शालेय विद्यार्थ्यांच्या गँग्स ऑफ प्रयागराज…

शाळेतल्या मुलांनी टोळ्या बनवून सहा बॉम्ब फोडले

  • टीम बाईमाणूस

तांडव, जग्वार, इमॉर्टल, रंगबाज… ऐकायला ही नावं शमशेरा, पुष्पा किंवा बाहुबली सारख्या चित्रपटांच्या सिक्वलची वाटतात. मात्र ही नावं चित्रपटांची नसून उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमधील नामांकित शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गँग्सची आहेत हे ऐकून तुम्हाला मोठा धक्काच बसले. याच गँग्सने गेल्या 22 दिवसांत प्रयागराजच्या वेगवेगळ्या शाळांच्या परिसरात तब्बल 6 बॉम्ब फोडले आहेत. तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रयागराज शहरामध्ये अवघ्या 22 दिवसांत जे सहा कमी क्षमतेच्या गावठी बॉम्बचे स्फोट झाले, त्यांत नुकसान फार झाले नाही वा एकदोघेच जण जखमी झाले हे खरे; पण या बॉम्बस्फोटांच्या तपासाला उत्तर प्रदेशच्या पोलिसांकडून वेग काही येत नव्हता आणि जेव्हा तपासाला वेग आला आणि खरे सुत्रधार सापडले तेव्हा मात्र सबंध प्रयागराज हादरून गेलं.

गँग्स ऑफ प्रयागराज…

प्रयागराजच्या पाच प्रख्यात शाळांतील 200 विद्यार्थ्यांनी वॉट्सअपवर वेगवेगळ्या नावांनी टोळ्या स्थापन केल्या आहेत. ‘तांडव’, ‘माया’ आणि ‘अमर’ नावाच्या या टोळ्या अनेक गुन्ह्यांत सहभागी आहेत. पोलिसांनी गुरुवारी धक्कादायक खुलासा करत सांगितले की, गेल्या काही दिवसांत देशी बॉम्बचे अनेक स्फोट याच विद्यार्थ्यांच्या टोळ्यांनी घडवले होते. पोलिस या विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत. या विद्यार्थ्यांनी टोळीसाठी सोशल मीडिया पेजही बनवले आहे. त्यावर ते दुसऱ्या टोळीवरील आपले वर्चस्व दाखवण्यासाठी बॉम्ब स्फोटांची छायाचित्रे पोस्ट करतात. पोलिसांनी मंगळवारी 10 अल्पवयीन विद्यार्थ्यांसह 11 जणांना ताब्यात घेतले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या 15, 16 आणि 22 जुलैच्या देशी बॉम्बस्फोटांच्या घटनांत सहभागी होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अनेक दुचाकी, एक डझन सेलफोन आणि काही देशी बॉम्ब जप्त केले आहेत. एसएसपी शैलेश पांडे यांनी सांगितले की, हे विद्यार्थी युट्युबवरून बॉम्ब कसे तयार करायचे हे शिकायचे आणि परस्परांवर हल्ले करत होते आणि देशी बॉम्बही फेकत होते. आरोपी दुचाकी वाहनांवर फिरत असत आणि नेहमी आपला चेहरा झाकून घेत असत. आम्हीच बॉम्ब बनवले, हे या 11 जणांनी प्राथमिक चौकशीत कबूल केले आहे.

युट्युबवरून बॉम्ब बनवायला शिकले

विद्यार्थ्यांच्या गटांशी त्यांच्या पालकांचादेखील संबंध असल्याचं दिसून आलं. त्यांना पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे. स्फोट घडवणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विद्यार्थ्यांच्या टोळ्या व्हॉट्स ऍपवरही सक्रिय होत्या. तांडव, जॅग्वार, माया, लॉरेन्स, इम्मॉर्टल्स अशा नावांनी त्यांनी व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केले होते. त्यात 10 ते 300 सदस्य होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. जुलैमध्ये शाळांच्या बाहेर बॉम्बस्फोटाच्या 5 घटना घडल्या. यातील पहिली घटना संगम परिसरात घडली. एका शाळेचे विद्यार्थी त्यांच्यातील एकाचा वाढदिवस साजरा करत असताना स्फोट घडवण्यात आला. बॉम्बस्फोटाची दुसरी घटना एमपीव्हीएमजवळ घडली. यानंतर पतंजली ऋषीकुल, बॉईज हायस्कूल, बिशप जॉन्सन स्कूल परिसरात स्फोट झाले.

बाजारातून फटाके खरेदी करायचे, त्यातील दारुगोळा वेगळा करायचा. तो बॉम्बच्या निर्मितीसाठी वापरायचा. हा प्रकार गेले काही महिने सुरू होता. शाळेतील विविध उपक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांकडून पैसे घेतले आणि याच पैशांचा वापर बाजारातून फटाके खरेदी करण्यासाठी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुखवस्तू घरातील मुले

मिसरूडही फुटली नसताना बॉम्ब हाताळणारे मुलगे अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा तत्सम इस्लामी देशांमध्ये असतात हे पाश्चात्त्य चित्रवाणी वाहिन्यांमुळे आपल्याला माहीत असते, पण आपल्या उत्तर प्रदेशासारख्या अत्यंत प्रगतिशील राज्यात आपापल्या वयांच्या दहाव्या-बाराव्या वर्षीपासून ‘योगी राज’चा अनुभव घेणारे हे मुलगे तसले नव्हते. या सर्वाचे आईवडील सभ्य, सुविद्य आणि सुखवस्तूही आहेत, त्यामुळेच हे सारे 11 बाल-आरोपी नामांकित इंग्रजी शाळांमध्ये शिकत होते. ‘इम्मॉर्टल ग्रूप’ चा शत्रू ‘तांडव ग्रूप’, पण ‘राम दल’ हा अशाच विद्यार्थ्यांचा समूहसुद्धा ‘तांडव’चा शत्रूच. याखेरीज ‘माया’ हा समूह आणि ‘बिच्छू’ समूह हे एकमेकांचे शत्रू. या विद्यार्थ्यांनी आपापल्या मोबाइलवरील इन्स्टाग्राम तसेच फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरून हे समूह बनवले आणि वाढवले. ही मुले ‘कॉन्व्हेन्ट’मधली आहेत, म्हणूनच ती बिघडलेली आहेत, असे स्थानिक हिंदी प्रचारमाध्यमांनी सुरुवातीला सुचवून पाहिले, पण ज्या शाळांची नावे ख्रिस्ती-संचालित दिसत नाहीत तेथील विद्यार्थीही अशा समूहांमध्ये असल्याचे आता उघड झाले आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here