‘शानदार’ शाहनवाज

पुण्यातील पहिली मुस्लिम महिला प्रथमवर्ग न्यायाधीश म्हणून शाहनवाज पठाण यांची निवड झाली आहे.

आशय बबिता दिलीप येडगे / २३ मे २०२२ :

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर आयुष्यात कुठलेही लक्ष्य सध्या करता येते याची प्रचिती पुण्यातील शाहनवाज पठाण या तरुणीच्या कहाणीतून येते. पुण्यातील लोहियानगर झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या शाहनवाजने कष्ट आणि अभ्यासाच्या जोरावर पुण्यातली पहिली मुस्लिम महिला प्रथमवर्ग न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे. शाहनवाज लोहियानगर येथे आपले आई वडील आणि आपल्या चार भावंडांसोबत राहते.

समाजात मुलींच्या शिक्षणाबाबत अतिशय उदासीनता असतांना शाहनवाज ने मिळवलेले हे यश कित्येक मुलींसाठी तर प्रेरणादायी आहेच पण अनेक रूढीवादी आणि बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना कृतीतून दिलेली ही एक शिकवण सुद्धा म्हणावी लागेल. २४ एप्रिल रोजी झालेल्या प्रथमवर्ग न्यायधीशासाठीच्या परिक्षेत शाहनवाजने हे यश संपादित केले आहे. तिचा हा दुसरा प्रयत्न होता आणि मागील तिने ते चार वर्षांपासून शाहनवाज याची तयारी करत होती.

मुस्लिम समाजातील काही लोकांचा होता शिक्षणाला विरोध

शाहनवाजचे वडील अमनखां पठाण यांचे लोहियानगर येथे अनेक वर्षांपासून छोटेसे दुकान आहे. त्यांना चार मुली आणि एक मुलगा असे अपत्य आहेत. या पाचही जणांना चांगले शिकवून समजात आपले स्थान निर्माण करण्यास मदत करण्याचे अमनखां यांनी ठरवले होते. आपल्याला परिस्थितीने शिकू दिले नाही याची खंत त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्यांनी आपल्या पाचही मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याची मुभा दिली . यावेळी समाजातील अनेक जण “मुलींना शिकवून काय करणार?” असे विचारत असत पण त्याकडे दुर्लक्ष करत अमनखां यांनी आपल्या मुलींना शिकवले.

बिकट आर्थिक परिस्थितीतही अमनखां यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणात कुठलीही कसूर केली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आज शाहनवाजने मुस्लिम समाजातील प्रथमवर्ग महिला न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या निकिशा पठाण हिनेसुद्धा मुस्लिम समाजातील महिला न्यायाधीश होण्याच्या परीक्षेमध्ये यश मिळवले होते.

“मला नेहमी माझ्या शिक्षणासाठी घरच्यांनी प्रवृत्त केले, पाठिंबा दिला. आमची आर्थिक परिस्थिती कधीच आमच्या शिक्षणाच्या आड आली नाही याचं सर्वस्वी श्रेय माझ्या वडिलांचं आहे. समाजातील लोकांचा मुलींच्या शिक्षणाला असणारा विरोध पत्करूनही वडिलांनी आमचे शिक्षण थांबवले नाही ते नेहमी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते आणि म्हणूनच मी हे यश मिळवू शकले.” – शाहनवाज पठाण

आधी निकिशा पठाण आणि आता शाहनवाज पठाण या दोन तरुण मुस्लिम युवतींनी न्यायाधीश होण्यासाठीचा परीक्षेत यश मिळवून भविष्यातील कित्येक तरुण मुस्लिम महिलांसाठी एक प्रेरणेची वाट निर्माण केली आहे.


हे ही वाचा 👉🏽 आणि चंद्रपूर मधली पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश झाली..

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here