दास्तान- गो : एक होती नसीम बानो, बॉलिवूडची ब्युटी क्विन आणि सुपरस्टार

भारतीय सिनेसृष्टीची पहिली ब्युटी क्वीन आणि पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नसीम बानो यांची आज (2 जानेवारी) जयंती. सायराबानोची आई असलेली नसीम बानो इतक्या सुंदर होत्या की कोणाच्याही नजरेस पडू नये, म्हणून त्या कायम पडद्याआड राहायच्या.

  • टीम बाईमाणूस

भारतीय सिनेविश्वात अशा अनेक अभिनेत्री झाल्या, ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांना वेड लावले, चाळीसच्या दशकातील अशीच एक अभिनेत्री म्हणजे नसीम बानो, ज्यांना ब्युटी क्वीन आणि पहिली महिला सुपरस्टार म्हटले जाते. आजचे सिनेप्रेमी त्यांना क्वचितच ओळखतील. 1930 च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात करून त्यांनी 1950 पर्यंत अभिनय सुरू ठेवला. नसीम बानो या प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांच्या आई आणि अभिनेता दिलीप कुमार यांच्या सासूबाई होत्या. त्याच नसीम बानो यांची आज जयंती आहे.

लोकांच्या नजरेपासून वाचवण्यासाठी बुरख्यात राहायच्या

नसीम बानो यांचे खरे नाव रोशा आरम बेगम होते. त्यांचा जन्म 4 जुलै 1916 रोजी जुन्या दिल्लीत झाला. नसीम यांच्या आई शमशाद बेगम या त्यांच्या काळातील प्रसिद्ध गायिका होत्या. नसीम बानो यांचे पालनपोषण राजेशाही थाटात झाले होते. त्या पालखीतून शाळेत जात असत. नसीम एवढ्या सुंदर होत्या की, त्या कोणाच्याही नजरेस पडू नये, म्हणून त्या कायम पडद्याआड राहायच्या. त्यांचे वडील अब्दुल वहीद खान हसनपूरचे नवाब होते. दिल्लीतील क्वीन मेरी शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांची आई शमशाद बेगम प्रख्यात गायिका होती. शमशाद बेगम यांचे नाव वाचकांनी ऐकलेच असेल. आपल्या मुलीनं शिकून डॉक्टर व्हावे अशी शमशाद बेगम यांची इच्छा होती. त्या काळात फक्त श्रीमंतच आपल्या मुलींना शिक्षण देत असत. त्यामुळेच नसीम बानो यांना शिकण्याची संधी मिळाली. खानदानी कुटुंबातील असल्याने नसीम बानो यांच्या वागण्या-बोलण्यात एक ग्रेस आणि अदब होती. त्यांना चित्रपटात काम करण्याची आवड होती; परंतु खानदानी कुटुंबातील असल्याने त्यांना चित्रपटात काम करण्याची परवानगी मिळणे कठीणच होते. त्यांचा चित्रपटात प्रवेश योगायोगानेच झाला. शाळेला सुटी लागल्याने नसीम बानो फिरण्यास मुंबईला आल्या होत्या.

संबंधित वृत्त :

मुंबईला (Mumbai) आल्यानंतर मैत्रिणींबरोबर त्या चित्रपटाचे शूटिंग पाहाण्यास अनेक स्टुडिओतही गेल्या होत्या. नसीम बानो यांचे सौंदर्य पाहून अनेक निर्मात्यांनी त्यांना चित्रपटात घेण्याचा विचार करून ऑफरही दिल्या; परंतु अगोदर शिक्षण पूर्ण कर आणि नंतर चित्रपटात कामाबाबत विचार करू, असे घरातल्यांनी सांगितल्याने नसीम बानो यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले. सुलोचना (रुबी मायर्स) या नायिकेची प्रचंड प्रशंसक असलेल्या नसीम बानो यांनी चित्रपटात काम करण्याचे स्वप्न पाहणे मात्र सोडले नव्हते.

एकदा शाळेच्या सुट्टीत नसीम त्यांच्या आईसोबत ‘सिल्व्हर किंग’ या चित्रपटाचे शूटिंग पाहायला गेल्या होत्या. शूटिंग पाहून त्यांनी ठरवले की, त्यांनाही अभिनेत्री व्हायचे आहे. स्टुडिओत नसीम यांचे सौंदर्य पाहून त्यांना चित्रपटात काम करण्याची ऑफरही आली, परंतु त्यांच्या आईने त्या ऑफर नाकारल्या. आणि नसीम यांनी डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.

बॉलिवूडला एक नवी सुशिक्षित नायिका मिळाली

एक दिवस प्रख्यात निर्माता-अभिनेता सोहराब मोदी यांनी नसीम बानो यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. परंतु नसीम बानो यांच्या घरचे या गोष्टीला तयार झाले नाहीत. नसीम बानो यांनी बंडाचा पवित्रा घेत अन्न-पाणी सोडले. मुलीच्या हट्टाखातर आई-वडिलांनी विशेषतः आईने चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि बॉलिवूडला एक नवी सुशिक्षित नायिका मिळाली. 1935 मध्ये सोहराब मोदी यांच्यासोबत शेक्सपिअरच्या हॅम्लेटवर आधारित ‘खून का खून’ चित्रपटात नसीम बानो यांनी नायिकेची भूमिका साकारली. चित्रपट पूर्ण करून पुन्हा शिक्षण घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता चित्रपटात काम करणारी मुलगी असल्यानं कोणत्याही कॉलेजने प्रवेश न दिल्याने त्या पुन्हा मुंबईला आल्या. सोहराब मोदी यांना भेटल्यानंतर त्यांनी मिनर्व्हा मूव्हीटोनसाठी चित्रपटांचा करार केला. ‘खान बहादूर’, ‘तलाक’, ‘मीठा जहर’ आणि ‘वासंती’ चित्रपट नसीम बानो यांनी केले. त्यानंतर सोहराब मोदी यांचा गाजलेला ऐतिहासिक चित्रपट ‘पुकार’ आला आणि या चित्रपटाने नसीम बानो सुपरस्टार झाल्या. सगळीकडे त्यांचीच चर्चा होऊ लागली. या चित्रपटात नसीम बानो यांनी गाणीही गायली होती. ‘पुकार’मध्ये ऐतिहासिक भूमिका साकारल्यानंतर मिनर्व्हा मूव्हीटोनच्याच ‘शीश महल’मध्ये गरीब घरातील एका मुलीची भूमिका साकारली. प्रेक्षकांना नसीम बानो यांचे हे गरीब रूपही प्रचंड आवडले. मिनर्व्हा मूव्हीटोनबरोबर भांडण झाल्याने नसीम बानो यांनी फिल्मीस्तान स्टुडिओकडे आपला मोहरा वळवला. अशोककुमार बरोबर केलेल्या ‘चल चल रे नौजवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले आणि नसीम बानो यांना ब्यूटी क्वीन म्हणून लोकप्रियता मिळाली. नसीम बानो त्यांच्या काळातील सगळ्यात सुंदर अभिनेत्री होत्या. गोरा रंग, नितळ त्वचा, मोठे डोळे पाहून देवाने त्यांना अत्यंत मन लावून बनवले असावे अशी चर्चा त्या काळात रंगल्याचे सांगितले जाते. त्यांचे नैसर्गिक सौंदर्य पडद्यावर आणखी खुलून दिसत असे.

या चित्रपटाच्या यशानंतर नसीम यांना देशभरात ओळख मिळाली. नसीम सर्व चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती बनल्या. जेव्हा चित्रपटांच्या अधिक ऑफर्स येऊ लागल्या, तेव्हा त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडले आणि चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी मिनर्व्हा मूव्हीटोन बॅनरखाली सोहराब मोदींसोबत तलाक, मीठा जहर, बसंती यांसारख्या चित्रपटांसह अनेक चित्रपट केले, परंतु पुकार चित्रपटात नसीम ‘नूर जहाँ’ ची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आल्या. यानंतर नसीम यांना इतर चित्रपटांच्या ऑफर्स आल्या पण सोहराब मोदींसोबतच्या करारामुळे त्या ऑफर्स स्वीकारू शकल्या नाहीत. या प्रकरणावरून नसीम आणि सोहराब यांच्यात काही प्रमाणात खडाजंगी झाली होती.

नसीम बानो यांचे बालपणीचे मित्र मियां अहसान-उल हक यांच्याशी लग्न झाले होते, त्यांनीच ताजमहाल पिक्चर्स बॅनर सुरू केले होते. नसीम आणि त्यांच्या पतीने या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. 1947 च्या फाळणीनंतर दोघेही पाकिस्तानात गेले होते, पण नंतर नसीम आपल्या दोन मुलांसह भारतात परतल्या होत्या. नसीम बानो यांनी अनेक चित्रपट केले जे यशस्वीही ठरले. त्यांचा सगळ्यात पहिला चित्रपट होता ‘उजाला’. यानंतर त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली. परंतु काही कारणाने नसीन बानो परदेशात गेल्या आणि जवळ-जवळ सात वर्षे युरोपमध्ये राहिल्या. पुन्हा मुंबईला आल्या ख-या; परंतु तोपर्यंत नव्या नायिका आलेल्या असल्याने त्यांना ‘बागी’, ‘सिंदबाद’सारखे सी ग्रेड चित्रपट करावे लागले. अशा भूमिका करण्यापेक्षा चित्रपटसृष्टी सोडलेली बरी असा विचार करून त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम केला. गुरुदत्त यांनी ‘प्यासा’ आणि के. आसिफ यांनीही नसीम बानो यांना चित्रपटांची ऑफर दिली; परंतु त्यांनी त्या नाकारल्या. मात्र ड्रेस डिझायनर म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली.

मुलीसाठी सोडले होते फिल्मी करिअर

‘अजीब लडकी’ हा नसीम बानो यांच्या सिनेकरिअरमधील अभिनेत्री म्हणून शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटानंतर नसीम यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला अलविदा केले होते. हा तो काळ होता जेव्हा त्यांची मुलगी सायरा बानो चित्रपटाच्या पडद्यावर पदार्पणासाठी सज्ज झाली होती. असेही म्हटले जाते की, नसीम यांना आपल्या मुलीची आपल्याशी तुलना व्हायला नको होती, म्हणून त्यांनी चित्रपटांमधून निवृत्ती घेतली होती.

मुलगी सायराच्या चित्रपटांसाठीही कपडे केले होते डिझाइन

त्यानंतर नसीम यांनी फॅशन डिझायनर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्यांनीने आपल्या मुलीच्या अनेक चित्रपटांसाठी ड्रेसही डिझाइन केले. एका रिपोर्टनुसार, सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या लग्नात नसीम यांचा मोठी भूमिका होती असेही म्हटले जाते. 18 जून 2002 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी नसीम यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here