केवळ सत्य बोलण्यासाठी मला ‘शहीद’ व्हायचे नाही

आपल्या पत्रकारितेसाठी जगभरात वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या परंतु करोडो भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून ज्यांच्या अटकेची मागणी होत आहे, ज्यांच्या ट्विटर आणि फेसबुक वॉलवर बलात्काराच्या आणि हत्येच्या हजारो धमक्या लिहिल्या जातात अशा भारतीय पत्रकार राणा अय्युब यांची सीएनएन या वृत्तसंस्थेच्या हरी श्रीनिवासन यांनी घेतलेली मुलाखत.

प्रश्न : भारतात पत्रकारिता करत असतांना दैनंदिन जीवनामध्ये कोणती आव्हाने तुमच्या समोर उभी आहेत?

राणा : खरं म्हणजे ज्या दिवशी माझ्या पत्रकारितेसाठी मला अमेरिकेतील नॅशनल प्रेस क्लब तर्फे देण्यात येणारा ‘जॉन अबूचान’ (John Aubuchon) पुरस्कार देण्यात आला त्याच दिवशी माझ्या देशाची राजधानी दिल्ली मधून मोहम्मद जुबेर (Mohammed Zubair) या पत्रकाराला केवळ बातम्यांची सत्यता तपासल्यामुळे अटक करण्यात आली होती. हा योगायोग होता की आणखीन काही हे मला माहित नाही, पण आम्ही सध्या भारतात अशा काळात जगत आहोत जिथे पत्रकारांना देशद्रोही समजले जात आहे. भारत हा आता एका लष्करी राजवटीमध्ये स्वतःला परावर्तित करू पाहतोय. मला असं वाटतं की, मी एका अन्यायी, उपद्रवी आणि अतिशय वेदनादायी देशात जगत आहे.

Rana Ayyub Receiving John Aubuchon award

संवैधानिक मूल्ये वाचविण्यासाठी सत्य बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या पत्रकारांना भारतात तुरुंगात टाकण्यात येत आहे. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मागील एका आठवड्यात माझ्या बलात्काराच्या आणि खुनाच्या हजारो धमक्या मला मिळाल्या आहेत. मला माहिती नाही माझं या देशातील भवितव्य नेमकं कसं असेल पण जरी या व्यवस्थेने माझ्या सत्य बोलण्यामुळे मला देशद्रोही ठरविले तरीही भारत ही माझी जन्मभूमी आहे, इथे माझ्या पूर्वजांनी आपले आयुष्य व्यतीत केले आहे आणि या देशातील लोकशाही मूल्ये वाचविण्यासाठी नेहमी सत्य बोलण्याचा निश्चय मी केलेला असल्याने मी हा देश सोडून जाणार नाही.

प्रश्न : आर्थिक गैरव्यवहार आणि करचोरी केल्याच्या आरोपाखाली दोनवेळा तुमचे खाते गोठविण्यात आले. भारताच्या अनेक राज्यात तुमच्यावर अब्रुनुकसानीचे खटले दाखल करण्यात आलेले आहेत. कोरोनाकाळात लोकांच्या मदतीसाठी तुम्ही उभ्या केलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप तुमच्यावर करण्यात आलाय? या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे?

राणा : मी अनेकवेळा माझ्यावर ज्या सरकारी संस्थांनी गुन्हा दाखल केला आहे तेथील अधिकाऱ्यांना ‘माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना सिद्ध करणारे पुरावे तुमच्याकडे आहेत का?‘ अशी विचारणा केली. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, सामान्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसणाऱ्या लोकांसाठी मी उभारलेल्या निधीचा मी अपहार केल्याचा आरोप लावण्यात आलाय, पण याची दुसरी बाजू अशी आहे की मी उभारलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब माझ्याकडे आहे. मी उभ्या केलेल्या निधीवर तब्बल 35% आयकर लावून यंत्रणांनी तो निधी वसूल केला आहे. तर अशा पद्धतीने कायदेशीर कर कापून घेतलेल्या पैश्यामध्येही मी अपहार केला आहे असा आरोप माझ्यावर करण्यात आलाय. मी एका लहान मुलांच्या रुग्णालयाला यापैकी काही निधी दिला तर त्यांना सरकारी यंत्रणेने हे पैसे मला परत करण्यासाठी धमकावले आणि त्या रुग्णालयाने ते पैसे परतदेखील केले. म्हणजे एकीकडे मी उभारलेला निधी मला तुम्ही वापरू देत नाही आणि दुसरीकडे माझ्यावर निधीचा अपहार केल्याचा आरोप लावणे हे सगळं अनाकलनिय आहे.

नुकताच माझ्याकडे माझ्या परदेशी व्यवहारांचे तपशील मागण्यात आलेले आहेत. मी टाईम या सुप्रसिद्ध नियतकालिकासोबत केलेला माझा वैयक्तिक करारदेखील माझ्याकडून मागवून घेण्यात आलाय. सध्या मी काम करत असलेल्या वॉशिंग्टन पोस्टसोबत केलेला करार देखील ते तपासत आहेत. यातून त्यांना बहुधा हे सिद्ध करायचे की परदेशी वृत्तसंस्थांसोबत काम करून मी मला परदेशातून मिळालेल्या पैश्यांचा वापर मी देशाला बदनाम करण्यासाठी, देशविघातक कारवायांसाठी वापरत आहे कदाचित मी देशद्रोही आहे असे चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझ्या बँकेतील खात्यांची सार्वजनिक मंचावर उघड चर्चा केली जाते. मी माझ्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत कष्टाने कामविलेल्या पैश्याला जणू काही मी गुन्हेगारीतूनच हा पैसा कमविला आहे असे बघितले जाते. मी आणि माझे कुटुंब एखादी मोफत सार्वजनिक मालमत्ता आहोत की काय असे मला आता वागवले जात आहे. मी लिहिलेली प्रत्येक ओळ, बोललेला प्रत्येक शब्द बदनाम करण्यात येतोय सरकारच्या एका इशाऱ्याची वाट पाहत हजारोंची गर्दी माझ्या नरडीचा घोट घेण्यासाठी आतूर झालेली आहे. अशा पद्धतीने मी सध्या भारतात पत्रकारिता करीत आहे. हे माझे वास्तव आहे.

प्रश्न : जगभरातील लोक जेंव्हा भारताकडे पाहतात तेंव्हा आम्हाला दिसतं की या महाकाय देशामध्ये तब्बल 140,000 नोंदणीकृत वृत्तप्रकाशन संस्था आहेत, 400 बातम्या देणाऱ्या वाहिन्या आहेत मग अशावेळी तुमच्या देशातील माध्यमे याविरोधात काहीच करत नाहीत? ती अजिबात प्रभावी नाहीयेत का?

राणा : जगभरातील देशांमध्ये पत्रकारितेला देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यावरून देशांची एक आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असण्याचा दावा करणाऱ्या भारताचा क्रमांक अनेक हुकूमशाही राष्ट्रांपेक्षा खालचा आहे. हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराची बातमी करण्यासाठी जाणाऱ्या सिद्दीक कप्पनला बेड्या ठोकण्यात आल्या. सिद्दीक केवळ त्या जागी पोहोचू पाहत होता जिथे एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला होता पण तिथे पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली आणि आता मागील तीन वर्षांपासून तो तुरुंगात आहे. तो तुरुंगात असतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला पण तरीही त्याच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी देखील त्याला जाऊ देण्यात आले नाही.

भारतातील अंदमानच्या जुबेर अहमद याला सरकारने कोरोनाकाळात केलेल्या चुकीच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात केलेल्या एका ट्विटमुळे अटक करण्यात आली. समाजमाध्यमावर काहीतरी लिहिल्याने अटक केल्या गेलेला जुबेर त्यानंतर नैराश्यात गेला आणि काही दिवसांपूर्वी म्हणजेच 8 जुलैला त्याने आत्महत्या केली आहे. पत्रकारितेतील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार विजेत्या जम्मू काश्मीरच्या पत्रकार सना इर्शाद मट्टो यांना विमानतळावर फ्रान्सला जाण्यापासून रोखण्यात आले. कारण त्या आपले काम फ्रान्समध्ये जाऊन मांडणार होत्या. काश्मीरी पत्रकारांना रात्री अपरात्री कधीही त्यांच्या घरांमधून अटक केली जाते, त्यांच्यावर कथित देशद्रोहाचे आरोप लावण्यात येतात हे असं सगळं सुरु आहे भारतात. देशातल्या पत्रकारितेची कर्तबगारी केवळ आता कागदावर उरली आहे. यामध्ये अजून एक बाब अशी की ज्या पत्रकारांना अटक केली जात आहे त्यापैकी बहुतांश पत्रकार हे मुस्लिम समुदायाचे आहेत. आता असे करून सध्याच्या सरकारला ‘हे सगळे पत्रकार देशद्रोही आहेत‘ अशी धारणा निर्माण करायची आहे का?

प्रश्न : तुम्ही म्हणता तसा जर भारतीय यंत्रणांकडून तुमच्यावर एवढा अन्याय होत असेल तर तुम्ही भारतीय सरकारला हे विचारण्याचा प्रयत्न केला नाही का की आत्ता ही कारवाई नेमकी का केली जातीय? आणि तुम्हालाच का लक्ष केले जात आहे?

राणा : मला असं वाटत मी 19 वर्षांची होते तेंव्हा मला गुजरातमध्ये जाऊन तेथील प्रश्नांवर पत्रकारिता करण्याची संधी मिळाली. तेंव्हासुन नरेंद्र मोदी सरकारच्या निशाण्यावर मला सतत ठेवण्यात आलेले आहे. मी गुजरात मध्ये जाऊन मुस्लिमांच्या झालेल्या नरसंहारामध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदींची भूमिका नेमकी काय होती हे तपासण्याचा प्रयत्न केला. मी धार्मिक कट्टरतेच्या विरोधात लिहीत आलेली आहे आणि मला अजूनही असे वाटते की 2002 च्या गुजरात दंगलीच्यावेळी नरेंद्र मोदी शांत होते. 1000 मुस्लिमांना मारले जात होते त्यावेळी मोदींनी काहीही केले नाही असे मला वाटते. मी स्वतः त्या मदत शिबिरांमध्ये गेलेली आहे जिथे समूहात बलात्काराला बळी पडलेल्या अनेक महिला, त्या महिलांचे कुटुंब राहत होते. मी त्या सगळ्या अनुभवांचे जतन केले आहे. खरंतर मी स्वतः मुंबईमध्ये घडलेल्या हिंदू मुस्लिम दंगली पहिल्या आहेत, जेंव्हा हजारोंचा जमाव मला आणि माझ्या बहिणीला बलात्कारासाठी उचलून घेऊन जाणार होता तेंव्हा वाटलेले भय झालेल्या वेदना मी अजूनही विसरू शकत नाही आणि म्हणून तो मानसिक धक्का कसा असतो हे समजू शकते.

मी तेंव्हापासून त्या वेदनांचे, अन्यायाचे सत्य वृत्तांकन करत आहे. 2014 ला जेंव्हा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळी मला अनेकांनी आता आपण ‘नरेंद्र मोदींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असा सल्ला दिला. पण मला असं वाटत की एखादा राजकीय नेता केवळ या देशाचा पंतप्रधान झाला म्हणून त्याने त्यापूर्वी केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि हे केवळ मी म्हणत नाहीये तर 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले की, ‘निष्पाप मुले आणि महिलांना जाळले जात होते तेंव्हा या आधुनिक निरोने या सगळ्या अत्याचाराकडे पाठ फिरवली होती‘ आणि एक पत्रकार म्हणून मोदींनी कसलाही आभास निर्माण केला तरीही मी त्या सगळ्या घटनांची साक्षीदार असल्याने त्या वेदना न विसरणे हे माझे कर्तव्य आहे आणि सत्य कधीही बदलत नाही.

मला आजही असे वाटते की नरेंद्र मोदींनी 2002 मध्ये गुजरातमध्ये जे केले ते आज या देशात ते पुन्हा घडवू पाहत आहेत. आजही या देशात धर्माच्या नावाखाली गंभीर अपराध घडत असताना नरेंद्र मोदी पूर्वीसारखेच शांत आहेत. आपण पाहिलं तर नरेंद्र मोदींना ट्विटर आणि फेसबुक सारख्या समाजमाध्यमांची विशेष आवड आहे पण मागील आठ वर्षांच्या काळामध्ये त्यांनी आपल्या देशातील लोकशाही टिकायला हवी, बहुजनवाद टिकायला हवा, भारतीय संघराज्याचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य टिकायला हवे यासाठी एकही ट्विट अथवा फेसबुक पोस्ट त्यांनी केलेली नाही.

Book Release In Kerala

प्रश्न : भारतातील पत्रकारितेचे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आणि भारताचे खालावलेले नामांकन सुधारविण्यासाठी भारताने नुकताच G-7 राष्ट्रांसोबत एक करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी एक समितीदेखील स्थापन केली आहे यावर तुम्हाला काय वाटते?

राणा : ज्या दिवशी नरेंद्र मोदींनी या करारावर स्वाक्षरी केली त्याचदिवशी जुबेर यांना अटक केली गेली. पत्रकारितेला दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्या पंतप्रधानांनी समिती स्थापन केली आहे त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील आठ वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि प्रभाव टिकवायचा असेल तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला हवी केवळ एकाच वृत्तसंस्थेला आधीच ठरविलेल्या प्रश्नांवर सात ते आठ मुलाखती दिल्याने काहीही होत नाही.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर 2014 मध्ये दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत टीका करणाऱ्या पत्रकारांना ‘बातम्यांचे व्यापारी’ म्हणून संबोधलं होतं त्यामुळे मी तरी याबाबतीत नरेंद्र मोदी यांच्याकडून फारशी काही चांगली अथवा वेगळी अपेक्षा करत नाही. समाजमाध्यमांचा विचार केला तर माझ्यासारख्या पत्रकारांसाठी भारतातील वाचकांपर्यंत माझे म्हणणे पोहोचविण्यासाठी ट्विटर अतिशय चांगले माध्यम आहे पण आता मोदी सरकारच्या कोरोनाकाळातील कामावर टीका करणारे अनेक ट्विट ट्विटरने काढून टाकले आहे कारण भारताच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार भारत सरकारने ट्विटरवर निर्बंध आणले आहेत. माझी शोकांतिका अशी आहे की माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमुळे भारतीय प्रकाशक आणि माध्यमे माझ्यासोबत काम करत नाहीत पण मोदींच्या प्रभावाखाली नसणारे अंतरराष्ट्रीय मंच मात्र माझे म्हणणे छापतात, जगभर प्रकाशित करतात.

प्रश्न : या सगळ्या परिस्थितीशी तुम्ही कशा लढत आहात? स्वतःला कसे सांभाळत आहात?

राणा : या सगळ्या परिस्थितीचा माझ्यावर प्रचंड परिणाम होतो आहे. मी कुठेही गेले, मी काहीही केलं तरीही माझ्यावर पळत ठेवण्यात येते आणि मी याच पाळतीच्या विरोधात आहे. मी अशा राज्याच्या विरोधात आहे जिथे त्याच राज्याचे रहिवासी असणाऱ्यांवर सतत पळत ठेवण्यात येते. मला लोक ‘धाडसी’ म्हणतात पण खरं सांगू मी धाडसी आहे असं मला अजिबात वाटत नाही, धाडस मला अजिबात परवडणारं नाही. मी केवळ सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहे हे सत्य कदाचित सहज पचणारं नसेलही पण सत्य बोलायलाच हवं हेही खरं.

प्रश्न : ‘पत्रकारांना धाडसी म्हणणे बंद करायला हवे कारण असे म्हणणे हे समजात काहीतरी संरचनात्मक बिघाड असल्याचे सांगत असते’ असे तुम्ही लिहिले होते. नेमकं यातून तुम्हाला काय म्हणायचं आहे?

राणा : मला असं वाटत की पत्रकारांना धाडसी म्हणून त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि त्यांच्याप्रती व्यक्त केला जाणारा द्वेष या गोष्टींना आपण अप्रत्यक्षरीत्या स्वीकारत आहोत. ‘सत्तेला सत्याच्या आधारे प्रश्न‘ विचारण्याचे आमचे मूलभूत काम केल्यामुळे कुणीतरी आम्हाला धाडसी म्हणणे चुकीचे आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे आम्ही केवळ साक्षिदार आहोत आणि असे साक्षीदार होण्याच्या अगदी सामान्य कामासाठी आम्हाला कुणीही ‘धाडसी’ म्हणू नये तशी वेळ येऊ नये असे मला वाटते. केवळ सत्य बोलण्यासाठी देशातल्या सिद्दीकी कप्पनला, मोहम्मद जुबेरला धाडसी होण्याची काय गरज आहे? आम्ही सत्य मांडण्याचे आमचे काम करत आहोत आणि आमच्या केलेल्या या कामासाठी आम्हाला एवढ्या त्रासातून जाण्याची काही गरज असायला हवी असं मला वाटत नाही. आजही तुरुंगात असणाऱ्या सिद्दीक कप्पनसारख्या माझ्या सहकाऱ्यांना मागील तीन वर्षांपासून त्यांच्या कुटुंबियांसोबत ईद साजरी करता आलेली नाही.

जेंव्हा तुम्ही मला धाडसी म्हणता तेंव्हा अक्षरशः माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही ती चालवत असता. “अरे ती धाडसी आहे, तिला बोलू दे” आपल्याला काय बोलायची गरज आहे असे प्रत्येकाला वाटत राहते. मी केवळ सत्य मांडले आणि या मार्गाची निवड केली म्हणून शहिद होण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. आता एक नवीन प्रकार सुरु झालाय माझे मित्र मला नेहमी सांगत असतात की ‘काहीदिवस तरी किमान तू शांत रहा, सामान्य रहा, काही ट्विट करू नको, काही लिहू नको.’ मला हे कळत नाही की जगातली सगळ्यात मोठी ‘लोक’शाही असण्याचा दावा करणाऱ्या देशामध्ये ‘शांत राहणे’ ही एकदम सामान्य गोष्ट कशी असू शकते. मला असं वाटत ‘असहमती दर्शविण्याची ताकद‘ किंवा ‘नकार देण्याचा हक्क‘ हे भारतीय लोकशाहीचे एक ठळक वैशिष्ट्य आहे ते तसेच असायला हवे.

मला माझ्यावर घाणेरड्या भाषेत टीका करणाऱ्यांना केवळ हेच सांगायचे आहे की माझे तुमच्याहीपेक्षा जास्त माझ्या देशावर प्रेम आहे. मला देशद्रोही समजणाऱ्या लोकांनी हे ध्यानात घायला हवे की रोज माझ्या हत्येच्या आणि बलात्काराच्या धमक्या, माझ्यावर यंत्रणेकडून केला जाणारा अन्याय होऊनसुद्धा मी अजूनही याच देशामध्ये राहण्याचा घेतलेला निर्णय माझे देशप्रेम सांगण्यासाठी पुरेसा आहे. भारतावर असणारे माझे प्रेम मला या देशातील नागरिकांना संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी बोलण्याची, लिहिण्याची प्रेरणा देत असते.

  • अनुवाद : आशय बबिता दिलीप येडगे

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here