“कृपया माझ्या पत्रकार वडिलांना सोडा”

UAPA अंतर्गत मागील दोन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या सिद्दीक कप्पन यांच्या नऊ वर्षांच्या मुलीची भाषणातून विनंती

  • आशय बबिता दिलीप येडगे

स्वातंत्र्यदिनादिवशी नऊ वर्षांच्या एका मुलीने केलेले भाषण सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजत आहे. पत्रकार सिद्दिक कप्पन यांची मुलगी मेहनाज कप्पन हिने 15 ऑगस्टला केलेला भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. केरळचे पत्रकार सिद्दिक कप्पन यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. 15 ऑगस्टला नऊ वर्षांच्या मेहनाजने तिच्या भाषणातून 2020 पासून अटकेत असलेल्या तिच्या वडिलांची आणि स्वातंत्र्य हिरावलेल्या तशाच इतर कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे.

सिद्दीक कप्पन यांना तीन मुले आहेत त्यापैकी मेहनाज ही सगळ्यात लहान आहे. मेहनाज भाषणातून आपले म्हणणे मांडताना म्हणाली की, “प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असणारे स्वातंत्र्य हिरावून माझ्या वडिलांसारख्या डझनभर माणसांना एका अंधाऱ्या खोलीत ढकलून देण्यात आले आहे. भारत आपल्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षात प्रवेश करत असताना नागरिकांचे नागरी हक्क त्यांना दिले जाणे अत्यंत गरजेचे आहे.

केरळमधल्या जीएलपी शाळेची प्रमुख विद्यार्थिनी असणाऱ्या मेहनाजने ‘भारत माता की जय” म्हणूनच आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्याचबरोबर प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याने किंवा तिने काय खावे, काय बोलावे आणि कोणत्या धर्माचा स्वीकार करावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य असल्याचे ती म्हणाली आणि जे लोक ‘हा देश सोडायला सांगतात‘ त्यांचा विरोध करण्याचा देखील प्रत्येक भारतीय माणसाचा अधिकार असल्याचा उल्लेख तिने केला. मेहनाजने आपल्या भाषणात सांगितले की, “15 ऑगस्ट 1947 ला मोठ्या कष्टाने आपण मिळवलेल्या आपल्या देशाच्या प्रतिष्ठेशी कसलीही तडजोड होता कामा नये. जात आणि धर्मावरून जागोजागी उफाळणाऱ्या हिंसेमधून आपल्याला नेहमी समाजाच्या अस्वस्थतेची कल्पना येऊ शकते. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन धर्माच्या नावावर उफाळणाऱ्या या हिंसेला प्रतिबंध घातला पाहिजे.

आपल्या भाषणाच्या शेवटी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना स्मरून मेहनाज कप्पन म्हणाली की, “आपल्याला अजूनही भारताला नवीन उंचीवर घेऊन जायचे आहे आणि विभाजन आणि मतभेदाशिवाय एक चांगले भविष्य घडवायचे आहे.

हाथरस बलात्कार प्रकरणानंतर त्या बलात्काराची बातमी करण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी UAPA अंतर्गत देशद्रोहाचा आरोप लावून पत्रकार सिद्दीक कप्पन यांना अटक केली होती. ऑक्टोबर 2020 पासून मेहनाज कप्पनचे वडील सिद्दीक कप्पन उत्तर प्रदेशच्या तुरुंगात आहेत. सिद्दिक कप्पन जामिनासाठी केलेल्या अनेक अर्जांना न्यायालयाने फेटाळून लावले आहे. असे असले तरी 90 वर्षांच्या आजारी आईला भेटण्यासाठी मात्र सर्वोच्च न्यायालयाने सिद्दीक कप्पन यांना दिवसांसाठी केरळला जाण्याची परवानगी दिलेली होती.

मेहनाज कप्पनने आपल्या भाषणातून वडिलांचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या सुटकेचीही मागणी केली आहे. देशातील नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय याकडे लहानग्या मेहनाजने अप्रत्यक्षरीत्या आपल्या भाषणातून लक्ष वेधले. मेहनाज कप्पनने स्वातंत्र्यदिनी आपल्या पत्रकार बापाच्या सुटकेसाठी केलेले हे आर्जव ऐकण्याजोगे आहे.

मेहनाज कप्पनचे भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा :

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here