एक कोटी विमाच बेतला जिवावर!

पैश्याच्या लालसेपोटी चक्क पत्नीनेच केला पतीचा खून!

सुकेशनी नाईकवाडे / १३ जून २०२२

आयुष्याचा काही भरोसा नसल्यामुळे जवळपास सर्वच जण विमा काढतात आणि विमा काढण्याचे अनेक फायदेही आहेत. घरातील कर्ता माणूस गेला तर विम्याच्या रक्कमेचा त्याच्या परिवारातील सदस्यांना मोठा फायदा होतो परंतू बीड मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यात एक कोटीच्या विम्याच्या रकमेसाठी चक्क पत्नीनेच दहा लाखाची सुपारी देऊन पतीचा काटा काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. मयत पतीच्याच्या पत्नीसह इतर चौघांनी मिळून हा प्रकार केल्याची माहिती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ यावेळी उपस्थित होते.

बीड ग्रामीण हद्दीतील पिपरगव्हाण शिवारातील म्हसोबा फाटा परिसरात शनिवारी (ता. 11) एका अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले होते, याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्या ठिकाणी पोलीसांना नंबर नसलेली एक स्कुटी आढळून आली यानंतर मयताची ओळख पटल्यानंतर पोलीसांनी मयताचेे नांव मंचक गोविंद पवार (रा. बीड) असल्याचे समजले. याप्रकरणी त्याची पत्नी व मुलगा यांची चौकशी केली असता, त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यांचे वागणे संशयास्पद आढळुन आले. यामुळे पोलीसांना संशय आला आणि याबाबतीत सखोल चौकशी केली असता संशयीत इसम ज्यांचे नाव श्रीकृष्णा सखाराम बागलाने (वय 27 वर्षे रा. काकडहिरा ता. जि. बीड) याला ताब्यात घेऊन त्याची विचारपुस केली असता त्याने सांगितले की, हा गुन्हा मी व माझ्यासोबत इतर 3 जणांनी मिळून केला आहे. हे करण्यासाठी मयताची पत्नी गंगाबाई मंचक पवार यांनी आम्हाला दहा लाखाची सुपारी दिली होती. यातील दोन लाख रुपये आम्ही इसार म्हणून घेतले होते.

शुक्रवारी (ता. 10) मी व इतर तीन जणांनी मिळून म्हसोबा फाटा परिसरात मंचक गोविंद पवार यास मारले यानंतर अपघाताचा बनाव करण्यासाठी, त्याला रोडवर आणून त्याच्या जवळील स्कूटीस आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. मंचक मेल्याची खात्री केल्यानंतर आम्ही तेथून निघून गेलो असे आरोपी बागलाने याने सांगितले. यावरुन श्रीकृष्ण सखाराम बागलाने (वय 27 वर्षे रा. काकडहिरा ता.जि. बीड), सोमेश्‍वर वैजिनाथ गव्हाणे (वय 47 वर्षे रा. पारगांव सिरस) , गंगाबाई भ्र. मंचक पवार (वय 37 वर्षे रा. वाला ता. रेणापुर जि. लातुर ह.मु. मिरगे रो हाऊस, अंकुशनगर बीड) यांच्यावर गुन्हा नोंद करत ताब्यात घेतले असल्याचे बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. या प्रकरणात अजून दोन जण फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल कृष्णा लांजेवार, पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पो. उपनिरीक्षक संजय तुपे, कैलास ठोंबरे, नशीर शेख, सतिष कातखडे, अशोक दुबाले, गणेश हंगे, राहुल शिंदे, अश्‍विन सुरवसे, गणेश मराडे, संपत तांदळे, अतुल हराळे यांनी केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here