भूलनदेवीची भूल…

‘भुलनवेल’ या निसर्गकन्येची रहस्यमय बाब म्हणजे, ही वेल ओलांडली म्हणजे दिशेचं भान नाहीसं होतं. माणूस एकसारखा भटकत राहतो. त्याला रानभूल होते. ‘भुलनवेल’ ही दोन प्रकारची असते. एक पांढ-या फुलांची, तर दुसरी काळ्या फुलांची. मेळघाटात मात्र पांढरी ‘भुलनवेल’ आढळते. हिच्यामध्ये काही आयुर्वेदीय गुणही असावेत. मात्र रानावनात राहणारा आदिवासी ते सांगत नाही.

रणजितसिंग राजपूत

‘भुलनवेल’चं इंग्रजी नाव आहे, ‘टायलोफ्लोरा रोटँडीफोलियो’. ती वर्षा ऋतूत पूर्णपणे जमिनीवर राहूनच आपला वंशवेल वाढवत असते. ‘भुलनवेल’ या निसर्गकन्येची रहस्यमय बाब म्हणजे, ही वेल ओलांडली म्हणजे दिशेचं भान नाहीसं होतं. माणूस एकसारखा भटकत राहतो. त्याला रानभूल होते. या वेलीतून निघणा-या वायूत भूल पाडणारे काही घटक असावेत, जे ओलांडणा-याच्या नाकात श्वासावाटे जात असावेत आणि त्याला भूल पडत असावी. वनात राहणा-या अधिका-यास विचारले असता तो म्हणाला, ‘तिच्या मुळावरून जर ती ओलांडली गेली, तर आठ ते दहा तास माणूस भटकत राहतो. मध्यातून ओलांडली, तर पाच ते सहा तास रानभूल होते आणि शेंड्यावरून ओलांडली तर दोन ते तीन तास माणसास भूल पडते.’ यापूर्वीही अनेक वर्षांपासून मला ‘भुलनवेली’बाबत हीच माहिती मिळाली होती. माझ्या मते, श्वासावाटे शरीरात जाणा-या या वायूच्या प्रमाणावर ही रानभूल होत असावी. ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर ज्या प्रमाणात ऑपरेशनचे स्वरूप पाहून नेस्थेशिया देतात, तसाच हा प्रकार असावा. ‘भुलनवेल’ ही दोन प्रकारची असते. एक पांढ-या फुलांची, तर दुसरी काळ्या फुलांची. मेळघाटात मात्र पांढरी ‘भुलनवेल’ आढळते. हिच्यामध्ये काही आयुर्वेदीय गुणही असावेत. मात्र रानावनात राहणारा आदिवासी ते सांगत नाही.

 ‘रानभूल’ या प्रल्हाद जाधव लिखित पुस्तकातील ‘दिशा उजळताना’ या प्रकरणात वनखात्यातील एका वरिष्ठ वन अधिका-याने ‘भुलनवेल’ ओलांडली असता ते दोन दिवस जंगलात हरवले होते, असा उल्लेख आहे. याच प्रकरणात पुढे असेही लिहिले आहे की, ‘अरण्यवती’ मारुती चितमपल्ली यांनी एकदा या वेलीची छायाचित्रे घेतली होती. पण रोल धुतल्यावर ती छायाचित्रं उमटली नाहीत. रानातील माझा कोरकू मित्र रानकाढ्या नानूनेही एकदा या वेलीवर एक दगड ठेवला होता. काही दिवसांनंतर तो दगड बाजूला सरकल्याचे त्याने मला यापूर्वी सांगितले होते. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात भुलजा नावाचे एक गाव आहे. तेथे अशा वनस्पती ओलांडल्यामुळे माणसं भ्रमिष्ट होतात, अशीही माहिती ‘रानभूल’ या पुस्तकात दिली आहे. असो. भुलनदेवीसारख्या रानावनांतल्या असंख्य वनस्पतींनी हवा, पाणी, जमीन आणि एकूण वातावरण शुद्ध आणि स्वच्छ ठेवले आहे. प्राणी जीवनाला अत्यावश्यक असलेल्या प्राणवायूचा पुरवठा सुरू ठेवला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा वनस्पतींनीच पुरवल्या आहेत. याखेरीज मनोरंजन, सुगंधी द्रव्ये, औषधी द्रव्ये यांचीदेखील त्यांनी मुक्त हस्ते उधळण केली आहे. पूर्वीच्या काळी मानव निसर्गाच्या सान्निध्यात राहात होता. त्याचे दैनंदिन कार्यक्रम, उदा. दंतधवन, न्याहरी, भोजन, पेयपान, तांबूल, पाचक औषधे, शय्या, विरेचनादी सर्व विधींसाठी तो वनस्पतीचाच प्रामुख्याने वापर करीत असे. विविध रोग, प्रसूती, समारंभ, पूजा-अर्चा वगैरे कार्यक्रमांत वनस्पतींचाच वापर होत होता. त्यामुळे त्या वेळी मानवाला वनस्पतींचा चांगला परिचय होता. प्राचीन भारतीय संस्कृतीची शेती आणि आयुर्वेद ही दोन प्रमुख वैशिष्ट्य होती. म्हणजे, प्राचीन भारतीयांच्या सर्वांगांना वनस्पतींचा स्पर्श झालेला होता.

 युरोपीय पर्यटक आणि राज्यकर्त्यांनी येथील वनस्पतींची वैशिष्ट्ये जाणून घेऊन त्यांचे व्यापक सर्वेक्षण केले. २०० वर्षांहून अधिक काळ सर्वेक्षणाचे मोठे काम करून येथील वनस्पतींचे हजारो नमुने जतन करण्यासाठी मायदेशी पाठवून दिले. अनेक वनस्पतींची लागवड केली आणि भारतीय वनस्पतींच्या संदर्भात प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली. आजही हे ग्रंथ भारतीय वनस्पतींच्या अभ्यासासाठी आधारभूत ठरतात.

तेराव्या शतकापासून या परिस्थितीत बदल होत गेला. परकियांची आक्रमणे, एतद्देशीयांची बेसावध वृत्ती वगैरेमुळे भारताला नंतरच्या काळात फारशी प्रगती करता आली नाही. भीतीच्या आणि जबरदस्तीच्या वातावरणात भारतीयांची मूळची संशोधक, चिंतनशील आणि कलात्मक दृष्टी अल्पावधीत नष्ट झाली. याचाच परिणाम म्हणून सभोवतालच्या वातावरणाचा, साधनसंपत्तीचा विसर पडला. संशोधनाकडे लक्ष देण्यास योग्य वातावरण लाभले नाही. हळूहळू ही वृत्तीच नाहीशी होऊन भीती, लाचारी, आत्मविस्मृतीमुळे भारतीयांची अधोगती होत गेली. ब्रिटिश राजवटीचे अनेक तोटे आपणास सहन करावे लागले. परंतु काही लाभदेखील आपल्या पदरात पडले. त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी या देशातील दुर्लक्षित परंतु बहुमोल अशा साधनसामुग्रीचे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि Imperial Gazetteer, State Gazetteer, District Gazetteer यांच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती ग्रंथीत करून ठेवली. या माहितीचा आजही आपण उपयोग करीत आहोत. वनसंपदेच्या सर्वेक्षणाबाबत असेच झाले आहे. प्राचीन काळी आपल्या ऋषी-मुनींनी केलेल्या संशोधनाचा वृत्तांत आज आपणास उपलब्ध नाही. परंतु ब्रिटिश राजवटीत पाश्चात्त्यांनी केलेले संशोधन अनेक ग्रंथांद्वारे संग्रहित करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर भुलनदेवीचे महत्त्व संशोधनाच्या माध्यमातून अधोरेखित होण्यास अजूनही पुरेसा वाव आहे. प्रश्न आपल्याला त्यात रस आहे की नाही, हा आहे.

—-

संपर्क – 9422785555

ranjitrajput5555@bmadm

———-

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here