एक अज्ञात प्रेमकहानी

गाविलगड सुमारे एक हजार वर्षांच्या सार्‍या आठवणी आपल्या अंगाखांद्यावर जोपासत मेळघाटातल्या वनराईत सरदार बेणिसिंहाच्या शौर्यगाथांची उजळणी, सुभेदारीणीचा तिच्या मैत्रिणींसह जोहार, त्या दोघांच्या हौतात्म्यातील कारुण्य, संभाजी, राजारामाच्या झुंजीची प्रशंसा आणि परसोजी भोसल्यांच्या मुत्सद्देगिरीच्या अनेक गोष्टी अद्यापही आपल्या काळजाच्या काजळी कोपर्‍यात सांभाळून उभा आहे

रणजितसिंग राजपूत

मोगलकालीन यावनी इतिहासात, महाराणी पद्मिनीपासून राजपूत स्त्रियांचे जोहार प्रसिद्ध आहेत. परकीयांच्या हातून अब्रू लुटली जाणे यापेक्षा पतिनिधनापूर्वीच रचून ठेवलेल्या धगधगत्या चितेमध्ये उड्या घेऊन आपली जीवनयात्रा संपविणे भारतीय विशेषत: राजपूत स्त्रियांनी पत्करले. राजपूत स्त्रियांच्या सतीत्वाला मोगलकाळात राजा मानसिंहच्या बहिणीशी विवाह करून अकबराने छेद देण्याचा प्रयत्न केला. अव्वल इंग्रजी अमदानीत सती परंपरा चालू असली तरी ‘जोहार’ झाल्याचे ऐकिवात नाही. सरदार बेणिसिंह आणि गाविलगड मात्र याला अपवाद ठरला. बेणिसिंह आणि त्याच्या राणीची प्रेमगाथा कुठेकुठे राजपूत काव्यात उमटली आहे. विदर्भाच्या उपलब्ध इतिहासात बेणिसिंहाच्या पत्नीचे नक्की नावही समजत नाही. परंतु 1803मध्ये म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला गाविलगडाने राजपूत स्त्रियांचा जोहार प्रत्यक्ष अनुभवला.

इंग्रजांनी गाविलगडाची मोहीम सुरू केल्यानंतर बेणिसिंहाने 12 डिसेंबर 1803 पासून गडावरील खजिना, चीजवस्तू, स्त्रिया व बालके यांची नरनाळ्यावर रवानगी करणे सुरू केले. अपवाद होता तो त्याच्या पत्नीचा आणि तिच्यासोबत तिच्या 13 पतिनिष्ठ मैत्रिणींचा. अखेरपर्यंत पती सहवास सोडायचा नाही, अशी शपथ घेतलेल्या या स्त्रियांनी गाविलगड सोडला नाही आणि 15 डिसेंबर 1803 रोजी बेणिसिंहाने कर्नल स्टीव्हन्सनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सूर्योदयापूर्वीपासून भडकलेल्या 14 चितांच्या ज्वाळांनी गाविलगडावरील सूर्योदय झाकोळून टाकला होता. आपापल्या पतिदेवांची चरणधूळ घेऊन या वेळी 14 राजपूत स्त्रियांनी या भडकत्या चितांवर स्वत:ला झोकून दिले. त्या वेळी कोठलेही धार्मिक संस्कार झाले नाहीत. तो जोहार होता. किल्ला सर करून ब्रिटिश सैनिकांनी दिल्ली दरवाजातून आत प्रवेश करताच त्यांना धगधगत्या चितांवर जळणारी प्रेतं दिसली. दिल्ली दरवाजा उघडण्यापूर्वी हे सारे घडले. एकंदर 14 स्त्रियांनी जोहार पत्करला. त्यापैकी चार स्त्रियांचा जळून मृत्यू झाला.

या जोहाराची व बेणिसिंहाच्या पराक्रमाची नोंद ब्रिटिश अधिकारी जस्पर निकोलस याने आपल्या डायरीत करून ठेवली आहे. देवगावच्या वाटाघाटीनुसार गाविलगड भोसल्यांच्या ताब्यात राहिला. त्यामुळे तेथे या सतींची स्मृती म्हणून वृंदावने बांधण्यात आली. आज मात्र त्या पवित्र समाध्या निराधार अवस्थेतही आपल्या इतिहासाची वीरगाथा सांभाळून गाविलगडावर उभ्या आहेत. ही वृंदावने काही वर्षे गडावर होती. सेनापती तात्या टोपेंच्या भीतीने इंग्रजांनी 1857 नंतर गाविलगड उद्ध्वस्त केला. काही वृंदावने मात्र इंग्रजांनी उद्ध्वस्त केली नाहीत. ती आजही ढासळलेल्या स्थितीत दिल्ली दरवाजावर शाबूत आहेत. इतिहासाने नोंद घेतली असली, तरी 19व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजी साम्राज्याविरुद्ध आलेला हा ‘जोहार’ इंग्रजांना मानवणारा नव्हता. इंग्रजांनी या घटनेला महत्त्व मिळू नये, यासाठी धडपड केली. बेणिसिंहाच्या पत्नीचा आणि तिच्या मैत्रिणींचा जोहार त्यामुळे मुका आणि अनुल्लेखित राहिला. त्यासोबतच बेणिसिंहाची प्रेमकहाणी अज्ञात आणि मुकी राहिली.

गाविलगडाच्या मोहिमेत इंग्रजांना घटांग मार्गे लबाडे या गावांचा रस्ता मिळाला आणि अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांवरील एक विशिष्ट उंचीही ब्रिटिशांना उपलब्ध झाली. गाविलगडाच्या पाडावापूर्वी चिखलदरा अस्तित्वात होते काय? परंतु संपूर्ण मेळघाटातील वनविश्रामगृहांची स्थिती पाहिल्यास 18व्या शतकाच्या उत्तरार्धातील एक-दोन सोडल्यास सारी ब्रिटिशकालीन विश्रामगृहे सन 1803नंतर बांधलेली आढळतात. गाविलगडाच्या पाडावानंतर ब्रिटिशांनी चिखलदर्‍याला थंड हवेचे ठिकाण बनविले, उद्ध्वस्त गाविलगड उपेक्षित राहू दिला. गाविलगडाची भव्य वास्तू आणि सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास पाहिल्यास गाविलगडाचे संरक्षण केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आले.

थंड हवेचे ठिकाण आणि विदर्भातील एकमेव हिलस्टेशन म्हणून चिखलदर्‍याचा विकास करताना 17 डिसेंबर 1803 रोजी ताब्यात आलेल्या गाविलगडाची भीती कदाचित त्याच्या भव्य, भक्कम, विस्तीर्ण आणि मर्दानी सौंदर्यामुळेच ब्रिटिशांना पुन्हा एकदा 1857च्या समरप्रसंगी वाटू लागली आणि सुमारे 12 ते 13 किलोमीटर परिघाचा गाविलगड, जेवढा शक्य होता तेवढा ब्रिटिश महाभागांनी तोडून टाकला. काही चांगल्या, काही उद्ध्वस्त आणि आपल्या मर्दानी भक्कमपणाचे अवशेष अंगाखांद्यावर मिरविणारे गाविलगडाचे हे ‘किल्ले पठार’ आजच्या परिस्थितीत वनसौंदर्य आणि इतिहासाची साक्ष देणार्‍या एका वेगळ्याच, परंतु काहीशा उदासीन, काहीशा विराण आणि इतिहास व वास्तव यांची साखळी व नाळ तुटलेल्या संदर्भासहित अत्यंत अगतिक आणि संवेदनशून्य पर्यटनाची निरर्थकता प्रकट करत आहे.

भारताच्या पुरातत्त्व आणि पुराणवस्तू संशोधन विभागाने गाविलगडाकडे विशेष लक्ष देण्याची घोषणा मधल्या काळात केली. संपूर्ण देशाचे सांस्कृतिक संचित हा विभाग सांभाळत असल्यामुळे अत्यंत दुर्गम स्मारके आपला तोल तारेवरच्या कसरतीसारखा सांभाळताना दिसतात. सुमारे एक हजार वर्षांच्या सार्‍या आठवणी आपल्या अंगाखांद्यावर जोपासत मेळघाटातल्या वनराईत सरदार बेणिसिंहाच्या शौर्यगाथांची उजळणी, सुभेदारीणीचा तिच्या मैत्रिणींसह जोहार, त्या दोघांच्या हौतात्म्यातील कारुण्य, संभाजी, राजारामाच्या झुंजीची प्रशंसा आणि परसोजी भोसल्यांच्या मुत्सद्देगिरीच्या अनेक गोष्टी अद्यापही आपल्या काळजाच्या काजळी कोपर्‍यात सांभाळून उभा आहे. गाविलगडाच्या अंतर्यामातील ही साद एका सुंदर सत्यात परावर्तित होईल. तोपर्यंत त्याने कोसळू नये, एवढीच एक अपेक्षा गाविलगडप्रेमी सध्या करत आहेत!

संपर्क – 9422785555
ranjitrajput5555@ranjitrajpur

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here