अबब! नाराज भावाला मनविण्यासाठी बहिणीने लिहिले 434 मीटरचे पत्र

5.27 किलो वजनाचे पत्र लिहून केला विश्वविक्रम

  • टीम बाईमाणूस

आजकाल ‘दिवस’ साजरे करण्याची प्रथा जगभर आहे. कधी आईचा दिवस, कधी वडिलांचा दिवस, कधी बायकोचा दिवस तर कधी नवऱ्याचा दिवस असे वेगवेगळे दिवस वर्षभर येत असतात. 24 मे ला जागतिक ब्रदर्स डे म्हणजे भावांचा दिवस होता. केरळमध्ये राहणारी कृष्णप्रिया आपल्या भावाला नेमकं याचं दिवशी शुभेच्छा द्यायला विसरली आणि मग तिचा भाऊ कृष्णदास यावरून प्रचंड नाराज झाला. आपल्या नाराज भावाला खुश करण्यासाठी कृष्णप्रियाने एक पात्र लिहिण्याचे ठरवले आणि मग लिहिता लिहिता हे पत्र एवढे मोठे आणि लांब झाले की हे जगातील सर्वाधिक लांब लिहिलेले पत्र ठरले आहे.

स्थापत्य अभियंता असणारी कृष्णप्रिया पी. एस. सांगते की मी दरवर्षी माझ्या भावाला जागतिक भाऊ दिनाच्या शुभेच्छा देत असते पण यावर्षी माझ्या कामातील व्यग्रतेमुळे मी त्याला शुभेच्छा देण्याचे विसरून गेले. यानंतर रागावलेल्या भावाने तिला जागतिक ब्रदर्स डे च्या शुभेच्छा म्हणून त्याला आलेले दहा ते बारा संदेश तिला दाखवले आणि कृष्णप्रियाचा भाऊ कृष्णदास नाराज होऊन बसला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने नाराज होऊन आपल्या बहिणीशी बोलणे बंद केले आणि तिला व्हाट्सअप वरून देखील ब्लॉक करून टाकले. “त्याने मला ब्लॉक केल्याने मी नाराज झाले आणि त्याला मानविण्यासाठी मी त्याला एक पत्र लिहिण्याचे ठरवले,” कृष्णप्रिया सांगत होती.

मग काय तिने बिलिंग साठी वापरल्या जाणाऱ्या कागदाच्या 14 गुंडाळ्या आणल्या आणि हे पत्र लिहायला सुरुवात केली. तब्बल 12 तास कृष्णप्रिया हे पत्र लिहीत होती आणि लिहिता लिहिता हे पत्र तब्बल 434 मीटरचे होऊन बसले. आपल्या या अनुभवाबद्दल सांगताना कृष्णप्रिया म्हणाली की, “सुरुवातीला मी A4 कागदावर पत्र लिहायला घेतले पण माझ्या मनातल्या भावना उतरविण्यासाठी मला ती जागा अपुरी वाटली.”

जागतिक भाऊ दिनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता कृष्णप्रियाने हे पत्र लिहायला घेतले आणि रात्री 11:45 पर्यंत ती हे पत्र लिहीत होती अशी माहिती आहे. कृष्णप्रसादला आपल्या बहिणीने पाठवलेले हे पत्र दोन दिवसानंतर मिळाले.

हे जगातील सगळ्यात लांब पत्र होणार

कृष्णप्रिया पी. एस. ने लिहिलेले हे 434 मीटरचे पत्र पाहून हे पत्र जगातले सगळ्यात लांब पत्र असू शकते अशी शक्यता तिच्या एका मित्राने व्यक्त केली आणि त्यानंतर तिने जागतिक विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरमला याबाबत संपर्क साधला. त्यानंतर या फोरमने कृष्णप्रियाला हे पत्र लिहितानाच व्हिडिओ पाठविण्यास सांगितला आणि या प्राप्त व्हिडिओची शहानिशा केल्यानंतर या फोरमने हे जगातील सगळ्यात लांब पत्र असल्याचे जाहीर केले.

आपल्या या विक्रमाबद्दल सांगताना कृष्णप्रिया म्हणाली की, “असा काही विक्रम करण्यासाठी म्हणून मी हे पत्र लिहायला घेतले नव्हते. मी पत्राची लांबी अजिबात ठरवली नव्हती हा सगळा निव्वळ एक योगायोग आहे.”

कृष्णप्रियाने आता गिनीज बुकात आजवर लिहिले गेलेले सगळ्यात लांब पत्र अशी आपल्या पत्राची नोंद व्हावी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) या संस्थेकडे अर्ज केला आहे.

कृष्णप्रसाद हा तिचा भाऊ तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे आपल्या भावाबद्दल सांगताना ती म्हणते की, “मी माझ्या भावाची आई, गुरु आणि मित्र सगळं काही आहे.”

एवढे मोठे पत्र वाचून नाराज भाऊराया खुश झाले का याची मात्र माहिती अजून मिळू शकलेली नाहीये.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here