- संजना खंडारे
65 वर्षांपासून ज्यांनी कलेची अविरत सेवा केली त्या मंगला बनसोडे यांच्या नातींनी शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक नात एम.डी. पर्यंत शिक्षण घेऊन डॉक्टर झाली आहे, तर दुसरी पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. या दोघींवितिरिक्त आणखी एक नात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, तर एक फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे. एम. डी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या माधुरी खैरमोडे या लग्नानंतर आता मुंबई येथे प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचे पतीदेखील डॉक्टर आहेत. दुसरी नात दीक्षा बनसोडे यांनी कऱ्हाड येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर ती आता पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.
मंगला बनसोडेंचे वय 72 पण आजही त्या पायात घुंगरू बांधून आठ आठ महिने दौऱ्यावर असतात. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या त्या कन्या आहेत, त्यांना महाराष्ट्र सरकारकडून विठाबाई नारायणगावकर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा मुलगा नितीन त्यांच्यासोबत काम करतो. तो त्यांच्या कुटुंबातील पाचव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो. असे म्हटले जाते की महाराष्ट्रातील तमाशा फडाच्या त्या एकमेव महिला मालक आहेत. लोकनाट्य तमाशा मंडळ असे त्यांच्या तमाशा फडाचे नाव आहे. कराडजवळील करवडी गावाच्या रहिवासी आहे. त्यांच्या फडात दीडशे लोक काम करतात.
प्रश्न : पुढच्या पिढीला शिकवण्याचा निर्धार तुम्ही नेमका का केला?
- हा निर्णय यासाठी घेतला की सध्याच्या काळात शिक्षणाशिवाय आयुष्याला महत्व नाही आणि त्यासोबतच प्रेक्षकही पहिल्यासारखे राहिलेले नाहीत. मोबाइलमुळं बरीच लोकं तमाशा बघायला येत नाहीत आणि गेली पाच वर्षे आम्ही तमाशा फडात राहून प्रेक्षकांची, लोकांची, समाजाची सेवाच केली की हो , कला लोकांपर्यंत पोहचवली, लोककला जिवंत ठेवली. आता आमच्या समोरच्या पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी. आता माझी नात मुंबईला डॉक्टर आहे ती रुग्णांची सेवा करते. एक नात स्पर्धा परीक्षेची पुण्याला तयारी करतीये ती अधिकारी होऊन समाजासाठी, लोकांसाठी काम करेल.
प्रश्न : लोककलावंतांच्या मुलांना शिक्षण घेताना काय अडचणी यावर अनेकदा बोलल जात पण पालकांना त्यांच्या मुलांना शिकवताना नेमक्या काय अडचणी येतात?
- पुष्कळ अडचणी येतात. एक तर आम्ही शिक्षण घेतलं नसल्याकारणाने आम्हाला त्यातलं काही कळत नाही. पण कळत नसलं म्हणून काय झालं, शिक्षणाला आयुष्यात किती महत्व आहे हे माहितीये. पोरींना लहानपणी शाळेत टाकायच तेव्हा पुरेसे पैसे नसायचे तिथे शाळेत हाता पाय पडून पोरींना शाळेत टाकलं. पैश्यामुळे हाल असायचे पण पोरींना शिकवयच म्हणून तमाशा फडात जाणे सोडले नाही. गेल्या पाच पिढ्या आमच्या तमाशा फडात काम करतात. आता ही सहावी पिढी आहे माझी दोन मुलं इंजिनिअर आहेत.

प्रश्न : असा एखादा प्रसंग आहे का की जेंव्हा तुम्हाला तुमच्या नातवंडाना आणि मुलांना शिकवताना अडचण आली असेल किंवा लक्षात राहिला असेल?
- अडचणी अनेक आल्यात. जेव्हा नातीला पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी पाठवायचं होत तेव्हा तिथे राहायला हॉस्टेल पण चांगले पाहिजे ना. हॉस्टेल ची फी भरपूर असायची. 2 दिवस पुण्यात फिरलो मग एक खोली सापडली त्या खोलीत ती भाड्याने राहिली. नाचून कष्ट करून पोरांची शिक्षण केली. याव्यतिरिक्त दुसरीकडून कुठून पैसे नाही . तमाशा मधून जो मिळेल तो पैसे त्यात घर चालवायचं मुलांना शिकवायचं.
प्रश्न : लोककलावंतांच्या मुलांसाठी कोणती सरकारी योजना, शासकीय मदत मिळते का?
- अजिबात नाही. कोणतीही सरकारी योजना लोकलावंतांच्या मुलांसाठी आजपर्यंत तरी नाही. एवढंच काय तर कोरोना काळात घरी बसून होतो. पैसे कुठून येणार धंदा बंद सगळंच बंद. रुपया सुद्धा कोणी मदत केली नाही. सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या, मंत्र्यांना पत्र पाठवले. त्यांनी काय फक्त तेव्हाही आश्वासन दिले फक्त. कलावंतांचे त्यांच्या कुटुंबांचे खूप हाल झाले तेव्हा.
प्रश्न : लोककलावंतांनी पुढच्या पिढीला नेमके का शिकवले पाहिजे?
- एक तर शिक्षण गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात लोककला लोप पावत चाललीये. आता लग्नामध्ये बँड बाजा असतो, काही कार्यक्रमांमध्ये आर्केस्ट्रा असतो. लावण्या असतात. त्यामुळे मी म्हणते लोकलावंतांच्या मुलांनी त्यांच्या पोरांना शिकवलं पाहिजे. कोणी मास्तर होईल, कोणी इंजिनिअर होईल, कोणी काही होईल. पण शिकवलं पाहिजे.
प्रश्न : लोककलेला आधी काय महत्व होतं आणि आताचे प्रेक्षक तेवढाच मान आज कलेला देतात का?
- आताच्या आणि आधीच्या प्रेक्षकांमध्ये खूप फरक आहे. सातव्या वर्ष पासून मी या क्षेत्रात काम करते, कलेची सेवा करते, खूप दौरे केले, कोणता प्रेक्षक कसा हे त्याच्या एका नजरेने कळायचं. पण त्या काळात कलेला खूप प्राधान्य दिल जायचं. त्या कलेचा मान राखला जायचा. पण आता कला नाही तर एक सुंदर दिसणारी मॉडेल पाहिजे. पण मी लोककलेला जिवंत ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. आजही करतीये. आज मी 72 वर्षांची आहे तरी ही नाचते. मला माझ्या कलेने दिलेला हा आशीर्वाद आहे. की आजही त्याच जोमाने मी पायात घुंगरू बांधून स्टेज वर जाते. ज्या कलेने मला आजपर्यंत जगवलं त्या कलेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करेल.