- अनिल साबळे
दुपारच्या सुट्टीत मी हातात दुर्बीण घेऊन दूरवरची घरं पाहत राहायचो. कधी टळटळीत उन्हात एखादी लहान मुलगी कमरेवर पाण्यांची कळशी घेऊन पाणी वाहताना दिसायची. सहा सात गायी-गुरांचा कळप घेऊन कोणीतरी वळणा वळणाच्या घाटातून नजरेआड व्हायचं. माझ्या हातातली दुर्बीण डोळयाला लावल्यावर आपल्या अंगणातलं पांढरं वासरु हुंदाडताना दिसल्यावर आश्रमशाळेतला एक मुलगा खळखळून हसला. दूर डोंगरकडयाला एक कौलारु घर होतं. ते घर मी रोज दुर्बीणीतून पाहत असायचो. एक आजोबा घराच्या सावलीत झोपलेले दिसायचे. कधी त्यांचा लेक शेतात काम करताना दिसायचा. जांभळीच्या झाडाखाली बांधलेली तांबडी बैलजोडी मला स्पष्ट दिसायची. कौलारुच्या घरांच्या बाजूने मांडवी नदीचं पात्र वाहत होतं. गावापासून दूरवर असलेल्या ह्या घराविषयी मला फारच आस्था होती. ह्या घरी आपण कधीतरी जायचं, असा विचार मनात रोजच येत होता. त्यात आमच्या आश्रमशाळेत शिकणारा सतीश मला म्हणाला,
“तिथं माझी बहिण दिलीये. दादा तुला वेळ असेल तेव्हा आपण तिथे जाऊ”.
दुसऱ्या दिवशी कसली तरी सुटी होती. आम्ही दोघं माझ्या मोटारसायकलवर त्या कौलारु घराकडे निघालो. मोठा रस्ता संपून एक छोटशी पायवाट सुरु झाली. त्या पायवाटेने मी हळूहळू मोटारसायकल चालवत होतो. पायवाटेवर एक आजोबा भेटले. त्याच्या हातात कसल्या तरी तेलाची बाटली होती. मी विचारलं तेव्हा मला ते आजोबा म्हणाले,
“मह्या लेकीचा पाय मोडलाय बाबा. हाड जुळताना लई रडली ती”.
पुढे वाट नव्हती तेव्हा मोटारसायकल एका आंब्यांच्या झाडाखाली लावली आणि आम्ही पुढे पायीच निघालो. एक महिन्यापासून आश्रमशाळेत येत नसलेल्या मंगेशच्या घरी आम्ही गेलो. मला पाहून मंगेश आईच्या पदराआड लपू लागला. मंगेशची आई आम्हाला सांगू लागली,
“गुराचा लई लळा ह्या पोराला ! नाकाला नाग चावून गाय मेली. तव्हापासून हे प्वारं शाळेत जातच नाही”.
मंगेश घरांच्या पत्र्यांवर चढला आणि आम्हाला खाण्यासाठी भुईमुगाच्या शेंगा काढू लागला. तु जर शाळेत येणार असशील तरच आम्ही ह्या शेंगा खाऊ? असं मी म्हणाल्यावर मंगेश उद्यापासून शाळेत यायला तयार झाला. घरांच्या पत्र्यावर वाळत असलेल्या शेंगा खाताना मलाच माझी लाज वाटत होती. कारण गोणभर शेंग होण्यासाठी मंगेशच्या आईनं किती कष्ट घेतले असतील, याची कल्पना मला होतीच. भुईमुग पेरल्यापासून हुंगत हुंगत येणारे रानडुकरं, शेंगा लागल्यावर भुईमुग उपटून खाणारी वानरं, यातून वाचलेल्या शेंगा आल्या गेल्या पाहुण्यांसाठी देताना ही माणसं अजिबात हात आखडत नव्हती. आपल्याला समोरच्या घरांकडे जायचे आहे. तु येतोस का? असं मंगेशला सांगितलं तेव्हा तो सुद्धा आमच्यासोबत यायला तयार झाला. घनदाट जंगलातून वाकडीतिकडी पायवाट त्या घरांकडे गेली होती. आजूबाजूच्या वेगवेगळया झाडांची नावं मला चालता चालता सतीश आणि मंगेश सांगायची. आमच्या वाडीतली माणसं रानडुक्कांची शिकार कशी करतात, कोणत्या वाटेवर वाघुरी ठोकल्या जातात, अशा एकेक घटना ती दोघं मला सांगत होती.

आमची डोकी सपाटून तापलेल्या उन्हात पोळायला लागली तेव्हा मी अर्ध्या वाटेतच खाली बसून घेतलं आणि मुलांना म्हणालो,
“ह्या उन्हामुळं आपण तिघेही आजारी पडू? मी उगीच तुम्हाला लांब चालवत आणलेय.”
दादाला आपण त्या घरापर्यंत नेलं पाहिजे असं मुलांना वाटत होतं. अशा उन्हात चालणं तर शक्यच नव्हतं. आपण तिघांच्या डोक्याला बांधायला काहीतरी आणायला पाहिजे होतं, असं मला वाटू लागलं. तेव्हा दोघांनी सागाच्या झाडांवर चढून भरकन सागाची तीन मोठी पानं तोडली. सतीशने हिरव्या वेताची लांब फोक दोरीसारखी सागाच्या पानातून ओवून माझ्या डोक्याला टोपी करुन दिली. तिघांच्या डोक्यावर अशा विचित्र टोप्या पाहून मी खळखळून हसलो. भल्या मोठया दु:खाला साधी साधी औषधं असतात, हे मला त्या लहान लेकरांनी त्या दिवशी शिकवलं. टोप्या घालून चालता चालता मुलं मला म्हणायची,
“दादा, तुला काटा भरला की, ह्या झाडांची मुळी लाव. हातपाय कापल्यावर ह्या झाडांचा पाला ठेचून लावायचा. ही फुलं घरात ठेवल्यावर उंदरं मरुन पडतात“,
असं बरंच काही मुलं मला सांगत होती. मला मध्येच तहान लागल्यावर मुलांनी पाण्याचा झरा शोधला. कंरजीच्या पानाचं पेल्यासारखं द्रोण करुन मला पाणी प्यायला दिलं. दूरचं कौलारु आता नजरेच्या टप्प्यांत दिसायला लागलं. धरणाचं पाणी काळया खडकांच्या दगडी भिंतीमध्ये अडवलेलं होतं. आम्ही धरणाचं पाणी पाहायला खाली डोकलो तेव्हा पारव्यांचा भला मोठा थवा भरकन उडून दूर निघून गेला. धरणाच्या पाण्यांत मोठमोठे मासे वरुनच दिसायचे. सागाची वाळलेली पानं वाऱ्यानं उडू लागल्यावर काहीतरी जनावर आल्याचा आम्हाला भास व्हायचा. आम्ही कौलारु घराजवळ गेलो तेव्हा आमची चाहून घेऊन दोन कुत्रे आमच्यावर भुंकत आले. एका कुत्र्याला सतीशने लांबूनच आवाज दिला. तेव्हा ते कुत्रं लोंडा घोळत जवळ आलं. आमच्या डोक्यावर असलेल्या सागाच्या पानाच्या टोप्या फारच विचित्र दिसत होत्या. सतीशची बहिण घराच्या बाहेर आली तेव्हा आम्ही डोक्यावरच्या टोप्या काढून फेकल्या. म्हातारे आजोबा आम्हाला हात जोडत उभे राहिले. घरात अंथरलेल्या कांबळयावर आम्ही बसलो. मी लगातार दोन तांबे पाणी प्यालो. भोपाळयासारख्या लांब मोठया काकडया सतीशच्या बहिणीने आम्हाला कापून दिल्या. मला तर चालून चालून फारच भुक लागली होती, समोर दिलेलं मी खात होतो.
तुमचं घर दुरुन आम्ही दुबिर्णीतून कसं पाहतो. तुमची तांबडी बैलजोडी आम्हाला दिसते. असं बरंच काही मी सांगत असताना म्हातारे आजोबा डोळयात पाणी आणून म्हणाले,
“लांबून समदं ग्वॉड दिसत असंल दादा! हा मुलुख साधा नाय. मरणाचा पाऊस. मरणाची थंडी. गायीगुरं…शेळीबकरं… कुत्रीमांजरं समदीच घरात घेऊन रात काढावी लागतेय. तो बाबा, गुरगुर करुन कवाडांच्या आत पंजा घालून बसतोय. नात डोळयाआड झाली तरी माह्या काळजाचं पाणी पाणी व्हातंय.”
सतीशची बहिण चूलीवर चहा करता करता आम्हाला वाघ दिवसाआड कुठे आणि कसा भेटतोय. हे सांगत होती. चहा पिऊन झाल्यावर आजोबा आम्हाला धरणाच्या काठाकाठांने फिरवत होते. एक ठाकर आदिवासी आत गळ टाकून मासे धरत होता. आजोबा म्हणाले,
“रोज एक मासा सापडला तरी त्यांची चूल पेटून जातेय”.
मी बराच वेळ त्या गळ टाकलेल्या माणसाकडे पाहत होतो. आजोबा म्हणाले ते खरंच होतं. एका माश्यांत पोट भरल्यावर दुसरा मासा उगीच धरायचा तरी कशाला. दुसरा मासा ताजा ठेवण्यांसाठी इथे बर्फाची लादी तरी कोठून आणायची. धरणाचा काठ फिरुन झाल्यावर घरी येता येता आजोबा सांगत होते, धरणाचं खोदकाम करताना आंबा, जांभाळीचं घनदाट जंगल काडकाड मोडून गेलं. नाहीतर पिकलेल्या फळांच्या वासानं माणसाला हवेत तरंगल्यासारखं वाटायचं. आपल्या भावाला आश्रमशाळेत जीव लावावा म्हणून सतीशच्या बहिणीनं माझ्यासाठी बरंच काही बांधून ठेवलं होतं. त्यातलं काहीच न घेता आम्ही तिथून निघालो. सगळयात करुण असतं निरोप घेणं. एवढया लांब अशा वाटेनं मी एकटा तर पुन्हा कधीच आलो नसतो. जणू माझ्याच बहिणीला मी तिच्या सासरी सोडून आपल्या गावी जातोय असं वाटत होतं. सागाची पानं तोडून आम्ही पुन्हा डोक्यावर बांधली. मंगेश सुद्धा आमच्या सोबत आश्रमशाळेत आला. आपल्या लाडक्या गाईला नाग कसा चावला आणि तिने कसा प्राण सोडला हे सारं तो मुलांना हातवारे करुन सांगत होता. कवी नागराज मंजुळे यांचा “उन्हाच्या कटाविरुद्ध” कविता संग्रह वाचताना मला ह्या ओळी सुचल्या…
“उन्हाच्या कटाविरुद्ध बंड करुन
सागाच्या फतरी पानांशी दोस्ती केली”
(लेखक कवी, छायाचित्रकार, कथाकार असून आदिवासी आश्रमशाळेत कार्यरत आहेत)