वाघ मागावर आहे…

ही माणसं स्वता:ला गाळात झोकून आपल्यासाठी सुंगधी इंद्रायणी भात पिकवतात. वाघाचं भय असलं तरी गायीगुरं सांभाळतात. साळाबाईची गोठयात बांधलेली गंगी गाय पुन्हा गाभण होती. ह्या गाभण गाईच्या पोटातलं वासरु वाघाच्या तोंडाला लागू नये अशी मी मनोमन प्रार्थना केली.

  • अनिल साबळे

सत्तरीकडे झुकलेली एक आदिवासी महिला मला एका डोंगरावर भेटली. हातातल्या कोयत्यांने ती महिला वाळलेल्या झाडाचं सरपण तोडत होती. त्या महिलेला मी जंगल राखणारा शिपाई वाटलो होतो. हातातला कोयता खाली टाकून आपल्या गळयाची शपथ घेऊन ती महिला मला म्हणाली, “ दादा ! चुलीसाठी फाटी तोडायला आलेय, हिरी झाडं नाय तोडत.” ह्या आधी सुद्धा मी अशा अनेक करुण प्रंसगाना अनेक वेळा समोरा गेलो आहे. त्याचं कारण म्हणजे आश्रमशाळेनं आम्हांला दिलेला खाका गणवेश. तो खाका गणवेश अंगात घालून कुठल्याही जंगलात फिरत असलं म्हणजे सरपण तोडणा-या बाया हातातल्या कोयता खाली टाकून आपल्या घरी पळू जायच्या.

त्या सत्तरीच्या आसपास असलेल्या महिलेला मी आश्रमशाळेत कामाला आहे. असं सांगितल्यावर तिला धीर आला. त्या महिलेच्या दोन्ही हातावर गोंदलेले होते. एका हातावर तुळस गोंदलेली होती. तर दुस-या हातावर त्या महिलेचं नाव गोंदलेलं होतं. ते नाव मला लांबून सुद्धा स्पष्ट वाचता आलं. ते नाव होतं, साळाबाई खेमा भोईर. साळाबाई भोईर यांची गाय जवळच चरत होती. वाकडया शिंगाची गाय फारच म्हातारी वाटत होती. वाळलेलं गवत चघळताना मी बारीक पाहिलं तेव्हा मला समजलं की, ह्या गाईच्या तोंडातले बरेच दात पडलेले आहे. त्या गाईच्या पाठीवर हाडांच्या अनेक बरगाडया उघडया पडल्या होत्या. पोटाखालची दूधाची कास आकसलेली होती. साळाबाईंनी डोंगराच्या खाली असलेलं त्याचं घर मला दाखवलं. तांबडया होल्यासारखं ते कौलारु लांबून दिसत होतं. आज मुजरीचं काम मिळालं नाही म्हणून साळाबाईंनी आपली गाय रानात चरायला आणली होती. ह्या सत्तरी पार केलेल्या साळाबाई भोईर यांना मुजरीचं काम करताना किती जीवघेणे कष्ट पडत असतील ही कल्पनाच मला अस्वस्थ करायला लागली होती.

काही दिवसांनी मी साळाबाई भोईर यांच्या घरी फिरत फिरत आलो. तेव्हा साळाबाई रानातून तोडून आणलेल्या फाटया रचून ठेवत होत्या. सोबत त्यांची बारावी पास झालेली मुलगी होती. त्यादिवशी मला डोंगरावर भेटलेली गाय अंगणात बांधलेली होती. गायी जवळच एक वासरु होतं. ह्या भागात बिबटयांच्या हल्ल्यांत रोज कितीतरी जनावरं ठार होतात. मी साळाबाई भोईर यांना विचारलं, “ मावशी तुमचं जनावर वाघानं कधी खाल्लं आहे का ?”. तर साळाबाई मोठयानं म्हणाल्या, “ दोन वासरं खाल्ली ना दादा वाघानं ! दोन्हीबी गो-हेच होते.” मी म्हणालो, “ मग तुम्हांला नुकसान भरपाई मिळाली असेल ना ?”. तर नाराजीच्या स्वरांत साळाबाई दोन्ही गो-हे खाल्ल्यांची घटना मला सांगू लागल्या, “ सरमख डोंगराच्या पोटाला गायवासरु चरत होतं. जंगलातून लपत आलेला वाघ वासरांवर झडप घालून वासरांचा गळा दातात धरुन जंगलात ओढू लागला. गाय हंबरत वाघाच्या मागे पळू लागली. पण वाघाने वासरु जंगलात नेलं. आम्ही सगळा सरमख डोंगर पालथा घातला. पण आम्हांला वासराचं शिंग सुद्धा सापडलं नाही. वनरक्षक आम्हांला म्हणत होता, तुमचं वासरु खाल्लं आहे. काय पुरावा आहे तुमच्याजवळ. वासरु खाल्लं म्हणून काहीतरी पुरावा दाखवा. वासराचा पाय, वासरांची शेपटी, नाहीतर वासराचं मुंडकं तरी. वाघानं वासरु नेताना तुम्ही पाहिलं हा काही पुरावा होत नाही.

साळाबाईच्या दोन मुली सगळया सरमख डोंगराला वासराचं काहीतरी सापडतं का म्हणून पाहत हिंडल्या. ज्या ठिकाणी वाघानं वासरांवर झडप मारली होती. तिथे फक्त वासरांच्या गळयाचं रक्तं उडालेलं होतं. आणि दूरवर वाघाने गो-याहयाला ओढत नेल्यांची फरफट होती. साळाबाईच्या दोन मुली रिकाम्या हातानेच परत घरी आल्या. साळाबाई भोईर यांच्या दुस-या खाल्लेल्या गो-हयांची हकीकत तर फारच भयानक होती. पहिल्या खाल्लेल्या गो-हयाचं काहीच सापडलं नव्हतं. पण दुस-या वेळेस तर साळाबाईचा गो-हा घराजवळून वाघांने ओढून नेला. साळाबाई हातात कोयता घेऊन वाघावर चालून गेल्या. तेव्हा वाघ गो-हा घेऊन जंगलात पळून गेला. वाघाबरोबर झुंज देताना उद्या आपल्या जीवाला काही झालं तर आपल्या मागे राहिलेल्या दोन मुलीचं कसं होणार ही भीती साळाबाईनां होती. त्यांत त्याच्या नव-यांला पक्षाघात झालेला असल्यामुळं त्यांना काहीच काम करता येत नव्हते. अखेर आपल्या मुलीचा विचार करुन साळाबाईने माघार घेतली.

त्यादिवशी मात्र साळाबाईच्या दोन मुलीनां खाल्लेल्या गो-हयाचं मुंडकं सापडलं होतं. ते मुंडकं मुलीनी घरी आणलं. आपला गो-हा वाघाने खाल्ला हा पुरावा साळाबाईकडे आता होता. पण वनरक्षक येईपर्यंत ते गो-हयाचं मुंडकं घरात कसं ठेवणार. कारण तो वाघ पुन्हा गो-हयांच्या वासाने येण्यांची भीती होती. म्हणून त्या वाघाने खाल्लेल्या गो-हयाचं मुंडकं साळाबाईनी भाताच्या वळईवर ठेवलं. डोंगराच्या कडयावर जाऊन साळाबाईनी वनरक्षकांला फोन केला. वनरक्षक पंचनाम्यांसाठी निघाला. पण नेमकं त्याच वेळी एका कुत्र्यांने भाताच्या वळईवरचं ते गो-हयाचं मुंडकं पळवलं. साळाबाई आणि तिच्या दोन मुली कुत्र्यांच्या मागे खूप पळाल्या. पण उपाशी कुत्र्यांने ते गो-हयाचं मुंडकं आपल्या तोंडातून काही सोडलं नाही. वनरक्षक साळाबाईच्या घरी आला तेव्हा मात्र पंचनाम्यांसाठी गो-हयाचं मुंडकं नव्हतं. आपला उगीच हेलपाटा झाला म्हणून वनरक्षक संतापून निघून गेला.

साळाबाई सांगत होत्या, हे आजूबाजूचं राहिलेलं जंगल ह्या गंगी गाईमुळेच उरलं आहे. जंगलात कोणी अनओळखी माणूस झाड तोडायला आलं म्हणजे ती गंगी गाय त्या माणसावर थेट हल्ला करते. तिच्या भीती पोटी ह्या जंगलात कोणीच मोळया तोडायला येत नाही. साळाबाई लग्न करुन ह्या गावात आल्या तेव्हा आजूबाजूला खूपच घनदाट जंगल होतं. बाहेर गावाचे व्यापारी माणसं कोळश्यांसाठी हिरडीच्या झाडांची कत्तल करु लागले. त्यामुळेच हे जंगल विरळ होत गेलं.
साळाबाई यांच्या घराजवळ राहणारा एक माणूस सांगू लागला, जंगलात लपलेला वाघ माझ्या शेळयावर अचानक चालून आला. एकापाठोपाठ त्या वाघांने माझ्या चार शेळया गळा फाडून मारल्या. मी हातातल्या काठीने त्या वाघांवर हल्ला केला. तेव्हा वाघानं मला जखमी केलं. वाघाने मारलेल्या शेळयांचा पंचनामा जंगलात झाला. तू शेळया जंगलात का चारत होतास असं कारण सांगून त्यांनी मला काहीच भरपाई दिली नाही.

घराजवळ धरलेलं आपलं जनावर वाघाने जंगलात ओढत नेऊन खाल्लं तर ? पंचनामा कुठे करायचा ? आणि आपल्या पाळीव मुक्या जनावरांला तरी कसं सांगायचं की तू गवत खाता खाता जंगलाच्या हद्दीत जाऊ नको म्हणून. तिथं वाघाने फाडून खाल्लं तर आम्हांला काहीच भरपाई मिळाची नाही म्हणून. जनावरांला तरी कुठे माहित असतं. आपल्या रानातलं आणि शासनांने आखलेल्या जागेतलं कुरण कागदांवर वेगळं आहे. भुकेने व्याकुळ झालेला वाघ तरी जंगलात गायीगुरं येईपर्यंत थोडीच वाट पाहणार आहे. भुकेला वाघ गोठयात गुसून गायीगुरं धरणार. आणि जंगलात जाऊन मनसोक्त खाणार.

भरपावसात एक दिवस मी साळाबाई भोईर यांच्या घरी गेलो. साळाबाई भोईर यांच्या दोन मुलीनां वह्या-पुस्तके घेण्यासाठी दोन हजार रुपये मदत द्यायची होती म्हणून. तेव्हा साळाबाईच्या घरातली सगळी माणसं गुडघ्याएवढया चिखलात भाताचं रोप धरुन आवणी करत होत्या. दोन-तीन पावलं गळात टाकत मी सुद्धा भाताच्या खाचरांत गुसलो. दोन मुठी भाताच्या लावल्या. पण वाकलेलं कंबर पुन्हा लवकर सरळ होत नव्हतं. दिवसभर असं गाळात वाकून आवणी करणारी माणसं नक्कीच थोर आहे असं मला वाटलं. ही माणसं स्वता:ला गाळात झोकून आपल्यासाठी सुंगधी इंद्रायणी भात पिकवतात. वाघाचं भय असलं तरी गायीगुरं सांभाळतात. साळाबाईची गोठयात बांधलेली गंगी गाय पुन्हा गाभण होती. ह्या गाभण गाईच्या पोटातलं वासरु वाघाच्या तोंडाला लागू नये अशी मी मनोमन प्रार्थना केली. आणि पाठीवर पाऊस घेऊन आपल्या घरी परतलो.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here