‘जय भीम’ फेम न्यायाधीश के. चंद्रू यांची विशेष मुलाखत

महिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर आलेले 20 ऐतिहासिक निकाल आणि त्यावर न्यायाधीश चंद्रु यांनी लिहिलेले 'लिसन टू माय केस' हे ऐतिहासिक पुस्तक. एका समतावादी लेखकाचा माणुसकीने भरलेला जिवंत प्रवास

  • जोहान दीक्षा

मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. चंद्रु यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 96000 खटल्यांचे निकाल दिले. कोणत्याही भारतीय न्यायाधीशाने केलेला हा एक विक्रमच म्हणावा लागेल. चंद्रू यांनी दिलेली निकाल हे काही साधेसुधे निकाल नव्हते तर त्यांनी दिलेल्या अनेक मोठ्या ऐतिहासिक निकालांनी भारतीय समजावर दूरगामी परिणाम घडवून आणले. या निकालांमध्ये जातीचा विचार न करता सामाईक दफनभूमी घोषित करणे, मध्यान्ह भोजन केंद्रांमध्ये सामुदायिक आरक्षण, महिलांनी मंदिरात पुजारी बनणे, स्टेज नाटकांसाठी पोलिसांची परवानगी घेणे यांचा समावेश आहे. मयत व्यक्तीची जात न पाहता एक सामुदायिक दफनभूमी घोषित करणे, मध्यान्ह भोजन केंद्रांमध्ये आरक्षण देणे, मंदिरांमध्ये महिला पुजाऱ्यांची नियुक्ती करणे आणि नाटकांसाठी पोलिसांच्या परवानगीचे वितरण करणे अशा महत्वाच्या निर्णयांचा समावेश होता.

केवळ न्यायाधीश म्हणून दिलेल्या निकालांमधूनच त्यांची निष्पक्षता दिसून येत नाही तर त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून देखील त्यांनी नेहमी समतेचा पुरस्कार केला. न्यायालयामध्ये वकिलांनी मला ‘माय लॉर्ड‘ म्हणून संबोधू नये असे सांगितले होते, ते त्यांच्या न्यायालयात येण्याची घोषणा पट्टेवाल्याने करण्याच्या विरोधात ते होते, त्यांनी सुरक्षारक्षक घेण्यासही नकार दिला, न्यायाधीश म्हणून रुजू झालेल्या पहिल्याच दिवशी त्यांनी त्यांच्याकडील संपत्तीची घोषणा केली आणि न्यायाधीश म्हणून कामकाजाच्या शेवटच्या दिवशी देखील त्यांच्याकडील संपत्तीची माहिती सार्वजनिक केली होती एवढेच नाही तर न्यायाधीश चंद्रु ज्यादिवशी सेवानिवृत्त झाले त्याच दिवशी त्यांना दिलेल्या अधिकृत वाहनाचा त्यांनी त्याग केला आणि लोकल ट्रेनने ते घरी परतले. निवृत्तीनंतर त्यांनी लोकांसाठी लोकांच्या प्रश्नावर वकिली केली, कायद्यावर त्यांनी वेगवेगळी पुस्तके आणि स्तंभ लिहिले आहेत. त्यांचे सगळ्यात अलीकडचे पुस्तक म्हणजे ‘लिसन टू माय केस‘ ज्यामध्ये त्यांनी न्यायासाठी न्यायालयामध्ये दाद मागणाऱ्या 20 महिलांची गोष्ट सांगितली आहे.

काय आहे त्यांचे ‘लिसन टू माय केस?’

न्यायाधीश चंद्रु यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये तामिळनाडूच्या अशा 20 महिलांची गोष्ट आहे ज्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागितली. न्याय मिळविण्याचा त्यांचा प्रवास हा प्रचंड प्रेरणा देणारा आहे. आता जरी अधिक स्त्रिया कायदा एक व्यवसाय म्हणून स्वीकारत असल्या तरीही सामान्य माणसासाठी आणि विशेषत: महिलांसाठी, न्यायव्यवस्थेचे दरवाजे नुसते नकोसेच नाहीत तर अनेकदा ते त्यांना धमकावणारेही आहेत. या पुस्तकात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या प्रकरणांमध्ये लहान शहरांतील, उपेक्षित समाजातील आणि कलहाच्या अनोख्या कथा असलेल्या महिलांचा समावेश आहे.

या पुस्तकातील प्रकरणे देखील अतिशय हुशारीने वर्गीकृत केलेली आहेत ज्यामध्ये एखाद्या नुकसानीनंतर महिलांचे आयुष्य, माता आणि मातृत्व, लैंगिक अत्याचार, धर्माचे पालन करण्याचा अधिकार आणि महिलांची धार्मिकता, जगण्याचा अधिकार आणि निवड आणि आत्मसन्मान मिळविण्यासाठी महिलांनी केलेला वैयक्तिक प्रवास अशा विषयांच्या वर्गीकरणाचा समावेश आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि सामाजिक स्तरातील महिलांकडून शिकण्याची त्यांचा संघर्ष जाणून घेण्याची संधी या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकाला मिळते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, पुरस्कार विजेत्या लेखिका गीता हरिहरन लिहितात की, हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की कायदा हा स्थिर नसतो आणि ज्या ज्या वेळी कायदा पुन्हा एकदा वाचला जातो, कायद्याचा अर्थ लावला जातो त्या त्या वेळी कायदा न्यायासाठी नवे रूप घेऊन जिवंत होत असतो पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा कायदा एक ‘आशा’ पल्लवित करतो. या पुस्तकाच्या शेवटच्या पानानंतर एक गूढ आशा मनामध्ये निर्माण झालेली असते. कारण या पुस्तकात सांगितल्या प्रमाणे जर या महिला न्याय मिळवू शकतात तर नक्कीच कायदा अजूनही एवढा आवाक्याबाहेर गेलेला नाही असेच म्हणता येईल आणि यामुळेच हे पुस्तक प्रत्येक तरुण महिलेने वाचायला हवे, कायद्याच्या विद्यार्थ्यांनी तर ते वाचायलाच हवे असे आहे.

न्यायाधीश चंद्रु यांना एवढे सुंदर पुस्तक लिहिण्यामागच्या त्यांच्या प्रेरणेबाबत आम्ही विचारले. या पुस्तकासाठी खटल्यांची निवड नेमकी कशी केली हेदेखील आम्ही त्यांना विचारले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे महिलांसाठी न्यायालय कसे अधिकाधिक खुले करता येईल यासाठीदेखील आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे.

हे पुस्तक लिहिण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टीने आणि कधी तुम्हाला प्रेरित केले?

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर महिलांसाठी का करणाऱ्या एका पाक्षिकाने माझ्याकडे एका महिलेच्या खटल्यावर मी दिलेल्या निकालासंदर्भात एक सविस्तर लेख लिहिण्याची विनंती केली. मी त्यांना सांगितले की मी माझ्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या महिलांशी निगडित खटले हाताळले आहेत. मग त्यांनी मला अशा खटल्यांची एक मालिकाच लिहिण्यासाठी सांगितले आणि म्हणून मग मी हाताळलेल्या महिलांशी निगडित खटल्यांवर मी एक मालिकाच लिहून काढली माझ्या या लेखमालेला तामिळमध्ये ‘कायद्यासोबत युद्ध पुकारणे‘ या अर्थाचे शीर्षक देण्यात आले.

मी त्यांना असेही सांगितले होते की मी त्या केसेसचा निकाल देऊन बरीच वर्षे झाली आहेत आणि त्या महिलांशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या तर बरे होईल मग या महिलांच्या बाजूने न्यायालयात उभ्या राहिलेल्या वकिलांचा शोध घेतला गेला त्या सगळ्या महिलांशी संपर्क केला गेला हे करताना अनेक अडचणी आल्या पण आम्ही ते केले. या पाक्षिकाच्या स्थानिक पत्रकारांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या या सगळ्या महिलांशी संपर्क केला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्यांची छायाचित्रेही काढली माझ्या पुस्तकामध्ये या सगळ्या महिलांच्या प्रतिक्रियांचा समावेश आहे. मी लिहिलेली ती लेखमाला यशस्वी ठरली त्यावर त्या पाक्षिकाने एक पुस्तकही छापले पण माझ्या अनेक मित्रांनी अशा प्रकारचे पुस्तक इंग्रजीतही यायला हवे असे सुचवले आणि माझी मैत्रीण गीता हरिहरनने केवळ हे पुस्तक लेफ्टवर्ड या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित करण्यातच मदत केली नाही तर या पुस्तकासाठी एक सुंदर प्रस्तावना देखील लिहिली.

पुस्तकासाठी खटल्यांची निवड नेमकी कशी केली?

मी दिलेले अनेक निर्णय कायद्याच्या जर्नल्समध्ये नोंदवले गेले नव्हते. सुदैवाने माझ्या निकालांच्या प्रती माझ्याकडे उपलब्ध होत्या आणि लेखमालेसाठी त्या सगळ्या प्रती मी पुन्हा संकलित केल्या. खटल्यांची निवड करताना मी गरीब महिलांचे खटले आणि काही असामान्य खटले अशी परिमाण मी निवडीसाठी ठेवलेली होती. त्याचबरोबर एकाच प्रकारचे खटले पुन्हा पुन्हा येणार नाहीत याचीदेखील मी काळजी घेतली. पुस्तकात आलेले खटले हे त्या समस्येचे प्रातिनिधिक वर्णन करतात. प्रत्येक खटला हा वेगवेगळ्या लैंगिक समस्या मांडणारा आणि विषय हाताळणारा असा आहे.

कायद्याचे विद्यार्थी म्हणून किंवा तुमच्या कारकिर्दीत तुम्ही साक्षीदार झालेला पहिला खटला कोणता होता जो एखाद्या महिलेने दाखल केला असेल आणि ज्याने तुमच्या मनावर छाप सोडली असेल?

विद्यार्थीदशेत मी राष्ट्रीय महिला लोकशाही आयोगासोबत काम करायचो, मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांचा मी सदस्य होतो आणि राजकीयदृष्ट्याही तितकाच सक्रिय होतो. दक्षिण अर्कोट जिल्ह्यातील नागम्मलचे प्रकरण मी कधी विसरू शकत नाही. स्थानिक पातळीवर अतिशय शक्तिशाली असणाऱ्या व्यक्तींकडून तिच्या कुटुंबाचा छळ करण्यात आला होता त्याविरोधात पोलिसांकडे गेल्यावर तिला अजून भयावह अनुभव आलेला होता. नागम्मलचे हे सगळे प्रकरण आणीबाणीच्या काळात घडले होते आणि प्रत्येक स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांकडे तिने याबाबत मागितली होती. एक अशिक्षित स्त्री कोणत्याही पाठिंब्याशिवाय सर्वोच्च अधिकाऱ्यांकडे याचिका करू शकते ही एक अत्यंत वेगळी आणि धाडसी गोष्ट होती. एवढेच नाही तर नागम्मलने न्यायासाठी तिने दिल्लीपर्यंत प्रवास करून तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंची भेट घेतल्याचेही सांगितले.

तिचे प्रकरण केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आणि निवृत्त न्यायमूर्ती एम अनंतनारायणन यांच्या अध्यक्षतेखालील आणीबाणी अतिरिक्त चौकशी प्राधिकरणासमोर आले. मला न्यायालयात तिच्यावतीने हजर राहण्याची संधी मिळाली. आयोगाने काही आर्थिक नुकसानभरपाई आणि पोलिसांवर कारवाईची शिफारस केली असली तरी नंतर उच्च न्यायालयाने पोलिसांविरुद्धची कारवाई मात्र नंतर रद्द केली.

नागम्मल अशा केसेस लढू शकेल ही बाबच मुळात अविश्वसनीय अशी होती. खिशात रुपयाही नसताना तिने न्यायासाठी दिल्लीपर्यंतचा प्रवास केला. बरेच दिवस तिने जेवणही केले नाही न्यायालयात जाताना ती दोन पिशव्या सोबत घेऊन जायची एका पिशवीत तिने न्यायालयामध्ये न्यायासाठी दाखल केलेल्या अर्जांच्या प्रती असत तर अजून एक कापडी पिवळी पिशवी मात्र ती कुणालाही दाखवत नसे. तिची ऊर्जा आणि पलटवार करण्याच्या तिच्या सामर्थ्यामुळे आजही मला नागम्मल सारख्या महिला आश्चर्यचकित करतात. तिच्यामुळेच कोणतीही महिला अन्यायाविरोधात आवाज उठवू शकते यावर माझा विश्वास बसला.

या पुस्तकातला कोणता खटला तुमच्या आवडीचा आहे?

या पुस्तकातील प्रत्येक खटला वेगेवगेळ्या अर्थांनी माझ्या आवडीचा आणि तेवढाच महत्वाचा देखील आहे. तरीही मी म्हणू शकतो, तामिळरासीचे प्रकरण अनोखे होते कारण तिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा आरोप करून सेवेतून काढून टाकण्यात आले होते. सरकारची भूमिका खोटी ठरवण्यासाठी तिला तिच्या मानसिक आरोग्याची स्थिती निश्चित करण्यासाठी चाचणी घ्यावी लागेल हे पटवून देण्यात मला थोडा वेळ लागला. तिने सुरुवातीला नकार दिला असला तरी, मन वळवल्यानंतर तिला मदुराईच्या शासकीय राजाजी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तज्ञ मानसोपचार तज्ज्ञांनी तिची तपासणी केली.

या खटल्यातील विजयाची फळे उपभोगण्यासाठी तीजगू शकली नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट होती. परंतु असे असले तरी तिच्या केसमुळे न्यायालयाला असे मांडणे शक्य झाले की मानसिक अपंगत्व हे देखील एक अपंगत्व आहे जे अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग) कायद्याच्या तरतुदींद्वारे संरक्षित आहे आणि सेवेत चालू ठेवण्याचा अधिकार आहे त्यामुळे असे अपंगत्व असूनही आणि हा कायदा सरकारी सेवेलाही लागू होईल.

मला वाटले की या पुस्तकात एका पारलिंगी महिलेची कथा समाविष्ट करणे तुमच्यासाठी उत्कृष्ट आणि सर्वसमावेशक आहे. तथापि, तुम्ही दिलेल्या एका निर्णयामध्ये मध्ये पारलिंगी महिलेला ‘तो’ असे संबोधण्यात आले होते. हे पुस्तक वाचणाऱ्या परावर्तित स्त्रिया स्वीकारतील असे तुम्हाला वाटते का?

एका पारलिंगी व्यक्तीच्या लिंगाचे वर्णन करण्यासाठी आपल्या भाषेमध्ये फार कमी शब्दसाठा आहे. आता आपण त्यांना ‘तृतीयपंथी’ म्हणून संबोधत असलो तरीही याबाबतीत आपल्या भाषेला समर्पक शब्दांची गरज आहे. या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्तीला ‘पांडियन’ म्हणून ओळखले जायचे आणि तिच्या बहिणीने दाखल केलेल्या खटल्यात वेळोवेळी तिचा उल्लेख ‘लहान भाऊ’ असा केलेला होता. त्यामुळे अनावधानाने माझ्याकडून त्यांचा उल्लेख ‘तो’ असा झाला त्यामागे माझा कसलाही हेतू नव्हता पण कोणत्याही परिस्थितीत, हा खटला केवळ पोलिसांच्या हातात तृतीयपंथीयांची असुरक्षितता आणि गणवेशधारी सेवेतील कर्मचार्‍यांकडून त्यांना कोणत्या प्रकारचे क्रूर वर्तन सहन करावे लागू शकते हेच दर्शवते.

आज तरुणी प्रिया रमानी सारख्या केसेसमुळे त्रस्त आहेत. पण या पुस्तकात छोट्या शहरातील महिला न्यायालयात जाऊन न्यायासाठी लढताना दिसतात, हे जाणूनबुजून केले होते का?

मथुरा नावाच्या महाराष्ट्रातील आदिवासी महिलेवर झालेल्या बलात्काराचा खटला सर्वोच्च न्यायालयासमोर आला आणि सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार करणाऱ्याला असंबद्ध कारणास्तव धक्कादायकरित्या निर्दोष मुक्त केले, तेव्हा भारतभर महिला संघटनांनी बलात्काराच्या कायद्यात बदल करण्यासाठी निषेध केला होता. त्यावेळी, वक्ते आणि लेखकांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आणि प्रश्न केला की नंदिनी सत्पथी आणि मेनका गांधींनी दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला असता तर न्यायालयाने हाच निर्णय दिला असता का? त्यामुळे मी ठरवले की, सामान्य घरातील स्त्रिया कोर्टात गेल्यावरही न्यायालये संवेदनशील असतील आणि त्यांच्या खटल्यांचीही सुनावणी होऊन त्यांच्या बाजूने निकाल दिला जाईल. त्यामुळे मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या सामान्य घरातील महिलांच्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.

माझ्या तामिळ पुस्तकामध्ये मदुराई नगरपालिकेत माळीकाम करणाऱ्या एका सामान्य महिलेच्या खटल्याचा समावेश आहे जिचे नाव असन बानू असे होते. अशा व्यक्तींना कोणत्याही महागड्या खटल्याचा भाग होता येत नाही आणि म्हणून त्याच वेळी मद्रास उच्च न्यायालयाच्या नव्याने स्थापन झालेल्या मदुराई खंडपीठाने कामकाज सुरू केले. गंमत अशी की आसन बानूला तिच्या निवासस्थानातून बाहेर काढल्याबद्दल कोर्टात जाण्यासाठी आरोपपत्र दाखल करण्यात आले. म्हणून मी माझ्या निकालात खालील निष्कर्ष नोंदवले :-

मदुराई येथील या खंडपीठाच्या घटनेने एका गरीब कमी पगाराच्या मजदूरलाही न्याय मागण्यासाठी दार ठोठावण्याची संधी दिली आहे, हेही न्यायालयाने नोंदवले आहे.

या पुस्तकात यशस्वी प्रकरणे आणि काही हृदयद्रावक कथा यांचे मिश्रण आहे. आज महिलांना न्याय मिळणे किती सोपे किंवा अवघड आहे?

त्या बाबतीत, सामान्य माणसांना न्यायालयात प्रवेश मिळवणे पूर्वीइतकेच अवघड आहे. महिला याचिकाकर्त्यांसाठी हे प्रमाण अधिक मोठे आहे. तथापि, महिला संघटनांच्या सततच्या मोहिमेद्वारे कायदेशीर सहाय्य सेवा सुरू करणे आणि त्यांच्या हक्कांबद्दल महिलांमध्ये वाढणारी जाणीव यामुळे या पैलूत काही बदल घडून आले आहेत. आज अनेक कनिष्ठ न्यायालयांमध्ये महिला न्यायाधीश आहेत त्याचबरोबर न्यायालयामध्ये महिला वकिलांची देखील संख्या वाढलेली असली तरीही याबाबत अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.

आपण न्यायालयांना महिलांसाठी अधिक सोयीची जागा कशी बनवू शकतो?

लिंग संवेदीकरण केवळ न्यायालयात करणे गरजेचे नाही समाजात एकंदरीत प्रयत्न व्हायला हवेत. परंतु न्यायव्यवस्थेला संवेदनशील बनवणे आणि कर्तव्यदक्ष बारद्वारे प्रयत्न करणे आणि कायद्याच्या शाळांमधून अध्यापनशास्त्रीय कार्यक्रम सुरू केल्याने महिलांना त्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात जाण्याची अधिक संधी मिळेल.

या पुस्तकाचा आपल्या समाजावर काय परिणाम होईल अशी तुम्हाला आशा आहे?

त्याचा समाजावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. हे पुस्तक केवळ लिंग समस्या हाताळताना न्यायाधीश म्हणून माझ्या अनुभवाचे वर्णन आहे आणि हे सिद्ध करू शकते की संवेदनशील न्यायव्यवस्था स्त्रियांच्या कारणासाठी किमान दिलासा देऊ शकते. परंतु ज्या स्त्रियांच्या केसेसची चर्चा पुस्तकात केली आहे, त्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल झाला आहे आणि त्या त्यांच्या अनुभवाची कहाणी त्यांच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्यापैकी काहींना माझा पत्ता शोधण्यातही यश आले आहे आणि ते त्यांचे कृतज्ञता दर्शविणारे संदेश पाठवत आहेत आणि माझ्या ऑर्डरमुळे त्यांना किती फायदा झाला हे मला सांगत असतात.

अनुवाद : आशय बबिता दिलीप येडगे

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here