- अनिल साबळे
वसतिगृहांच्या आठवणी सांगताना मुलं मला म्हणायची, आम्हांला डोळे बांधलेल्या मांजरीसारखं एसटीनं वसतिगृहांत सोडलं जायचं. तेव्हा आमचं गाव कुठं राहिलंय हे काहीच कळत नसायचं. तेव्हा आम्ही नदीकाठानं घराकडं निघायचो. पायाखालचे रस्ते चुकू शकतात, पण नितळ नदीची धार मुलांना नेमकी घराजवळ सोडायची. घनदाट नदीकाठानं मुलं कशी घरी जात असतील हा शोध घ्यायला मी नदीकाठावर आलो. माथ्यावर ऊन तळतळत होतं. पावसाळयांत दुथडी भरुन वाहणारी नदी आता बरीच आटली होती. काळया खडकांच्या कपा-यांत कुठे कुठेच निळया पाण्यांचे डोह दिसायचे. काटेरी निवंडुगांची बेटं लहान मुलांसारखी मांडी घालून बसलेली दिसायची.
काळया खडकांच्या कपारीत मायलेकरं भेटली. वाळूत खेळणारं लेकरु नदीच्या डोहांत उतरु नये म्हणून आईनं लेकरांच्या कमरेला साडीचा लांब पदर बांधला होता. वा-यानं सागांची पानं अवतीभोवती उडायची. तेव्हा जंगली श्र्वापद आपला पाठलाग करतंय असाच भास मला होत राहायचा.
नदीचं पात्र सोडून मी तसाच जवळच्या वस्तीवर आलो. तहान लागली होती. झोपडीच्या दारातच पायाला पांढरी पट्टी बांधलेला गुराखी आपलं तोंड हाताच्या जाळीत झाकून झोपला होता. पट्टी मारलेली पायांची टाच रक्ताळलेली होती. पायाला मारलेली पट्टी ओलीच होती. त्या गुरांख्याला उठवून पाणी मागण्याची माझी हिंमतच झाली नाही. डोक्यावरुन शेणांच्या पाटया वाहणारी एक म्हातारी मला म्हणाली, “सकाळी नदीला गुरं लावताना त्या भाऊच्या पायात काच भरलीय. डोकांची टोपी पायाला बांधून तो पट्टी मारुन आलाय”. आता असा जखमी पाय घेऊन तो गुराखी नदीकाठांची गुरं कशी वळून आणणार हा प्रश्न स्वता:ला विचारत मी तिथून तशीच तहान घेऊन निघालो.
आपल्या गाया-म्हशीसोबत बोलत निघालेला भोळसर मुलगा मला भेटला. त्या मुलांच्या सोबत चालताना मी म्हशीच्या काळया पाठीवर थापा मारायचो. त्या भोळसर मुलांला मी बोलतं केल्यावर तो मुलगा मला सांगायला लागला, माझ्या गरीब आईला माझे वडिल दारु पिऊन खूप मारायचे. ती बिचारी मरुन गेली. मला सांगता सांगता तो मुलगा रडायला लागला. माथ्यावरच्या मळक्या टोपीनेच त्याने आपले भिजलेले डोळे पुसले. त्या मुलाचं दु:ख मुक्या गाया-म्हशीच ऐकतच असाव्यांत. दिवस मावळू लागल्यांवर त्या मुलांच्या मनात घरी जाण्याचं भय दाटून येत असावं.
नदीच्या काठांवरुनच एक कौलारु घर दिसलं. तिथं जाऊन थंडगार पाणी प्यायचं आणि निवांत झोपून राहायचं. असा विचार मनात आला. घश्यातली तहान गिळत मी उंच टेकडी चढून आलो. उंबरांच्या सावलीत एक आजी आपली नजर दूरच्या रानात खिळवून बसली होती. पाहाता पाहाता आपल्या डोळयासमोरच हे जंगल नष्ट झालंय. असं तिला म्हणायचं असेल. मी वेडयासारखं तांब्यामागून तांबे पाणी पीतच राहिलो. तरी तहान काही शमेना. पोटात अर्ध्यां हंडयासारखं पाणी डचमळ करत होतं. लाल तोंडाचा सुस्त सरडा पेरुच्या झाडांवरुन खाली येत असतानाच मांजरीनं झडप मारुन त्याला आपल्या तोंडात धरलं. थोडा वेळ सरडयानं आपल्या शेपटीची वळवळ केली. नंतर मांजरीच्या धारधार दातात सरडा डोळे मिटून मरणांची वाट पाहत राहिला.
पण त्यांचं मरण सहज, साधं नव्हतं. मांजर त्या सरडयांला थोडं पळायला लावायची आणि लगेच झडप मारुन धरायची. मांजरीची धारधार नखं सरडयांच्या खरबरीत कातडीत गुसायची. उंबरांच्या सावलीत बसलेली आजी चूल पेटवून माझ्यासाठी चहा करत होती. नुकत्याच पिकू लागलेल्या उंबरांच्या फाळांना पाखरं बिलगलेली होती. मांजर जीव गेलेल्या सरडयांला खाऊ लागली तेव्हा मी चहा पीत होतो. मांजरीनं अर्धवट खाल्लेला सरडा आजीच्या अंगणात तसाच पडून होता. दारांच्या उंब-यांवर सरडा खाल्लेली मांजर तशीच पसरली.
मी तसाच चालत चालत पुढे आलो. जांभळीच्या झाडांखाली बांधलेली बैलजोडी मी काहीतरी चारा आणला असावा. ह्या आशेनं धडपडून उभी राहिली. अंगणात शेळयांची रिकामी दावी पडलेली. बहुतेक सगळया शेळया जवळच्या रानात चरायला गेलेल्या असाव्यांत. आपल्या झोपडीवजा घरांबाहेर एक स्त्री चोळीत गुसलेली कुसळं हातांने उपटून काढत होती. अशा अस्वस्थेत मी तिला आणि तिने मला पाहू नये. म्हणून मी मागे सरकत रस्ता बदलू लागलो. तोच त्या स्त्रीने मला पाहिले. आणि शरमून आपल्या झोपडीत गेली. मी सुद्धा शरमून जाग्यांवरच उभा राहिलो. आपण अशा अस्वस्थेत त्या माऊलीला पाहायला नको होतं. मी लांबची वाट पकडून पुढे निघालो.
मला कोणीतरी हाका मारत होतं म्हणून मी थांबलो. मागे वळून पाहातो तर त्या माऊलीचा नवरा मला चहा पिण्यांसाठी आवाज देत होता. मला त्या माऊलीसमोर उभं राहण्यांची भीती वाटू लागली. मी जड पायांने झोपडीच्या बाहेरच उभा राहिलो. त्या माऊलीचा नवरा मला म्हणाला, “दादा, दोन पोरं हायेत ती बी आश्रमसाळांत घातलीय. आम्ही दोघं नवरा बायकू आनं म्हातारी राहतोय. त्यादिशी वाळत घातलेली चोळी उडून बैलांम्होर गेली आनं बैलानं खाऊन टाकली. अभयअरण्यांची मोजणी त्यादिशीच झालीय. अभयअरण्य झाल्यांवर आम्हांला जंगलातून फाटीबी मिळायची नाय. त्यामुळं पहाट पसून आम्ही फाटया वाहतोय”.
त्या माणसांची नजर चुकवत मी जांभळीच्या झाडांखाली डोळे पुसत उभा राहिलो. अचानक माझ्यापुढे माझं लहानपण उभं राहिलं. अगदी चौथीला असेपर्यंत मी आईच्या पदरांखाली लपून आईचं दूध पीत असायचो. आम्हांला शोधत आमच्या मळयांत आलेले गुरुजी आईला पाहून लांब उभे असायचे. आईच्या पदारांआडून आम्ही गुरुजीकडे घाबरत घाबरत पाहायचो. गुरुजीनां खाण्यांसाठी दिलेल्या भुईमुगांच्या शेंगा गुरुजी तशाच रुमालांत बांधून आणायचे आणि शेंगा फोडून शेंगदाणे भाजीत टाकायचे. गुरुजी दर शनिवारी आपली सायकल उलटया वा-यांत हाकत हाकत आपल्या दूरच्या गावाला जायचे. तिथे त्यांची म्हातारी आई त्यांची वाट पाहात अंगणात बसलेली असायची. कधी कधी धिप्पाड गुरुजी सुद्धा आपल्या आईची आठवण काढून आमच्या पुढे ढसाढसा रडायचे.
चहा पीता पीता त्या माणसांने मला मोळया वाहताना आपली सोललेली पाठ मला दाखवली. त्या माऊलीच्या अंगात तर एकच चोळी होती. चोळी गुसलेली कुसळं काढून ती माऊली पुन्हा मोळया वाहायची. दुसरी चोळी विकत आणायला आणि शिवायला वेळ नव्हता. आणि पैसेही नव्हते. अभयअरण्य झालं म्हणजे आम्हांला ह्या रानात मोळया तोडायला जाता येणार नाही. अंगणातल्या शेळया तर विकूनच टाकव्या लागतील. हातात कोयता सापडला तरी सात वर्षांची शिक्षा आहे. असं बरंच काही तो माणूस मला सांगत होता. पुन्हा आश्रमशाळेकडे येता येता मला आठवलं. शहरात काही ठिकाणी एक चोळी शिवण्यांची शिलाई अडीच हजार रुपये आहे. नवीन वर्षांची पार्टी करण्यासाठी अनेक जण मोळया विकत घेतात आणि रात्रभर दारु पीत बसतात. पण इथं गोष्ट वेगळीये? जगण्यासाठी चूल पेटवण्यांची धडपड वेगळीच आहे. त्यादिवशी मी चूलीच्या घनदाट धूरातच हरवलो होतो.