‘निखर गई निखत’

भारताच्या निखत झरीनने इस्तंबूल येथे झालेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अशी कामगिरी करणारी तेलंगणाची निखत पाचवी महिला भारतीय खेळाडू ठरली आहे.

टीम बाईमाणूस / २० मे २०२२ :

इस्तंबूल (istanbul) येथे झालेल्या १२ व्या जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग (boxing) स्पर्धेत भारताची कन्या निखत झरीनने (Nikhat Zareen) ५२ किलो कॅटेगरीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारी निखत भारताची पाचवी महिला बॉक्सिंग खेळाडू ठरली आहे. निखतने थायलंडच्या जितपोंग जुतामासचा गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात ५-० च्या फरकाने दारुण पराभव केला आहे. पाचही पंचांनी अनुक्रमे ३०-२७, २९-२८, २९-२८, ३०-२७, २९-२८ अशा गुणफरकाने निखतच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे एमसी मेरी कोम (२००२, २००५, २००६, २००८, २०१० आणि २०१८), सरिता देवी (२००६), जेनी आरएल (२००६) आणि लेखा केसी (२००६) यांच्यानंतर जगज्जेती भारतीय महिला बॉक्सिंगपटू बनण्याचा बहुमान तिने मिळवला आहे.

अंतिम सामन्यात निखतने अपेक्षेनुसार आक्रमक खेळ केला. तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत सुरुवातीपासून निखतने वर्चस्व प्रस्थापित केले. उपांत्य फेरीत तीन वेळा विश्वविजेत्या असणाऱ्या कझाकस्तानच्या झाइना शेकेर्बेकोव्हाचा पराभव करणाऱ्या जुतामासने आपल्या आक्रमणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, निखतने भक्कम बचाव करत तिचे आक्रमण परतवून लावले. दुसऱ्या फेरीतही २५ वर्षीय निखतने आपल्या उंचीचा फायदा घेतला. तिने प्रतिस्पर्धी जुतामासपासून अंतर ठेवले. त्यामुळे जुतामासने प्रतिहल्ला करण्याच्या प्रयत्नात चुका करण्यास सुरुवात केली. निखतने याचा फायदा घेत या फेरीतही बाजी मारली.

तिसऱ्या फेरीत आघाडीवर असूनही निखतने अधिक आक्रमकता दाखवली. त्यामुळे जुतामासला बचावावर भर देणे भाग पडले. निखतने समोरच्या दिशेने अचूक मुक्के मारत जुतामासवर दडपण टाकले. तिच्या आक्रमणापुढे जुतामासचा निभाव लागला नाही. अखेरीस निखत आणि जुतामास या दोघींनाही आपणच हा जिंकलो असा विश्वास होता. मात्र, सर्व पंचांनी निकाल निखतच्या बाजूने दिल्याने तिने सुवर्णपदक पटकावले.

कोण आहे निखत झरीन ?

nikhat zareen baimanus

तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे निखत झरीनचा जन्म झाला. सध्या हैदराबाद येथे पदवीचे शिक्षण घेत असलेल्या निखतने सुरुवातीला आपल्या वडिलांकडूनच बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले होते. निखतला 2009 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार विजेते IV राव यांच्या हाताखाली प्रशिक्षण देण्यासाठी विशाखापट्टणम येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सामील करण्यात आले. एक वर्षानंतर तिला 2010 मध्ये इरोड नॅशनलमध्ये ‘गोल्डन बेस्ट बॉक्सर’ म्हणून घोषित करण्यात आले.त्यानंतर दोन वर्षांपूर्वी बॉक्सिंग मध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल निखतला २०२० मध्ये तेलंगणाचे क्रीडा मंत्री श्रीनिवास गौड यांच्या हस्ते एक इलेक्ट्रिक स्कूटर आणि दहा हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले होते.

या स्पर्धेत भारतीय महिला चमूने याआधी तीन पदके पटकावली आहेत. निखतच्या आधी ५७ किलो कॅटेगरीमध्ये मनीषा आणि ६३ किलो कॅटेगरी मध्ये परवीनने ब्रॉन्झ पदकाची कामे केली आहे. ७३ देहामधून आलेल्या ३१० खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताला एकूण तीन पदके मिळाली. भारताच्या १२ पैकी आठ खेळाडूंना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत निखतने मिळवलेले हे सुवर्णपदक भारताचे दहावे सुवर्णपदक ठरले आहे. एकट्या एमसी मेरी कोमने तब्बल सहा सुवर्णपदके भारतासाठी मिळवून दिलेली आहेत. चीन आणि रशियानंतर भारताने जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत एकूण पदकांच्या बाबतीत तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here