- अनिल साबळे
रणरणत्या उन्हातून दूर जाताना एका हिरडीच्या झाडांखाली लहान मुलांची किलबिल ऐकू आली. रणरणतं ऊन अंगाची कातडी जाळत असताना ही मुलं हिरडीच्या एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर उडी मारुन जाताना खळखळून हसत होती. मी हिरडीच्या जवळ जाऊन पाहिलं, तर ती सगळीच मुलं आमच्या आश्रमशाळेत शिकणारी होती. हिरडीच्या एका लोंबत्या फांदीला त्या मुलांनी झोका बांधला होता. झोक्यावर बसलेली मुलगी ओळखीची वाटली. मी त्या मुलीकडे एकटक पाहिलं तेव्हा मनाशीच म्हणालो, अरे ही मुलगी तर मीनाच आहे. होय ही मीना आहे…
एकदम सुकलेला चेहरा, डोळे मोठे आणि फार फार खोल गेलेले. तीन वर्षे झाली त्या गोष्टीला जेव्हा आम्ही आश्रमशाळेसाठी मुलं पाहत फिरत होतो. मी मीनाच्या झोपडीवजा घरापुढे जाऊन उभा राहिला. मीनाच्या घरात सगळा अंधार होता. गुरांच्या शेणामुताचा वास येत होता. काही ठिकाणी तर गुरांच्या लघवीचे लालसर थारोळे साचलेले होते. मीनाच्या अंधाऱ्या घरांतून एक आजोबा हात जोडत घराच्या बाहेर आले. आमची ही मुलगी तुम्ही पाहिलीला घ्या, अशी विनंती त्या आजोबांनी केली. त्यावेळी अवघ्या सहा वर्षांची मीना खुपच अशक्त आणि दुबळी वाटत होती. अशी अशक्त मुलगी आपल्या आश्रमशाळेतच नकोच, असं सगळया शिक्षिकाचं एकमत होतं. पण मीच मीनाला आमच्या आश्रमशाळेत घेण्याचा आग्रह धरला. आम्हाला देण्यासाठी मीनाच्या घरात काय होतं? तिच्या आजोबाला जंगलात सापडलेले रान आंब्यांचे पाड होते. ते पाड आम्ही खाल्ले आणि हात धुवून तिथून निघालो.
जून मध्ये आश्रमशाळा सुरु झाल्यावर रडत रडत शाळेत बसणारी मीना हळूहळू आमच्या आश्रमशाळेत रमू लागली. उकडलेली गरम अंडी तिला सोलता येत नव्हती. मोठं सफरचंद तिला खाता येत नव्हतं. तिचे दूधाचे बारीक कोवळे दात सफरचंदावर घसरत राहायचे. अशा वेळी मग दुसरी मोठी मुलगी तिला आपल्या दाताने सफरचंद फोडून द्यायची. जुलैच्या मुसळधार पावसात सगळी आश्रमशाळाच गळू लागली. ओल्या वसतिगृहात रात्रभर झोपणं लहान मुलांसाठी फारच त्रासदायक होतं. लहान मुलं तर आपल्या लोखंडी पेटीवर हातपाय आखडून कसेतरी झोपायचे. मुलांनी घरुन आणलेल्या गोधडया पावसात भिजून जायच्या. पाऊस उघडेपर्यंत मुलं-मुली घरी निघायच्या. तेव्हा नदी-नाले तुंडूब भरुन वाहायचे. मुलं घरी निघाली तरी आम्हाला घोर लागून असायचा.
अशा पावसाळी हवेत मीनाला सर्दी आणि खोकल्यांचा फारच त्रास होऊ लागला. साधा श्वास घेणं सुद्धा मीनाला अवघड झालं होतं. आश्रमशाळेत आलेले डॉक्टर मीनाला तपासताना म्हणाले, ‘या मुलीच्या छातीतून भयंकर असा घरघर आवाज येतोय. या मुलीला उद्याच सरकारी दवाखान्यांत आणा.’ मीनाच्या वडिलांना लगेच मी पावसात भिजत जाऊन उद्याचा निरोप दिला. आपल्या शेतातली भाताची आवणी सोडून मीनाचे वडील आश्रमशाळेवर हजर झाले. सरकारी दवाखान्यात काही तपासण्या झाल्यावर डॉक्टर लगेच आम्हाला म्हणाले, ‘या मुलीच्या हृदयाला एकच झडप आहे. लवकर ऑपरेशन केलं पाहिजे, नाहीतर या मुलीच्या जीवाला धोका आहे.’ हे ऐकून मीनाचे वडील रडायला लागले. आपले वडील का रडत आहेत… आपल्या इतक्या तपासण्या कशासाठी झाल्या… आपल्या हृदयाचं ऑपरेशन (Cardiac surgery)… या गोष्टीचं लहान मीनाला काहीच आकलन होत नव्हतं. आता आपलं पुढे काय होणार आहे, ही सगळी भीती बिचाऱ्या मीनाच्या अशक्त चेहऱ्यावर पावसाळी ढगासारखी साचू लागली होती.
एका महिन्यांत तुम्ही तुमचा निर्णय कळवा. या मुलीचं ऑपरेशन मोफत होईल. पण ऑपरेशन मध्ये काही जास्त झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही, हे ऐकल्यावर मीनाच्या वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली. आश्रमशाळेवर आम्ही माघारी आलो तेव्हा मीनाच्या वडिलांनी मीनाची लोखंडी पेटी आपल्या डोक्यावर घेतली. अंगावर असलेल्या काळया ऊबदार घोंगडीत मीना आपलं अशक्त शरीर घेऊन बसली होती. अचानक वादळ सुटून झाडावरचं आपलं खाली पडावं. आता दुसरं घरटं बांधण्यासाठी पक्षी आपल्या पिल्लांला पोटाशी धरुन निघून जातो, मला तसंच वाटत होतं.
डॉक्टर मीनाच्या ऑपरेशनची चौकशी करत आमच्या शाळेवर आले. मीना अजून आश्रमशाळेवर आली नव्हती. मीनाला शोधत मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो. मीनाचे आजोबा मला म्हणाले, ‘अशा लहान लेकरांची छाती फाडून ऑपरेशन करायचं. त्या डॉक्टरला काही दया माया आहे की नाही. छाती फाडाल्यावर आमचं लेकरु घडीभर तरी जगण का?’ मी मीनाच्या आजोबांना खूप समजून सांगितलं. पण मीनाचं ऑपरेशन करायचं नाही आणि तिला पुन्हा आश्रमशाळेत पाठवायचं सुद्धा नाही. आमच्या गावात चौथीपर्यत शाळा आहे, ती तिथे जाईल. असाच त्यांचा ठाम निर्णय झाला. मीनाचे वडील जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा मी त्यांना धीर द्यायचो, ‘मीनाचं ऑपरेशन करुन टाका. तिला काहीच होणार नाही. आता ऑपरेशन केल्यावर तिला जन्मभर काहीच भीती नाही.’ पण त्यांनी हात जोडून कायम मला नकारच दिला.
काही दिवसांनी ही मुलगी आपल्याला कधीच दिसणारच नाही, अशीच भीती मला वाटत होती. आज नेमकं तीन वर्षानंतर त्याच वाटेने जाताना हिरडीच्या झाडाजवळ मला किलबिल ऐकू आली आणि मुला-मुलीमध्ये खेळताना मला पुन्हा एकदा मीना दिसली होती. पुन्हा मी या वाटेने आलो तर मला मीना दिसेल का? ही शंका माझ्या मनात होती. सोसाटयाच्या वाऱ्यात एक विझू लागलेला दिवा आपण हातांच्या ओंजळी करुन पेटता ठेवला आहे. दिवा डगमगत कसातरी पेटलेलाच आहे. आता आपल्या हाताच्या ओंजळीना चटका बसू लागलाय. दिवा विझणार या कल्पनेनं आपल्या डोळ्यात पाणी आलंय. आपल्याच डोळयातल्या पाण्याने हा दिवा विझला तर? आपण पोळणारे हात जवळ घेऊन तसेच हतबलपणे बसणार आहे. आपण ऑपरेशनसाठी एका पालकाचं मन वळवू कसं शकत नाही. हे फुलपाखरु एकाच पंखावर खेळत राहिलं तर त्या फुलपाखरांचा पराभव अटळ आहे.
मीनाच्या हृदयाच्या आत एक काळीज आहे. त्या काळजाला जणू तिच्याच हृदयाचे दोन पंख सोबत घेऊन दूर उडत असतात. हृदयाचं एक रंगीत पंख ओलं असतानाच पिसाट वाऱ्यांत सापडून फाटून गेलं आहे. आता एकाच पंखावर झेपेल तेवढा भार पेलत हे एका पंखाचं फुलपाखरु उडत आहे. हिरडीच्या झाडांवर सुरपांरब्या खेळत आहे. एका गोड फळाच्या झाडाला आतून वाळवी पोखरत असते. पाणी शोधत मुळं कितीही खोल गेली तरीही गोड फळांच्या झाडाचं मरण मात्र नक्की असतं. या वाटेने येण्याचा मला आजही धीर होतच नाही. आपण मीना… मीना अशी हाक मारली आणि तिकडून कोणी आवाजच दिला नाही. कदाचित मीनाची आईच डोळे पुसत पुसत मीनाची बातमी घेऊन घरांच्या बाहेर आली तर?
(लेखक कवी, छायाचित्रकार, कथाकार असून आदिवासी आश्रमशाळेत कार्यरत आहेत)