एकविसाव्या वर्षी सरपंच होऊन लक्षिकाने वेधले लक्ष

मध्य प्रदेश पंचायत निवडणुकीत महिलांची यशस्वी घोडदौड सुरूच

आशय बबिता दिलीप येडगे / 28 जून 2022

महिलांनी मध्य प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या यशाची मालिका सुरूच ठेवली आहे. आता 21 वर्षे वय असणाऱ्या लक्षिका डागरने अटीतटीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत सरपंच होण्याचा बहुमान पटकावला आहे. वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीत राजकारणातले सगळे हातखंडे वापरून लक्षिकाने मिळविलेला विजय हा मध्यप्रदेशातील राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी एक प्रेरणादायी विजय म्हणता येईल.

लक्षिकाने 21 व्या वर्षी सरपंच होऊन उज्जैनच्या चिंतामण जेवसिया ग्रामपंचायतीची सगळ्यात तरुण सरपंच होण्याचा मान मिळविला आहे. आपल्या वाढदिवसाच्या केवळ एक दिवस आधी मिळविलेल्या या विजयाने प्रफुल्लित झालेल्या लक्षिकाने सांगितले की, “या निवडणुकीसाठी अर्ज भरत असतांना केवळ गावाचा विकासच माझ्या डोक्यात होता. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये गावातील पिण्याच्या पाण्याचा, सांडपाण्याचा आणि पथदिव्यांचा प्रश्न निकालात काढण्याचे वचन गावकऱ्यांना दिलेले आहे. याचबरोबर गावातील निर्वासित कुटुंबांना घरे मिळवून देण्याचे आम्ही दिलेले वचनसुद्धा आम्ही पूर्ण करू.”

पुढे बोलतांना ती असे म्हणाली की, “या विजयामुळे मला खूप आनंद झाला आहे. मध्य प्रदेशातील सगळ्यात तरुण सरपंच म्हणून माझी निवड होणे माझे भाग्य आहे. मी लोकांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरेन अशी आशा करते.”

लक्षिकाच्या विरोधात आठ इतर महिलांनी सुद्धा आपले अर्ज दाखल केले होते मात्र आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर 487 मतांनी लक्षिकाने विजय मिळवला. ही निवडणूक लढण्याआधी लक्षिकाने रेडिओ जॉकी म्हणून काही वर्ष काम केले आहे, ती एक पत्रकार सुद्धा होती आणि तिने जनसंवाद विषयात पदव्युत्तर पदविका देखील मिळवलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास सर्वच गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले.

तिच्या या विजयामुळे भारतातील राजकारण आणि प्रशासनात सक्रिय सहभाग नोंदवू पाहणाऱ्या असंख्य तरुणींसमोर एक आदर्श प्रस्थापित झाला आहे. लक्षिका डागर च्या सरपंच होण्याने अनेक तरुणींना आता राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा होऊ शकते.

राजकारण आणि इतर पुरुषसत्ताक क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढणे महिलांसाठी अत्यंत आवश्यक आहे. राजकारणात आलेल्या महिलांना फारसे महत्व मिळत नाही काही मान्यवर उदाहरणे सोडली तर स्थानिक पातळीवरील राजकारणात महिलांच्या मताला फारशी किंमत नसते पण हळू हळू आता हे चित्र बदलू लागले आहे. निवडून आलेल्या महिलांमध्ये देखील आपले मत मांडण्याचा आत्मविश्वास फार अभावाने आढळून येतो याला वेगवेगळी कारणे देखील असू शकतात.

मध्य प्रदेशमध्ये महिलांचा राजकारणातील सहभाग वाढविण्यासाठी जसे प्रयत्न केले जातायत अगदी तसेच प्रयत्न महाराष्ट्रातही ‘महिला राजसत्ता आंदोलना’ सारख्या चळवळींमधून होत आहेत. ‘बाईमाणूस’साठी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात रिपोर्टींग करणाऱ्या भाग्यश्री लेखामी यांनी सुद्धा काही वर्षांपूर्वी देशातील सगळ्यात तरुण महिला सरपंच होण्याचा मान मिळविला होता. 23 वर्षीय लेखामी या आजही नऊ गावांच्या गटसरपंच म्हणून काम करत आहेत.

तरुण महिलांचे राजकारणातील हे यशस्वी पदार्पण भारतातील इतर महिलांना नेहमीच प्रेरणा देत राहील.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here