प्रियकराची आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट केलेल्या महिलेला जामीन नाकारला

महिला किंवा पुरुष सगळ्यांसाठी कायदा समान असल्याचे अधोरेखित करणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

  • टीम बाईमाणूस

आपल्या माजी प्रियकराची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करून प्रियकराच्या मुलीच्या शाळेशी संबंधित खात्याला त्या पोस्टसोबत जोडणाऱ्या एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जमीन अर्जाला न्यायालयाने नामंजूर केले आहे. महिलेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी या महिलेला फसवून आणि चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आल्याचे म्हटले होते.

या महिलेच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डांगरे यांच्या एकसदस्यीय खंडपीठासमोर करण्यात आली. अर्जदार महिलेचे 2010 पासून एका विवाहित पुरुषासोबत संमतीने संबंध होते. 10 वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर प्रियकराने हे नाते 2020 मध्ये संपविण्याचा निर्णय घेतला. हे नाते संपुष्टात आल्याने संतापलेल्या महिलेने एक इंस्टाग्राम खाते बनवले आणि त्यावर प्रियकराच्या मुलीच्या शाळेला जोडून तिचे आणि त्याचे चुंबन घेत असतानाचे फोटो त्या खात्यावरून प्रकाशित केल्याचा आरोप या महिलेवर लावण्यात आला आहे. यासोबतच प्रियकराचे त्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीतील नग्न छायाचित्रेही तिने ईमेलद्वारे पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सतत होणारी भांडणे थांबविण्यासाठी या महिलेने प्रियकराला त्याच्या पत्नीशी घटस्फोट घेऊन तिच्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावला होता. या प्रकरणातील पीडित पुरुषाने असा आरोप केला आहे की या महिलेने त्याच्या छायाचित्रांचा वापर करून नेहमी धमक्या दिल्या आणि या धमक्यांना त्याने प्रतिसाद दिला नाही म्हणून हे दोघे चुंबन करत असतानाची त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रकाशित केली. या सततच्या त्रासाला कंटाळून या प्रकरणातील प्रियकराने अखेर मे महिन्यात प्रेयसीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. माहिती अधिकार कायद्यासह इतर काही कलमांखाली या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पहिल्यांदा या महिलेने कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज 3 ऑगस्टला फेटाळण्यात आला होता. न्यायालय म्हणाले की, “या प्रकरणातील अर्जदार आणि पीडित पुरुषाने त्या दोघांच्या चुकांवरून आयुष्यभर भांडावे, एकमेकांवर आरोप करावे मात्र अटकपूर्व जामिनाचा अर्ज केलेल्या महिलेला या पुरुषाच्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यातील शांतता भंग करण्याचा कोणताही अधिकार नाही.

न्यायालयाने म्हटले की अर्जदाराच्या या कृतीमुळे या प्रकरणातील पीडित पुरुषाच्या मुलीची प्रतिमा, करियर आणि एकूण भविष्य धोक्यात आले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की महिलेच्या वर्तनाच्या आधारे, ती पुरुषाच्या मुलीचे भविष्य खराब करण्यासाठी पुढील पावले उचलण्याचीदेखील शक्यता होती. त्या व्यक्तीच्या वतीने तक्रार दाखल करणारे वकील शेहजाद नक्वी यांनी जामीन अर्जाला विरोध केला आणि सांगितले की, महिलेच्या या कृतीमुळे त्यांच्या अशिलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि त्यांच्या मुलीला शाळेत अपमानाचा सामना करावा लागत आहे. न्यायालयाने या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याच्या अहवालाचीही दाखल घेतली आहे ज्यामध्ये लिहिले होते की महिलेने तपासात सहकार्य केले नाही आणि तिचा संगणक आणि मोबाईल अद्याप जप्त करण्यात आलेला नाही. यामुळे न्यायालयाने या महिलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here