांनी अर्णब गोस्वामी यांना लाइव्ह चर्चा सुरू असताना “मिडल फिंगर’ दाखवली. “तुझा वन मॅन शो आहे, तू बोलत राहा. तू कोणालाही बोलू देत नाहीस तर मग चर्चेला कशाला बोलवतोस” असं त्यांनी अर्णब गोस्वामी यांना ठणकावून विचारलं. तेव्हा ही चर्चा पाहणारे अवाक झाले होते. लाइव्ह चर्चा हा आपल्यासाठी प्रसिद्धी मिळवण्याचा आणि स्वतःला चर्चेत ठेवण्याचा एक मार्ग आहे हे त्यांनी केव्हाच ओळखलं होतं. आपल्या हातातलं हत्यार कसं वापरायचं, टीव्हीचं माध्यम आपल्याभोवती कसं ठेवायचं ही मीडिया मॅनेजमेंट जमणारी व्यक्ती राजकारणात यशस्वी होते, असं एक समीकरण होऊ घातलं आहे. ही गोष्ट मोइत्रा यांना नीट माहीत आहे हेच या चर्चेवरून दिसून येतं.

2016 मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ यांना विधानसभेचं तिकीट दिलं तेव्हा त्यांची स्टायलिश जीवनशैली आणि कॉर्पोरेट पार्श्वभूमी यांच्यामुळे लोक त्यांना पसंत करणार नाहीत आणि त्या यशस्वी ठरणार नाहीत असे अंदाज भल्या भल्या राजकीय विरोधकांनी बांधले. पण त्यांनी आपल्या नेत्याचा विश्वास सार्थ ठरवत या सगळ्यांना तोंडावर आपटवलं आणि निवडून आल्या. त्यांनी खूप चांगला जनसंपर्क प्रस्थापित केला आहे. त्यामुळे अगदी ग्रामीण भागांमधूनही अल्पावधीत जनाधार मिळाला. त्यांनी आपल्या मतदारसंघात 150 कोटी रूपयांची कामं केली. त्या कामांवर ममतादीदींचं लक्ष होतंच. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी घोषित केली गेली. या निवडणुकीत भाजपाने त्यांचा परदेशातून आल्याचा मुद्दा धरला. पण त्यांनी तो मुद्दा खोडून काढत आपली पाळंमुळं इथल्याच मातीतली आहेत हे सिद्ध केलं आणि सुमारे 66 हजार मतांच्या मताधिक्याने निवडून आल्या.

त्यांचे जून 2019 मधील संसदेतील भाषण हे वॉशिंग्टन (Washington, D.C.) मंथलीच्या मे 2017 च्या मार्टिन लाँगमन (Martin Longman) यांच्या भाषणाची कॉपी आहे, असं मत झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी (Sudhir Chaudhary) यांनी व्यक्त केल्यावर महुआ यांच्याबाबत पुन्हा एकदा वादळ उठलं. त्यांनी त्याआधीच प्रसारमाध्यमांमधून खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याबद्दल आवाज उठवला होता. त्यानंतर मार्टिन लाँगमन यांनी स्वतःच त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांचा लेख कॉपी केल्याची बातमी खोटी असल्याचं स्पष्ट केलं. महुआ यांनी लोकसभा अध्यक्षांकडे विशेष सवलतींचं उल्लंघन केल्याबद्दल तक्रार दाखल केली. ही तक्रार लोकसभेने फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला. त्याविरोधात जाऊन झी न्यूजनेही त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. आता हे दोन्ही खटले वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल असून त्या दोन्हींवर देशभरात मोठी चर्चा सुरू आहे.

Mahua Moitra visiting her constituency

ठोशास ठोसा, जशास तसे

आजचं राजकारण हे कुणी ‘अरे’ म्हटलं की गप्प बसावं असं राजकारण नाही तर ‘अरेला, का रे’ असं विचारण्याचं आहे. कारण तुम्ही गप्प बसलात की लोक तुम्हाला कमकुवत समजतात आणि तुमच्या या शांत बसण्याचा गैरफायदा घेतला जातो, असं त्यांना वाटतं. ठोशास ठोसा, जशास तसे या तत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि काहीही चुकीचं घडत असेल तर त्याविरोधात आवाज उठवण्यात त्या मागे राहत नाहीत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून निवडणूक आयोगाने आपल्या भाजपातील विरोधकाविरोधातील तक्रारीची दखल न घेतल्याची तक्रार केली. नादिया जिल्हा अध्यक्षाने कल्याण चौबे या उमेदवाराच्या उपस्थितीत त्यांच्यावर वैयक्तिक शेरेबाजी केल्याची तक्रार त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले. केंद्र शासनाच्या सर्व्हेलन्स धोरणाबाबत त्यांनी एक याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तिच्यावर सुनावणीही सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि हातमागावरच्या साड्या

त्यांच्या कपडे आणि पर्सेस यांचं कलेक्शन यांच्याबाबतही खूप चर्चा होताना दिसते. त्याबद्दल व्हर्व्ह अँड लुइस वुटन डायरीजशी (VERVE AND LOUIS VUITTON DIARIES ) बोलताना त्यांनी आपल्या आवडींबद्दल सांगितलं. त्या अगदी सुंदर साड्या नेसतात आणि त्यांच्या खांद्याला कायम लुइस वुटनची पर्स लटकलेली दिसते. त्या ती खूप सुंदरपणे वापरतात. “माझ्या व्यक्तिमत्वाला काय कपडे चांगले दिसतील हे मी ठरवते. कपडे माझं व्यक्तिमत्व कसं असेल हे ठरवत नाहीत. काम करत असताना मला बंगाल आणि झारखंड प्रदेशातल्या नैसर्गिक आणि हातमागावरच्या साड्या आवडतात. पण संध्याकाळच्या वेळी मला सुंदर ड्रेस घालायला आवडतात. मला राहुल मिश्रा, अनामिका खन्ना, देव आर निल आणि मॉशिनो आणि बरबेरी असे आंतरराष्ट्रीय ब्रँडही खूप आवडतात”. असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. आपली पहिली लुईस वुटनची मोनोग्राम अल्मा पर्स नवऱ्याने लंडनमध्ये भेट दिलेली होती. तेव्हापासून मला हा ब्रँड खूप आवडतो असं त्या आवर्जून सांगतात. कोलकात्यातील महिलांना आपल्या रंगरूपाबाबत काहीही वाईट वाटत नाही. त्या स्वतःला आहे तसं स्वीकारतात आणि हीच गोष्ट मला खूप आवडते, असं त्या म्हणतात. मग ती महाविद्यालयीन तरूणी असो किंवा कडक साडी नेसून जाणारी उच्चपदस्थ अधिकारी असो, कपड्यांमुळे आपलं व्यक्तिमत्व काय आहे हे ठरत नाही हे त्यांना माहीत आहे. आपली सर्वांत लाडकी साडी म्हणजे आपल्या आईची लग्नातील निळ्या रंगाची साडी आहे, असं त्या सांगतात. आपली आई इतकी “बोल्ड” होती की तिने आपल्या लग्नात हिंदूंची पारंपरिक लाल रंगाची साडी न नेसता सुंदर मोरपिशी रंग आणि त्यावर सोनेरी किनार निवडली. आपल्या स्वभावातील हा बोल्डनेस आईचीच देणगी आहे असं त्यांना वाटतं.

महुआ यांना व्यायामाची आवड आहे. त्या नियमितपणे योगासनं करतात. शिवाय त्यांना स्वयंपाकाचीही आवड आहे. आपल्या मोकळ्या वेळेत (तो त्यांना खूप कमी मिळतो) वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवून खायला त्यांना आवडतं. महुआ मोइत्रा यांच्यासारख्या आणखी अनेक नेत्यांची देशाला गरज आहे. कोणत्याही भीतीशिवाय वावरणारे, कोणत्याही दबावाला बळी न पडणारे, कोणत्याही चुकणाऱ्या गोष्टींवर प्रश्न विचारणारे आणि लोकांचे प्रश्न ठामपणे संसदेत, समाजासमोर मांडणारे हे नेते भारताचं भविष्य असतील. सुशिक्षित, फॉरेन रिटर्न्ड, भाषांवर अस्खलित प्रभुत्व असलेल्या या नेत्यांची भारताला भविष्यात खूप गरज भासेल. त्या स्टायलिश आहेत, देखण्या आहेत आणि राजकारणाचं, प्रसारमाध्यमांचं मॅनेजमेंट कसं करायचं हे त्यांना माहीत आहे. त्यांच्यातले हेच गुण हेरून ममता बॅनर्जी यांनी त्यांना संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं करून दाखवलं.

लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व विरोधी पक्षाला असतं. देशात विरोधी पक्ष कमकुवत झालेला असताना महुआ मोइत्रा यांच्यासारखे नेते विरोधकाची भूमिका उत्तम पद्धतीने निभावत आहेत. योग्य मुद्द्यांवर, योग्य पद्धतीने टीका करत त्यांनी देशाच्या नजरेत आपलं स्थान निर्माण करायला सुरूवात केली आहे. त्यांची बुद्धिमत्ता, व्यवस्थापनाचं ज्ञान आणि त्यांचं भुरळ घालणारं व्यक्तिमत्व यांच्यामुळे त्यांना राजकारणात उज्ज्वल भवितव्य आहे असं अनेकांना वाटतं आणि ते योग्यही आहे. भारतीय राजकारण आता एक वेगळं रूप घेऊ पाहत आहे. तिथे आधुनिक विचारसरणीच्या आणि प्रत्यक्षात आधुनिक दिसणाऱ्या, वावरणाऱ्या लोकांची गरज आहे. असेच लोक पुढच्या काळातल्या तरूण पिढीचं खऱ्या अर्थाने नेतृत्व करतील. त्यांना फक्त संधीची गरज आहे. अशा अनेक महुआ मोइत्रा इथून पुढच्या काळात निर्माण होतील असंच अनेकांना वाटतं. फक्त त्यांचा पुढे येण्याचा आणि नेतृत्वाचा मार्ग मोकळा होणं गरजेचं आहे.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here