या बाजारात मनासारखे नवरे मिळतात

टीम बाईमाणूस / 30 जून 2022

किराणा बाजार, कपड्यांचा बाजार, गुरुवारचा बाजार, भाज्यांचा बाजार इतकेच नव्हे तर गाढवांचा बाजार असे अनेक बाजार आपण कधीनाकधी ऐकले, पाहिले आणि अनुभवलेही. मात्र नवऱ्यांचा बाजार…? हे कसं शक्य आहे? असा कुठला बाजार असतो का, असे तुम्ही म्हणाल परंतू बिहारमध्ये नवऱ्यांचा बाजार भरतो आणि तोही नेमका आजपासून पुढच्या नऊ दिवसांपर्यंत…

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात हा नवरदेवांचा बाजार भरतो. येथे सौराठ सभा म्हणजेच नवरदेवांचा बाजार 22 बिघा जमिनीवर 9 दिवसांपर्यंत भरतो. स्थानिक याला सभागाछी नावानेही ओळखतात. या यात्रेत आपल्या लाडक्या लेकीसाठी वडील सुयोग्य वराची निवड करण्यासाठी येतात. वराची निवड करून त्याला सोबत नेले जाते आणि लगेच लग्न लावून दिले जाते. एवढेच नाही, येथे नवरदेवाच्या योग्यतेनुसार सौदेबाजीही सर्रास चालते.

9 दिवसांच्या या यात्रेत रजिस्ट्रेशनची महत्त्वाचे असते. जे स्थळ पसंत पडते, त्याला रजिस्ट्रेशन करणारेच मान्यता देतात. या पुरातन काळापासून चालत आलेल्या नोंदणी पद्धतीमध्ये वडिलांच्या आणि आजोळाच्या 9 पिढ्यांचे संबंध पाहिले जातात. यात कोणत्याही प्रकारचे संबंध आढळल्यास लग्नाला परवानगी मिळत नाही. म्हणजेच ब्लड रिलेशनमध्ये लग्न होत तर नाही ना हे पाहिले जाते. नोंदणीकार सांगतात की, ही परंपरा 700 वर्षांपासून सुरू झाली. सन 1971 मध्ये येथे तब्बल 1.5 लाख लोक आले होते. सध्याच्या काळात येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. ते वैज्ञानिक कारणही देतात की, वेगळ्या ब्लड ग्रुपमध्ये लग्न केल्याने जन्मणारे अपत्य सुंदर अन् सुदृढ निघते.

लग्नाबद्दल वेगवेगळ्या समाजांमध्ये भिन्न-भिन्न चालीरीत आहेत. परंतु नवरदेवाची विक्री होताना पाहिली नसेल. येथील स्थानिकांच्या मते, बहुतांश जुन्या प्रथा-रूढी संपल्या आहेत. हुंड्याची प्रथा नष्ट करण्यासाठी तत्कालीन राजा हरिसिंह देव यांनी या यात्रेची सुरुवात केली होती. परंतु आता परिस्थिती उलट आहे. येथे वधुपक्षाला वराच्या योग्यतेनुसार निर्धारित रक्कम द्यावी लागते. यामुळेच याचे महत्त्व कमी झाले आहे. तथापि, बिहार सरकारने हुंडा प्रथेविरुद्ध कडक पावले उचलली आहेत.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here