आदिवासींचे ‘चारचौघे’ नायक…!

आदिवासींना एकवेळ तहसीलदार कोण आणि पोलिस अधीक्षक कोण हे ठाऊक नसेल; पण पेरमा, भूमिया, गायता आणि कोतला हे पक्के ठाऊक असतात. भारतातील आदिवासींच्या आदिम यंत्रणा याच चार पारंपरिक नायकांभोवती गुंफलेल्या दिसतात. अनादी काळापासून या चारही घटकांच्या माध्यमातून आदिवासींची समाजरचना काम करीत आली आहे.

  • लालसू नोगोटी

आदिवासींना (Adivasi) विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची चर्चा अनेकदा केली जाते, परंतु त्यासाठी आदिवासींच्या जगण्याचा प्रवाह काय आहे हे समजून न घेताच, तथाकथित आधुनिक यंत्रणा त्यांच्यावर लादली जाते. आदिवासींच्या मागास राहण्यामागे त्यांच्या सक्षम आणि समृद्ध पारंपरिक रचना बाद होण्याचा वाटा अधिक आहे. त्यामुळे या आदिम रचना समजून घेणे गरजेचे आहे. मध्य भारतातील आदिवासींच्या आदिम यंत्रणा चार पारंपरिक नायकांभोवती गुंफलेल्या दिसतात. ते नायक म्हणजे… पेरमा, भूमिया, गायता आणि कोतला. आदिवासींना एकवेळ तहसीलदार कोण आणि पोलिस अधीक्षक कोण हे ठाऊक नसेल; पण गावचा, पट्टीचा पेरमा कोण, गायता कोण आणि कोतल्याचे काम काय हे पक्के ठाऊक असते. त्यामुळे त्यांच्या विकासाचा आणि संस्कृती संवर्धनाचा विचार या चारही व्यवस्था जाणून घेतल्याशिवाय अपुराच.

पेरमा हा आदिवासींचा धार्मिक प्रमुख… धर्मगुरूच समजा. गावाचा पेरमा गावकरी नियुक्त करतात, तर पट्टीचा म्हणजे इलाख्याचा पेरमा वंश परंपरेने चालत येतो. पट्टी म्हणजे आदिवासी गावांच्या समूहाचा इलाखा. आमच्या भामरागड गावातील १०८ गावांचे प्रत्येकाचे पेरमा आहेत आणि या 108 गावांपासून बनलेल्या भामरागड पारंपरिक पट्टी गोटूल समितीचे स्वतंत्र पेरमा आहेत. पेरमा हा धार्मिक प्रमुख असल्याने त्याचे अस्तित्व श्रद्धेवर बेतलेले आहे. अतिदुर्गमता, अज्ञान आणि कमालीची अनिश्चितता यामुळे आदिवासी समाजात अगम्य शक्तींना खूप महत्त्व दिले गेेले आहे. आपल्याला नियंत्रित करणारी दुसरी दुनिया आदिवासीही मानतात. त्या दुसऱ्या दुनियेचा वास पहाडात आहे आणि जंगलातील वाघसिंह त्याचे पाळीव प्राणी आहेत, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे गावावर कोणतीही रोगराई किंवा आपत्ती आल्यास या दुसऱ्या दुनियेतील शक्तीस शांत करणे हे पेरमाचे काम. या दुसऱ्या शक्तीशी नाळ सांगणारी व्यक्ती पेरमा होते. शिकार करून त्यास आपली दिव्य शक्ती गावापुढे सिद्ध करावी लागते.

आदिवासींचा पुजारी म्हणजेच ‘पेरमा’

हा झाला श्रद्धा-अंधश्रद्धांचा भाग. परंतु, आदिवासींच्या पंडुममध्ये- उत्सवांमध्ये पेरमा खूप महत्त्वाचा असतो. पंडूम तीन स्तरांत होतात. आधी इलाख्यातील पंडूम पट्टीचा पेरमा करतात, त्यानंतर गावातील पेरमा गावांचे पंडूम करतात आणि अखेरीस आदिवासी घराघरात पंडूम करतात. घरातील पंडूमसाठी पेरमा लागत नाहीत, पण पट्टी आणि गावातील पंडूमची पूजा पेरमाच सांगतात. कधी कधी एका पेरमाकडे पाच-दहा गावेही असू शकतात. पंडूम म्हणजे जत्रा. या जत्रा आदिवासी संस्कृतीत खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. मरका जत्रा हा पंडूम केल्याशिवाय गावातील कुणीही मका खायला सुरुवात करीत नाही. पंडूम करूनच आंबा खाल्ला जातो. मोहाची दारू कधीही काढली जात नाही. बोरी पंडूमनंतर त्यास आदिवासी सुरुवात करतात. त्यामुळे हे पंडूम कधी आणि कसे करायचे हे पेरमा ठरवतात.

तीन वर्षातून पेरमा एकदा मंत्राने गावाची बांधणी करतो. गावातील सर्वांना एका रात्रीसाठी गावाबाहेर काढले जाते. पेरमा मंत्र म्हणत गावाभोवती रात्रभर फिरतो आणि अघटीत गोष्टींपासून गावाचे रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. गावाचा पेरमा व्यवस्थित काम करत नसेल, लोक समाधानी नसतील, गावावर काही संकट आले, आपत्ती आली तर पेरमा बदललला जातो. हा अधिकार गावकऱ्यांनाही आहे. त्याच्या निधनानंतर दुसऱ्या पेरमाची नियुक्ती करतात.

जमीन मंजूर करणारे भूमिया

भूमिया हा महसूली प्रमुख असतो. ज्याच्या पूर्वजांनी गाव वसवले त्या कुटुंबातून भूमिया नेमला जातो. हे पद वारशाने चालत येते. त्यांचे काम गावातील जमिनविषयक बाबींशी संबंधित असते. म्हणजे, गावात एखादे कुटुंब नव्याने स्थायिक होण्यासाठी आले असेल तर त्यांच्या घरासाठी कोणती जमीन द्यायची हे गावाच्या संमतीने भूमिया ठरवतो. गावाच्या सामूहिक मालकीच्या जमिनीतून तो दोरीने मोजून त्यांच्या घरासाठीचा तुकडा काढून देतो. हा निर्णय गोटूलमध्ये सर्वांच्या संमतीने भूमिया घेतो. एखाद्या समाजाच्या कुटुंबांची संख्या वाढली तर त्यांना कुठे आणि किती दफनभूमी द्यायची हे भूमिया ठरवतो. गावात काही जमिनीचे वाद उपस्थित झाले आणि ते गोटूलमध्ये निवाड्यासाठी आले तर भूमियाची माहिती आणि भूमिका महत्त्वाची ठरते. एकवेळ पेरमा गावाबाहेरचा असू शकतो, परंतु भूमिया गावातलाच असतो, कारण त्याला गावातील जमिनींची माहिती गरजेची असते.

पोलिसांना खबर देणारे गायता…

तिसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजेे गायता. हा गावाचा प्रमुख असतो, मुखिया असतो. हा वंशपरंपरेने चालत येत नाही. नेतृत्वगुण असलेला, संघटन कौशल्य असलेेला कुणीही गायता होऊ शकतो. गोटूलमध्ये गावाच्या बैठका बोलावण्याचे, त्या घेण्याचे काम गायता करतो. गायता वृद्ध झाल्यास, दगावल्यास, त्याचे काम गावाच्या पसंतीस न आल्यास किंवा त्याने दिलेल्या निर्णयांवरून वाद उत्पन्न होत असल्यास गाव गायता बदलू शकतात. सरकारी कार्यालय आणि गाव यांच्यातील तो दुवा असतो. गावकऱ्यांच्या वतीने गावाचा मुखिया म्हणून तो सरकारी कार्यालयात पाठपुरावा करतो. अनेकदा यांचा अधिक संपर्क पोलिसांशी येतो. गावात कुणी दगावले, संशयास्पद मृत्यू झाला, खून- आत्महत्या यासारखे प्रकार झाले तर गायता लोकांना घेऊन पोलिस स्टेशनला जातो. तहसीलदार, पोलिस स्टेशन या प्रशासकीय यंत्रणा त्याला ज्ञात असतात. त्याचा तेथे राबता असतो.

मधल्या काळात महाराष्ट्र शासनाने गायत्यांनाच पोलिस पाटील केले. पोलिसांना खबर देेण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले. त्याबदल्यात त्यांना पगार सुरू झाले. बाहेरच्या जगाच्या दृष्टीने आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असला तरी आदिवासी समजाताली गायत्यांसाठी तो जीवघेणा ठरला. पोलिस पाटील म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आल्यावर पोलिसांचे खबरे म्हणून ते नक्षलवाद्यांचे (Naxalites) लक्ष्य झाले. गेल्या काही वर्षात शेकडो गायत्यांच्या नक्षलींनी हत्या केल्या. खरं तर गावाचा पारंपरिक प्रमुख म्हणून शासकीय यंत्रणा आणि आदिवासी यांच्यातील समन्वयाचा दुवा म्हणून तो त्याची भूमिका महत्त्वाची होती. शासनाच्या विकास योजना आदिवासींपर्यंत पोहोचविण्यात गायते महत्त्वाची भूमिका पार पाडू शकले असते कारण त्यांना पारंपरिक मुखिया म्हणून मान्यता होती. परंतु, ‘पोलिस पाटील’ पदाचा शिक्का बसल्याने ती शक्यताही मावळून गेली, उलट झाला तो नकारात्मक परिणाम. आता कुणी गायता बनण्यास तयार नाही किंवा असलेले गायते त्यांची ओळख उघडपणे सांगण्यास घाबरतात.

माहिती प्रसारण खातं साभाळणारा कोतला

आदिवासी पारंपरिक रचनेतील चौथे पद म्हणजे कोतला. आता त्याला कोतवाल म्हणतात. पण मूळ आदिवासी शब्द कोतला. माहिती प्रसारण हे याचे काम. पट्टीचा कोतला वेगळा असतो आणि गावाचा वेगळा. पट्टीच्या पातळीवर पेरम्याने जे ठरविले ते निरोप गावांच्या कोतल्यापर्यंत पोहोचविणे हे याचे काम. गावाच्या कोतल्यापर्यंत आलेली माहिती तो गोटूलातील ढोल बडवून गावकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. गावात काही प्रश्न, वाद निर्माण झाल्यास त्याची माहिती पट्टीच्या कोतल्यामार्फत पट्टी समितीपर्यंत पोहोचवतो. हे पद ऐच्छिक आहे. एखाद्याने हे पद सोडले, त्यास करायचे नसेल तर गाव दुसरा कोतला नेमतो.

अनादी काळापासून या चारही घटकांच्या माध्यमातून आदिवासींची समाज रचना काम करीत आली आहे. गोटूलच्या पारंपरिक सामुदायिक निर्णय प्रक्रियेत यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. लोक या बदल्यात वर्षातून एकदा त्यांना मोहाची फुले आणि धान (भात) याच्या माध्यमातून साारा देतात. प्रत्येक घरातून गोटूलमध्ये हे गोळा केले जाते. त्यातून त्यांच्या साऱ्याचे वाटे काढले जातात. मेच्या अखेरीस ते दिले जाते. ही चारही मानाची पदे आहेत. त्यामुळे या साऱ्याच्या रूपाने त्यांना मानधन मिळते, पण त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून नसते. त्यामुळे यास बाजारू रूप आलेले नाही.
या व्यवस्थेचा एकच दोष म्हणजे यात सध्या तरी महिलांना स्थान नाही. पेरमा, भूमिया, गायता आणि कोतला पुरुषच आहेत. परंतु ही परिस्थिती आम्ही बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आदिवासींनी बदलण्याची गरज आहे. जंगोदाई, कमारमुत्ते , नुलेमुत्ते या आदिवासींच्या विविध गोत्रांच्या देवता होत्या. नंतरच्या काळात इतर समाजातील रूढी -परंपरा विचार आणि मानसिकता याची सरभेसळ झाल्याने या धारणा मागे पडल्या आणि त्यांची जागा पुरुषकेंद्री व्यवस्थेने घेतली. ती बदलून या पारंपरिक रचनेत महिलांचा सहभाग वाढवून आदिवासींमधील पूर्वीची मातृसत्ताक व्यवस्थेच्या पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

मुघल (Mughal), ब्रिटिश (British) यांच्यासारखे परकीय राजकर्ते असोत, स्थानिक राजे महाराज असोत वा स्वातंत्र्यानंतरचे भारत सरकार… कित्येक वर्षांपासून आदिवासींमध्ये प्रशासनाची ही पारंपरिक व्यवस्था चालत आली आहे. ही लोकांमध्ये भिनलेली, लोकांनी स्वीकारलेली आणि त्यांच्या जगण्याचा भाग बनलेली व्यवस्था आहे. परंतु, सर्वच राजकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. काही ठिकाणी हे मागासलेपणाचे लक्षण ठरवले जात आहे. नागरी समाजाने ही व्यवस्था समजून घेेण्याची गरज आहे. ब्रिटीश आल्यानंतर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक ही प्रशासकीय यंत्रणा आली. त्याआधीपासून या चारही पारंपरिक पदांच्या नेतृत्वाखाली आदिवासींमध्ये सामूहिक जगणे सुरू आहे. मात्र, सरकारी पातळीवर याची कोणतीही नोंद नाही. उलट आमचे हे कोतले, पेरमा, गायते जंगलात दिसले तर वन खात्याचे लोक त्यांना पकडतात. पोलिस कोतल्यांना वापरून घेतात. सरकारी पातळीवर यांची नोंद व्हावी, शासनाने त्यांना ओळखपत्र द्यावीत, अशी आमची मागणी आहे. शेड्युल ट्राइब अँड अदर फॉरेस्ट ड्वेलर्स (Schedule Tribe And Other Forest Dwellers) ॲक्टमधील अशी कलम 3 (1) (ई) नुसार कृषी पूर्व समाज आणि आदिम आदिवासी जमातींच्या अधिवासाचे हक्क बहाल करून पेरमा-भूमिया-गायता-कोतला या पारंपरिक रचनांना सरकारने मान्यता देण्याची तरतूद आहे. या दोन्ही यंत्रणांमध्ये परस्पर समन्वय निर्माण झाला, संवाद आणि समन्वय वाढला तरच आदिवासींचा विकास खऱ्या अर्थाने शक्य आहे.
advlalsunogoti@gmail.com

संपर्क – 9450130530

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here