एकेकाळी भारतात मुसलमानही साजरी करायचा कृष्णजन्माष्टमी!

कृष्णकौतुके लिहिलेल्या उर्दू कवितांची एक सुरेख मैफल...

टीम बाईमाणूस

आपल्या देशातील बहुतांश लोकांनी स्वतःला फक्त हिंदू किंवा मुस्लिम म्हणून जगासमोर आणण्याआधी आपल्या पूर्वजांनी शिकवलेल्या ऐक्याच्या, सुखाच्या गोष्टी अंगिकरून आधुनिक शिकवणींशी त्यांचा मिलाफ घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे.

2022 मध्ये एखादा मुसलमान होळी, दिवाळी, जन्माष्टमी, महाशिवरात्री यांसारखे सण साजरा करत असेल तर ती अत्यंत महत्वाची बातमी असते. एखादा हिंदू रमजान ईद साजरा करत असेल तरीदेखील तीसुद्धा एक अत्यंत आगळीवेळी लक्षवेधी बातमी असते कारण मागील 5 ते 7 दशकांमध्ये आपण आपल्या उत्सवाची ही कारणे विभागून घेतलेली आहेत. मुस्लिमांचे सण वेगळे, हिंदूंचे सण वेगळे आणि एकमेकांच्या सणांमध्ये आपण अजिबात सहभागी झाले नाही पाहिजे अशी जी वर्गवारी करण्यात आलीय त्यामुळे एखादा मुस्लिम दिवाळीचा फराळ खात असेल तर त्याची बातमी होते आणि एखादा हिंदू इफ्तार पार्टीला जात असेल तर त्याचीही बातमी होते. सणांना आपण जसे वाटून घेतले आहे अगदी तसाच प्रकार देवांसोबतही केला आहे. जगाची निर्मिती करणाऱ्या महादेव, विष्णू, अल्लाह, येशू या सगळ्यांना आपण जगात आणून वाटून घेतले आहे. हिंदूंनी मुस्लिम देवतांबद्दल काही बोलायचे नाही आणि मुस्लिमांनी हिंदू देवतांकडे बघायचेही नाही अशी ही वाटणी वाटणी कसली छाटणीच करण्यात आलीय. 1947 नंतरचाच देश माहिती असणाऱ्यांना किंवा मग बाबरी मशिदीच्या पाडावानंतरचा इतिहास बघणाऱ्या या देशातील तरुणांना हे कदाचित काल्पनिक वाटू शकेल जेंव्हा त्यांना कळेल की कोणे एके काळी भारतात अतिशय धर्माभिमानी मुसलमान महादेव, राम, कृष्णाला भजत असत, दसरा, दिवाळी, कृष्णजन्माष्टमी हे हिंदू सण मोठ्या आनंदाने साजरे करत असत…

याबाबतीत उर्दू कवितांची तर तऱ्हाच वेगळी म्हणावी लागेल कारण भगवान श्रीकृष्णाला उर्दू कवितांमध्ये अत्यंत मानाचे स्थान देण्यात आलेले होते. उर्दू कवितांमध्ये कृष्णाचे वर्णन नेहमी प्रेमाचे किंवा सौंदर्याचे प्रतीक म्हणून केले जायचे. कृष्णाच्या प्रतिमेचा प्रेम, प्रणय आणि सौंदर्यासाठी वापर करण्यामध्ये इंशा अल्लाह खान ‘इंशा’, इक्बाल, इब्न-ए-इंशा, परवीन शाकीर यांसारखे काही उर्दू कवी सगळ्यात पुढे होते असे म्हणता येईल.

त्यांच्यासाठी, कृष्ण हे केवळ सौंदर्याचे रूपक नव्हते तर एक आकृती होती जीचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. १८ व्या शतकातील उर्दू कवींपैकी एक इंशा अल्लाह खान ‘इंशा’ लिहितात,

“सांवले तनपे गजब धज है बसंती शाल की,
जी मैं है कह बैठिये अब जय कन्हैयालाल की..”

( पिवळी शाल गजबजलेल्या अंगावर भव्य दिसते आत्ता
या क्षणी, माझ्या मनाला प्रिय कन्हैयाचा विजय म्हणावेसे वाटते
)

सध्याच्या भारतात ‘जय कन्हैया लाल की’ ही उद्घोषणा केवळ हिंदूंची मक्तेदारी असल्याचे वातावरण आहे एखाद्या मुस्लिमाने ही घोषणा देणे म्हणजे हिंदूंची भावना दुखावणे होऊ शकते इतकेच काय मुस्लिम समाजातील कर्मठ आणि रुढीवादी वर्ग एखाद्या मुस्लिमाने कृष्णाचे नाव आपल्या तोंडी घेतले म्हणून त्याने धर्मद्रोह केला असे देखील म्हणू शकतो एवढे अवघड वातावरण सध्या निर्माण झाले आहे.

तथापि, इंशा हा एकमेव मुस्लिम उर्दू कवी नाही ज्यांनी कृष्णाचा आपल्या कवितांच्या माध्यमातून एवढा आदर केला आहे. कृष्णाविषयी लिहिणाऱ्या कवींमध्ये सर्वात मनोरंजक उदाहरण म्हणजे हाफीज जालंधरी यांचे. हिंदू देवाबद्दलचा त्यांचा आदर लक्ष वेधण्याजोगा आहे कारण, सध्याच्या भारतीय आणि पाकिस्तानी मुस्लिमांमध्ये हाफिज जालंधरी यांनी ‘हिंदू देवांच्या’ बाबत काही चांगलं लिहीलं असेल यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही आणि त्याला काही कारणही आहेत पहिलं म्हणेज हाफीज जालंधरी यांनी संपूर्ण कुराण पाठ केले होते आणि विसाव्या शतकाच्या मध्यात होऊन गेलेल्या उर्दू कवींमध्ये सनातनी आणि कट्टर इस्लामी विचारांच्या मुस्लिम कवींमध्ये त्याची गणना होते.

त्याचबरोबर हाफिज जालंधरी हे मुस्लीम लीगचे सक्रिय सदस्य होते याच मुस्लीम लीगने पाकिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळावी याचा प्रचार केला होता. 1947 नंतर, ते पाकिस्तानी सशस्त्र दलातसुद्धा सामील झाले आणि 1948 मध्ये काश्मीरवरील हल्ल्यात हाफिज जालंधरी एक सैनिक म्हणून सहभागी झाले होते जेथे ते जखमीदेखील झाले. एवढेच काय तर पाकिस्तानचे राष्ट्रगीत तसेच पाकव्याप्त काश्मीरचे (पीओके) राज्यगीतसुद्धा त्यांनी रचले आहे. अशा व्यक्तीला, सध्याच्या पिढीसाठी, एक धर्मनिरपेक्ष आणि ‘हिंदू देवी-देवतां’बद्दल आदर बाळगणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाण्याची शक्यता कमीच आहे.

हाफिज जालंधरी यांच्या कृष्णाचे वर्णन करणाऱ्या उर्दू कविता आजही जीवंत आहेत

जेव्हा भारतीय राष्ट्रीय स्वतंत्र चळवळ चालू होती आणि हाफिज देखील मुस्लिम लीगचा एक सदस्य म्हणून स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेंव्हा त्यांनी कृष्णाच्या स्तुतीसाठी ‘कृष्ण कन्हैया’ नावाची एक कविता लिहिली होती आणि विशेष म्हणजे ही कविता ही काही साधी स्तुती नव्हती. भगवान कृष्ण या देशाचा तारणहार म्हणून परत येईल अशी कवीला आशा असते आणि कवितेच्या अगदी सुरुवातीलाच हाफीज आपल्या शब्दरचनेच्या साहाय्याने कृष्णाच्या भव्यतेकडे वाचकांचे लक्ष वेधून घेतात..

“ऐ देखने वालों,
इस हुस्न को देखो,
इस राज को समझो,

(अरे बघणाऱ्यांनो हे सौंदर्य पहा, हे गुपित नेमकं काय आहे ते समजून घ्या)

हाफिज जालंधरी पुढे लिहितात,
“ये पैकर-ए-तन्वीर,
ये कृष्ण की तस्वीर.”

(हा प्रकाशाचा साक्षात्कार आणि ही कृष्णाची प्रतिमा)

येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सामान्य मुस्लिमांमध्ये प्रेषित मुहम्मद हे प्रकाशाचे ‘दैदिप्यमान रूप’ मानले जातात. कृष्णासाठी हेच रूपक वापरून, हाफिज एक प्रकारे इस्लामिक विद्वानांच्या एका वर्गाच्या जुन्या समजुतीचा पुनरुच्चार करतो जो सांगतो की कृष्ण हा उपखंडातील लोकांसाठी पाठवलेला नीतिमान संदेष्टा होता. पुढे कवितेत याच विश्वासाचा पुनरुच्चार करतांना हाफिज म्हणतात की,

“ये नर है या नूर”
(हा माणूस आहे की केवळ प्रकाश)

सामान्य मुस्लिम समाजात असणारा एक समज म्हणजे प्रेषित मुहम्मद हे केवळ हाडा मांसापासून बनलेले एक सामान्य शरीर नव्हते तर तो एक तेजोमय प्रकाशाचा झोत होता कृष्णाची तुलना प्रेषित मुहम्मद यांच्याशी करण्याचा प्रयत्न या कवितेतून झाला आहे. या कवितेचा सर्वात महत्त्वाचा भाग येतो जेव्हा हाफिज कृष्णाला भारताचा राजा म्हणून गुलामगिरीच्या बंधनातून देशाला बाहेर काढण्यासाठी विनवतो यावरून कवी जालंधरी यांची कृष्णावरील श्रद्धा दिसून येते.

“सब अहले-खिदमत
हैं दर पे इज़्ज़त
ये राज दुलारे
बुज़दिल हुए सारे”

(सर्व वादग्रस्त लोक सन्मानाच्या दाराकडे जात आहेत. हे राजाचे लाडके लोक डरपोक झाले आहेत)

“आ जा मेरे काले
भारत के उजाले
दामन में छुपाले”

हाफीज, या ओळींमध्ये, एकीकडे ब्रिटिशांच्या हाताखाली पदे भूषवणाऱ्या भारतीयांना गुलामगिरीसाठी दोषी ठरवत असताना, तो कृष्णाला (येथे त्याला ‘भारत के काले’ म्हणून संबोधतो) परकीय राजवटीच्या अपमानापासून वाचवण्याची विनंती करतो.
या कवितेत, तो दुर्योधनाला पराभूत करण्यासाठी कृष्णाकडून त्याच्या अर्जुनाला सल्ला देण्याची गरज आहे असे सांगतो. अर्थात या कवितेत त्याच्यासाठी दुर्योधन हे ब्रिटिश सरकार असते. गरज असेल तेव्हाच हिंसेचा वापर करून वाईटाशी लढा देण्याच्या गीतेच्या शिकवणीवर त्यांचा अगाध विश्वास दिसून येतो.

कवितेच्या शेवटी, तो कृष्णासमोर देशाच्या स्थितीबद्दल विनवणी करतो आणि त्याला देश वाचवण्यास सांगतो.

“परियों में है गुलफ़ाम,
राधा के लिए शाम,
बलराम का भैया,
मथुरा का बसैया,
बिंद्रा में कन्हैया,
बन हो गए वीरान,
बर्बाद गुलिस्तां,
सखियाँ है परेशान,
जमना का किनारा,
सुनसान है सारा,
तूफान है खामोश,
मौजो में नहीं जोश,
लौ तुझसे लगी है,
हसरत ही यही है,
ए हिन्द के राजा,
एक बार फिर आजा,
दुख दर्द मिटा जा…”

येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की हाफिजला कृष्ण परत येण्याची अपेक्षा नक्कीच नव्हती परंतु त्याचा असा विश्वास होता की मुक्त आणि चांगल्या भारतासाठी लोकांनी कृष्णाच्या शिकवणींचे अनुसरण करणे आवश्यक आहे.

हाफीज कृष्णाच्या शिकवणींचा आदर करू शकतो आणि सार्वजनिकरित्या त्याची स्तुती करू शकतो, जरी तो त्याच्या काळातील सर्वात सनातनी मुस्लिम कवी होता हे उदाहरण आताचा काळ किती बदलला आहे हे दाखविते. त्याच्यासाठी, प्रेषित मुहम्मद किंवा इतर कोणत्याही कुराणातील पैगंबरांबद्दल लिहिण्यासारखेच कृष्णाबद्दल लिहिणे अगदी सामान्य होते. या धर्माभिमानी मुस्लिम कवीच्या कलेला दुसऱ्या धर्माचा द्वेष साहजिकच शिवलादेखील नाही असेच म्हणावे लागेल.

केवळ सांप्रदायिक दृष्टिकोनातून भारतीय तत्त्वज्ञानाकडे पाहण्याने या देशाचे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त नुकसान केले आहे. शेवटी आजच्या आषाढी आणि ईद-उल-अदाहला आपल्या समाजातून धार्मिक कट्टरता संपुष्टात यावी या इच्छेसह आणखी एक प्रसिद्ध उर्दू कवी मुहम्मद इक्बाल यांची एक कविता…

इक्बाल लिहितात,
“ये आया-इ-नौ, जेल से नाज़िल हुवी मुझ पर
गीता में है क़ुरान तो क़ुरान में गीता”

भाषांतर : आशय बबिता दिलीप येडगे

सौजन्य : शरजिल इमाम आणि साकिब सलीम

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here