रेल्वेच्या महिला ड्रायव्हर्सची अवस्था बिकट

कमी पाणी पिऊन किंवा सॅनिटरी पॅड वापरून करावी लागते ड्युटी

  • टीम बाईमाणूस

अमुक अमुक बनली देशाची पहिली महिला रेल्वे चालक… देशातल्या पहिल्या नमहिला लोकोपायलटला महिला सबलीकरणाचा पुरस्कार… अशा टाईपच्या बातम्या वेळोवेळी आपण वाचतच असतो आणि त्या वाचून आपल्याला अभिमानही वाटायला लागतो. परंतू पुढे काय…? देशातल्या या महिला लोकोपायलट्सना रेल्वे चालवताना कसा आणि किती त्रास पडतो याबद्दल काहीच बोललं जात नाही. भारतीय रेल्वेकडून लोकोपायलट्स (Loco Pilots) म्हणजेच रेल्वेच्या ड्रायव्हर्सची किती काळजी घेतली जाते, त्यांना कोणत्या सुविधा पुरवल्या जातात, याबाबतचा एक धक्कादायक रिपोर्ट समोर आलाय.

इंजिनमध्ये टॉयलेट्स नाहीत!

लोकोपायलट्ससाठी ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेटची सुविधा नाही. रिपोर्ट्सची आकडेवारी बघितली तर फक्त 97 ट्रेन लोकोमोटिव्हमध्ये टॉयलेटची सुविधा उपलब्ध आहे. एवढंच नव्हे तर अनेक स्थानकांवर रनिंग रुममध्येही महिलांसाठी वेगळी स्वच्छतागृहं नाहीत. रनिंग रूम म्हणजे लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट आणि माल गार्ड यांच्यासह कर्मचारी त्यांच्या होम स्टेशनशिवाय इतर स्टेशनवर ड्युटीच्या वेळेनंतर किंवा शिफ्ट दरम्यान विश्रांती घेतात ती खोली होय.

टीव्ही 9 हिंदी‘नं (TV9) दिलेल्या वृत्तानुसार इतर देशांच्या तुलनेत यूके, यूएस आणि युरोपमधील लोको पायलटना दर चार तासांनी 20-25 मिनिटांचा ब्रेक मिळतो. या भागात लोको पायलट आठवड्यातून 48 तास काम करतात. भारतात ही संख्या 54 तासांपर्यंत वाढते. भारतातील लोको पायलटच्या स्थितीवर प्रकश टाकणाऱ्या अहवालातून या सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत.

महिला लोकोपायटलच्या समस्या

‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेट नसल्यामुळे महिला ड्रायव्हर सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. काही महिला पाणी पिणं कमी करतात. काही महिला अपुऱ्या सुविधांना कंटाळून त्यांच्या स्वप्नांशी तडजोड करतात आणि ऑफिसमध्ये काम करण्याची ड्यूटी स्विकारतात. पुरुषांसाठीही अनेक सुविधांचा अभाव आहे; पण महिला चालकांना मासिक पाळीच्या काळात जास्त अडचणी येतात, त्यामुळे बहुतांश महिला पाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छतागृहांच्या अभावामुळे सुट्टी घेणं पसंत करतात.

कमी अंतराच्या गाड्या चालवणाऱ्या एका सहाय्यक लोको पायलटने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, ‘शौचालयांच्या नसण्याची समस्या पुरुष आणि महिला दोघांमध्ये सामान्य आहे. पण एक काम करणारी महिला म्हणून मला माझ्या प्रत्येक मासिक पाळीच्यावेळी ब्रेक घ्यावा लागतो, हे खूप अपमानास्पद वाटतं. त्या काळात वॉशरुमला न जाता ट्रेन चालवण्याची कल्पनाच करवत नाही. रेल्वेने कामाच्या वेळेबद्दल आणि आमच्या सुट्टीबद्दल सर्व व्यवस्था केली असली, तरी स्वच्छतागृहांची कमतरता ही रोजची लढाई झाली आहे. आम्हाला रोज कामावर जाताना या समस्येचा सामना करावा लागतो.’

आणखी एका ड्रायव्हर तरुणीने तिचा अनुभव सांगितला. तिला ट्रेन चालवण्याचे, अवघड प्रदेशात जाण्याचे आणि पश्चिम घाट रेल्वे मार्गावर आपले कौशल्य दाखवण्याचे बालपणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ट्रेन ड्रायव्हरची नोकरी मिळवली. पण तिच्या पाच वर्षांच्या नोकरीत तिचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये बसून जातो. कारण ट्रेनमध्ये टॉयलेट नाही, अशा परिस्थितीत गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यास तिला विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागेल अशी भीती तिला वाटते.

फक्त 97 इंजिनमध्ये बायो टॉयलेट

सहा वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांनी बायो-टॉयलेटने सुसज्ज पहिल्या लोकोमोटिव्हची सुरुवात केली होती. परंतु आतापर्यंत केवळ 97 बायो-टॉयलेट बसवण्यात आली आहेत, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेतील काही आकडेवारींवर नजर टाकल्यास, भारतीय रेल्वेकडे 14,000 हून अधिक डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह (Diesel Electric Locomotive) आहेत. तर देशभरातील 60,000 लोको पायलटपैकी सुमारे 1,000 महिला आहेत. यातील बहुसंख्य महिला लोको पायलट कमी अंतराच्या मालगाड्या चालवतात.

रेल्वेने एका निवेदनात म्हटलंय की, सततच्या मागणीनंतर 2013 मध्ये रेल्वे बजेटची घोषणा झाली त्यावेळी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सद्वारे (CLW) निर्मित इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हमध्ये वॉटर क्लोसेट (शौचालय) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आतापर्यंत फक्त 97 इलेक्ट्रिक लोकोमध्ये हे वॉटर क्लोसेट बसवण्यात आली आहेत.

सॅनेटरी पॅड वापरण्याची वेळ

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आणखी एक महिला लोको पायलट नाव न सांगण्याच्या अटीवर आपली व्यथा मांडली ती म्हणाली, ‘आमच्या अडचणी कमी नाहीत. यार्डमध्ये थांबणं, प्रवासाची तयारी करणं आणि त्यानंतर पाच ते सात तासांच्या दरम्यान 40 किलोमीटर प्रतितास वेगाने मालगाडी चालवावी लागते. यापैकी कोणत्याही ठिकाणी महिलांसाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे काहीतरी अनुचित होईल, अशा भीतीने मी सॅनिटरी पॅड वापरते.’

त्यांच्या दुसऱ्या महिला सहकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मालगाड्यांमध्ये टॉयलेटची सोय नाही. पण पॅसेंजर गाड्यांची अवस्थाही वाईटच आहे, कारण त्यांना टॉयलेट वापरण्यासाठी दुसऱ्या डब्यात चढण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

रेल्वेची पोकळ आश्वासनं

भारतीय रेल्वे लोको रनिंग मेन्स ऑर्गनायझेशनचे (IRLRO) माजी अध्यक्ष आलोक वर्मा यांनी या मुद्द्यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाशी (NHRC) संपर्क साधला. वर्मा म्हणाले, ‘रेल्वे लोको पायलट (स्त्री आणि पुरुष दोन्ही) यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवत आहे.’ यावर आयोगाला दिलेल्या उत्तरात, रेल्वेने सर्व गाड्यांमध्ये शौचालये बसवणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, एनएचआरसीच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.

एक लोको पायलट ड्रायव्हर म्हणून किमान 10-12 तास घालवतो आणि चालू प्रवासात त्याला आराम मिळण्याची शक्यता नाही. प्रवासाच्या वेळेत ते जेवत नाहीत किंवा टॉयलेटला जात नाहीत, हे अमानवी आहे. ज्या महिला लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट म्हणून भरती झाल्या आहेत त्या एकतर कार्यालयात बसतात किंवा मुख्यतः शौचालयांच्या कमतरतेमुळे लहान पल्ल्याचा प्रवास करतात. त्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पना करा, असं वर्मा म्हणाले होते.

लगेच तोडगा नाही!

ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनचे महासचिव एम.एन प्रसाद यांच्या मते, लोकोमोटिव्हमध्ये शौचालये बसवून घेण्याचा लढा खूप मोठा आहे. जास्तीत जास्त महिला या क्षेत्रात येत असल्याने स्वच्छतागृहे ही खरी गरज आहे. शौचालये नसणे हे सर्वच लोको पायलटसाठी त्रासदायक आहे, परंतु महिलांसाठी अधिक त्रासदायक आहे. आम्ही भारतीय रेल्वे प्रशासनावर याबद्दल दबाव आणत आहोत पण अजून त्यावर काहीही तोडगा निघाला नाही. ज्या स्थानकांवर पुरुषांसाठी रनिंग रुम्स आहेत त्या स्थानकांवरही महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत, असं प्रसाद म्हणाले.

तर दुसरीकडे महिला लोको पायलटना त्यांच्या सोयीनुसार ड्युटी सोपवण्यात येते आणि त्यांच्या सुविधांची काळजी घेतली जाते, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

2 Comments

  1. I’m often to blogging and i really appreciate your content. The article has actually peaks my interest. I’m going to bookmark your web site and maintain checking for brand spanking new information.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here