स्टॅन्डअप कॉमेडी हा प्रकार तास भारतासाठी अतिशय नवीन आहे. केवळ काही महानगरांमध्ये असणाऱ्या बार, पब्स आणि काही निवडक ठिकाणी तरुण एकत्र येऊन स्टॅन्डअप कॉमेडीचा आनंद घेताना दिसून येतात. डिजिटल विश्वामध्ये तर विनोद करणारे अनेक विनोदवीर प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत. भारतीय स्टॅन्डअप कॉमेडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विनोदाच्या विषयांचा विचार केला तर बऱ्याचदा तेच तेच विषय दिसून येतात. कधी ट्राफिक, कधी बॉस आणि त्याच्या कर्मचाऱ्याचे नाते, कधी टिंडरवर केली जाणारी मस्ती, कधी उबर ड्रायव्हर तर कधी इंजिनियरिंग असे मोजके विषय सोडले तर आपण फारसे विनोद या स्टॅन्डअप मध्ये ऐकलेले नसतात. मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगलोर सारख्या शहरांमध्ये दिवसभर मोठमोठ्या कंपन्यात गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या करून संध्याकाळी श्रमपरिहारासाठी एखाद्या स्थानिक पब अथवा थियेटरमध्ये जमून समोर उभ्या असलेल्या स्टॅन्डअप कॉमेडीयनने केलेल्या विनोदांचा आस्वाद घेण्यापासून सुरु झालेली भारतीय स्टॅन्डअप कॉमेडी आता बऱ्यापैकी लोकप्रिय झालेली आहे.
स्टॅन्डअप कॉमेडीचा परीघ वाढला असला तरी अजूनही काही मोजके अभिजन विषय आणि काही मोजके अभिजन वर्गातील विनोदवीर यांच्यापुरतेच हे विश्व सीमित होते पण आता मात्र काही दलित, पारलिंगी आणि क्वायर स्टॅन्डअपवाले तरुण हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणजे स्टॅन्डअप कॉमेडी विश्वातील काही प्रस्थापित चेहरे कधी कधी आरक्षण, मायावती, ग्रामीण माणसं, घरकाम करणारे नोकर यांच्यावर विनोदनिर्मिती करतात पण, हे सगळं जगलेल्या किंवा पाहिलेल्या वर्गातून आलेला एखादा स्टॅन्डअप कॉमेडियन स्वतःच्याच जातीय अथवा सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीचा उपहास करून विनोदनिर्मिती करतो त्यावेळी त्याची मजा काही औरच असते. मागील काही वर्षांमध्ये कॉमेडी करू पाहणाऱ्या या दलित कॉमेडीयन्सनी तेच विषय एका वेगळ्या अंगाने मांडून प्रेक्षकांना खळखळून हसवणे सुरु केले आहे आणि त्यात ते सध्यातरी कुठे कमी पडताना दिसुन येत नाहीत.
बंगळुरूच्या एका बार मध्ये मनजीत सरकार नावाचा एक दलित विनोदवीर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच म्हणतो, “तुम्हाला सगळ्यांनाच वाटत असेल मी इथे काम करणारा एक वेटर आहे हो ना? नमस्कार मी मनजीत आणि मला सुरुवातीलाच तुमचा एक समज मोडायचा आहे. मी एक दलित आहे पण मी स्वतःला ब्राम्हण समजतो.” स्टॅन्डअप कॉमेडी पाहायला आलेले तरुण त्याने सुरुवातीलाच बोललेल्या या शब्दांनी हसायला लागतात.
आमचे विनोद सगळ्यांसाठी
महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील 24 वर्षांची तरुण कॉमेडियन अंकुर तांगडे म्हणते, “विनोद सादर करणारा व्यक्ती दलित आहे अथवा आणखीन काही याने फारसा फरक पडत नाही कारण आमचे विनोद सगळ्यांसाठी असतात.” जेंव्हा एखाद्या कार्यक्रमात केवळ दलित स्टॅन्डअप कॉमेडियन सादरीकरण करणार असतात त्याचा अर्थ असा होत नाही की ते पहायला एखादा ‘गुप्ता‘ किंवा ‘मलिक‘ येऊ शकत नाही. दलित कलाकारांना मंचावर आणण्यामागे दुसरा काहीही हेतू नसतो फक्त तिथे आलेल्या प्रेक्षकांना विनोद ऐकायला मिळावा आणि त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा एवढाच हेतू आयोजकांच्या मनात असतो.
मनाल पाटील या जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाने आपल्या स्टॅन्डअप कॉमेडीची सुरुवात मुंबईमधून केली. सध्या तो हैदराबाद मध्ये काम करतो. ‘ब्लु मटेरियल‘ नावाचा एक कार्यक्रम त्याने सुरु केला आहे, ज्यामध्ये फक्त दलित स्टॅन्डअप कॉमेडियन सादरीकरण करत असतात. “आमच्या कार्यक्रमाला अनेक उच्चजातीय लोक नेहमी येत असतात” असे तो म्हणतो.
दुसऱ्या जातींवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्याच जातीय ओळखीचा आणि जातीचा उपहास करून केलेल्या त्याच्या विनोदनिर्मितीला अनेकदा प्रस्थापित कार्यक्रम आयोजकांनी त्यांच्या मंचावर सादरीकरणास परवानगी दिली नाही. त्यांचे असे म्हणणे होते की, “अजून किती दिवस तुम्ही जात जात करणार?” मानल पाटीलचा एक व्हिडिओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल झाला होता ज्यात त्याने ‘आरक्षण‘ म्हणजे त्याला मिळालेली एक ‘सुपरपॉवर‘ आहे अशी मांडणी केली होती. त्यात तो म्हणतो की “आरक्षणामुळे मी मागवलेल्या पिझ्झा पेक्षाही जलद एखाद्या महाविद्यालयात माझा प्रवेश होऊ शकतो आणि ही माझी सुपरपॉवर आहे.” त्या व्हिडिओ क्लिप मध्ये दिसते की तिथे उपस्थित प्रेक्षकांना त्याचा हा विनोद प्रचंड आवडतो आणि तिथे एकच हशा पिकतो.
सुरुवातीला उल्लेख केलेल्या मनजीतचा विचार केला तर आपल्या सादरीकरणातून तो एका संपूर्ण वेगळ्या दलित जीवनाचे कथन करतो. तो स्वतः एका नक्सलग्रस्त भागातून असल्याने त्याच्या विनोदामध्ये कधी लॅन्डमाईन्सचा म्हणजेच भूसुरुंगांचा हसत हसत उल्लेख केलेला असतो. तर कधी सेक्स करत असताना त्याची ब्राम्हण मैत्रीण तो दलित असल्याने त्याला तिच्यावर कशी येऊ देत नाही याचेही सविस्तर चित्रण तो आपल्या विनोदातून करतो आणि त्याच्या अनुभवआधारित अथवा काल्पनिक विनोदांना प्रचंड प्रतिसाद मिळतो.
आपल्या अनुभवाबाबत सांगतात मनजीत सांगतो की, “मी नेहमी शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन यांच्यात तुलना करत असतो. या दोन्ही जगण्यातील काही फरक दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. मी अशा परिसरातून येतो जिथे केवळ 30% उच्चजातीय लोक राहतात. पण माझ्या सादरीकरणामध्ये मी नेहमी माझ्या परिसरातील आदिवासी लोकसंख्या आणि त्यांच्या प्रश्नांना मांडण्याचे काम करत असतो.” एका कार्यक्रमात मनजीतने केलेला विनोद असा, “जर तुम्ही मी केलेल्या माझ्या विनोदावर हसला नाहीत तर मी तुम्हाला स्पर्श करेन आणि अस्पृश्यता ही माझी ताकद आहे.” त्याच्या लहानपणीच्या हातपंप वापरण्याच्या कटू अनुभवाचाही तो हळूच उल्लेख करतो. ज्यात तो सांगतो की, त्याने हातपंप वापरला म्हणून कशापद्धतीने गावातल्या एका ब्राम्हण बाईने त्या हातपंपाचे गंगाजल वापरून शुद्धीकरण केले होते.
आपल्या आदिवासी जिल्ह्यातील अनुभवांचे बंगळुरू आणि इतर महानगरांमध्ये त्याने केलेले विनोदी सादरीकरण लोकांना प्रचंड आवडू लागले आहे आणि त्याचाही एक वेगळा चाहतावर्ग हळू हळू तयार होतो आहे. मनजीत सांगतो की, “मोठमोठ्या रेंज रोव्हर सारख्या आलिशान गाड्यांमधून लोक माझे विनोद ऐकायला येतात, विनोदांवर प्रचंड हसतात आणि नंतर त्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी पार्टीलाही बोलावतात हे पाहून मला खूप आनंद होतो.” पण मनजीतला जातीचे कार्ड खेळायची अजिबात इच्छा नाही “मला कुणाचेही हास्य किंवा माझ्या विनोदाला दिलेली दाद ही सहानुभूती म्हणून नकोय” असे तो म्हणतो.
याचवर्षी महाराष्ट्राच्या एका छोट्याश्या खेड्यातून आलेली नेहा ठोंबरे जेंव्हा नागपूरच्या एका पब मध्ये आपल्या ग्रामीण महाराष्ट्रीयन आयुष्याचे उपहासाने विनोदी चित्रण करते, तेंव्हा तिच्या स्टॅन्डअपलाही प्रचंड प्रतिसाद मिळतो. आपल्या सादरीकरणात ती म्हणते की, “काही दिवसांपूर्वी मी जेंव्हा परदेशात गेले होते तेंव्हा मला तिथे कुणीही माझी जात विचारलीच नाही. मला एवढ्या समतेच्या वागणुकीची सवय नाही? एवढ्या समतेचे काय करावे कळलेच नाही, त्यामुळे जवळ जवळ मी बेशुद्धच पडणार होते.“
या हसण्यामागे बरंच काही दडलंय
दलित विनोदीकलाकारांच्या अशा विनोदांवर जरी त्यांना प्रचंड हशा मिळत असला तरी भारतीय स्टॅन्डअप आणि एकूणच विनोदीविश्वात जातीवरून भेदभाव केला जातो हे वास्तव आहे. बीडची अंकुर एक दलित कॉमेडियन तर आहेच पण ती एक क्वायर कॉमेडियनदेखील आहे. आपल्या या वेगळ्या ओळखीबद्दल सांगताना अंकुर सांगते की, ती स्वतः एका सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी असूनदेखील एका मोठ्या विनोदी मंचाने दलित विनोदी कलाकारांना नोकरीवर घेण्यास नकार दिला होता. “मी एका मोठ्या मनोरंजन कंपनीत काम करत होते आम्ही तिथे 10-12 दलित कलाकार होतो पण एका नवीन प्रकल्पासाठी ब्राम्हण कलाकाराचीच निवड करण्यात आली. सुरुवातीला मला काही लक्षात आले नाही पण नंतर कुणीतरी मला त्या कंपनीचा ब्राम्हण कलाकारांनाच नोकरीत घेण्याचा इतिहास असल्याचे सांगितले.“
“आपल्यापेक्षा कमकुवत किंवा असुरक्षित स्तरातून येणाऱ्या लोकांवर तुम्ही विनोद करू शकत नाही मात्र, मी एक दलित आहे आणि एक क्वायर आहे म्हणजेच काय तर आधीच अल्पसंख्यांक असलेल्या समाजातही मी अल्पसंख्यांक आहे त्यामुळे मी कुणावरही विनोद करू शकते तो माझा हक्कच आहे. नाही का?” निर्भयपणे अंकुर सांगत होती.
मनालला माहित आहे की त्याचा शो हिट झाला तरी त्याला जातीवादी टिप्पण्यांचा सामना करावा लागेल. मुंबईतील बूजी कॅफेमध्ये त्याच्यासोबत असाच एक प्रकार घडला याबद्दल तो सांगतो की, “त्या कॅफेच्या मालकाने माझ्या विनोदाला प्रचंड हसून दाद दिली खरं म्हणजे तिथे उपस्थित सगळ्यांनाच माझे सादरीकरण आवडले मात्र शेवटी तो म्हणाल की आता मला माझ्या कॅफेतील सगळ्या प्लेट्स धुवाव्या लागतील.” हा जातीय भेदभाव केवळ कॉमेडीक्लब्स मध्येच होत नाही. भारतात स्टॅन्डअप कॉमेडी करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी असल्याने त्यांचा समूह खूप छोटा आणि बंदिस्त आहे. त्यामुळे एखादी दलित महिला स्टॅन्डअप कॉमेडी करताना मार्गदर्शक शोधत असेल तर तिला प्रचंड अडचणी येत असल्याचे नेहा ठोंबरे सांगते. “उच्चजातीतील कलाकारांना त्यांचे सादरीकरण बसवून घेण्यात आणि त्यातील चुका काढून सुधारणा करण्यास खूप वाव असतो पण दलित कॉमेडीयन्सच्या बाबतीत ते तितकेसे सोपे नसते.“
मनजीत आपल्या एका अनुभवाबद्दल सांगतो की, एका प्रेक्षकाने त्याला असे विचारले की, “तुझ्या सादरीकरणातून तू नेहमी दलितांचे प्रश्न मांडतोस पण आता हे सगळे लोक सुधारले असतील नाही का?” मनजीतचा स्टॅन्डअप पाहायला येणारे लोक नेहमी त्याच्या विनोदांचा मनसोक्त आनंद तर घेत असतात पण कधी कधी अशा खोचक टिप्पण्यांचाही त्याला सामना करावा लागतो.
भाषेचे राजकारण
आपल्या यूट्यूब चॅनलला एक चळवळ म्हणणारी नेहा आपल्या व्हिडिओजमध्ये वऱ्हाडी भाषेचा आणि उच्चारांचा वापर करत असते. त्यामुळेच कदाचित तिचे व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय आहेत. आपल्या सादरीकरणाला तिची ‘सामाजिक चिमट्यासोबत विनोद‘ असे म्हणते. तिच्या मते तिच्या मराठी भाषेमुळेच ती डिजिटल माध्यमांवर यशस्वी होऊ शकली आहे. ती म्हणते की, “माझ्या मते कलाकाराला आणि प्रेक्षकाला जात नसते. पण मला माझ्याच जातीतील तरुणांनी मी विनोदी कलाकार असल्याने लग्नाला नकार दिला आहे हेही तितकेच खरे आहे. सवर्ण भाषेला किंवा शुद्ध हिंदीलाच आपल्या देशात शुद्धतेचा दर्जा दिला जातो इतर सगळ्या बोलीभाषा अशुद्ध मानल्या जातात पण माझ्या यशामध्ये मी माझ्या व्हिडिओज मध्ये वापरलेल्या वऱ्हाडी भाषेने मला प्रचंड मदत केली आहे. कतारमध्ये राहणाऱ्या एका दलित परिवाराने मला नुकताच कॉल करून सांगितले की त्यांना माझे व्हिडिओज खूप आवडतात आणि ते नित्यनेमाने माझे व्हिडिओज पाहत असतात.“
मनजीतने तो काळही सांगितला जेव्हा तो मुंबईतील एका शोच्या आधी ग्रीन रुममध्ये होता, जेव्हा त्याला इंग्रजी नीट येत नव्हते. तो विनोदात सांगतो की, “मी माझा अपमान झाल्याने इंग्रजी शिकलो.” इंग्रजी बोलता येत नसल्याने त्याच्यासोबत भेदभाव केला गेला होता. “कलाकारांशी संवाद करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रकट झालेले भाव आणि त्यांच्या उपहासयुक्त नजरा मी अजूनही विसरू शकत नाही. उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण विचार हा आता जातीनिहाय प्रश्न नसून ती एक सामाजिक स्थिती किंवा मानसिकता झाली आहे. तो स्वर मला आयुष्यभर लक्षात राहील.“
प्रसिद्धी, संघर्ष आणि इतर त्रास सहन करूनही हे सगळे दलित विनोदी कलाकार काहीतरी वेगळे सांगण्याचा आणि इतरांप्रमाणेच लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सौजन्य – द प्रिंट
अनुवाद – आशय बबिता दिलीप येडगे