महाराष्ट्र आता अधिक पुरोगामी होतोय !

हेरवाडनंतर आता ढोरखेड्याने दिली विधवांना मुक्ती

टीम बाईमाणूस / १६ मे २०२२ :
मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्राम पंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विधवांना वर्षानुवर्षे चालत आलेल्या अमानवी प्रथांपासून मुक्तता देण्याचे लोण आता राज्यभर पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील ढोरखेडा ग्राम पंचायतीनेही असाच ठराव घेऊन विधवांना सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला केला आहे. असा ऐतिहासिक निर्णय घेणारी विदर्भातील ही पहिलीच ग्राम पंचायत ठरली आहे.

पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे आणि पायातील जोडवे काढणे इत्यादी प्रथा प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहेत. विधवा महिलांना कोणत्याही धार्मिक किंवा मंगल कार्यात उत्साहपूर्वक सहभागी होण्यासाठी समाज मान्यता देत नाही. त्यांना सन्मान न देता समाजात दुय्यम वागणूक मिळते, कुटुंबात फारशी विचारपूस होत नाही, त्यांचे विचार आणि सल्ला ऐकला जात नाही.

असे प्रकार कमी अधिक प्रमाणात सगळीकडेच पहायला मिळतात. विधवा महिलांना कमी दर्जाची वागणूक देणे, तिरस्काराने पाहणे अशा वर्तणुकीमुळे विधवा झालेल्या सर्व गटातील महिलांना सन्मानाने जगता येत नाही. महिला आणि पुरुषांना कायद्याने सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार असताना या प्रथेमुळे महिलांच्या अधिकारावर गदा येते. त्यामुळे अशा महिलांना मान सन्मान मिळावा या उद्देशाने ढोरखेड्याच्या सरपंच सुनीता दत्तात्रय मिटकरी यांच्या पुढाकाराने ढोरखेडा ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत एक मोठी ग्रामसभा घेतली होती आणि त्यात सर्व संमतीने हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाचं आता सर्व स्तरातून मोठं कौतुक होत आहे.

अधिक वाचा :

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here