लढत लढत हौतात्म्य आलेल्या राणी लक्ष्मीबाई 

1857 च्या उठावात पोटच्या पोराला पाठीशी घेऊन इंग्रजांविरुद्ध लढता लढता हौतात्म्य आलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंची गोष्ट शतकानुशतके केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील महिलांना प्रेरणा देत राहील...

  • टीम बाईमाणूस 

झाशीची राणी लक्ष्मीबाई या अनेक स्वातंत्र्यसैनिकांसाठी युगानुयुगे प्रेरणादायी आहेत. 1857 च्या बंडाच्या वेळी त्यांच्या शौर्याला ठळकपणे दाखवण्यासाठी अनेक कविता रचल्या गेल्या आहेत. झाशीच्या राणीबद्दल अनेक देशभक्तीपर गीतेही लिहिली गेली आहेत. 

प्रारंभिक जीवन 

मणिकर्णिका तांबे यांचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी 19 नोव्हेंबर 1835 रोजी वाराणसी येथे झाला. वयाच्या चौथ्या वर्षी स्वतःची आई गमावल्यानंतर, लहानग्या माणिकर्णिकाचे संगोपन तिच्या वडिलांनी केले आणि त्यांच्याकडूनच तिने युद्धाचे कौशल्य आत्मसात केले. 1842 मध्ये, मणिकर्णिकेचा राजा गंगाधर राव यांच्याशी विवाह झाला आणि वाराणसीची मणिकर्णिका तांबे झाशीची राणी बनल्या आणि त्यावेळी त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवले गेले. त्यांनी 1851 मध्ये एका मुलाला जन्म दिला जो चार महिने पूर्ण झाल्यानंतरच मरण पावला. या जोडप्याने नंतर दामोदर राव नावाचा एक मुलगा दत्तक घेतला. 1853 मध्ये महाराजा गंगाधर राव यांचे निधन झाले आणि लक्ष्मीबाई एकट्या पडल्या पण 18 वर्षांच्या या शूर राणीने हिंमत गमावली नाही आणि त्या झांशीवर राज्य करत राहिल्या आणि ते करत असताना आपल्या मुलाचीदेखील काळजी घेतली.

त्यावेळी लॉर्ड डलहौसी भारताचे गव्हर्नर जनरल होते. इंग्रजांनी दामोदर राव यांना लक्ष्मीबाईंच्या गादीचा वारस म्हणून मान्यता दिली नाही आणि झाशीचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला. 1854 मध्ये डलहौसीने 60,000 रुपये वार्षिक पेन्शन जाहीर केले आणि राणी लक्ष्मीबाईंना झाशीचा किल्ला सोडण्यास सांगितले. पण कोणत्याही किंमतीत झाशी सोडायची नाही असा राणीचा निर्धार होता.

युद्ध हा एकमेव पर्याय आहे हे लक्षात आल्यानंतर या चपळ आणि चतुर राणीने स्वतःचे सैन्य गोळा केले आणि राज्यातील महिलांना युद्धासाठी प्रशिक्षित केले गेले. इंग्रजांपासून राज्याच्या स्वातंत्र्याविरुद्धच्या लढ्यात झाशीच्या लोकांनी आपल्या राणीला पाठिंबा दिला. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने 1858 मध्ये झाशीवर हल्ला केला आणि राणी लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखालील झाशीच्या सैन्याने या हल्ल्याचा कठोर प्रतिकार केला. झाशीचा पाडाव होण्यापूर्वी दोन आठवड्यांहून अधिक काळ ही लढाई सुरु होती.

ब्रिटीश सैन्य झाशीला पोचल्यावर राणी लक्ष्मीबाईंनी त्यांचा मुलगा दामोदर राव याला पाठीवर बांधून युद्धात प्रवेश केला. दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन राणीने हार मानली नाही आणि काल्पीच्या किल्ल्यावर जाताना अनेक शत्रू सैनिकांना ठार केले. ज्यात त्यांनी सहकारी बंडखोर तात्या टोपे आणि राव साहेब यांच्यासोबत युद्ध केले. या तिघांनी ग्वाल्हेरचा किल्ला काबीज केला आणि लूटमार करणाऱ्या ब्रिटीश सैन्यासमोर मोठे आव्हान उभे केले. अशा या शूरवीर राणी लक्ष्मीबाईंना लढत असताना कोटा-की-सराय येथे हौतात्म्य आले आणि त्यांच्या मृत्यूमुळे 1857 च्या उठावाचाही अंत झाला.

वारसा 

ब्रिटीश आर्मी कमांडर जनरल ह्यू रोज यांनी युद्धानंतर राणी लक्ष्मीबाईचे कौतुक केले. “भारतीय विद्रोहाने केवळ एक पुरुष निर्माण केला आणि तो पुरुष मात्र एक स्त्री होती,” असे तो म्हणाला.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here