क्षमा बिंदू आणि सोलोगॅमीच्या निमित्ताने…

'लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन' हे वाक्य सिरियल्सपासून ते सिनेमांपर्यंत प्रत्येक ठिकाणावरून किमान एकदा तरी आपल्या कानावर पडतंच. मात्र, दोन आत्म्यांचे मिलन या संकल्पनेस मागे टाकून स्वत:लाच सिंदूर लावून नववधू झालेली क्षमा बिंदू आणि Sologamy संकल्पना....

शमिभा पाटील / १० जून २०२२

गेल्या आठवड्यापासून माध्यमांमध्ये चर्चेत आलेल्या क्षमा बिंदूचा विवाह सोहळा अखेर पार पडला आहे. आता यात नवे ते काय असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडू शकतो. लग्नाच्या बातम्यांची वेगळीच क्रेज असलेल्या आपल्या देशात क्षमा बिंदूच्या विवाह सोहळ्याची एवढी चर्चा नेमकी कशासाठी ? एक तर ती कुठली सेलेब्रिटीही नाही किंवा यापूर्वी तिला कुणी ओळखतही नव्हतं पण तरीही तिच्या विवाहाने मात्र देशभरात एक कुतूहल निर्माण केले आहे आणि याला कारणही तसेच आहे! लग्न म्हटल्यावर भारतासारख्या बहुविध सांस्कृतिक देशात दोन व्यक्ती त्यामध्ये असाव्यात आणि खास करून ते स्त्री व पुरुष असावेत असा रुढसंकेत पितृप्रधान संस्कृतीने आपल्या मनावर रुजवून ठेवला आहे. असे असताना मग क्षमा बिंदूचा हा विवाह चर्चेत कशासाठी आला? तर तिचा विवाह तिने ‘स्वतःसोबतच’ केला आहे. त्यामुळे सोलोगॅमी ही भानगड नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख प्रपंच…

‘सोलोगॅमी’ किंवा ‘ऑटोगॅमी’ म्हणजे काय?

सोलोगॅमी किंवा ऑटोगॅमी म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच स्वतःशी केलेला विवाह. या प्रथेचे समर्थक असा युक्तिवाद करतात की अशी व्यक्ती स्वतःच्या जीवन मूल्यांना अधिक सुदृढ करते आणि आनंदी जीवन जगते अर्थातच म्हणून याला ‘स्वविवाह’ असेही म्हणता येईल. स्वविवाह म्हणजे स्वतःसाठी स्वतः सोबत नेहमी असण्याची आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे, ही स्वतःची स्वीकृती देखील आहे. अशा विवाहाला कोणतीही कायदेशीर मान्यता किंवा दर्जा नसताना देखील अनेक लोक त्यांचे आत्मप्रेम व्यक्त करण्यासाठी आणि स्वातंत्र्याचे त्यांच्या आयुष्यातील महत्व विषद करण्यासाठी या प्रतिकात्मक समारंभाचा वापर करतात.

स्वतःशी लग्न करण्याचा हा ट्रेंड कधी सुरू झाला?

अशा सोलोगॅमी विवाहाचे पहिले प्रकरण हे 1993 मध्ये अमेरिकेत घडल्याचे दिसते. दंतरोग तज्ञ लॅन्ड बेकर यांनी केलेल्या या विवाहाला बेकर यांच्या 75 मित्रांनी हजेरी लावली त्यावेळी लॅन्ड बेकर म्हणाल्या होत्या की, “मी आजारपणात आणि आरोग्याच्या देखभालीत स्वतःचा सन्मान करण्यासाठी हा विवाह केला आहे.” हे विवाह मुख्यत्वे महिला-केंद्रित उत्सव आहेत.
गेल्यावर्षी एक सोलोगामी घटस्फोट देखील नोंदवला गेला जेव्हा ब्राझिलियन मोडेल क्रिस गेलने जाहीर केले की ती फक्त 90 दिवसात तिचा एकल विवाह संपवत आहे कारण ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली आहे

सोलोगॅमी किंवा स्वविवाह करण्यासाठीच्या काय आहेत अटी आणि याचा विधी नेमका कसा असतो ?
सोलोगॅमी विवाह हा वैयक्तिक आयुष्यात स्वतःसोबत स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी केला जाणारा एक मनो भावनिक करार असल्याचे दिसते त्यामुळे त्याची अट ही एकच असू शकते आणि ती म्हणजे स्वतःला आनंदी ठेवणे. त्यामुळे विवाह या संकल्पनेला घेऊन समाजात रूढ असलेले कुठलेच सामाजिक परिमाण आणि नियम या विवाहाला लागू होत नाहीत.

जगभरात सोलोगॅमीचा ट्रेंड…

स्वविवाहासाठी लोकांना मदत करणाऱ्या ‘मॅरी युवरसेल्फ’च्या संस्थापक अलेक्झांडर बेल याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणतात “आज इतिहासात प्रथमच महिला स्वबळावर जगू शकतात. त्यांचे करिअर घडवु शकतात, स्वतःच्या संपत्तीच्या स्वतः मालक होऊ शकतात, एकल माता होऊ शकतात आणि हाच निवडीचा पर्याय हा आमच्या आजी आईला नव्हता. एकटे राहण्याच्या कल्पनेमध्ये स्वविवाहाची प्रथा समाविष्ट होऊ शकते. बहुतांशी पारंपारिक विवाह पद्धतीमध्ये सुख शोधताना स्वतःचे सुख हरवून जाते, त्यासाठी स्वविवाहाचा पर्याय येत्या काळात लोकप्रिय होऊ शकतो.”

सकारात्मक विचार व जीवन प्रशिक्षक आणि लेखिका साशा केगेन आपल्या पुस्तकात म्हणतात की ‘स्व विवाह म्हणजे सामान्यतः कल्पनेतील प्रियकराप्रमाणे स्वतःची काळजी घेण्यासाठी स्वतःप्रतीची वचनबद्धतापाळणे होय, नात्यांमध्ये स्वतःच्या गरजा सोडविणाऱ्या महिलांच्या समस्येवर एक अनोखा उपाय म्हणून देखील स्वतः सोबत विवाह महिलांकडून केला जातो.

यापूर्वी जपान, इटली, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सोलोगॅमीची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा ट्रेंड वाढल्यापासून, सोलोगॅमीसाठी मदत करणाऱ्या काही संस्थादेखील जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून ग्राहकांना स्वतःशी लग्न करण्यास मदत करण्यात पुढे आल्या आहेत. कॅनडामधील ‘मॅरी युवरसेल्फ’ ही संस्था याबाबत सल्ला देण्याची आणि या लग्नामध्ये छायाचित्रण करण्याची सेवा देखील प्रदान करते तर सॅन फ्रान्सिस्कोमधील ‘IMarriedMe.com’ लग्नाच्या बँड आणि शपथेसह सोलोगॅमी सोहळ्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि सेवा प्रदान करते. क्योटोमध्ये, एक ट्रॅव्हल कंपनी दोन दिवसांचे स्व-विवाहाचे चक्क पॅकेजच देते.

चित्रपटांमध्ये सोलोगॅमी

‘ग्ली’ आणि ‘सेक्स अँड द सिटी’ सारख्या लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शोच्या काही भागांमध्ये सोलोगॅमीची दृश्ये दाखविली गेली आहेत. सेक्स अँड द सिटीच्या 2003 च्या एपिसोडमध्ये , कॅरी ब्रॅडशॉने स्वतःशी लग्न करून या कृतीला लोकप्रिय केले कारण यापूर्वी असे काहीही दाखवले गेले नव्हते. 2016 च्या बेन स्टिलरच्या झूलँडर 2 चित्रपटात स्वतःशी लग्न केलेले दृश्य दाखवले आहे.

क्षमा बिंदू….

वडोदरा येथील रहिवासी क्षमा बिंदूने या महिन्याच्या अखेरीस अशाप्रकारचे लग्न करण्याची योजना आखली होती. या लग्नात ‘वधू’ आणि ‘वर’ दोन्ही स्वतःच असणारी बिन्दु म्हणते की जे जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये अनेक दशकांपासून चालत आलेले आहे तेच मीही करत आहे. सोलोगॅमी हे स्व-स्वीकृतीचे कार्य आहे असे मला वाटते

स्व-विवाह म्हणजे स्वतःसाठी गरजेच्या वेळी स्वतः उभे राहण्याची आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची प्रतिज्ञा आहे. आपण कोण आहोत आणि आपल्या मर्यादा काय आहेत हे तपासून त्या स्वीकारण्यास सक्षम होण्यासाठी केली गेलेली ही एक कृती आहे. ‘आपण दुसऱ्यावर प्रेम करायला सुरुवात करण्यापूर्वी आधी स्वतःवर प्रेम करायला हवं’ या कल्याणकारी मंत्राशी हा प्रकार जोडलेला दिसतो.

असं असलं तरीही निव्वळ प्रसिद्धीसाठी आणि नौटंकी म्हणून ती स्वतःशी लग्न करत असल्याच्या आरोपाची खिल्ली उडवत बिंदू स्वतःचा बचाव करताना म्हणते की, “मी स्त्रियांच्या आयुष्यात त्यांना किती महत्व असायला हवे हे दाखविण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.’ शिवाय, बिंदूला स्पष्टपणे प्रसिद्धीची गरज नाही कारण ती आधीपासूनच सोशल मीडियावर लोकप्रिय आहे पण स्वतःहून सातफेरे घेणारी आणि स्वतःहून कपाळाला सिंदूर लावणारी ती भारतातील पहिलीच महिला आहे.”

विशेष म्हणजे, वैवाहिक जीवनाचे वेड असलेल्या भारतात, बिंदू म्हणते, की ती लग्नाबाबत असणारे रूढ समज तोडण्यासाठी आणि खऱ्या प्रेमाचा स्पर्श न मिळाल्याने कंटाळलेल्या इतर लोकांना प्रेरित करण्यासाठी ती स्व-विवाह करत आहे. ती एक पर्यायी मार्ग दाखवत आहे. शिवाय, बिंदू एक उभयलिंगी व्यक्ती आहे तिने यापूर्वी एका स्त्री आणि पुरुषावरदेखील प्रेम केले होते, परंतु तिने ठरवले की आता हे सगळे प्रेम स्वतःला देणेच चांगले आहे. स्वविवाहावर भाष्य करताना, मानसशास्त्रज्ञ म्हणतात की आत्म-प्रेमाची सार्वजनिक घोषणा हा देखील स्त्रियांसाठी अयशस्वी प्रेमसंबंध किंवा हृदयविकाराचा सामना करण्याचा एक मार्ग आहे. त्यांचा स्वाभिमान त्या वेळी सर्वात खालच्या पातळीवर गेलेला असतो आणि म्हणून त्यांनी स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडणे आवश्यक आहे.

बिंदूच्या स्वतःशी लग्न करण्याच्या योजनेने बरेच वाद निर्माण झाले आहेत कारण अनेक राजकारणी या निर्णयाच्या विरोधात होते. काहींनी स्व-विवाह हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचे म्हटले तर काहींनी याला मूर्खपणाचे पाऊल म्हटले. गुजरातच्या वडोदऱ्याच्या माजी उपमहापौर असलेल्या भाजप नेत्या सुनीता शुक्ला म्हणाल्या की अशा विवाहांमुळे हिंदू लोकसंख्या कमी होईल. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही यावर टीका केली आहे. त्यांनी सोलोगॅमीला वेडेपणाच्या सीमारेषेवरील ‘जागेपणा’चे आणखी एक उदाहरण असे म्हटले. तिच्या विरोधात अनेक लोक उभे असताना बिंदूला काही लोकांची साथदेखील मिळाली. रटगर्स युनिव्हर्सिटीमधून पीएचडी करत असलेल्या मारिओ डी पेन्हा म्हणतात की, “आम्ही अशा देशात राहतो जिथे मंगळाच्या प्रभावाखाली जन्मलेल्या महिलांनी केळीची झाडे, पिपळाची झाडे, कुत्री आणि मातीच्या भांड्यांशी लग्न केले पाहिजे जेणेकरून त्यांचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या भावी पतींवर पडू नये असे सांगितले जाते. जर हा वेडेपणा असेल, तर तुम्ही या प्रथांना काय म्हणाल?”

बिंदूच्या म्हणण्यानुसार, तिने एका कॅनेडियन वेब सिरीजमधून सोलोगामीची कल्पना घेतली आहे. बिंदूचे लग्न विशेष असणार आहे कारण तिच्या लग्नासाठी ती वधूची वेषभूषा करेल आणि तिचे मित्र आणि पालक या लग्नाला उपस्थित राहतील. लग्नसमारंभानंतर, ती वरासह त्याच्या घरी जाण्याऐवजी स्वतःच्या घरी परतेल. या नव्या युगातील नव्या लग्नाच्या आगळ्यावेगळ्या कथेमध्ये बिंदूसारख्या स्त्रिया नवनवीन अध्याय जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. सोलोगॅमीमध्ये असे दिसते की, या विवाहात कुठल्याही पारंपरिक प्रथांना आणि कर्मकांडाला स्थान नाही. या लग्नात हुंडा नाही, रुसवे फुगवे नाहीत, मानापमान नाही याउलट स्वतःवर प्रेम करण्याचा हा एक प्रामाणिक आणि सकारात्मक प्रयत्न असल्याचेच दिसून येते.

हे ही वाचा 👉🏽 24 वर्षांची मुलगी करणार स्वतःशीच लग्न (Sologamy)

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here