सतरंगी रंगात न्हाऊन निघाले चेन्नई

चेन्नईचा LGBTQI समुदायाने 27 जूनला हजारोंच्या संख्येने रस्त्यावर जल्लोष साजरा केला

टीम बाईमाणूस / 28 जून 2022

आपल्या समुदायाची ओळख असणारे सप्तरंगी झेंडे घेऊन चेन्नईच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने उतरलेल्या माणसांचा उत्सव 27 जूनला पाहायला मिळाला. आपल्या वेगळ्या लैंगिक ओळखीचा अभिमान, प्रेम आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व या तीन गोष्टींचा उत्सव साजरा करण्यासाठी चेन्नईमध्ये रविवारी चेन्नई रेनबो परेड 2022 म्हणजेच इंद्रधनुष्य परेड 2022 चे आयोजन करण्यात आलेले होते. चेन्नईच्या चिंताद्रीपेट येथे तामिळनाडूच्या इंद्रधनुष्य आघाडी तर्फे या प्राईड परेडचे आयोजन करण्यात आलेले होते.

मागील दोन वर्षे कोरोनाच्या उद्रेकामुळे या प्राईड परेडचे आयोजन करण्यात आलेले नव्हते. आता कोरोना काहीसा कमी झाला आणि निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर मोठ्या जोमाने ही परेड आयोजितही केली गेली आणि ही परेड प्रचंड यशस्वी झाल्याचे यामध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या संख्येवरून लक्षात येते. या सोहळ्याचे विविध रंग आणि आनंद दर्शविणारे फोटोज आणि व्हिडिओज सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. चेन्नई इंद्रधनुष्य आघाडीच्या वतीने आयोजित केलेला हा चौदावा सोहळा होता.

रविवारी संध्याकाळी चार वाजता या परेडच्या उदघाटन सोहळ्याला स्थानिक सत्ताधारी पक्ष असणाऱ्या डीएमकेच्या खासदार तमीझाची तंगपांडियन (Thamizhachi Thangapandian) या स्वतः उपस्थित होत्या. याचबरोबर LGBTQIA+ या वेगळ्या लैंगिक ओळख असणाऱ्या शेकडो माणसांची गर्दी आणि त्यांच्या आनंदाने हा सगळा परिसर प्रफुल्लित झाला होता. समुदायातील लोकांच्या गाठीभेटी आणि प्रेमाने घेतलेल्या गळाभेटी या सगळ्या सहभागी नागरिकांचा आनंद व्यक्त करत होत्या.

उदघाटनावेळी बोलताना खासदार तंगपांडियन म्हणाल्या की, “चेन्नईच्या रस्त्यावर एवढ्या मोकळेलपणाने तुम्हा सगळ्यांना वावरताना, जल्लोष करतांना पाहून मला खूप समाधान वाटले. या जगात जन्मलेल्या प्रत्येकाला आपली लैंगिक ओळख ठरविण्याचा आणि आनंदाने जगण्याचा अधिकार आहे असे आम्ही मानतो. आमचे सरकार नेहमीच तुमच्या हक्कांसाठी तुमच्या सोबत असेल. “

या उत्सवात सहभागी झालेली 19 वर्षांची तरुणी प्रियांका सांगत होती, ““हा कार्यक्रम प्रेम साजरा करण्यासाठी आहे. या समुदायातील बर्‍याच लोकांना इतर समाजाकडून अतिशय वाईट वागणूक दिली जाते आणि त्या पैलूंबद्दल अधिक जागरूकता आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय ते जसे आहेत तसे साजरे करण्यासाठी हा दिवस आहे.”

परलिंगी समुदायासाठी असणाऱ्या एका प्रकल्पावर राष्ट्रीय आरोग्य अभियानासोबत काम करणाऱ्या तिरूनागाई तामिलसेल्वी म्हणतात की, “इतरांसारखेच शिक्षण, सक्षमीकरण आणि रोजगार आम्हाला मिळावा म्हणून या प्राईडचे आयोजन करण्यात येते. LGBTQIA+ समुदायाची समाजातील स्वीकारार्हता वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ही परेडसुद्धा त्याचाच एक भाग आहे.”

मॉडेलिंग करणारा अक्षय म्हणतो की, “ही माझी पहिलीच प्राईड आहे. या सगळ्यांचा मी एक साथीदार आहे याचा मला आनंद होतोय. सरतेशेवटी आपण सगळे माणूस आहोत आणि त्यामुळेच मला इथे येऊन यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहावेसे वाटले. आम्हाला इथे येऊन आनंद झाला आहे. ज्या लोकांना असे वाटते की असे प्राईड व्हायला नकोत त्यांनी इतिहास वाचायची गरज आहे. असे उत्सव होत आले आहेत ही काही पहिली वेळ नाहीये.”

या परलिंगी आणि इतर सगळ्या वेगवेगळ्या लैंगिक ओळखी असणाऱ्या लोकांसोबतच इतरही लोक ही प्राईड बघायला आले होते यापैकी काही लोक अनेक वर्षांपासून हा रंगीबिरंगी उत्सव पाहण्याकरता इथे येत असतात.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here