- पूजा येवला
सर्कस ही आपल्याकडे केवळ मनोरंनाच्या दृष्टीकोनातूनच पहिली जाणारी कला आहे. मात्र त्यांच्या या कलेसाठी त्या कलाकारांनी घेतलेले कष्ट, मेहनत आणि त्यांच्या पडद्यामागच्या आयुष्याचा विचार कोणीही करत नाही. सर्कशीतल्या कलाकारांना कलाकार म्हणून न्याय मिळावा यासाठी सातत्याने मागील 12 वर्षांपासून काम करणारे नितीन सोनवणे यांची ही थोडक्यात मुलाखत…
प्रश्न : रॅम्बो सर्कस – द शो मस्ट गो ऑन या प्रोजेक्टवर काम करण्याचे का आणि कसे ठरवले?
लहानपणापासूनच मला सर्कस पाहण्याची आवड होती. पुढे पत्रकारितेत अॅज अ फोटोजर्नलिस्ट म्हणून मी कार्यरत झालो. त्यामुळे फोटो काढण्यासाठी मी नेहमी कुठेना कुठे जायचो, नेहमी उत्सुक असायचो. त्यात मला मुख्य आकर्षण होत ते सर्कसबद्दल कारण त्यामध्ये वाघ, हत्ती, उंट, घोडे या सारखे प्राणी आणि काही प्रमाणात लहान मुलांच्या कसरती प्रत्यक्षात पाहायला मिळायच्या. पहिला फोटो मी साधारणत: २५ वर्षापूर्वी काढला होता आणि तो होता सिंहाचा जो मुलीच्या खांद्यावर पाय देऊन उभा आहे.
बऱ्याच वेळेला पत्रकार असून सुद्धा सर्कस शूट करण्यासाठी परवानगी नसायची मग काही काळानंतर रॅम्बो सर्कस सोबत चांगल्या प्रकारे ओळख झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की पडद्यासमोरचं तर मी शूट करेनच पण मला पडद्यामागचं आयुष्य त्यांचं जीवन नेमकं ते कसे जगतात , कसे राहतात ते मला माझ्या कॅमेरामध्ये टिपायचं होतं म्हणून ह्या प्रोजेक्टवर काम करायचं असं ठरवलं .

प्रश्न : फोटोग्राफीसाठी रॅम्बो सर्कसच का निवडली? रॅम्बो सर्कसबद्दलचा तुमचा अनुभव
कारण याआधी अनेक सर्कशी येवून गेल्या मात्र रॅम्बो सर्कस कायम राहिली आणि ही सर्कस इतर सर्कस पेक्षा बरीच मोठी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली सर्कस आहे यात नॅशनल आर्टिस्टची संख्या पण बरीच आहे. तीन सर्कस मिळून एक सर्कस बनली आहे. यामध्ये जवळपास 300 ते 350 लोकं काम करतात. मी या सर्वांचे कष्ट खूप जवळून पाहिलेत. एकादिवशी या सर्वांचा व्यायाम खूप जवळून पाहिल्याने अधिक प्रेरित झालो होतो. ही लोक सकाळी 5 ला उठून जवळपास 11 ते 12 वाजेपर्यंत सलग व्यायाम करतात आणि प्रात्याक्षिक करतात. यातून प्रेरणा घेत मी देखील 21 किमी धावलो 40 किमी सायकल चालवली. आणि यांची मेहनत समजुन घेण्याचा प्रयत्न केला.
या माणसांना पाहून लोक खूप प्रेरित होतात. स्वतः च्या आयुष्यात देखील याचा फायदा होऊ शकतो जसा मी केला. ही लोकं एवढी दिवसभर व्यायाम करून सुद्धा संध्याकाळी होणाऱ्या एकापाठोपाठ शोसाठी ते पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभे राहतात. सर्कशीतले लोक फक्त टाळ्यांकरिता जगतात. टाळ्या हीच त्यांची उमेद असते. पण त्यांनाही सामान्य माणसांसारख्या भावना असतात, कुटुंब असतं, आयुष्य असते हे मी जाणलं मला त्याचं दुःख भावलं आणि या सर्वांमागे मी डोकावण्याचा प्रयत्न केला आणि ते सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत केलेलं हे सर्व काम आणि माझ्या लेखणीचा आणि कलेचा उपयोग मी समाजकार्यासाठी करतोय.
संबंधित वृत्त :

प्रश्न : सर्कशीच्या कलाकारांच्या आयुष्याबद्दल काय सांगाल?
आपण गायकाला गायक, लोककलाकारांना लोककलाकार, सिनेमातल्या लोकांना अभिनेते मानतो परंतू सर्कशीतल्या लोकांना काहीच मान दिला जात नाही, त्यांना कुठल्याही सुखसुविधा सरकारमार्फत पुरविल्या जात नाही आपल्याकडील लोक त्यांना कलाकार देखील मानत नाही या लोकांनाही हाडाचा कलाकार म्हणून मान्यता मिळावी यासाठी मी काम करतोय.
प्रश्न : एकीकडे 5G चे युग, प्रेक्षकांच्या बदलेल्या अभिरुची, सर्कशीचे बिगडलेले आर्थिक गणित, कोरोनानंतरचा काळ या सगळ्यातून हा शो ऑन कसा राहू शकेल?
सर्कस टिकून राहणार. जुनी फॅशन पुन्हा आलीये दागिणे, कपडे हे पुन्हा बाजारात भाव खाऊन जाताय. तसचं पुन्हा सर्कसला प्रतिसाद मिळणार. सध्याच्या काळात मनोरंजनाची साधनं इतकी वाढलीयेत की लोकांना आता लोककला नकोशा झाल्या आहेत, टीव्ही वरचे शो लोक जास्त पसंत करतात पण काही मार्ग निघत लोक संस्कृती जपायला लागतील ” कधीतरी लोकांना परत आपल्या संस्कृती पहायला नक्की आवडणार.
भारत सोडून इतर देशातील सर्कशीतले लोक राजा- सारखे नटतात. त्या ठिकाणी कैक शाळा आहेत ज्या सर्कशीच धडे देतात (शिकवतात). पण भारतात तसं काहीच नाही म्हणून इथे सर्कस मागे पडली आहे. पण तरीदेखील रॅम्बो सर्कस सारखी काही लोक सर्कस पुढे नेतायेत रॅम्बो सारख्यांमुळे हा वारसा नक्कीच पुढे सुरू राहिल .

प्रश्न : इतक्या वर्षानंतर आता सर्कशीत नेमके काय बदल झालेत ?
सर्वात मोठा बदल हा 2013 मध्ये झाला लहान मुलांना आणि जनावरांना त्यातून काढण्यात आलं, या मुळे लहान मुलांचा प्रेक्षक म्हणून वर्ग कमी झाला कारण हे सर्कशीतले मुख्य आकर्षण होतं. जिम्नास्टिक, athletics, तारेवरच्या कसरती, डान्स ,कपड्यातील कॉम्बो अशा काही गोष्टी आहेत ज्या अजुन ही कालबाह्य झालेल्या नाहीत, त्यामुळे सर्कस अजूनही जीवंत आहे. सर्कसमध्ये कुठलाही रिटेक नसतो. ती वन टेक मध्ये असते. त्यामुळे सर्कसमध्ये जिवंतपणा आहे हाच जिवंतपणा लोकांना भावतो, डोळ्याचे पारणे फिरवणाऱ्या कसरती आहेत. आता लोकांना त्यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते म्हणून ती लोक सर्कस पाहण्यास आवर्जून जातात.

प्रश्न : या प्रकारे प्रदर्शन भरविण्यामागचा उद्देश काय होता?
सर्कशीतला कलाकार जिवंत राहावा, सर्कस जिवंत राहावी सर्कस कधीही लोप पावू नये, सर्कस जगावी, सर्कशीच महत्त्व पुन्हा वाढावं, त्या लोकांची मेहनत, कसरत पाहून लोकांनी प्रेरणा घ्यावी, सद्य परिस्थितीती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी ते करतोय. सर्कशीतला कलाकार काय आहे हे सर्वांना समजावं आणि त्याचे महत्त्व अधिकाधिक वाढावे हा मुख्य हेतू होता . त्यांचं संघर्षमय जीवन माझ्या माध्यमातून समोर याव आणि या कलाकारांना काहीतरी मदत समाजातून मिळावी हाच प्रयत्न आहे.