आखाडा होता कुस्तीचा पण…

स्थानिक खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांच्या आदेशाने पंचांना खेळ थांबवायला लावून अयोध्येचा बुवाबाबांनी महिला कुस्तीपटूंना दिले आशीर्वाद

  • टीम बाईमाणूस

लखनौच्या साई केंद्रात जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची निवड सुरू होती. मॅटवर 59 किलो वजनगटातील दोन मल्ल जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता एकमेकांना चितपट करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, सामना सुरु होऊन अवघ्या 54 सेकंदांनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे खासदार बृजभूषण सिंह तिथे येतात आणि पंचांना तो सामना तात्पुरता थांबविण्याची विनंती नाही तर ‘आदेश’ देतात. बिचारे सरकारी पगारावर काम करणारे कुस्तीचे पंच सामना थांबवतात. आता स्वतः कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि बाहुबली समजले जाणारे राजकीय नेते सामना थांबवायला सांगतात तेंव्हा त्यांच्या आदेशाचे पालन तर व्हायलाच हवे नाही का? आणि सामना थांबवला जातो. कुणी विरोधही करत नाही कारण सामना थांबविण्याचे कारणही मोठे ‘धार्मिक’ असते.

साक्षात आयोध्येवरून आलेल्या काही संत महंतांना जागतिक स्पर्धेची तयारी करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना काहीतरी सांगायचे असते, त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचे हात फिरवायचे असतात एवढा महान उदात्त हेतू असताना कोण कशाला विरोध करेल. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या महान संतांना कुस्ती महासंघ आणि साई केंद्राने या चाचणी स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेले असते आणि सामना सुरु होण्यापूर्वी तिथे उपस्थित असलेले अधिकारी या बुवांना कुस्तीपटूंना आशीर्वाद देण्याकरिता मॅटवर निमंत्रित करण्याचे विसरले असतात.

त्यामुळे जागतिक कुस्तीस्पर्धेतील माजी पदकविजेती पूजा धांडा आणि तिच्या विरुद्ध शड्डू ठोकलेली युवा कुस्तीपटू मानसी यांच्यात सुरु असलेला रोमांचक सामना अचानक थांबवावा लागतो. कारण तसे करण्याचे आदेशच खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेले असतात. महंतांना या महिला कुस्तीपटूंनसोबत फोटो काढायचे असल्याने आणि त्यांना आशीर्वाद द्यायचे असल्याने कुस्तीचा सामना थांबविला गेल्याची घटना घडली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार बृजभूषण सिंह मॅटशेजारी असलेल्या सोफ्यावर बसून पंच आणि आयोजकांना त्याचबरोबर तिथे अयोध्येच्या हनुमानगढीवरून आलेल्या महंतांना हातात असलेल्या इंटरकॉमद्वारे सूचना देत होते. ते आयोध्येच्या महंतांना सांगत होते की, “जास्त वेळ घेऊ नका मी सुरु झालेला सामना तुमच्यासाठी थांबवला आहे जा आणि लगेच आशीर्वाद देऊन परत या.

आपल्या देशात होणाऱ्या कुस्तीस्पर्धांमध्ये याप्रकारचे चित्र काही नवीन नाही. एखाद्या राजकीय नेत्याला अथवा आयोजकाला वाटेल तेंव्हा, वाटेल तसा कुस्तीचा सामना थांबवला जातो, परत खेळवला जातो आणि जर असे झाले नाही तर अशा निवड चाचण्यांमध्ये नेहमी भांडणे होतात, वाद होतात हे सगळं अगदीच सामान्य आहे. सोमवारी जेंव्हा काही मिनिटे सामना थांबविण्यात आला तेंव्हा अर्ध्या डझनहुन अधिक बुवा बाबांनी कुस्तीच्या मॅटवर प्रवेश केला, मल्लांना आशीर्वाद दिले, महिला मल्लांसोबत फोटो काढले आणि परत आले त्यानंतर दोन्ही कुस्तीपटू मॅटवर परतले, मानसीने अत्यंत अटीतटीच्या लढतीत तिच्या अनुभवी प्रतिस्पर्ध्याचा 2-0 असा पराभव केला.

आता मानसी पुढील महिन्यात बेलग्रेड येथे होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाचा एक भाग असेल. या स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेती मल्ल विनेश फोगटही सहभागी होईल. या निवड चाचणीमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती साक्षी मलिक सहभागी झालेली नाही. सोमवारी साई केंद्रात झालेल्या कोणत्याही सामन्यात कसलाही वाद झालेला नसला तरीही या स्पर्धेच्या भोवती घडलेल्या अनेक घटनांनी लक्ष वेधले आहे. बृजभूषण सिंह यांचा शब्द भारतीय कुस्तीविश्वात कुणीही ओलांडू शकत नाही हेच याही स्पर्धेतून सिद्ध झाले आहे. तब्बल सहावेळा खासदार असणारे बृजभूषण सिंह वेळोवेळी भारतीय कुस्ती महासंघावर एक प्रशासक म्हणून असणारी त्यांची पकड अशी सिद्ध करत असतात.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही सोमवारी सगळे सामने संपल्यानंतर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष 65 वर्षीय बृजभूषण सिंह यांनी सर्व कुस्तीपटूंना त्यांच्या समोर तीन रांगा करून बसवले आणि खेळाडू आणि प्रशिक्षकांना खेळातल्या काही ‘तांत्रिक’ चुकाही दाखवून दिल्या होत्या. राजकीय हस्तक्षेपामुळे भारतीय फ़ुटबॉल टीमवर फिफाने बंदी घातली होती आणि काही दिवसांपूर्वी ही बंदी उठविण्यात आलेली आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here