साई पल्लवीचं खरचं चुकलं…?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने नवा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.

टीम बाईमाणूस / 20 जून 2022

फिल्म इंडस्ट्रीमधल्या सौंदर्याच्या तथाकथित संकल्पनांना धुडकावून लावून आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अव्वल स्थान मिळवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी (Sai Pallavi). आपल्या सडेतोड भूमिकेमुळे आणि स्वत:च्या नियमांवर-शर्थींवर जगणारी साई पल्लवी याच कारणांमुळे कायम चर्चेत असते. आणि आताही गेल्या 48 तासांपासून साई पल्लवीने तिच्या एका विधानामुळे सबंध सोशल मीडियाला कामाला लावले आहे. ‘विराट पर्वम’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान साई पल्लवीने एक वादग्रस्त विधान केले आणि सबंध देशभर त्याचे पडसाद उमटले.

साई पल्लवीचे अगोदरचे स्टेटमेंट

साई म्हणते, ”द काश्मीर फाईल्स” या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.”

साईच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल (Troll) करण्यात आलं आणि वादाला तोंड फुटलं. हा सगळा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी साई पल्लवीने आपल्या वक्तव्यासंदर्भात पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर स्पष्टीकरण दिलं आणि यावेळी ती म्हणाली…

साई पल्लवीचे नंतरचे स्पष्टीकरण

“आज पहिल्यांदाच मी एखाद्या विषयावर स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्याशी संवाद साधत आहे. आज पहिल्यांदाच मी दोनवेळा विचार करून माझं म्हणणं मांडत आहे. कारण माझ्या वक्तव्याचा पुन्हा विपर्यास करण्यात येऊ नये, याची भीती माझ्या मनात आहे. त्यामुळे माझं म्हणणं लांबलचक वाटत असल्यास मला माफ करावं.

नुकतेच मला एका मुलाखतीत मी उजव्या विचारांची आहे की डाव्या विचारांची आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मी तटस्थ आहे, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. कोणतेही विचार स्वीकारण्याआधी आपण एक चांगला माणूस असणं गरजेचं आहे, असं मी त्यावेळी म्हणाले होते. पुढे मुलाखतीत सविस्तर बोलत असताना मी दोन संदर्भ दिले. या दोन गोष्टींचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला होता.

खरं तर, काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर मला चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी बोलण्याची संधी मिळाली होती. तीन महिन्यांपूर्वी हा चित्रपट पाहत असताना त्यांची ती दशा पाहून मी विचलित झाले होते. या नरसंहाराच्या घटनेचा परिणाम त्यांच्या पुढच्या पीढ्यांवर झाला आहे, त्यांच्या वेदनांची मला कल्पना आहे. तसंच त्यावेळी मी कोव्हिड (Covid-19) काळात झालेल्या मॉब लिंचिंगच्या (Mob Lynching) घटनांचाही उल्लेख केला होता. ते व्हीडिओ पाहूनही मला धक्का बसला होता.

हिंसा मग ती कोणत्याही स्वरुपात असो, ती चुकीची आहे असं मला वाटतं. कोणत्याही धर्माच्या नावे होणारी हिंसा ही चुकीचीच आहे, इतकंच मला म्हणायचं होतं. पण नंतर काहीजण मॉब लिंचिंगचं ऑनलाईन समर्थन करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. मला वाटतं, कुणाचाही जीव घेण्याचा अधिकार आपल्या कुणालाच नाही. वैद्यकीय पदवीधर असल्याने सगळे जीव समान आहेत, सगळेच जीव महत्त्वाचे आहेत, हे मला चांगलंच माहिती आहे.

असा दिवस येऊ नये की एखादा जीव जन्माला आला, पण त्याला त्याच्या ओळखीबाबत भीती वाटावी, अशी मी प्रार्थना करते. 14 वर्षांच्या माझ्या शालेय जीवनात मी सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझं माझ्या देशावर प्रेम आहे, ही प्रतिज्ञा रोज म्हणायचे. ही प्रतिज्ञा अजूनही माझ्या मनात खोलवर घर करून आहे. आपण शाळकरी मुलं असताना कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक किंवा जातीय भेदभाव करायचो नाही.

म्हणून मी काहीही बोलत असताना अतिशय तटस्थपणे बोलत असते. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याचं पाहून मला धक्का बसला. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, वेबसाईट यांनी पूर्ण मुलाखत न पाहता माझ्या बोलण्याचा विशिष्ट संपादित भाग काढून त्यावर टीका केली. यामुळे माझ्या वक्तव्याचा मूळ अर्थ निघून गेला.
यादरम्यान, काही लोक माझ्यासोबत ठामपणे उभे होते. त्यांचे मी आभार मानते. मी काय चुकीचं केलं असा विचार मी करत असताना हे लोक माझ्यासोबत असल्याचं पाहून मला बरं वाटलं. मी नेमकी काय आहे, हे त्यांना माहिती आहे, हे पाहून मला अभिमान वाटला.
धन्यवाद. सर्वांना प्रेम.”

‘नो मेकअप लुक’ साठी साई लोकप्रिय

साईने प्रेमम या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटातून मिळाली. पण अभिनेत्री होण्याचं स्वप्न तिनं कधी पाहिलं नव्हतं. तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं होतं. २०१४ मध्ये कॉलेजमध्ये असताना तिला प्रेमम चित्रपटाची ऑफर मिळाली होती. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की साई तिच्या चित्रपटांमध्ये मेकअपशिवाय दिसते. याच कारणामुळे साई ही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. चित्रपटांमध्ये कॅमेऱ्यासाठी आवश्यक तितकाच मेकअप ती करते. अभिनेत्री साई पल्लवी हिने तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमात प्रामुख्याने काम केले आहे. पल्लवी हिने गेल्याच महिन्यात ९ मे रोजी तिचा तिसावा वाढदिवस साजरा केला. एवढ्या कमी वयात तिने तगडी फॅन फॉलोइंग मिळवली आहे. तिला प्रेमम आणि फिदा या सिनेमासाठी विविध पुरस्कार देखील मिळाले आहे. यामध्ये फिल्मफेअर पुरस्काराचा देखील समावेश आहे. साई पल्लवी हिने ‘मलर टीचर’ या तिच्या ‘प्रेमम’ सिनेमातील भूमिकेतून ती चाहत्यांच्या आवडीची अभिनेत्री बनली होती. यानंतर तिने ‘काली’, ‘फिदा’, ‘मारी २’ आणि ‘लव्ह स्टोरी’ असे अनेक जबरदस्त चित्रपट केले.

कोट्यवधींच्या जाहिरातींना धुडकावले

एकीकडे आपण पाहतोय मोठमोठे सुपरस्टार्स तंबाखूच्या जाहिराती करतात. तिकडे साई मात्र फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करायला ही नकार देते. क्रीम गोरं करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरात ती नाकारते. साईचं म्हणणं आहे की, “मला काॅस्मेटिक्स आवडत नाहीत. लोकांना संभ्रमित करणाऱ्या गोष्टी मी प्रमोट करणार नाही. जे नैसर्गिक आहे, तेच खरं आहे.”

साई पल्लवीला एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी विचारणा करण्यात आली होती. या जाहिरातीसाठी तिला तब्बल २ कोटी रुपयांचं मानधनही मिळणार होतं. मात्र साई पल्लवीने एवढ्या कोट्यावधी रुपयांचं मानधन धुडकावून लावत ही जाहिरात नाकारली होती. तिच्या म्हणण्यानुसार, सुंदर दिसण्यासाठी ती कधीही मेकअपचा वापर करत नाही आणि लोकांना गोंधळात टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा तिला प्रचार करायचा नाही.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here