केरळ, सिनेमा आणि सेक्स स्कॅन्डल…

हेमा कमिटीचा अहवाल सार्वजनिक कधी करणार? हा एकच सवाल केरळातल्या फिल्म सर्किटमध्ये सध्या विचारला जातोय. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत महिलांचं होणारे लैंगिक शौषण यासंदर्भात 2017 ला हेमा कमिटी स्थापन करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या कमिटीनं आपला रिपोर्ट मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना सादर केला. पण अजूनही तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही. गोपनियतेचे कारण पुढे करत सरकारने हा अहवाल जाहीर करण्यास नकार दिला आहे. त्यावरून आता केरळातल्या फिल्म इंडस्ट्रीत मोठं वादळ आलंय. अनेक आघाडीच्या अभिनेत्री आता पुढे आल्यात. त्यांनी झालेल्या लैंगिक छळाला सोशल मीडिया, टेलिव्हिजन डिबेटवरुन वाचा फोडलीय. कमिटीचे सदस्यही माध्यमामध्ये आपलं मत व्यक्त करतायत. यामुळं वातावरण आणखी तापलंय.

  • नरेंद्र बंडबे

ओटीटी प्लॅटफॉर्मवर केरळाच्या सिनेमांची मागणी वाढलेय. यावर्षाच्या सुरूवातीला जो बाबीच्या “द ग्रेट इंडियन किचन’ (२०२१) या सिनेमानं धुव्वा उडवला. स्क्रिन तर गाजवलीच पण समाजात एक ढवळाढवळ करुन टाकली. चूल आणि मूल यापलिकडे स्त्रियांकडे पाहण्याचं मत या सिनेमानं बनवलं. फेमिनिस्ट अप्रोच लोकांना आवडला. सोशल मीडियावर पोस्टी पडल्या, वृत्तपत्रांचे रकाने भरले आणि टेलिव्हिजनवर जोरदार चर्चा झाल्या. ही झाली सिनेमातली गोष्ट…पण तिथल्या सिनेमाक्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचं काय? हा प्रश्न सध्या केरळातल्या सोशल मीडियावर गाजतोय. कारण आहे २०१७ ला झालेली एका अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचाराची घटना, पाच वर्षांनंतर न्यायासाठी लढणारी ती अभिनेत्री, आणि सिनेमातल्या महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारासंदर्भात नेमलेल्या जस्टिस हेमा समितीचा अहवाल तयार असूनही जाहीर न करणे आणि अहवालावर सरकारचं चिडीचूप राहणं. आता तर या अहवालावर अभ्यास करण्यासाठी एक कमिटीची स्थापना झाली आहे. तिच्यात एकही महिला सदस्य नाही. यावरुन केरळात मोठा गदारोळ सुरु आहे.

अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करून धावत्या गाडीतून फेकले

घटना फेब्रुवारी २०१७ची आहे. कोचीपासून काही किलोमीटरची. धावत्या गाडीतून एका महिलेला फेकण्यात आलं. तिची अवस्था पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याचं स्पष्ट दिसत होतं. जखमी अवस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं तिनं जो जवाब दिला त्यानं केरळाच्या फिल्म इंडस्ट्रीत बाँब फुटला. आघाडीचा अभिनेता दिलीप आणि इतर चार जणांची नावं या अभिनेत्रीनं घेतली. दिलीपने धावत्या गाडीत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. बाकीचे लोकही त्याला साथ देत होते. एव्हढचं नव्हे तर हे सर्व मोबाईलवर रेकॉर्ड करत होते. हसत होते. किंचाळत होते. ती जुमानत नाही दिसल्यावर त्या लोकांनी तिला भरधाव गाडीतून बाहेर फेकून दिलं. कित्येक तास ती जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होती. आसपासच्या गाववाल्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये आणलं.
या घटनेला आज पाच वर्षे झालीत. “निर्भया’च्या घटनेमुळं वातावरण तापलेलं असताना हे घडलं होतं. दिलीप आणि त्याच्या चार मित्रांना कठोर शिक्षा होणं अपेक्षित होतं. पण तसं काहीच घडलं नाही. दिलीपला जामीन मिळाला. या अभिनेत्रीविरोधात वातावरण तयार झालं. तिची इमेज पध्दतशीरपणे ठरवून खराब करण्यात आली. आज ही ती न्यायासाठी लढतेय.

केरळच्या अभिनेत्री एकवटल्या

या घटनेनंतर एक गोष्ट घडली… केरळातल्या महिला संघटना एकवटल्या. सरकारवर दबाव आला. केरळ फिल्म इंडस्ट्रीत महिलांचे लैंगिक शोषण होतंय, त्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव टाकला गेला. जस्टीस के. हेमा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय कमिटी स्थापन झाली. या कमिटीनं सुमारे दोन वर्षे मल्याळम सिनेमात काम करणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री, साईड एक्ट्रेस, मॉबमध्ये काम करणाऱ्या, महिला टेक्निशियन्स या सर्वांच्या मुलाखती घेतल्या. 31 डिसेंबर 2019ला या हेमा कमिटीनं आपला अहवाल मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना सादर केला. तेव्हापासून आत्तापर्यंत हा अहवाल सरकारी कपाटात सीलबंद पडून आहे. तो उघडण्याची हिम्मत मुख्यमंत्री पिनाराई विजयन दाखवत नाहीयेत. गोपनियतेचे कारण देऊन हा अहवाल उघड करता येणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याने “वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह’ ही संघटना प्रचंड चिडली आहे.

हेमा समितीचा अहवाल जाहीर करण्यास सरकारचा नकार

जुलै २०१७ ला केरळात “वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह’ या संस्थेची स्थापना झाली. सिनेमा क्षेत्रातल्या महिलांच्या हक्कांसाठी ही संस्था काम करते. सिनेमा क्षेत्रातल्या आघाडीच्या अभिनेत्री, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि काही मोज़के निर्माते हे या संस्थेत आहेत. मल्याळम सिनेमाक्षेत्रात अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणावर हेमा कमिटी नेमणूक करण्यात या संस्थेची भूमिका महत्त्वाची ठरली. सरकारनेही लगेच समिती स्थापन केली. आता वाटलं त्या पिडीत अभिनेत्रीला लगेच न्याय मिळणार. कमिटीसमोर येणारी ती एकटी नव्हती. तर असंख्य आघाडीच्या अभिनेत्रींनी आपबिती सांगितली. या सर्वांची नावं गुप्त ठेवण्यात आली. आता हे लैंगिक अत्याचार करणाऱ्या लोकांची खैर नाही असं वाटत होतं. पण झालं भलतंच. कमिटीनं काम केलं. व्हिडीयो जाब नोंदवले. यात महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच शुटींगच्या जागी महिलांना स्वतंत्र चेंजिंग रुम, टॉयलेट-बाथरुम सहित त्यांना महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं मानधन मिळावं अशा मागण्या करण्यात आल्या. कमिटीने रिपोर्टही वेळेत दिला. पण पुढे काहीच घडलं नाही. जेव्हढ्या वेगानं वातावरण तापलं होत त्याच वेगानं ते थंड झालं. शांत झालं.
“वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह’च्या सदस्य अभिनेत्रींना टार्गेट करण्यात आलं. त्यांना काम मिळेनासं झालं. जर तुम्ही या संस्थेशी सलग्न असाल तर काम मिळणार नाही, असं अभिनेत्रींना सांगण्यात आलं. केरळातल्या अभिनेत्रींनी यातून ही मार्ग काढला. संस्थेत एक्टिव्ह असलेली राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेती अभिनेत्री पार्वती थिरुवोथु म्हणते, “ दोन अभिनेत्री एकत्र येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. अगदी योजनाबध्द पध्दतीनं त्यांना बाजूला करण्यात आलं. शुटींगच्या ठिकाणीही असाच अनुभव यायला लागला. शिवाय डबिंग किंवा मग पोस्ट प्रोडक्शनच्यावेळी त्या अभिनेत्रींना कशी वेगवेगळी वेळ देता येईल याची काळजी घेण्यात आली. मग आम्ही यावर ही तोडगा काढला. एक क्लोज ग्रुप बनवला. त्यात आपापले अनुभव अभिनेत्रींनी शेअर केले. नवीन अभिनेत्रीलाही त्यात घेण्यात आलं. मग तिच्या सहकारी अभिनेत्याबद्दलची सर्व माहिती दिली जायची. काय काळजी घ्यायची, कसं डिल करायचं हे सर्व तिला सांगण्यात यायचं, हे सर्व गुपचुप होत होतं. अगदी कुणालाही त्याचा थांगपत्ता लागायचा नाही. तरीही अनेकजणींचं लैगिंक शोषण झालंच. एव्हढी काळजी घेऊनही त्या बळी पडल्या. यावरुन तुम्हाला लक्षात येईल की, इथं कसं पध्दतशीरपणे सेक्स रॅकेट कार्यरत आहेत. जे मोठमोठे सुपरस्टार आता रिएक्शन देत सुटलेत तेच या रॅकेटमध्ये आहेत. तेच ते चालवात. आम्ही याविरोधातच लढतोय ”
हे सर्व घडण्यामागे अनेक कारणं आहेत.पार्वथी आणि इतर अभिनेत्रींच्या मते मल्याळम इंडस्ट्रीतले प्रोडक्शन हाऊस हे सर्व सुपरस्टार यांच्या मालकीचे आहे. जे त्यांच्या मालकीचे नाहीत त्यांना कंट्रोल हे सुपरस्टारच करतात. काही सुपरस्टार्सनी तर इतकं तर दिलं आता या महिलांना नक्की काय काय हवंय, असं वक्तव्य केलं. अश्याच एका वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महिलांनी सुपरस्टार मामुटीच्या घराबाहेर मोर्चा काढला. यानंही परिस्थिती सुधारली नाही. ती आणखी चिघळत गेली. एक दोन सिनेमा चालले की त्या अभिनेत्रीला पध्दतशीरपणे बाजूला करण्यात येऊ लागले. तिचं मानधन तंगवणं, प्रमोशनमधून गायब करणं असं सर्व भयंकर घडू लागलं.

सुपरस्टार दिलीप आरोपीच्या पिंजऱ्यात

२०१७ ला घडलेल्या अत्याचाराच्या घटनेला आता नवं वळण मिळालंय. या प्रकरणी एक नवा साक्षीदार नव्या पुराव्यांसहित पुढे आलाय. घटनेनंतर अभिनेता दिलीपच्या घरी सर्व आरोपी एकत्र होते. टिव्हीवर तपास करणाऱ्या पोलीसांची प्रेस कॉन्फरेन्स सुरु होती. त्यातल्या पोलीसाला ट्रकखाली चिरडण्याची भाषा दिलीप आणि इतर आरोपी करत होते. याचं ऑडियो रेकॉर्डीग या साक्षीदारानं केलं होतं. अनेक वर्षांनंतर तो हिम्मत करुन पुढे आलाय. दिलीप विरोधात पोलीसांना एफआयआर केला. दिलीप सध्या त्यासाठी एन्टिसिपेटरी बेल मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. या पाच वर्षांच्या कालावधीत जेलमधून बाहेर आलेल्या दिलीपला सिनेमे मिळाले. ते सुपरहिटही झाले. पीडित अभिनेत्री मात्र अजूनही झगडतेय.
एकीकडे न्याय मिळत नाही म्हणून तिला साथ देणारे वकीलांनी केस सोडलीये. केस स्थानिक पोलीसांकडून क्राईम ब्रान्चकडे आली. आता तिनं सोशल मीडियाचा सहारा घेतला. तिच्या इन्स्टापोस्टमध्ये ती म्हणतेे. ” पाच वर्ष संघर्ष सुरुच आहे. या कालावधीत मी पिडितेपासून बचावलेली महिला ठरले. मी न केलेल्या गुन्ह्यामुळे माझी ओळख, माझी शक्ती सर्व हिरावून घेतली. आता न्याय मिऴेल असं वाटतं. माझ्यासारख्या अनेकजणी आहेत. त्या पुढे येत आहेत. माझ्या या संघर्षात जे बाजूने उभे राहिले त्या सर्वांचे आभार.”

तिच्या या पोस्टला सोशल मी़डियातून उचलून धरण्यात आलंय. पुन्हा वातावरण तयार झालंय. हेमा कमिटीचा अहवाल का लपवताय हे सरकारला विचारण्यात येतंय. सरकारनं पुन्हा एक नवी कमिटी नेमलीय. राज्याच्या सिनेमा क्षेत्रासाठी केरळा चलचित्र अकादमी स्थापन करण्यात आलीय. त्या अकादमीतूनही आता निषेधाचे सूर निघतायत. हा रिपोर्ट सार्वजनिक करायला सरकार का घाबरतंय? असा सवाल येतोय. जर सरकार वेळ लावत असेल तर फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या त्या पिडीत महिलांना तरी या रिपोर्टची कॉपी मिळावी अशी मागणी जोर धरलेय. दुसरीकडे महिलांनी आता या अन्यायाविरोधात शड्डू ठोकलाय. वुमन इन सिनेमा कलेक्टीव्हनं कोर्टात रिट याचिका दाखल केलीय. यात महिलांना समान वेतन आणि समान वागणूक या मुद्द्यावर जोर दिलाय. त्या याचिकेवर रोज नवीन तारीख पडत आहे.
“पितृसत्ताक समाजात आणि पुरुषी इंडस्ट्रीत आम्हाला न्याय कधी मिळेल हे सांगता येणार नाही. पण आमचं म्हणणं तर लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. हवा बदलायला हवी. त्यासाठीच ही धडपड सुरु आहे. त्या पिडीतेप्रमाणेच आम्हीही आस धरुन आहोत. एक दिवस न्याय जरुर मिळेल.” असं पार्वथीचं म्हणणं आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here