ब्रिटिश राजवटीत भारतीय ध्वज फडकवणाऱ्या क्रांतिकारक अरुणा असफ अली

अरुणा असफ अली यांनी केवळ स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गरीब आणि वंचितांसाठी त्यांनी अविरत कार्य केले.

  • टीम बाईमाणूस

अरुणा असफ अली या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख क्रांतिकारकांपैकी एक होत्या. अरुणा यांनी केवळ स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गरीब आणि उपेक्षितांसाठी अविरतपणे काम केले. 1909 मध्ये एका उच्चवर्गीय बंगाली ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अरुणा यांचे शिक्षण लाहोरमधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट आणि नंतर नैनितालच्या ऑल सेंट्स कॉलेजमध्ये झाले. त्यांचे वडील उपेंद्रनाथ गांगुली हे रेस्टॉरंटचे मालक होते, ते मूळचे पूर्व बंगालच्या (आता बांगलादेश) बरिसाल जिल्ह्यातील होते. पदवीनंतर त्यांनी कलकत्ता येथील गोखले मेमोरियल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणूनही काम केले.

अंतरधर्मीय विवाह

अरुणाने जानेवारी 1928 मध्ये अलाहाबाद येथे काँग्रेस पक्षातील एक नेते आणि देशातील प्रमुख वकिलांपैकी एक असफ अली यांची भेट घेतली. त्यांच्या पहिल्या भेटीतच अरुणा आणि आसफ यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटले. त्या काळात आंतरधर्मीय विवाहाला सामाजिक मान्यता नव्हती. त्यामुले अरुणाच्या वडिलांनी या लग्नाला नकार दिला. शिवाय आसफही त्यांच्यापेक्षा 21 वर्षांनी मोठे होते पण पुढे जाऊन त्यांनी आसफ अली यांच्याशीच लग्न केले. “सप्टेंबर 1928 मध्ये जेव्हा असफ आणि मी लग्न केले तेव्हा माझे वडील राहिले नव्हते. माझे प्रश्यपज असणारे काका नागेंद्रनाथ गांगुली स्वतःला माझे पालक मानत होते, त्यांनी नातेवाईक आणि मित्रांना सांगितले की अरुणा आमच्यासाठी आता मरण पावली आहे इतकेच काय त्यांनी माझे श्राद्धही घातले होते.” सुरेश मिश्रा यांच्या पुस्तकात अरुणा असफ अली यांनी हे सांगितले आहे.

राजकीय कार्य

राजकारणातील त्यांचा पहिला प्रयत्न 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभागाने सुरू झाला. त्यानंतरच त्यांना पहिल्यांदाच अटक करण्यात आली. 1932 मध्ये त्यांनी तिहार तुरुंगातील राजकीय कैद्यांना होत असलेल्या अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ उपोषण सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती सुधारली पण अरुणा याना अंबाला येथे हलवण्यात आले जेथे त्यांना एकांतवासात ठेवण्यात आले. 1931 मध्ये गांधी इर्विन करारामुळे सुटलेल्या इतर कैद्यांच्या विपरीत, त्यांच्या अटकेला जनतेने विरोध केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

1942 चळवळीच्या नायिका

1942 मध्ये, जेव्हा गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले आणि ‘करा किंवा मरो’ची हाक दिली, तेव्हा ब्रिटिश आधीच घाबरले होते, त्यांनी गांधी, नेहरू आणि बहुतेक प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले. आघाडीचे नेते तुरुंगात गेल्याने तरुण असणाऱ्या अरुणाने आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हातात घेतली. 9 ऑगस्ट रोजी त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले आणि मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर निर्भयपणे ध्वजारोहण केले. नंतर काँग्रेस पक्षावर बंदी घालण्यात आली. त्यांच्या या शौर्यामुळे, अरुणा यांना 1942 च्या चळवळीची नायिका म्हणून गौरवण्यात आले.

त्यांना पकडण्यासाठी सरकारने 5,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यांची मालमत्ता जप्त करून विकण्यात आली. मार्क्सवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोटली संघासह त्या भूमिगत झाल्या. भूमिगत असताना त्यांनी काँग्रेस पक्षाचे मासिक इन्कलाबचे संपादन केले. गांधीजींनी अरुणा असफ अली यांना ब्रिटिशांना शरण येण्याची विनंती केलेली मात्र असफ अलींनी गांधींची ही विनंती मान्य केली नाही 1946 मध्ये त्यांच्यावरील आरोप मागे घेतल्यानंतरच त्या सगळ्यांसमोर आल्या पण ब्रिटिशांना शरण गेल्या नाहीत.

स्वातंत्र्यानंतर लगेचच, काँग्रेस पक्षाच्या प्रगतीमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आणि 1948 मध्ये त्या सोशलिस्ट पक्षात सामील झाल्या. नंतर, पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. 1954 मध्ये, त्यांनी भारतीय महिला महासंघ, सीपीआयची महिला शाखा स्थापन करण्यात मदत केली. तथापि, 1956 मध्ये सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या तत्कालीन सचिव निकिता ख्रुश्चेव्ह यांनी स्टॅलिनचा निषेध केल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला.

दिल्लीच्या पहिल्या महापौर

स्वातंत्र्यानंतर, अली यांना 1958 मध्ये दिल्लीचे पहिले महापौर होण्यासाठी राजी करण्यात आले त्या दिल्ली शहराच्या आजवरच्या एकमेव महिला महापौर राहिलेल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोठ्या नागरी सुधारणा केल्या. सार्वजनिक सेवेसाठी त्यांना 1975 मध्ये लेनिन शांतता पुरस्कार आणि 1986 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी इंदिरा गांधी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना 1992 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 29 जुलै 1996 रोजी नवी दिल्ली येथे 87 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मरणोत्तर, भारत सरकारने त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविले.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here