झाडूवाली बाई जेव्हा जनरल मॅनेजर बनते…

37 वर्षांच्या संघर्षाची प्रेरणादायी गोष्ट

  • टीम बाईमाणूस

ही गोष्ट आहे अवघ्या विसाव्या वर्षी विधवा झालेल्या एका महिलेची, ही गोष्ट आहे 20व्या वर्षी मुंबईच्या एसबीआय बँकेत (SBI) झाडू मारण्यापासून सुरुवात केलेल्या एका सफाई कामगाराची, ही गोष्ट आहे एका महिलेच्या जिद्दीची, संघर्षातून आपल्या मुलाचा सांभाळ केलेल्या आणि त्याच्यासोबत स्वतःच्या आयुष्यातही क्रांतीची वाट चाललेल्या एका मातेची, ही गोष्ट आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून काही दिवसांपूर्वी रुजू झालेल्या प्रतिक्षा तोंडवलकर यांची.

पुण्यातील रहिवासी असणाऱ्या प्रतिक्षा तोंडवलकर सध्या ज्या बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) या पदावर आहेत त्याच बँकेत त्यांनी सफाई कामगार म्हणून सुरुवात केली होती हे सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण जर मनात जिद्द असेल, यश मिळविण्याची इच्छा असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आयुष्यात काहीही शक्य आहे. हेच सांगणारी प्रतिक्षा तोंडवलकरची ही कहाणी.

आपल्या पतीच्या मृत्यूनंतर 20व्या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक सेवक म्हणून रुजू झालेल्या प्रतिक्षाला आपण 37 वर्षांनंतर याच बँकेत वरिष्ठ अधिकारी होतील असे वाटलेही नव्हते. एक सफाई कर्मचारी म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या प्रतिक्षाने आपले शिक्षणही पूर्ण केले नव्हते आणि वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. 30 वर्षांच्या खडतर मेहनतीनंतर त्यांनी आपल्या शिक्षणासकट आयुष्याची गाडीही परत रुळावर आणली आहे.

भारताच्या पुरुषप्रधान बँकिंग क्षेत्रामध्ये प्रतिक्षाने यश मिळवले आहे. कुटुंब सांभाळत स्वतःचे करियर बनविण्यासाठी भारतात महिलांना संघर्ष करावा लागतो. तोंडवलकर यांचा जन्म पुण्यामध्ये 1964 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. प्रतिक्षा यांची दहावीतच अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांचे लग्न लावून देण्यात आले. एसबीआय मध्ये बुक बाईंडर म्हणून काम करणाऱ्या सदाशिव कडू यांच्याशी त्यांचे लग्न लावून देण्यात आले. लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला आणि मुलगा झाल्यामुळे गावाकडे कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याचे त्यांनी ठरवले.

पण त्यांनी घेतलेला हा निर्णय प्रतिक्षाचे आयुष्य कायमचे बदलून टाकणार आहे याचा त्यांना अंदाजदेखील आला नसेल. या प्रवासादरम्यान त्यांना एका अपघाताला सामोरे जावे लागले आणि या अपघातात सदाशिव कडू यांचे निधन झाले. अवघ्या 20व्या वर्षी वैधव्य आलेल्या प्रतिक्षा तोंडवलकर यांच्या आयुष्याचा खरा संघर्ष येथूनच सुरु झाला.

आपल्या पतीचे पैसे काढण्यासाठी त्यांना नेहमी एसबीआय मध्ये जावे लागायचे. स्वतःच्या आणि आपल्या मुलाच्या भविष्यासाठी त्यांना नोकरी करणे भाग होते पण लग्नानंतर शिक्षण अर्धवट सोडल्याने कोणतीही नोकरी मिळू शकणे माझ्यासाठी अशक्य होते त्यामुळे मी माझा पती काम करत होता त्या बँकेत मलाही काहीतरी काम देण्याची विनंती केली आणि मला त्या बँकेत फर्निचर साफ करण्याचे, झाडू मारण्याचे, साफसफाई करण्याचे काम मिळाले आपली संघर्षाची सुरुवात सांगताना त्या म्हणतात.

रोज सकाळी दोन तास बँकेत सफाईचे काम केल्यानंतर प्रतिक्षा यांना महिन्याला 60 ते 65 रुपये मिळायचे पण हे काम करत असताना ‘हे काम करण्यासाठी माझा जन्म झालेला नाहीये ‘ हा विचार नेहमी त्यांच्या मनात घॊळत असे. आपल्यापेक्षा लहान आणि समवयस्क व्यक्तींना बँकेत प्रतिष्ठेचे काम करताना पाहून तरुण प्रतिक्षाच्या मनात नोकरी करण्याची इच्छा निर्माण झाली नसती तरच नवल. आयुष्याला पुन्हा एक संधी देण्याच्या निर्माण झालेल्या या इच्छेने प्रेरित होऊन त्यांनी मिळेल तिथे आणि जो भेटेल त्याला त्या त्यांचे उर्वरित शिक्षण कसे पूर्ण करू शकतील याची विचारणा करायला सुरुवात केली.

बँकेतल्या काही अधिकाऱ्यांनी तिला काही परीक्षांची माहिती दिली आणि तरुण प्रतिक्षाने पुन्हा एकदा शिक्षणाचा प्रवास सुरु केला. दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरताना अनेकांनी तिला मदत केली इतकंच काय तर अभ्यासासाठी बँकेने एक महिन्याची विशेष राजदेखील प्रतिक्षा यांना देण्यात आली. आता प्रश्न होता पुस्तके आणि इतर साहित्याचा पण सुदैवाने काही नातेवाईकांनी हे सगळ उपलब्ध करून दिलं आणि या मदतीच्या, अभ्यासाच्या आणि कष्टाच्या बळावर प्रतिक्षा तोंडवलकर यांनी दहावीच्या परीक्षेत 60% मार्क मिळवले.

दहावीनंतर मात्र प्रतिक्षा तोंडवलकर यांनी मागे वळून पहिले नाही. आपल्या समोर असणारे स्वतःचे आणि आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर बँकेची परीक्षा उत्तीर्ण होणे महत्वाचे आहे हे त्यांना माहित होते आणि त्यासाठी 12वीची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे होते. काही वर्ष सफाई काम करून केलेल्या बचतीच्या आधारे मुंबईतल्या विक्रोळीतील एका रात्रशाळेत त्यांनी 12वी साठी प्रवेश घेतला. त्या शाळेतील मार्गदर्शन आणि बँकेतील सहकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे त्या सहज 12वी उत्तीर्ण झाल्या. 12 वी नंतर एका रात्रशाळेतच मनोविज्ञान या विषयात पदवी मिळवून त्या पदवीधरही झाल्या. 16 व्या वर्षी लग्न झाल्याने शिक्षणापासून दूर गेलेल्या प्रतिक्षाने आपल्या पतीच्या निधनानंतर स्वतःच्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि कष्टाच्या बळावर आता पदवीपर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले होते. यातूनच तिच्या आणि तिच्या मुलांसाठीच्या तिने पाहिलेल्या उज्वल भवितव्याच्या स्वप्नाला एक मार्ग मिळाला.

एका एकल मातेसाठी स्वतःचे शिक्षण पूर्ण करणे आणि आपल्या मुलाचे भविष्य घडवणे असे दोन मार्ग समोर असताना दोन्हींची निवड करून हे आव्हान यशस्वीरीत्या पेलणे सोपे नसते. समाज नेहमी तुमच्यावर स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करण्यासाठी एक अप्रत्यक्ष दबाव टाकत असतो आणि या दबावाचा सामना करत करत पुढे जाणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. नेहमी मला वाटायचे की आपण आपल्या केलेल्या या शिक्षणाच्या हट्टामुळे आपल्या मुलाचे तर काही नुकसान होणार नाही ना? पण शेवटी मी स्वतःलाच समजवायचे की मी जे काही करत आहे ते माझ्या मुलासाठीच करत आहे. पदवीनंतर ज्या बँकेत मी सफाई काम करत होते तिथेच मला कारकुनाची नोकरी मिळाली.

1993 मध्ये प्रतिक्षा यांनी प्रमोद तोंडवलकर यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नवऱ्याने त्यांना मग बँकिंगच्या परीक्षेस बसण्याचा आग्रह केला आणि विशेष म्हणजे त्यांच्या मुलाने देखील त्यांचे उर्वरित शिक्षणाचे आणि नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे 2004 मध्ये प्रतिक्षा तोंडवलकर यांना अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आणि आता त्यांना सहाय्यक व्यवस्थापक म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रतिक्षा तोंडवलकर यांच्या सेवानिवृत्तीला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे आणि त्यांनी 2021 मध्ये नॅच्युरोपथीचा एक कोर्स पूर्ण केलेला असल्याने निवृत्तीनंतर त्यांना या कोर्समध्ये मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे. बँकेत झाडू मारण्यापासून सरकारी बँकेच्या वरिष्ठ पदापर्यंत केलेला त्यांचा हा प्रवास नेहमी प्रेरणा देत राहील हे मात्र नक्की.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here