खुप बेसुरा गातोस, गाणं लगेच बंद कर

बांग्लादेश सोशल मीडिया स्टार हिरो अलोमला अटक

  • टीम बाईमाणूस

सोशल मीडियावर तो कायम टिंगलटवाळीचा विषय असला तरी त्याच्या देशात मात्र तो हिरो आहे. फेसबुकवर त्याचे तब्बल 20 लाख फॉलोअर्स आणि युट्युबवर 15 लाख चाहते… सोशल मीडियावर तासनतास घालवणाऱ्या जवळपास प्रत्येकाने त्याचा अरबाच्या वेशातला अरेबियन गाणं म्हणणारा आणि आजूबाजूला ग्राफिक्सने तयार केलेले उंट नाचतानाचा व्हिडियो पाहिला असेल आणि काहीतरी नक्की प्रतिक्रिया दिली असेल. तब्बल एक कोटी 70 लाख लोकांनी त्याचा तो व्हिडियो पाहिला होता. अतिशय बेसुरा आवाज आणि तितक्याच चित्रविचित्र हरकतीमुळे सोशल मीडियाचा हा स्टार आता मात्र त्याच कारणामुळे अडचणीत आलाय.

हीरो अलोम… बांगलादेशातील प्रसिद्ध गायक. मात्र याच आलोमला पोलिसांनी नुसतेच पकडले नाही तर यापुढे शास्त्रीय गाणी गायची नाहीत अशी तंबीही दिली. शिवाय तसे करणार नाही अशा आशयाच्या माफीनाम्यावर त्याची स्वाक्षरीही घेतली. तुमचे गाणे ‘वेदनादायक‘ आहे, कधीही क्लासिकल गाणी गाऊ नकोस, असे म्हणत त्याचे काम थांबवण्यास सांगितले. खुद्द हीरो आलोमने वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

माफीनाम्यावर सही घेतली

त्याचे झाले असे की, रविंद्रनाथ टागोर आणि काझी नझरूल इस्लाम यांच्या कविता, गाणी आणि साहित्याला बांग्लादेशात प्रचंड मान आहे. आतापर्यंत हिरो आलाम अशीच काहीबाही गाणी गायचा. मात्र संगीतातले ओ का ठो कळत नसलेल्या या पठ्ठ्याने यावेळी थेट याच दोन महनीय व्यक्तींच्या गाण्यांनाच थेट हात घालण्याचे ठरवले. लोकांची तक्रार होती की अलोम अत्यंत विसंगतपणे गातो आणि शास्त्रीय गाण्यांशी छेडछाड करतो. अनेक तक्रारी आल्यानंतर अखेर पोलिसांनी अलोमला अटक केली आणि तब्बल आठ तासांनी सोडले ते पुन्हा शास्त्रीय गाणी गाणार नाही या अटीवरच… हिरो आलोमच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात पोलिसांनी त्याचा मानसिक छळ केला होता. पोलिसांनी त्याला शास्त्रीय गाणे गाणे बंद करण्यास सांगितले. गायक म्हणून तो खूप रागीट असल्याचेही पोलिसांनी सांगितले. शेवटी, अलोमला माफीनाम्यावर सही करायला सांगितले.

हिरो आलोम म्हणाला- ‘पोलिसांनी मला सकाळी 6 वाजता उचलले आणि 8 तास त्यांच्याजवळ ठेवले. त्यांनी मला विचारले की मी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर आणि बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांची गाणी का गातो?

या प्रकरणी ढाक्याचे चीफ डिटेक्टिव्ह हारुन उर रशीद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अलोमविरुद्ध आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. सध्या अलोमने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याबद्दल आणि त्याच्या व्हिडिओमध्ये परवानगीशिवाय टागोर आणि नजरुलची गाणी गायल्याबद्दल माफी मागितली आहे. त्याने गाण्याची पारंपारिक शैली पूर्णपणे बदलून टाकली… त्याने आम्हाला आश्वासन दिले की तो त्याची पुनरावृत्ती करणार नाही. पोलिसांच्या चौकशीतून सुटका झाल्यानंतर, अलोमने एक नवीन व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये तो तुरुंगाच्या पोशाखात कारागृहाच्या मागे असल्याचे दिसून आले. त्याला फासावर लटकवले जाणार असल्याचे व्हिडीओमध्ये दुःखाने सांगितले जात होते.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

त्याचवेळी अलोमसोबतच्या या वागणुकीमुळे सोशल मीडियावर संताप निर्माण झाला. अनेक यूजर्स अलोमच्या समर्थनार्थ उभे असल्याचे दिसले. आलोमचे गायन वाईट असले तरीही लोकांनी याला वैयक्तिक हक्कांवरचा हल्ला म्हटले. स्थानिक पत्रकार आदित्य अराफत यांनी लिहिले- ‘मी अलोमच्या गाण्यांचा किंवा अभिनयाचा चाहता नाही. मात्र त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर मी त्या गोष्टीच्या विरोधात उभा आहे. संजीदा खातून राखी यांनी लिहिले – धीर सोडू नको, तू हिरो आहेस. इतरांनी काहीही म्हटले तरी तूच खरा नायकआहेस. मात्र, काही लोकांनी अलोमवर त्याच्या गाण्याच्या शैलीने मूळ गाणे खराब केल्याची टीका केली.

हेच ते गाणे ज्याकरिता हीरो अलोमला अटक झाली आहे

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here